चालू घडामोडी : ३१ मे

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

  • महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
  • फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते.
  • पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले.
  • आणीबाणीच्या काळात त्यांनी ३ महिने तुरुंगवासही भोगला. यानंतर मिसाबंदी म्हणूनही ९ महिने ते तुरुंगात होते.
  • १९७७मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
  • फुंडकर यांनी ३ वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे तर १९७८ व १९८०मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
  • फुंडकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे.
  • ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट कृषीमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
  • १९८३ मध्ये कापूस प्रश्नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
  • त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले.
  • अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. मुंडे आणि फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती.
  • २००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना २००६-०७ या वर्षाचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

  • समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेला राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल अखेर ३० मे रोजी जाहीर झाला.
  • या परीक्षेत जळगाव येथील रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम आला आहे. मुलींमध्ये पुणे येथील रोहिणी नऱ्हे, तर राखीव गटातून सोलापूर येथील अजयकुमार नष्टे हे उमेदवार प्रथम आले आहेत.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) उपजिल्हाधिकारी पदाच्या १४ जागांसह एकूण ३७७ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
  • यात पूर्वपरीक्षेसाठी १,९८,५९९ उमेदवार बसले होते. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे टप्पे पार करून १,१९४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
  • विद्यार्थ्यांना हा निकाल एमपीएससीच्या https://www.mpsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येईल.
  • हा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.

भारत इंडोनेशिया दरम्यान १५ करार

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांचा इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांचा दौरा ३० मेपासून सुरु झाला आहे.
  • इंडोनेशियामध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची मार्डेका पॅलेस येथे भेट घेतली.
  • त्यानंतर ३१ मे रोजी मोदींनी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे जाऊन मलेशियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महाथिर मोहंमद यांचे अभिनंदन केले.
  • यावेळी दोन्ही देशांदरम्यान १५ करारांवर सह्या करण्यात आल्या. तसेच मोदींनी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या विनामूल्य व्हिसाची घोषणाही केली.
  • इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रण त्यांनी दिले आहे.
  • इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे.

वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी

  • एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.
  • आंततराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने संजिता उत्तेजक चाचणी दोषी आढलली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे संजिता चानूला सुवर्णपदक गमवावे लागण्याची शक्यता आहे.
  • उत्तेजकांच्या यादीत असलेले द्रव्य संजिताच्या शरीरात आढळले असून तिच्यावर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.
  • संजिताने ५३ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव करत एकूण १९२ किलो वजन उचलत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
  • २०१४मध्ये वर्षांपुर्वी ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते.
  • कुंजाराणी देवी यांच्यापासून प्रेरणा घेत संजिताने वेटलिफ्टिंगमध्ये रस घेण्यास सुरुवात केली होती.

झिनेदिन झिदान रियल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

  • रियल माद्रिद क्लबला सलग तीन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून देणारे त्यांचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी क्लबच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
  • राफाएल बेनिटेझ यांच्यानंतर झिदान यांनी रीयाल माद्रिदचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने ९ जेतेपदे पटकावली.
  • आतापर्यंत झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रीयाल माद्रिद १४९ सामने खेळला. त्यापैकी माद्रिदने १०४ सामन्यांत विजय मिळवला, तर २९ सामन्यांमध्ये बरोबरी साधली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा