चालू घडामोडी : २ जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरला भेट

  • आपल्या ५ दिवसीय आसियान देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरला भेट दिली.
  • नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे माजी पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी क्लीफर्ड पियर येथे महात्मा गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण केले.
  • १९४८मध्ये गांधीजींच्या अस्थी विसर्जनासाठी भारतासह जगभरात पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये सिंगापूरमधील क्लीफर्ड पियर ही जागा सामील आहे.
  • याशिवाय मोदींनी नॅशनल ऑर्किड गार्डन ऑफ सिंगापूर येथेही भेट दिली. त्यावेळी येथील एका ऑर्किडला त्यांचे नाव देण्यात आले. डेन्ड्रोबियम नरेंद्र मोदी असे आर्किडचे नामकरण करण्यात आले आहे.
  • हे ऑर्किड मोठे व उष्णकटिबंधीय भागातील असून त्यात ३८ सेमी लांब फुलांचा समुच्चय असतो. त्यात १४ ते २० फुले सुंदर रचनेत साकारलेली असतात. त्यात काही पाकळय़ा वेगळय़ा पद्धतीने वळलेल्या असतात. यात वेगवेगळी रंगसंगती असते.
  • मोदी यांनी नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीलाही भेट दिली. यावेळी ही युनिव्हर्सिटी आणि भारतातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य व औद्योगिक भागीदारीसंबंधी एकूण ६ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • पंतप्रधान मोदी यांनी नंतर सिंगापूरमधील श्री मरियाम्मन हिंदू मंदिरास भेट देऊन प्रार्थना केली. हे मंदिर १८२७ मध्ये नागपट्टणम व कडलोर येथून आलेल्या स्थलांतरितांसाठी बांधलेले असून ते मरियाम्मन देवतेचे आहे. संसर्गजन्य व इतर रोग बरी करणारी ही देवता मानली जाते.
  • या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगी नौदल तळाला भेट देऊन भारतीय व रॉयल सिंगापूर नौदला अधिकाऱ्यांशी यांच्याशी चर्चा केली.
  • भारत व सिंगापूर यांच्यात सागरी क्षेत्रातही सहकार्य असून, गेली पंचवीस वर्षे दोन्ही देशांत अखंडपणे नौदल कवायती सुरू आहेत.
  • यावेळी भारत व सिंगापूर यांच्या नौदलांमध्ये सहकार्य करार झाला. त्यात पाणबुडय़ा, नौदल विमाने, जहाजे या बाबतच्या सेवा एकमेकांना पुरवण्याचा समावेश आहे.

तमिळ कवी एम. एल. (लेनिन) थंगप्पा यांचे निधन

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तमिळ कवी एम. एल. (लेनिन) थंगप्पा यांचे २ जून रोजी निधन झाले.
  • तमिळनाडूच्या कुरुम्बळपेरि गावात (जि. तिरुनेलवेलि) १९३४साली जन्मलेल्या थंगप्पांचे वयाच्या २१व्या वर्षी बालकवितांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्या १९५५च्या पुस्तकाच्या आवृत्त्या आजही निघतात.
  • १९६७पर्यंत त्यांनी पुद्दुचेरीमध्ये विविध शाळांमध्ये इंग्रजी शिकवले आणि १९६८ पासून १९८८ पर्यंत त्यांनी टागोर आर्ट्स कॉलेजमध्येत इंग्रजीचे अध्यापन केले. भारतीसदन महिला महाविद्यालयात पुढे त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
  • त्यांच्या नावावर आयुष्यभरात ५० हून अधिक पुस्तके आहेत. त्यांपैकी अनेक अनुवाद आहेत. तमिळमधून इंग्रजीत थंगप्पांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके ही पद्यानुवाद आहेत.
  • त्यांच्या ‘चोलक कोल्लइ बोम्मई’ (बुजगावणे) या तमिळ बालकविता संग्रहाला २०११चा साहित्य अकादमी बालवाङ्मय पुरस्कार मिळाला होता.
  • त्यानंतर पुढील वर्षी (२०१२) ‘लव्ह स्टँड्स अलोन’ या संगम काव्याच्या इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कारही मिळाला होता.

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे पासपोर्ट ब्लॉक

  • पाकिस्तान सरकारने गृह मंत्रालयाला माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र कार्ड (एनआयसी) आणि पासपोर्ट ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे.
  • देशद्रोह प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्याने परवेझ मुशर्रफ यांच्या परदेशी प्रवास तसेच इतर गोष्टींवर बंधने येणार आहेत.
  • या कारवाईमुळे परवेझ मुशर्रफ परदेशात प्रवास करु शकणार नाही. तसेच त्यांच्या बँकिंग व्यवहारावरही बंधने येणार आहेत.
  • याशिवाय पाकिस्तान किंवा परदेशातील आपली कोणतीही संपत्ती विकण्याचा तसेच खरेदी करण्याची त्यांना परवानगी नाही.
  • २००७मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू करण्यात आला आहे.
  • एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या अटकेचा आदेश दिला होता.

डेन्मार्कमध्येही बुरखाबंदी

  • अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
  • येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १ हजार क्रोनर (डेन्मार्क चलन) दंड ठोठावण्यात येईल.
  • दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन करताना पकडले तर १० हजार क्रोनरचा दंड किंवा ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  • डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी आणि पारंपारिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही.
  • या निर्णयामुळे यापुढे डेन्मार्कमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा आणि निकाब परिधान करता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा