चालू घडामोडी : ४ जून

रिझर्व्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी एम. के. जैन

  • आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. के. जैन यांची रिझर्व्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • बँक क्षेत्रातून नियुक्त करण्यात येणाऱ्या पदाकरिता जैन यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर जैन हे पुढील तीन वर्षांसाठी असतील.
  • डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा हे जुलै २०१७मध्ये निवृत्त झाल्यापासून आरबीआयचे चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्त होते.
  • रिझर्व्ह बँकेत सध्या विरल आचार्य, एन. एस. विश्वनाथन आणि बी. पी. कांगो हे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत.
  • जैन हे आयडीबीआय बँकेत मार्च २०१७पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत.
  • तीन दशकांचा अनुभव असलेल्या जैन यांनी यापूर्वी इंडियन बँकत वरिष्ठ अधिकारी पदावर जबाबदारी हाताळली आहे.

दिल्लीत राज्यपालांच्या संमेलनाचे आयोजन

  • सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपालांचे दोन दिवसांचे संमेलन ४ आणि ५ जूनला दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे.
  • राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात भाषण करणार आहेत.
  • पहिले राज्यपाल संमेलन १९४९मध्ये तत्कालिन गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
  • यंदा होणारे संमेलन हे राज्यपालांचे ४९वे आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील दुसरे संमेलन असेल.
  • या संमेलनात वेगवेगळ्या सत्रांत अंतर्गत सुरक्षा, रोजगार, उच्चशिक्षण, कौशल्य विकास यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर विचारविनिमय होणार आहे.
  • संमेलनात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, कौशल्य विकास राज्यमंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या मंत्रालयांचे अधिकारीही सहभागी होतील.

इंटरकॉन्टिनेंटल चषक : भारताची केनियावर मात

  • इंटरकॉन्टिनेंटल चषकाच्या अंधेरीतल्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने केनियावर ३-० अशी मात केली. भारताचा या स्पर्धेतला हा दुसरा विजय ठरला.
  • आपल्या कारकिर्दीचा १००वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने या सामन्यात दोन गोल झळकावले. यापूर्वी चीन तैपेई विरुद्ध सामन्यात भारताकडून सुनील छेत्रीने गोलची हॅटट्रीक झळकावली होती.
  • केनियाचा दुबळा बचाव भारताच्या आक्रमण करणाऱ्या फळीला थांबवू शकला नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
  • सुनील छेत्रीने या सामन्यातील २ गोलसह आपली गोलसंख्या ६१वर नेत डेव्हिड व्हिलाला (५९) मागे टाकले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत त्याने तिसरे स्थान मिळवले आहे.
  • या क्रमवारीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (८१) पहिल्या तर अर्जेंटिनाचा मेस्सी (६४) दुसऱ्या स्थानावर आहे.
  • याशिवाय बायचुंग भुतियानंतर १०० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही छेत्रीला मिळाला. त्यासाठी त्याला सामन्याआधी भुतिया व आय. एम. विजयन या मातब्बर फुटबॉलपटूंच्या हस्ते गौरवण्यात आले.

फिफा विश्वचषक २०१८

  • फिफा विश्वचषक २०१८ ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा १४ जून ते जुलै १५ दरम्यान रशियामध्ये खेळवली जाईल.
  • रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. डिसेंबर २०१० मध्ये झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.
  • विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व २१० सदस्य राष्ट्रांनी पात्रता फेरीमध्ये भाग घेतला. यजमान रशियासह जगातील एकूण ३२ संघ ह्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत भाग घेतील.
  • १२ मार्च २०१५ ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात पात्रता फेरीचे एकूण ८७२ सामने खेळवण्यात आले ज्यांमधून ३१ संघांना मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला. तर यजमान रशियाला थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळाला.
  • आईसलँड व पनामा ह्या देशांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला, तर इटली व नेदरलँड्स ह्या दिग्गज युरोपीय संघांवर पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली.
  • तसेच घाना व आयव्हरी कोस्ट ह्या बलाढ्य आफ्रिकन संघांना देखील मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले.
  • यापूर्वीची फिफा विश्वचषक २०१४ ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली गेली. जर्मनी संघाने अर्जेंटिनाचा पराभव करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
 टेलस्टार १८ 
  • फिफा वर्ल्ड कप २०१८मध्ये ‘टेलस्टार १८’ या फुटबॉलने सामने खेळले जाणार आहे. हे बॉल पाकिस्तानातील एका कंपनीने तयार केले आहेत.
  • टेलस्टार १८ हा बॉल आदिदास या कंपनीने डिझाईन केला असून फुटबॉल वर्ल्ड कपसाठी बॉल डिझाईन करण्याची आदिदासची ही १३वी वेळ आहे.
  • फुटबॉलच्या पहिल्या वर्ल्ड कपमधील बॉललाही टेलस्टार १८ हे नाव देण्यात आले होते. तेच नाव आदिदासने पुन्हा एकदा वापरले आहे.
  • टेलस्टार १८ हा बॉल हा तयार करण्याचे काम पाकिस्तानच्या सियालकोटमधील फॉरवर्ड स्पोर्ट कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी आपल्या खेळ वस्तूंच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.
  • या कंपनीत प्रत्येक महिन्यात ७ लाख बॉल तयार केले जातात. २०१४ विश्व चषकासाठीही याच कंपनीने फुटबॉल तयार केले होते.
 व्हिक्टोरिया लोपीरेवा 
  • २००३मध्ये मिस रशिया स्पर्धेची विजेती ठरलेली व्हिक्टोरिया लोपीरेवाची फिफा विश्वचषक २०१८च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.
  • व्हिक्टोरियाचा जन्म २८ जुलै १९८३मध्ये रशियात झाला. तिने रोस्टोव्ह स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे.
  • ‘मॉडेल ऑफ डॉन’, ‘फेस ऑफ द इयर’, ‘रोस्टोव्ह ब्युटी’ आणि ‘डॉनबास ओपन’ या स्पर्धांच्या विजेतेपदामुळे ती नावारुपास आली.
  • २००७मध्ये ‘फुटबॉल नाइट’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा व्हिक्टोरियाच्या खांद्यांवर होती. ज्यानंतर तिला या खेळात रस वाटू लागला.
  • व्हिक्टोरिया फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
  • ज्याच्या माध्यमातून ती रशियन संस्कृतीचा प्रचार करणार आहे. त्याशिवाय ती या खेळाच्या आयोजनामागची काही महत्त्वाची उद्दिष्ट सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे.

इटलीच्या पंतप्रधानपदी जुजेपी कोंटे

  • जुजेपी कोंटे यांनी ४ जून रोजी इटलीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाला आहे.
  • नवे आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा