चालू घडामोडी : ७ जून

साखर उद्योगाला सरकारकडून ७ हजार कोटी रुपयांची मदत

  • आर्थिक संकटग्रस्त साखर उद्योगाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ७ जून रोजी ७ हजार कोटी रुपयांच्या मदत योजनेची घोषणा केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदत योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • यापूर्वी सरकारने वेळोवेळी संकटग्रस्त साखर उद्योगाच्या मदतीसाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत.
  • यामध्ये साखरेवरील आयात शुल्कात ५० वरून १०० टक्क्यांपर्यंत वाढ, साखरसाठा नियंत्रण आदेश, साखर निर्यातीवरील शुल्क रद्द करणे, प्रत्येक कारखान्याला निर्यातीचा कोटा निश्चित करून देणे आदींचा समावेश होता.
 या योजनेत खालील तीन घटकांचा समावेश आहे. 
  • बफर स्टॉक : एक वर्षासाठी साखरेचा ३० लाख टनांचा बफर स्टॉक तयार केला जाईल. यासाठी कारखान्यांकडे विक्रीविना पडून असलेली साखर सरकार खरेदी करेल.
  • यासाठी अंदाजे ११७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बाजारभाव आणि साखरेची उपलब्धता लक्षात घेऊन या राखीव साठ्याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्यातर्फे केव्हाही आढावा घेण्यात येईल.
  • या योजनेखाली दिली जाणारी रक्कम दर तीन महिन्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरण्यात येईल.
  • त्या कारखान्यातर्फे म्हणून ही रक्कम दिली जाईल आणि शेतकऱ्यांच्या उसापोटीच्या थकबाकीपोटीची ती रक्कम असेल.
  • साखरेचा किमान दर : जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली साखर किंमत नियंत्रण आदेश अधिसूचित केला जाईल. फॅक्टरी गेट दर त्यात अधिसूचित केला जाईल. या अधिसूचित दरापेक्षा कमी दराने साखर विक्रीला बंदी करण्यात येईल.
  • ऊस व त्यापासून साखरनिर्मितीच्या रास्त किफायतशीर किमतीच्या (एफआरपी) आधारे ही किंमत निश्चित करण्यात येईल.
  • सुरवातीला ही किंमत २९ रुपये किलो अशी ठेवण्यात आली आहे; परंतु नियमित आढावा घेऊन त्यात वाढ करण्यात येईल.
  • हे करताना बाजारातील साखरेची उपलब्धता, तसेच साखरेच्या किमती स्थिर राखण्याचे प्रमुख उद्दिष्ट राहील.
  • यंदाच्या गळित हंगामात सप्टेंबरपर्यंत कारखान्यांच्या साखर साठ्यांवर बंधने आणून बाजारात पुरेशी साखर वाजवी दराने उपलब्ध होईल याची खात्री केली जाईल.
  • बँक कर्जांवर व्याज परतावा : भविष्यात मागणीहून जास्त साखर उत्पादनाची वेळ येईल, तेव्हा कारखान्यांनी जास्तीच्या साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन करावे यासाठी प्रोत्साहन देण्यातयेईल.
  • यासाठी साखर कारखान्यांमध्ये असलेल्या वर्तमान डिस्टिलरींचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण यासाठीही आर्थिक मदत करण्यात येणार.
  • उसाचा चोथा, गॅस यांच्या आधारे बॉयलर आणि नव्या डिस्टीलरी चालविण्यासाठी ही मदत असेल.
  • यासाठीच्या आर्थिक साह्यावरील १३३२ कोटी रुपयांच्या व्याजाचा बोजा सरकारतर्फे उचलण्यात येईल. पाच वर्षांसाठी ही योजना लागू राहील
 साखरेचे अतिरिक्त उत्पादन 
  • गेल्या वर्षी ३.१५ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले. दरवर्षी सुमारे २.५ कोटी टन साखरेचे उत्पादन होते. अतिरिक्त साखर कारखान्यात पडून आहे.
  • अतिरिक्त साखर उत्पादनामुळे कारखान्यांना उत्पादन मूल्यापेक्षा कमी दरात म्हणजे २६ रुपये किलो दराने साखर विकावी लागत आहे.
  • साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्यामुळे ऊसकरी शेतकऱ्यांचे २२ हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडून थकले आहेत. त्यापैकी काही रकमेची तरी परतफेड या पॅकेजमुळे होऊ शकेल.

विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) २०१६-१७ आणि २०१७-१८चा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • या पुरस्कारावर कोहलीने चौथ्यांदा नाव कोरले आहे. कोहलीने आतापर्यंत २०११-१२, २०१३-१४, २०१६-१७ आणि २०१७-१८साठी हा पुरस्कार पटकावला आहे. चार वेळा पुरस्कारावर नाव कोरणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.
  • महिला क्रिकेटपटूंमध्ये २०१७-१८साठी महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाची, तर २०१६-१७साठी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.
  • हरमनप्रीत आणि स्मृतीने गेल्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत प्रवेश करता आला होता.
  • स्मृतीने ४१ वनडे सामन्यांत ३७.५३च्या सरासरीने १४६४ धावा केल्या असून, २८ टी-२० सामन्यांत ७८१ धावा केल्या आहेत.
  • सर्वोत्तम राज्य संघटना म्हणून २०१६-१७साठी क्रिकेट एसोसिएशन ऑफ बंगालची, तर २०१७-१८साठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनची निवड करण्यात आली.
  • याशिवाय बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या नावाने चार पुरस्कार देण्यासही यावर्षापासून सुरुवात करण्यात आली.
 बीसीसीआयचे २०१६-१७चे पुरस्कार 
  • कर्नल सी. के नायडू जीवनगौरव पुरस्कार : पंकज रॉय
  • बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार (महिला) : डायना एडल्जी
  • बीसीसीआय विशेष पुरस्कार : अब्बास अली बेग, नरेन ताम्हाणे
  • पॉली उम्रीगर पुरस्कार : विराट कोहली
  • सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : हरमनप्रीत कौर
  • रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : परवेझ रसूल (जम्मू-काश्मीर)
  • देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : कृणाल पंड्या
  • जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : पूनम राऊत
 बीसीसीआयचे २०१७-१८चे पुरस्कार 
  • कर्नल सी. के नायडू जीवनगौरव पुरस्कार : अंशूमन गायकवाड
  • बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार (महिला) : सुधासिंग
  • बीसीसीआय विशेष पुरस्कार : बुधी कुंदरन
  • पॉली उम्रीगर पुरस्कार : विराट कोहली
  • सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : स्मृती मंधाना
  • रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : जलज सक्सेना (केरळ)
  • देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : दिवेश पठाणी
  • जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : दीप्ती शर्मा

जागतिक आशा निर्देशांकांत भारत ८४व्या स्थानी

  • एखाद्या देशाने सकारात्मक विचार करत विकासाची अथवा बदलाची आशा धरल्यास होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आशा निर्देशांक काढण्यास सुरवात करण्यात आली आहे.
  • केवळ एखाद्याच क्षेत्रातील अभ्यासावरून क्रमवारी काढण्याऐवजी तुलनात्मक बदलांचा अभ्यास करून राहुल वासलेकर यांनी ही नवी यादी तयार केली आहे.
  • जगभरातील १३१ देशांमध्ये सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या या यादीत भारत ८४व्या स्थानावर आहे.
  • आशेमुळे एखाद्या देशाच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत बदल घडून येतो का?, हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले.
  • एखादी सकारात्मक गोष्ट घडावी, अशी अपेक्षा करणे म्हणजे आशा अशी सर्वसामान्य व्याख्या आहे. ही वैयक्तिक बाब असली तरी सर्वेक्षण करताना ती सामाजिक बाब म्हणून ध्यानात घेतली गेली.
  • दहशतवाद, स्थलांतर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरात सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण होत असताना लोकांमध्ये आशेचा किरण कायम राहावा, या उद्देशाने जागतिक आशा निर्देशांकची सुरवात करण्यात आली आहे.
  • आपत्तीमध्ये आशा कायम ठेवल्याने समाजामध्ये काय आणि किती बदल झाला, नागरिकांचे बदललेले जीवनमान आणि आर्थिक स्थिती याची छाननी या वेळी घेण्यात आली.
  • तसेच, गेल्या काही वर्षांमधील सामाजिक व इतर बदल, जागतिक बॅंकेसारख्या संस्थांनी गोळा केलेली माहिती यांचा अभ्यासही करण्यात आला.
  • एखाद्या देशाने संशोधनासाठी काय केले, शिक्षणक्षेत्रातील प्रगती, नागरिकांना पाणी आणि विजेसारख्या सुविधा देण्यासाठीचे प्रयत्न, राजकीय स्थैर्य यांचाही अभ्यास केला गेला.
  • एखाद्या देशातील दीर्घकालीन अथवा अल्पकालीन बदलाचा किती प्रभाव पडतो, याचा अंदाज या निर्देशांकामुळे येतो.
  • आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या बाबींपलीकडे राजकारण, संशोधन यांच्याकडे पाहण्याची गरज असली तरी या मूळ बाबींशिवाय देशाला कोणत्याही बाबतीत आशा ठेवता येणार नाही, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
जागतिक आशा निर्देशांक यादीतील प्रमुख देश
क्रमांक देश गुण
१. आयर्लंड ०.७२७
७. सिंगापूर ०.६९१
१७. अमेरिका ०.६५१
२४. जपान ०.६२६
४४. भूतान ०.५६४
५३. चीन ०.५३१
७५. श्रीलंका ०.४८५
८४. भारत ०.४६८
१२७. पाकिस्तान ०.३०५

मिताली राजच्या टी-२०मध्ये २००० धावा

  • भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
  • मितालीने ७४ सामन्यांत ३८.०१च्या सरासरीने २०१५ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
  • मलेशियात महिला आशिया करंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मितालीने २३ चेंडूत ३३ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.
  • मितालीचा अपवाद वगळता एकाही महिला अथवा पुरुष भारतीय खेळाडूला हा विक्रम साधता आलेला नाही. विराट कोहलीच्या खात्यावर सध्या १९८३ धावा जमा आहेत.
  • दोन हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही सातवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीमध्ये इंग्लंडची कार्लोस एडवर्ड्स ही २६०५ धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
  • पुरुषांमध्ये मार्टिन गुप्टिल (२२७१), ब्रेंडन मॅकलम (२१४०) आणि विराट कोहली (१९८३) हे अनुक्रमे एक ते तीन स्थानावर आहेत.
  • मिताली ही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकदिवसीय सामने (१९४) खेळणारी क्रिकेटपटू असून, सर्वाधिक ६३७३ धावांचा विक्रमदेखील तिच्याच नावे आहे.

मायक्रोसॉफ्टकडून गिटहबचे अधिग्रहण

  • गिटहब ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी विकत घेण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतला आहे. हा करार साडेसात अब्ज डॉलरचा असेल.
  • मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरचे सोर्सकोड सहजपणे उपलब्ध नसतात. गिटहब ही कंपनी इतरांना याबाबतीत सहकार्य करते.
  • सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांना अधिक मोकळीक, पारदर्शकता आणि संशोधन यासाठी या कराराचा फायदा होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांचे मत आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांचा राजीनामा

  • ६ वर्षे न्यूझीलंडच्या संघासोबत काम केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा यासाठी हेसन यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.
  • पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापर्यंत हेसन यांनी संघासोबत कायम राहावे यासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले, पण हेसन यांनी त्यास नकार दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा