चालू घडामोडी : ११ जून

भारताला इंटरकाँटिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद

  • कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या दोन गोलमुळे भारताने केनियाला २-० ने पराभूत करून इंटरकाँटिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • या सामन्यात छेत्रीने पहिल्यांदा ८व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २९व्या मिनिटाला आणखी एक गोल करून मेस्सीची बरोबरी केली.
  • भारताने यूएईत २०१९मध्ये होणाऱ्या आशियाई कपसाठी तयारीच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
  • ओगिंगा आणि ओवेला ओचिंगने केनियासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु, भारतीय डिफेंडर्सनी त्यांच्या योजना धुळीस मिळवल्या.
  • छेत्री या दोन गोलसह सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल खेळाडुंच्या यादीत अर्जेंटिनाचा खेळाडु लिओनेल मेस्सीबरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
  • या दोन खेळाडुंच्या नावावर आता ६४ आंतरराष्ट्रीय गोलची नोंद आहे. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो छेत्री आणि मेस्सीपेक्षा अधिक गोल करत प्रथम स्थानी आहे. त्याच्या नावे १५० सामन्यात ८१ गोलची नोंद आहे.
  • इंटरकाँटिनेंटल चषकातील ४ सामन्यात भारताचे एकूण ११ गोल झाले त्यापैकी ८ गोल एकट्या छेत्रीने केले आहे.
  • त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इंटरकॉन्टिनेंटल चषक २०१८ स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना ८७,००० कोटींचा तोटा

  • बुडीत कर्जांसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना २०१७-१८ या वर्षात ८७,००० कोटींचा तोटा झाला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील २१ बॅंकांपैकी इंडियन बॅंक आणि विजया बॅंक वगळता सर्वच बॅंकांना तोटा सहन करावा लागला आहे.
  • नीरव मोदी प्रकरणात जबर आर्थिक फटका बसलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात १२,२८३ कोटींचा तोटा झाला.
  • डिसेंबर २०१७ अखेर सार्वजनिक बॅंकांमधील बुडीत कर्जे ८.३१ लाख कोटींपर्यंत वाढल्याने, बुडीत कर्जांसाठी बॅंकांना तरतूद करावी लागली. परिणामी, बहुतांश बॅंकांना तोटा झाला.
  • गेल्या आर्थिक वर्षात ५ सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेला सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला ६,५४७ कोटींचा तोटा झाला आहे.
  • त्यामुळे २१ पैकी ११ बॅंका या रिझर्व्ह बॅंकेच्या रडारवर आल्या असून, त्यांच्यावर कर्ज वितरणासंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • आर्थिक घोटाळे आणि बुडीत कर्जे यामुळे बॅंकांचा ताळेबंद कमजोर झाला असल्याने आर्थिक कामगिरी खालवली आहे.
  • बुडीत कर्जांची समस्या निकाली काढण्यासाठी सरकारने स्वत:चीच मालमत्ता पुनर्बाधणी कंपनी (एआरसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, येत्या २ आठवड्यांत या समितीचा अहवाल सरकारला प्राप्त होणार आहे.
  • आरबीआयने निर्बंध घातलेल्या ११ बॅंकां :-
  1. अलाहाबाद बँक
  2. कॉर्पोरेशन बँक
  3. युको बँक
  4. बँक ऑफ इंडिया
  5. इंडियन ओव्हरसीज बँक
  6. देना बँक
  7. बँक ऑफ महाराष्ट्र
  8. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  9. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  10. युनायटेड बँक ऑफ इंडिया
  11. आयडीबीआय बँक

प्रा. मार्टिन ग्रीन यांना प्रतिष्ठेचा जागतिक ऊर्जा पुरस्कार

  • युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स या संस्थेतील प्रा. मार्टिन ग्रीन यांना प्रतिष्ठेचा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रकाशीय सौर विद्युतघटावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे व क्रांतिकारी ठरले आहे.
  • हा पुरस्कार ८ लाख २० हजार डॉलर्सचा असून, हा पुरस्कार पटकावणारे मार्टिन ग्रीन पहिलेच ऑस्ट्रेलियन व्यक्ती आहेत.
  • १४ देशांच्या ४४ स्पर्धकांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. नोबेलनंतर महत्त्वाचे मानले जाणारे हे पारितोषिक असून, स्पेस एक्सचे इलन मस्क हेही या स्पर्धेत होते.
  • ब्रिस्बेनमध्ये जन्मलेल्या ग्रीन यांनी क्वीन्सलँड विद्यापीठातून पदवी तर कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे.
  • त्यांच्या नावावर अनेक शोधनिबंध व पेटंट्स आहेत. प्रोफेसर ग्रीन हे ‘ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड फोटोव्होल्टॅइकस’ या संस्थेचे संचालक आहेत.
  • त्यांनी सौर प्रकाशीय विद्युतघटांची कार्यक्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढवली तर आहेच, शिवाय त्यांनी शोधलेले तंत्रज्ञान कमी खर्चीकही आहे.
  • मोनोक्रिस्टलाइन व पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेलची निर्मिती हा ग्रीन यांचा विशेष संशोधन विषय आहे.
  • त्यांनी पीईआरसी सोलर सेलचा शोध लावला असून २०१७अखेरीस सिलिकॉन सेलच्या उत्पादनात या प्रकारच्या सेलचे (विद्युतघट) प्रमाण अधिक आहे.
  • शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांनी गेली ३० वर्षे केलेले काम हे फार उल्लेखनीय आहे. सौरघटांची क्षमता वाढवतानाच त्याची किंमत कमी करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
  • कार्ल बोअर सौरऊर्जा पदक, सोलर वर्ल्ड आइनस्टाइन अवॉर्ड असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

भारतात माता मृत्यूदरात कमालीची घट

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवाडीनुसार, गेल्या काही वर्षात भारतात माता मृत्यूदरात कमालीची घट झाली आहे.
  • १९९०मध्ये एक लाख जन्मांमागे ५५६ इतका असलेला माता मृत्यू दर २०१६मध्ये १३०पर्यंत खाली आणण्यात यश आले आहे.
  • २०३०पर्यंत हा दर ७०पर्यंत आणण्याचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल) साध्य करण्याच्या दृष्टीने भारत प्रगतीपथावर आहे.
  • भारताने गर्भवती मातांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रयत्न केले असून, २००५च्या तुलनेत यासंबंधीच्या सुविधा दुप्पट मातांपर्यंत पोहचत आहेत.
  • सार्वजनिक रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसुतींचे प्रमाण २००५मधील १८ टक्क्यांवरून तिप्पट होऊन २०१६मध्ये ५२ टक्के झाले आहे. खासगी रुग्णालयांमदील प्रसुतीही गृहीत धरल्या, तर हे प्रमाण ७९ टक्के आहे.
  • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक रुग्णालयांमध्ये निशुल्क प्रवास व प्रसुतीमुळे याबाबत शहरी व ग्रामीण भागात असलेली तफावत दूर होत आहे.
  • त्याखेरीज सरकारी व खासगी रुग्णालयांच्या समन्वय, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत गरोदरपणातील तपासण्या, स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला यांची वाढलेली उपलब्धता, जोखमीच्या प्रसुतींवर लक्ष ठेवणे आदींचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
  • भारतात २०१३च्या तुलनेत माता मृत्यू दरात तब्बल २२ टक्के घट झाली असून २०११-१३मध्ये दर लाखामागे १६७ असलेले हे प्रमाण २०१४-१६मध्ये १३०वर आल्याचे समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा