चालू घडामोडी : १२ जून

राजकीय गुरु भय्युजी महाराज यांची आत्महत्या

 • राजकीय गुरु अशी प्रतिमा असलेले भय्युजी महाराज यांनी १२ जून रोजी इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
 • माझ्यावर असलेला तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करतो आहे, असे लिहिलेली चिट्ठी पोलिसांना मिळाली आहे.
 • गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते. त्याच वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.
 • भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे २०१५मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याबरोबर दुसरा विवाह केला.
 • भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर, त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने त्यांची दुसरी पत्नी डॉ. आयुषीला भय्यू महाराज यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे.
 • त्यावर आयुषी शर्मा यांनी कुहूचे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व वादासाठी आयुषीने कुहूला जबाबदार धरले आहे.
 • त्यामुळे भय्यूजी महाराज यांनी कौटुंबिक कलहाला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असण्याचीही दाट शक्यता आहे.
 भय्यूजी महाराज यांच्याबद्दल 
 • २९ एप्रिल १९६८ रोजी मध्यप्रदेशमधील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख होते.
 • मध्यप्रदेश व महाराष्ट्रात त्यांना लोक भय्यूजी महाराज म्हणून ओळखतात. या दोन राज्यांत त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. तसेच अनेक राजकारणी त्यांना राजकीय गुरु मानत होते.
 • महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रसंताचा दर्जा बहाल करण्यात आला होता. ते सूर्याची उपासना करायचे. तसेच त्यांनी पाण्यातही साधना केली होती.
 • तरुण वयात त्यांनी सियाराम शूटिंग शर्टिंगच्या पोस्टरसाठी मॉडेलिंगही केले होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता.
 • वयाची चाळिशी गाठण्यापूर्वीच त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या, असा दावा त्यांचे भक्त करतात.
 • दत्तगुरुंना आपले गुरु मानणाऱ्या भय्युजी महाराजांनी दत्त संप्रदायाची शिकवण आपल्या आचरणातून समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.
 • कलाकार, गायक, राजकारणी, उद्योजक अशा अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा त्यांनी मोकळेपणाने स्वीकार केला होता.
 • दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते जवळचे समजले जायचे. भाजपा नेते नितीन गडकरी ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता.
 • भय्यूजी महाराज पद, पुरस्कार, शिष्य आणि मठाचे विरोधी होते. व्यक्तिपूजेचा ते नेहमीच द्वेष करत आले आहेत.
 • त्यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सूर्योदय चळवळीतून शिक्षा, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
 • कृषी तीर्थ प्रकल्प, सूर्योदय ग्राम समृद्धी योजना, सूर्योदय स्वयंरोजगार योजना, तीर्थ क्षेत्र स्वच्छता अभियान, दारिद्र्य निर्मूलन अभियान, एड्स जनजागृती अभियान आदी प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवले.
 • मध्यप्रदेश सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पण भय्यूजी महाराज यांनी राज्यमंत्रिपद नाकारले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातला सहभागही कमी केला होता.
 • अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरिता राजकीय नेते मध्यस्थीसाठी भय्यूजी महाराजांना विनंती करायचे.
 • अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात ऐतिहासिक बैठक

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील ऐतिहासिक बैठक सिंगापूरच्या सेन्टोसा बेटावर १२ जून रोजी पार पडली.
 • दोघांनीही शिखर परिषदेनंतर संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. परंतु नेमक्या कोणत्या गोष्टींवर त्यांची सहमती झाली आहे याचा खुलासा केला नाही.
 • दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम यांनी अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळली. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई यांनी उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळली.
 • किम जोंग यांनी यावेळी भूतकाळ मागे ठेवण्याचा निर्णय घेतला असून, जगाला खूप मोठा बदल पहायला मिळेल असे म्हटले आहे.
 • उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे.
 • उत्तर कोरियाने अण्वस्त्रविकास कार्यक्रम मोडीत काढून, कोरियन उपखंड अण्वस्त्रमुक्त करण्याचे वचन दिले आहे.
 • अमेरिकेने उत्तर कोरियाला सुरक्षेची हमी देताना, दक्षिण कोरियासोबत होणारे प्रक्षोभक लष्करी सराव थांबविण्याचे जाहीर केले.
 • जागतिक शांततेस मोठा धोका ठरू शकणारा तणाव व संघर्ष मिटविण्याच्या या कराराचे भारतासह अनेक देशांनी स्वागत केले.
 • त्रयस्थ देश या नात्याने यजमानपद करणाऱ्या सिंगापूरला या बैठकीसाठी तब्बल २० दशलक्ष सिंगापूर डॉलर खर्च आला.

प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन यांचे निधन

 • अरबी आणि उर्दू भाषांचे जाणकार आणि इस्लामी धर्मसाहित्याचे आणि त्यासोबत सूफी संतविचारांचे अभ्यासक प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन यांचे वयाच्या ७९व्या वर्षी ३ जून रोजी निधन झाले.
 • भारतीय उपखंडातील एका भाषेवर निस्सीम प्रेम करणारे एक अमेरिकी प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.
 • दिवंगत प्राध्यापक मोहम्मद उमर मेमन हे भारतीय म्हणून जन्मले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील इस्लामी धर्मसाहित्याचे जाणकार प्राध्यापक अब्दुल अजीज मेमन हे त्यांचे वडील.
 • १९५४साली हे कुटुंब अलिगढहून कराचीस गेले. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण कराचीतच झाले. अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळाल्याने हार्वर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात इस्लामी धर्मसाहित्याचा अभ्यास केला.
 • ते विविध विद्यापीठांत अभ्यागत म्हणून शिकवू लागले. मॅडिसन शहरातील विस्कॉन्सिन विद्यापीठात १९८०पासून त्यांना प्राध्यापकपद मिळाले.
 • फाळणीच्या व्यथा सांगणारा ‘अ‍ॅन एपिक अन-रिटन’ हा कथासंग्रह तसेच १९४७ नंतरच्या कथांचा ‘द कलर ऑफ नथिंगनेस’ हा संग्रह यांचे ते संपादक व अनुवादक होते.
 • ‘डोमेन्स ऑफ फीअर अ‍ॅण्ड डिझायर’ तसेच ‘द ग्रेटेस्ट उर्दू शॉर्ट स्टोरीज एव्हर टोल्ड’ यांचे अनुवाद-संपादनही त्यांनीच केले.
 • वयाच्या पन्नाशीपर्यंत ते स्वत:देखील कथा लिहीत होते. त्या कथांचा ‘तारीक गली’ हा संग्रह प्रसिद्ध आहे.
 • उर्दूच्या विद्यापीठीय अभ्यासाला वाहिलेली एकमेव इंग्रजी संशोधनपत्रिका त्यांनी सुरू केली.
 • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या संस्थेसाठी पाकिस्तानी कथासाहित्याचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा