चालू घडामोडी : १३ जून

देशातील १८ क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार

  • देशातील १८ क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या ३८ वर येणार आहे.
  • बँकांचे जाळे ग्रामीण भागात नेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सहकार्याने क्षेत्रीय ग्रामीण बँका उभारण्यात आल्या. या बँकांमुळे प्रामुख्याने पीक कर्जाचे लाभ शेतकऱ्यांना मिळाले.
  • पण मागील काही वर्षांत बँका संकटात आल्या. त्यामुळे २०११-१२मध्ये त्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
  • त्यावेळी अशा बँकांची १९६ असलेली संख्या ८२ वर आणण्यात आली. या ८२पैकी काही बँका बंद पडल्या. सध्या त्यांची संख्या ५६ असून, ती आणखी कमी होणार आहे.
  • केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंबंधी नाबार्डशी चर्चा केली. त्यानुसार २८ राज्यांमधील १८ बँकांचे विलीनीकरण आता होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एकाच राज्यातील दोन ते चार बँकांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण होईल.
  • महाराष्ट्रात विदर्भ कोकण ग्रामीण बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन ग्रामीण बँका आहेत. त्या सध्या नफ्यात आहेत. पण त्यांच्या नफ्यात घट झाली आहे.
  • या दोन्ही बँकांचे एकमेकांमध्ये सध्या तरी विलीनीकरण होणार नसले, तरी त्यादृष्टीने विचार सुरू झाला आहे.

अमेरिका भारताला सहा अपाचे हेलिकॉप्टर विकणार

  • अमेरिकेने भारताला ९३ कोटी डॉलरमध्ये सहा एएच ६४ इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास मंजुरी दिली आहे.
  • अपाचे हेलिकॉप्टरमुळे भारताची संरक्षण क्षमता वाढेल तसेच त्यांचे सैन्यदलही आधुनिक होईल. अंतर्गत तसेच बाहेरील हल्ल्यांना तोंड देण्यास भारत सक्षम होईल.
  • अपाचे हेलिकॉप्टरच्या समोरील भागात असलेल्या सेन्सरमुळे रात्रीही हेलिकॉप्टरचे उड्डाण करता येईल.
  • अमेरिकेमध्ये अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचे लॉकहिड मार्टिन, जनरल इलेक्टिक आणि रेथियॉन हे मोठे कंत्राटदार आहेत.
  • हेलिकॉप्टर व्यतिरिक्त यात आग नियंत्रण रडार, हेलफायर लाँग्बो मिसाइल, स्टिंगर ब्लॉक आय-९२ एच मिसाइल, नाईट व्हिजन सेन्सर आणि जडत्वीय नौवहन प्रणालीच्या (इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम्स) विक्रीचाही समावेश आहे.
  • भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण व्यवहार वर्ष २००८ पासून सुमारे ० ते १५ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे.

डॉ. आशिक महंमद यांचा न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाकडून गौरव

  • भारतीय नेत्र जैवभौतिकशास्त्रज्ञ डॉ. आशिक महंमद यांना युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स, राउंड हाऊसच्या माजी विद्यार्थ्यांमधून २०१८चा ‘माजी विद्यार्थी संशोधक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे.
  • त्यांनी डोळ्यांविषयीच्या संशोधनात केलेल्या कामगिरीसाठी, एक लाख माजी विद्यार्थ्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  • ते ‘ऑक्युलर टिश्यू’ (डोळ्यातील एक प्रकारच्या उती) संशोधक आहेत. कॉर्निआ व स्फटिकी नेत्रभिंगे हेदेखील त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. दृश्यात्मक प्रकाश संवेदनशीलतेचे कमाल परिमाण यावरही त्यांनी काम केले आहे.
  • त्यांनी एल. व्ही. प्रसाद नेत्र मदुराई मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी, मद्रास आयआयटीतून वैद्यकीय जैवतंत्रज्ञानात एमटेक पदवी घेतली आहे.
  • नंतर ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या ब्रायन व्हिजन होल्डन व्हिजन इन्स्टिटय़ूट (बीव्हीएचआय) या संस्थेतून त्यांनी पीएचडी संपादन करून, ते भारतात परतले.
  • एलव्ही प्रसाद नेत्र संस्थेत ते सध्या संशोधन करीत असून, तेथे अध्यापनाचे कामही करीत आहेत. या संस्थेच्या ऑपथॅलमिक बायोफिजिक्स लॅबोरेटरीचे ते प्रमुख आहेत.
  • त्यांनी बीएचव्हीआय संशोधन केंद्रात असताना डोळ्याच्या नैसर्गिक नेत्रभिंगाला पर्याय निर्माण करण्याच्या प्रकल्पात भाग घेतला. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांसाठी असे नेत्रभिंग वरदान ठरणार आहे.
  • परदेशात त्यांनी 'द लाइफ जर्नी ऑफ ह्युमन आय लेन्स' या विषयावर सादरीकरणे केली आहेत. एकंदर ४० शास्त्रीय शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत.

मॅकडोनिया देशाचे नवीन नाव रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया

  • शांततेची बोलणी पूर्ण झाल्यानंतर फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हे नाव बदलण्यावर मॅकडोनिया आणि ग्रीस तयार झाले आहेत.
  • या दोन देशांमध्ये सुमारे २७ वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिलीच वेळ आहे. मॅकडोनिया हा देश ग्रीसच्या उत्तरेस आहे.
  • या दोन्ही देशांना राजी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अनेकवेळेस मध्यस्थी करुन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
  • फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हा देश एफवायआरओएम किंवा मॅकडोनिया नावाने ओळखला जायचा. आता हा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया नावाने ओळखला जाईल.
  • मॅकडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. हेच नाव १९९१साली तयार झालेल्या नव्या देशाने घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले होते.
  • मॅकडोनियातील राजधानीमधील विमानतळाला ग्रीकमधील प्राचीन योद्धा अलेक्झांडर द ग्रेटचे नाव दिल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली. त्यामुळे मॅकडोनियाला युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये प्रवेश देण्यास ग्रीसने विरोध केला होता.
  • नावामधील हा बदल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडे करण्यात येणार आहेत.
  • ग्रीसचे पंतप्रधान : अलेक्सीस त्सायप्रस
  • मॅकडोनियाचे पंतप्रधान : झोरान झाएव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा