चालू घडामोडी : २४ व २५ जून

स्वच्छ सर्वेक्षण २०१८मध्ये महाराष्ट्राला दुसरा क्रमांक

  • स्वच्छ सर्वेक्षण २०१८मध्ये स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक झारखंड तर तृतीय क्रमांक छत्तीसगढ राज्याने पटकावला.
  • तर राजधानीचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशात मुंबई उपनगराला पहिला क्रमांक मिळाला असून, घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईने बाजी मारली आहे.
  • स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • त्याअंतर्गत ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४,२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
  • त्यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता. या सर्व विजेत्या शहरांचा गौरव इंदूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • स्वच्छ भारत अभियान हा देशपातळीवर राबवला जाणारा पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • २०१५पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे, राज्यांच्या राजधानीची शहरे यांचा समावेश आहे.
  • दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषांच्या आधारे तपासणी केली जाते.
  • या तपासणीच्या आधारे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे मानांकन आणि क्रमांक काढले जातात.
  • दरवर्षी ही तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते. यावेळी सेवा क्षेत्रांत अग्रगण्य असलेली ‘कार्वे’ या कंपनीने देशपातळीवरील शहरांचे मानांकन केले आहे.
  • घनकचरा व्यवस्थापन, नगर नियोजन, दळणवळण नियोजन, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था हे घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात.
  • स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विविध विभागांतील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण १० पारितोषिके महाराष्ट्राला मिळाली आहेत.
  • महाराष्ट्रातील २८ शहरांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविले आहे. एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८ शहरांनी स्थान मिळविले आहे.
  • राज्यातील ९ शहरांना (६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील तर ३ शहरांना विभागस्तरीय) स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत नवी मुंबईने नववा आणि पुण्याने दहावा क्रमांक मिळवला आहे.
  • सार्इंच्या शिर्डीने एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी शहरांच्या वर्गात देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
  • नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर पुरस्कार जाहीर झाला.
  • सातारा जिल्ह्य़ातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला.
  • तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्य़ातील शेंदुर्जना घाट या शहराला मिळाला.
  • पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारत आणि क्युबामध्ये द्विपक्षीय करार

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि क्युबामध्ये जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, पारंपरिक औषधे आदी क्षेत्रात द्विपक्षीय करार झाले आहेत.
  • तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती कोविंद यांनी ग्रीस आणि सुरिनाम या देशांचा दौरा संपवून क्युबात दाखल होत क्युबाचे राष्ट्रपती मिगुएल डियाज-कैनेल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
  • उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबध मजबूत करण्यासाठी सहमती व्यक्त केली. कोविंद यांनी फिडेल क्रॉस्ट्रो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केली.
  • चर्चेदरम्यान क्युबाने भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या मागणीला पाठिंबा दिला.
  • कोविंद यांनी हवाना विद्यापीठात ‘भारत आणि जागतिक दक्षिण’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी विकसनशील देशांसाठी उभय देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त केली.

प्रवीण तोगडियांकडून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना

  • विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी २४ जून रोजी अहमदाबादमध्ये नवीन संघटनेची स्थापना केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद असे या संघटनेचे नाव असून, तोगडिया हे या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत.
  • यावेळी, तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर ‘हिंदू ही आगे’ असे लिहिले होते. तसेच व्यासपीठावर भारत माता, गो-माता, गणपती आणि अशोक सिंघल यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या.
  • आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहेत.
  • एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे समजले जाणारे तोगडिया हे काही महिन्यांपासून मोदींनाच लक्ष्य करत होते. मोदींनी सत्तेत आल्यानंतर आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
  • एप्रिल २०१८मध्ये झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू कोकजे हे संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले होते.
  • कोकजे यांनी तोगडियांचे समर्थक मानले जाणारे राघव रेड्डी यांचा पराभव केला होता. त्यामुळे तोगडिया नाराज झाले होते.

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांना वाहन परवाना

  • महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या सौदी अरेबियात जवळपास १.५१ कोटी महिला पहिल्यांदाच रस्त्यांवर वाहने चालवताना दिसणार आहेत.
  • सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे असून आतापर्यत महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नव्हती.
  • तीन वर्षांपूर्वी या देशातील महिलांना मदतानाचा हक्क देण्यात आला होता. यानंतर महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
  • २७ सप्टेंबर २०१७ रोजी सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही महिलांवरील वाहन चालविण्यास असलेली बंदी उठविली होती. त्यानंतर महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन परवाना देण्यात आला होता.
  • सौदी अरेबियातील महिलांना वाहनपरवाना मिळत नसल्याने एक दशकाहून अधिक काळ सौदी अरेबियावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका केली जात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा