चालू घडामोडी : २८ जून

देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी भाषा तिसऱ्या स्थानी

  • देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून, या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
  • २०११मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे.
  • या यादीमध्ये हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून, हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ सालच्या ४१.०३ टक्क्यांवरुन ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८.१ टक्क्यांवरुन ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्या तुलनेत ६.९९ टक्क्यांवरुन २०११मध्ये ७.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्य तुलनेत ७.१९ टक्क्यांवरुन ६.९३ टक्क्यांवर घसरले आहे.
  • मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे.
  • देशातील २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे.
  • देशात फक्त २४,८२१ लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत भाषा बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आहे.
  • कोकणीलाही असाच अनुभव आला आहे. देशात २२.५६ लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याची नोंद केली आहे. पण २००१च्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या २.३२ लाखांनी घटली आहे.
  • गोव्यातील मराठी भाषकांची सख्या २००१च्या तुलनेत २०११मध्ये १.४५ लाखांनी घटली आहे. 

सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन

  • जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
  • सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
  • सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम २०१३मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती.
  • त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.
  • वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते.
  • भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो.
  • केशरी रंग, पेवातील साठवणूक या सांगलीच्या हळदीच्या खास वैशिष्ट्यांमुळे तिला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा केली होती.
  • या प्रस्तावाचा स्वीकार करत मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाने सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.
  • हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता मिळाली आहे.
  • ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे.
 भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक मानांकन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते.
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक मानांकन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • आजवर जगातील १६० देशांनी जीआयला मान्यता दिली आहे. हे मानांकन मिळाल्यानंतर त्या त्या परिसरातील पिकांच्या गुणवैशिष्ट्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.
  • एकूण २४ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे. 
  • मानांकनाचे फायदे
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.

इराणकडून तेल आयात बंद करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव

  • अमेरिकेने भारत, चीन व इतर मित्रराष्ट्रांना इराणकडून तेल आयात न करण्याचे आवाहन केले आहे.
  • येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत इराणशी होत असलेले तेल व्यवहार पूर्णपणे थांबवा, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले होते. इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचे पूर्वीच ट्रम्प प्रशासनाने घोषित केले होते.
  • भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांपैकी इराण तिसरा मोठा निर्यातदार आहे. इराक व सौदी अरेबियानंतर इराणचा क्रमांक येतो.
  • एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन कच्चे तेल निर्यात केले होते.
  • गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषित केले होते.
  • अमेरिका दबाव तंत्राचा वापर करत आहे. भारत व चीनवरही त्यांनी तेल आयात बंद करण्यासाठी दबाव टाकला आहे.
  • अमेरिका इराण धोरणाविषयी प्रचंड संवदेनशील असून, भारत आणि चीनने या आवाहनास सकारात्मकच प्रतिसाद न दिल्यास या देशांसोबतच्या उद्योग व व्यापार धोरणावर अमेरिका पुनर्विचार करणार आहे.

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकेरला सुवर्णपदक

  • जर्मनीत सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने चीनच्या कायमान लूवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
  • १६ वर्षीय मनु भाकेरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात २४२.५ गुणांची कमाई करत विक्रमाची नोंद केली. या वर्षातील मनूचे हे सातवे सुवर्णपदक आहे.
  • मनूने याआधी याच स्पर्धेत आपली सहकारी महिमा अग्रवालसोबत सांघिक प्रकारात कांस्यपदकाचीही कमाई केली.
  • याच स्पर्धेत भारताच्या उदयवीर आणि विजयवीर सिद्धु या जुळ्या भावांनी आपला सहकारी राजकंवर सिंह याच्यासोबत २५ मीटर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • उदयवीरने २५ मीटर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदकाचीही कमाई केली. तर अनिश भनवालाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले.

वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. एच वाय मोहन राम यांचे निधन

  • प्रसिद्ध भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. होलेनरसिपूर योगनरसिंहम मोहन राम १८ जून रोजी निधन झाले. ‘एचवायएम’ या नावाने ते ओळखले जात होते.
  • पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, सनदी अधिकारी एच. वाय. शारदाप्रसाद हे त्यांचे मोठे बंधू होते.
  • डॉ. राम यांनी वनस्पतिशास्त्राची दुर्मीळ वाट निवडून फुलझाडांचे जीवशास्त्र, वनस्पतींचे रचनाशास्त्र यात संशोधन केले. एकूण २०० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत.
  • त्यांनी फुलांचे रंग, फुलझाडांचे लैंगिक प्रकटीकरण, बांबूची संकरित पद्धतीने निर्मिती यातही मोठी कामगिरी केली होती.
  • एचवायएम यांचा जन्म कर्नाटकात १९३०मध्ये झाला. सेंट फिलोमेना कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी केले. पदवीनंतर त्यांनी आग्रा येथे एमएस्सी केले.
  • पुढे दिल्ली विद्यापीठात त्यांची अध्यापक म्हणून निवड झाली. नंतर ते फुलब्राइट शिष्यवृत्ती घेऊन वनस्पतिशास्त्र शिकण्यासाठी कार्नेल विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी उती संस्करणाचे तंत्र आत्मसात केले व त्याचा वापर भारतात केला.
  • त्यांनी ल्युपिन, ग्लॅडिओलस, क्रीसॅनथमम, कँलेंड्यूला, झेंडू व इतर वनस्पतींच्या वेगळ्या गुणधर्माचा अभ्यास केला.
  • त्यातील काही गुण त्यांनी केळी, कडधान्ये व बांबू या वनस्पतींत आणून आर्थिक किफायत वाढवली. केळीच्या उती संकरात त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग करून त्यात यश मिळवले.
  • कॉलेजमध्ये असताना त्यांनी नॅचरल सायन्स सोसायटीची स्थापना करून तेथे व्याख्यान देण्यासाठी नोबेल विजेते वैज्ञानिक सर सी.व्ही. रामन यांना बोलावले.

राज्यात कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता

  • महिला सक्षमीकरण व सबलीकरणासोबत वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.
  • पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे, यासाठी वन विभागातर्फे ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे.
  • या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी कुटुंबांना होईल, असा अंदाज आहे.
  • त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून साग, आंबा, फणस, जांभूळ व चिंच अशी झाडांची १० रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. 
  • या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. 
  • या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा