चालू घडामोडी : ३० जून

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

  • महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवाज्येष्ठतेनुसार जून अखेरीस निवृत्त झाले असून, त्यानंतर या पदावर दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची ३६ वर्षांची निष्कलंक सेवा लक्षात घेता, त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत ते महासंचालकपदी राहतील.
  • सध्या पडसलगीकर यांच्याकडे असेलेल्या आणि रिक्त झालेल्या मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे. या आधी ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये कार्यरत होते.
  • १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असेलेले जयस्वाल यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. तेलगी प्रकरणात त्यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.
  • २००६च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते. मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

मुंबईतील इमारतींचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

  • दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.
  • मुंबईतील ज्या इमारतींना जागतिक वारसा स्थान देण्यात आले आहे त्या वास्तूंची व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको दोन प्रकारात विभागणी होते.
  • व्हिक्टोरियन स्थापत्य शैलीच्या इमारती ज्या मुख्यत्त्वे करून मुंबईतील फोर्ट भागात आहेत. तिथे सध्या सरकारी कार्यालये किंवा विद्यापीठ आहे.
  • यामध्ये मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन शैलीच्या वास्तूंना जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.
  • मरिन ड्राइव्ह परिसरातल्या इमारतींचा समावेश हा आर्ट डेको इमारतींमध्ये होतो. या इमारती रहिवासी इमारतींच्या प्रकारांमध्ये येतात.
  • क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग आणि इरॉस व रिगल सिनेमा हॉल आर्ट डेको इमारतींचा समावेशही जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.
  • बहरीनमधील मनामात सध्या सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्थेच्या (युनेस्को) बैठकीत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे.
  • या घोषणेमुळे जागतिक वारसा स्थळांमध्ये सर्वाधिक वास्तू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • याआधी महाराष्ट्रातील अजंठा, एलिफंटा, वेरूळमधील लेण्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात झाला आहे.
  • युनेस्को ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
  • शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते.
  • ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे, असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) जागतिक वारसा स्थळ असते.
  • एकदा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थळाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

भारताला दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

  • दुबईत सुरु असलेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणवर ४४-२६ गुणांनी मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतासह इराण, पाकिस्तान, कोरिया, केनिया, अर्जेंटिना हे संघ सहभागी होते.
  • या स्पर्धेत साखळी सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमावता भारताने स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा मान पटकावला.
  • तीन वेळा विश्वचॅम्पियन असलेल्या भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून इराणला संधी दिली नाही. भारतीय कर्णधार अजय ठाकूर (९ गुण) याने सर्वाच्च कामगिरी केली.

बेपत्ता मुलांचा मागोवा काढण्यासाठी रियुनाइट अॅप

  • देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यात उपयुक्त ठरणाऱ्या ‘रियुनाइट’ अॅपचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी अनावरण केले.
  • बेपत्ता झालेल्या मुलांचा मागोवा काढणारे हे पहिलेच अॅप आहे. हे अॅप अँड्रॉइड तसेच आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल ऑपरेटिंग प्रणालींसाठी उपलब्ध असेल.
  • शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी संस्थापक असलेली स्वयंसेवी संस्था ‘बचपन बचाओ आंदोलन’ आणि कॅपजेमिनी या सॉफ्टवेअर कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
  • या अॅपच्या माध्यमातून हरवलेल्या मुलांचे आईवडील मुलांची छायाचित्रे, त्यांचा पत्ता, जन्मचिन्ह आदी माहिती अपलोड करू शकतात. पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून हरवलेल्या मुलांची ओळख पटवू शकतात.
  • हरवलेल्या मुलांची ओळख पटविण्यासाठी इमेज रेकग्निशन तसेच बेववर आधारित फेशियल रेकग्निशनसारख्या सेवांचा अवलंब जात आहे.
  • मुलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ या देशातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेने बालहक्क संरक्षणासाठी कायदे बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
  • १९८०साली स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत ८६ हजाराहून अधिक मुलांना वेठबिगारीतून मुक्त केले आहे.

एफएटीएफकडून पाकिस्तानचा संशयित देशांच्या यादीत समावेश

  • फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्ट म्हणजेच संशयित देशांच्या यादीतकेला आहे.
  • इथोपिया, सर्बिया, श्रीलंका, सीरिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ट्युनिशिया आणि यमन देशांचा या यादीमध्ये आधीपासूनच समावेश आहे.
  • दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याने एफएटीएफने पाकिस्तानवर ही कारवाई केली आहे.
  • एफएटीएफने पाकिस्तानला २६ कलमी कृती योजना पाठवली होती, जेणेकरून पाकिस्तानला या कारवाईपासून वाचता येईल.
  • पाकिस्तानने मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना मिळणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आपण उपाययोजना केल्याचा दावा एफएटीएफकडे केला होता.
  • त्यानंतरही एफएटीएफ ने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • ३७ देशांच्या या संघटनेचा निर्णय आपल्या विरोधात येऊ नये यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होते. पण एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये न येणे हीच त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.
 फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्स 
  • एफएटीएफ ही पॅरिसस्थित आंतर सरकारी संस्था आहे. १९८९साली तिची स्थापना करण्यात आली होती. जगातील ३७ देश या संस्थेचे सदस्य आहेत.
  • दहशतवादी कारवायांना अवैधरीत्या देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम बनवण्याचे काम ही संस्था पाहते.
  • एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधील देशांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा