चालू घडामोडी : ११ जुलै

फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या स्थानी

  • जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकत जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
  • २०१७साठीच्या या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी २.५९७ लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. तर फ्रान्सचा जीडीपी २.५८२ लाख कोटी डॉलर्स आहे.
  • सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून, त्यानंतर चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन हे देश आहेत.
  • या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ २०१८मध्ये ७.४ टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर २०१९मध्ये ही वाढ ७.८ टक्के असेल असाही अंदाज आहे.
  • वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (२०१८मध्ये ६.६ टक्के व २०१९मध्ये ६.४ टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.
  • तत्पुर्वी भारत हा सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला गेला होता. २०१६साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा वेग ७.१ टक्के इतका होता. मात्र, जीएसटी व नोटबंदीमुळे तो वेग मंदावला होता.

नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना केंद्र सरकारची मंजुरी

  • केंद्र सरकारने देशामध्ये ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या तत्वांना मंजुरी दिली असून, त्यामुळे त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही तसेच इंटरनेटच्या वापरावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
  • दूरसंचार आयोगाने ट्रायच्या नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांना यापुढे इंटरनेटचा स्पीड आणि कंटेट यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही.
  • या नव्या धोरणाचे नाव नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी) २०१८ असे असून, ते आता मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.
  • इंटरनेटचा वापर करण्यासाठी शुल्क देणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा कंपनीला पक्षपात करून प्राधान्य न देता सर्वच उपभोक्त्यांना समान वागणूक दिली जाईल, हे नेट न्यूट्रॅलिटीचे तत्व आहे.
  • या तत्त्वाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंड आणि कारवाईची तरतूद या नव्या धोरणामध्ये करण्यात आली आहे.
  • या नवीन धोरणामुळे इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्यांना ब्लॉकिंग किंवा विशिष्ट साइट्सना अधिक वेग देता येणार नाही.
  • मात्र ऑटोनोमस ड्रायव्हिंग किंवा टेलिमेडिसीनसारख्या सेवांना, जिथे सामान्य वेगापेक्षा अधिक वेगाने इंटरनेट लागते अशा सेवांना ट्रायने या नियमातून अपवाद केले आहे.
  • इंटरनेट वापरण्याच्या समानतेच्या तत्वावर अतिक्रमण होऊ नये अशी ट्रायने नोव्हेंबर २०१७मध्ये शिफारस केली होती. इंटरनेट हे मुक्त माध्यम असून त्यात कुठलाही भेदभाव होता कामा नये अशी ट्रायची भूमिका होती.
  • त्यामुळेच फेसबुकच्या ‘फ्री बेसिक्स’च्या नावाखाली इंटरनेट समानतेच्या तत्त्वाला धक्का देणाऱ्या योजनेचा ट्रायने विरोध केला होता.
  • सर्व इंटरनेट सेवांचे दर एकसमान झाल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल तसेच मोबाइल सेवा कंपन्यांचा तोटासुद्धा भरुन येण्यास मदत होणार आहे.
  • याशिवाय नवीन धोरणात दूरसंचार विभागाने ‘५ जी’ नेटवर्कच्या माध्यमातून देशात २०२२ पर्यंत ६८०० अब्ज रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे या नमूद केले आहे.
  • ट्राय (TRAI) : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया

बीएसएनएलकडून देशातील पहिल्या इंटरनेट टेलीफोनी सेवेची घोषणा

  • सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने देशातील पहिल्या इंटरनेट टेलीफोनी सेवेची घोषणा केली आहे. २५ जुलैपासून ही सेवा सुरू होईल.
  • या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी सिमकार्डची गरज लागणार नाही.
  • यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ ‘विंग्ज’ हे मोबाइल अॅप डाउनलोड करण्याची गरज आहे.
  • या अॅपद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कच्या क्रमांकावर बीएसएनएल वाय-फाय किंवा अन्य कोणत्याही सर्विस प्रोवायडरद्वारे कॉल करु शकतात.
  • मात्र, बीएसएनएलची ही सेवा मोफत नसेल, यासाठी सबस्क्रायबरला १,०९९ रुपयांचे वार्षिक शुल्क आकारले जाईल.

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

  • जगभरात ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येत असून, वाढती लोकसंख्या ही मोठी जागतिक समस्या ठरत आहे.
  • लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडूनही (यूएन) लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात.
  • यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त यूएनकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा विषय ‘कुटुंब नियोजन मानवाचा अधिकार’ हा आहे.
  • वर्ल्डोमीटर्स या संस्थेने केलेल्या जागतिक लोकसंख्येच्या सर्वेक्षणानुसार सध्या जगाची एकूण लोकसंख्या ७६० कोटी आहे.
  • १०००साली जगाची लोकसंख्या केवळ ४० कोटी इतकी होती. १८०४साली जगाची लोकसंख्या १०० कोटी झाली.
  • १९६० साली जगाची लोकसंख्या ३०० कोटी इतकी झाली. म्हणजेच अवघ्या १५६ वर्षांमध्ये जागतिक लोकसंख्या १०० कोटींवरून ३०० कोटी झाली.
  • जगात दर सेकंदाला चार मुलांचा जन्म होतो, तर दोन नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
  • जगात सर्वाधिक लोकसंख्या चीनमध्ये (१४१ कोटी) आहे. त्यानंतर भारत (१३५ कोटी) दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या स्थानावर (३२.६७ कोटी) आहे.
  • २०२८मध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल, असा अंदाज यूएनने २०१३मध्ये व्यक्त केला होता.
  • २०२०पर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण लोकांचा देश असेल. आणखीन दोन वर्षांनी भारतातील ६४ टक्के लोकसंख्या ही कार्यक्षम असेल.
  • एकूण जागतिक लोकसंख्येपैकी ३९० कोटी लोक शहरांमध्ये विस्थापित झाले आहेत. २०११च्या जनगणनेनुसार भारतातील ३२.४ टक्के लोकसंख्या ही शहरी लोकसंख्या आहे.
  • जगभरात रोज ८०० महिला गर्भधारणेसंदर्भातील आजार आणि प्रसूती दरम्यान मरण पावतात. यापैकी १६० महिला महिला भारतातील आहेत.
  • जागतिक लोकसंख्या वाढीतील ३० टक्के लोकसंख्या वाढ ही अपघातातून झालेली (Accidental) गर्भधारणा किंवा नकोश्या (Unwanted) गर्भधारणेतून होते.
  • भारतामधील ४७ टक्के मुलींचा बालविवाह होतो. वयाच्या १८व्या वर्षाआधीच या मुलींची लग्न लावून दिली जातात. जर जागतिक स्तरावर बालविवाहाचे हे प्रमाण ४६ टक्के इतके आहे.
  • भारताची ४१ टक्के लोकसंख्या ही २० वर्षाहून कमी वयाची आहे. जगभरात हेच सरासरी वय हे २४ इतके आहे.
  • जगातील एकूण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या भारत, पाकिस्तान, नायजेरिया, कांगो, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा आणि इंडोनेशिया या ९ देशांमध्ये राहते.
  • जगभरात वृद्ध नागरिकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. २०५०पर्यंत वृद्ध नागरिकांची संख्या युवांच्या तुलनेत जास्त असणार आहे. यापूर्वी नेमके याच्या उलट वातावरण होते.
  • जगभरात नायजेरियाच्या लोकसंख्येचे वाढीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. नायजेरिया सध्या सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. २०५०पर्यंत नायजेरिया या यादीत तिसऱ्या स्थानावर असेल.

ख्यातनाम चित्रकार, साहित्यिक अमृतलाल वेगड यांचे निधन

  • ख्यातनाम चित्रकार, साहित्यिक आणि विलक्षण परिक्रमावासी असलेले अमृतलाल वेगड यांचे ६ जुलै रोजी वृद्धापकाळाने जबलपूर येथे निधन झाले.
  • अमृतस्य नर्मदा, सौंदर्य की नदी नर्मदा, तीरे तीरे नर्मदा आणि नर्मदा तुम कितनी सुंदर हो आदी पुस्तके लिहून नर्मदा नदीची भक्ती करणारे वेगड हे ‘नर्मदापुत्र’ म्हणूनच प्रख्यात होते.
  • ३ ऑक्टोबर १९२८ मध्ये जबलपूर येथे जन्मलेल्या वेगड यांनी वयाच्या ५०व्या आणि ७५व्या वर्षी अशी दोनदा नर्मदा नदीची परिक्रमा केली. केवळ परिक्रमेवर आधारित असे ‘नर्मदा-एक परिक्रमा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.
  • ४००० किमी पदयात्रा करीत त्यांनी नर्मदेच्या काठी असलेल्या लोकजीवन, इतिहास, संस्कृती, वृक्ष-वनस्पती, पशुपक्षी आदी अनेक विविधतेचा परिचय लोकांना करून देण्याचे महत्कार्य केले.
  • त्यांची ७ पुस्तके गुजरातीत तर ४ हिंदीत प्रकाशित झाली आहेत. शिवाय त्यांनी बालसाहित्य लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकांचे मराठी, इंग्रजी, बंगाली व संस्कृत अनुवाद प्रसिद्ध आहेत.
  • हिंदी व गुजराती भाषेतील साहित्यकृतीबद्दल त्यांना दोनदा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • काही वर्षांपूर्वी माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता संस्थानाने ‘डी. लिट’ देऊन त्यांचा सत्कार केला होता. ‘महापंडित राहुल सांकृत्यायन’ पुरस्कारासारख्या अनेकविध राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • नर्मदेवर निस्सीम प्रेम करणारे अमृतलाल नर्मदाकाठच्या आदिवासी जमातींनी सरदार सरोवर प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढ्यापासून मात्र अलिप्त राहिले.

भारताला इराणकडून धमकीवजा इशारा

  • चाबहार बंदराबाबत झालेल्या करारानुसार गुंतवणूक न केल्यास आणि कच्चे तेल आयातीत कपात केल्यास भारताला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने भारताला दिला आहे.
  • अमेरिकेच्या दबावात येऊन जर भारताने तेल आयात कपात केली तर त्यांना देण्यात आलेला विशेषाधिकाराचा दर्जा काढून घेण्यात येईल, असा इशाराही इराणने दिला आहे.
  • अमेरिकेने भारतासह इतर देशांना ४ नोव्हेंबरपर्यंत इराणकडून तेल आयात बंद करण्यास सांगितले आहे. तसे न करणाऱ्या देशांना प्रतिबंधचा सामना करावा लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
  • एकीकडे अमेरिकेचा दबाव आणि दुसरीकडे इराणचा इशारा यामुळे भारत कात्रीत सापडला आहे.
  • इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण भारताचा तिसरा सर्वांत मोठा तेल पुरवठा करणारा देश आहे. तर भारतानंतर चीन हा इराणचा सर्वांत मोठा ग्राहक आहे.
  • सामरिकदृष्ट्या चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या बंदरामुळे भारत पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि इराणशी थेट व्यापार करू शकतो.
  • भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी ५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. चाबहार हे मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे.

डेटा चोरी प्रकरणात फेसबुकला ४.५६ कोटी रुपये दंड

  • केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणात फेसबुकला ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने (डेटा रेग्युलेटर) पाच लाख पाऊंडचा (सुमारे ४.५६ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
  • वापरकर्त्यांचा डेटा गोपनीय राखण्यात फेसबुकला अपयश आल्याने फेसबुकवर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • ५ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती.
  • २०१६मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सच्या माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचेही समोर आले.
  • केंब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकवरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप झाला.
  • प्रकरण चिघळल्यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या प्रकरणात चुक मान्य करत, जाहीर माफी मागितली होती.
  • या प्रकरणामुळे फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती घसरल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा