चालू घडामोडी : १६ जुलै

फिफा विश्वचषक स्पर्धेचे फ्रान्सला दुसऱ्यांदा विजेतेपद

  • फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्सने पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून १९९८नंतर पुन्हा जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला.
  • फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला.
  • विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.
  • एका गोलमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावणारा आणि स्वतः एक गोल करणारा फ्रान्सचा अँटोइनी ग्रीझमन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकाले.
  • आक्रमक फ्रान्सला क्रोएशियाच्या झुंजार खेळाचा सामना करावा लागला. क्रोएशियाकडून इवान पेरिसिक व मारिओ मँडझुकीच यांनी प्रत्येकी एक गोल केला.
  • सामन्याच्या १८व्या मिनिटाला मारिओ मँडझुकीचने केलेल्या स्वयंगोलचा फटका क्रोएशियाला बसला.
  • जागतिक क्रमवारीत फ्रान्स ७व्या, तर क्रोएशिया २०व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ ५ वेळा आमनेसामने आले होते. त्यात ३ वेळा फ्रान्सने बाजी मारली, तर २ लढती ड्रॉ झाल्या होत्या.
  • अवघी ४० लाख लोकसंख्या असलेल्या क्रोएशियाने या विश्वचषकात बहारदार खेळाचे प्रदर्शन करत, करोडो लोकांची मने जिंकली.
  • ६८ वर्षांनंतर प्रथम एवढ्या छोट्या देशाने फिफाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. यापूर्वी १९५०मध्ये उरुग्वेला अशी संधी मिळाली होती.
  • पुढील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कतारमध्ये होणार असून, पहिल्यांदाच यजमानपद भूषविण्यासाठी कतार सज्ज झाले आहे.
  • रशिया २०१८ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी कतारचे अमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याकडे विश्वचषक मशाल आणि प्रतिकात्मक चेंडू सोपविला.
 विश्वचषक स्पर्धा दोनवेळा जिंकणारा फ्रांस सहावा देश 
  • या विजेतेपदामुळे विश्वचषक स्पर्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जिंकण्याच्या यादीत आता फ्रान्सचा समावेश झाला आहे.
  • आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे.
  • फिफा विश्वचषक सर्वाधिक पाचवेळा जिंकण्याची किमया ब्राझीलने केली आहे. त्यांनी १९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ मध्ये चषक पटकाविले.
  • त्यानंतर जर्मनीने चार वेळा (१९५४, १९७४, १९९०, २०१४) आणि इटलीनेही चार वेळा (१९३४, १९३८, १९८२, २००६) ही स्पर्धा जिंकली आहे.
  • उरुग्वेने दोनवेळा (१९३०, १९५०) आणि अर्जेटिनानेही दोनवेळा (१९७८, १९८६) विश्वचषक पटकाविला आहे. इग्लंड (१९६६) आणि स्पेनने (२०१०) एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे.
 स्पर्धेतील पुरस्कार 
  • या विश्वचषक स्पर्धेत एकूण ४०० मिलियन डॉलर्सचे (सुमारे २७०० कोटी रुपये) रोख पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी विजेत्या फ्रान्सला ३८ मिलियन डॉलर्स (सुमारे २६० कोटी रुपये) मिळाले.
  • उपविजेत्या क्रोएशियाला २८ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. तर तिसऱ्या (बेल्जियम) आणि चौथ्या (इंग्लंड) क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे २४ व २२ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
  • ५ ते ८ स्थानावरील संघांना प्रत्येकी १६ मिलियन डॉलर्स, तर ९ ते १६व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी १२ मिलियन डॉलर्स एवढी रक्कम देण्यात आली.
  • गोल्डन बॉल : यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त खेळाने प्रभावित करणाऱ्या क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉडरिच हा गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. विश्वचषकाच्या इतिहासात सलग सहाव्यांदा उपविजेत्या संघाच्या खेळाडूस सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला आहे. झिदान याच्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या युरोपियन संघाच्या खेळाडूला हा गोल्डन बॉलचा मान मिळाला आहे.
  • सिल्व्हर बॉल : हा पुरस्कार बेल्जियमच्या एडीन हॅजार्ड याला देण्यात आला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.
  • ब्राँझ बॉल : हा पुरस्कार अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला मिळाला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.
  • गोल्डन बूट : हा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हॅरी केन याने एकूण ६ सामन्यात सर्वाधिक ६ गोल केले.
  • सिल्व्हर बूट : हा पुरस्कार फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला देण्यात आला. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. अँटोइन ग्रीझमन याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.
  • ब्राँझ बूट : बेल्जियमच्या रोमेलू लुकाकू याला हा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. रोमेलू लुकाकू याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.
  • गोल्डन ग्लोव्हज : हा पुरस्कार थिबॉट कोटरेइस या बेल्जियमच्या गोलकिपरला देण्यात आला. हा पुरस्कार सर्वोकृष्ट गोलकिपरला देण्यात येतो.
  • सर्वोत्तम युवा खेळाडू : हा पुरस्कार फ्रान्सच्या कालियान एमबाप्पे याला देण्यात आला. फ्रान्सकडून महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याने गोल केले. अंतिम सामन्यातील त्याचा गोल हा प्रसिद्ध खेळाडू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी करणारा ठरला.
  • शिस्तबद्ध कामगिरी : स्पेन या फुटबॉल संघाला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील सर्व सामन्यांत शिस्त आणि खिलाडूवृत्तीने खेळणाऱ्या संघाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
 स्पर्धेतील विक्रम 
  • फ्रान्सच्या विजेतेपदानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डिश्चॅम्प्स संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले. १९९८साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सचे प्रशिक्षक डिश्चॅम्प्स हे फ्रान्सच्या संचे कर्णधार होते. यापूर्वी ब्राझिलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे.
  • गोलची बरसात : यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत ६४ सामन्यांमध्ये सर्व संघांनी मिळून फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक १६९ गोल केले. केवळ एक सामनाच गोलशून्य बरोबरीत सुटला. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सरासरी २.६ गोल नोंदवले गेले.
  • सर्वाधिक पेनल्टी : या फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रथमच व्हिडीओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) प्रणालीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या विश्वचषकात सर्वाधिक २९ पेनल्टी देण्यात आल्या. त्यामुळे पेनल्टीवर सर्वाधिक गोलही या विश्वचषकात नोंदवले गेले. याआधी २००२च्या विश्वचषकात १८ पेनल्टी देण्यात आल्या होत्या. या पेनल्टीचा सर्वाधिक फायदा इंग्लंडच्या हॅरी केनने उचलला. त्याने संपूर्ण स्पर्धेत पेनल्टीवर तीन गोल केले.
  • सर्वात युवा खेळाडू : यंदाच्या विश्वचषकात फ्रान्सच्या एमबाप्पे याने गोल करून इतिहास रचला. तो पेले (१९५८) यांच्यानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल करणारा कमी वयाचा पहिला खेळाडू ठरला.
  • सर्वात ज्येष्ठ खेळाडू : इजिप्तचा गोलरक्षक इमान अल हैदरी (४५) हा विश्वचषक खेळणारा सर्वात बुजुर्ग खेळाडू ठरला.
  • अंतिम फेरी गाठणारा छोटा देश : क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आणि जेमतेम ४० लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा गेल्या ६८ वर्षांतील सर्वात लहान देश ठरला. याआधी १९५०साली उरुग्वेने फिफाची अंतिम फेरी गाठली होती.
  • सर्वात कमी रेड कार्ड : यंदाच्या विश्वचषकात व्हीएआर प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला असल्याने खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन करणे प्रकर्षाने टाळले. त्यामुळेच यावेळच्या विश्वचषकात फक्त चार खेळाडूंना रेड कार्ड मिळाले.  

नोव्हाक जोकोव्हिचला ४थे विम्बल्डन विजेतेपद

  • प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने कारकिर्दीतील १३वे ग्रँडस्लॅम विजेतेपद तर ४थे विम्बल्डन विजेतेपद पटकावले.
  • २०१६च्या फ्रेंच ओपन विजेतेपदानंतरचे जोकोविचचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
  • उपांत्यपूर्व फेरीत फेडररसारख्या दिग्गज टेनिसपटूला पराभूत केलेल्या आफ्रिकेच्या केविन अँडरसनला त्याने ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे पराभूत केले.
  • विम्बलडन विजेतेपद पटकावणारा जोकोविच जागतिक क्रमवारीत ११ क्रमांकांनी झेप घेत १०व्या स्थानावर पोहोचला आहे.
  • या क्रमवारीत स्पेनचा राफेल नदाल प्रथम स्थानी कायम आहे. तर दुसऱ्या स्थानावर रॉजर फेडरर आहे.
 क्रेजिकोव्हा व सिनिआकोव्हा जोडीला महिला दुहेरीचे जेतेपद 
  • चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा क्रेजिकोव्हा व कॅटरिना सिनिआकोव्हा यांच्या जोडीने विम्बल्डनच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले.
  • अमेरिकेच्या निकोल मेलिचार आणि चेक प्रजासत्ताकच्या क्वेता पेश्चके यांचा  ६-४, ४-६, ६-० असा १ तास २८ मिनिटांत पराभव केला.
  • या जोडीचे हे वर्षांतील सलग दुसरे विजेतेपद ठरले. यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपदही बाबरेरा व कॅटरिनाच्याच जोडीने मिळवले होते.
  • २००३नंतर एकाच वर्षी फ्रेंच व विम्बल्डन अशा दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावणारी ही पहिलीच जोडी ठरली.
 माइक ब्रायन आणि जॅक सॉक पुरुष दुहेरी स्पर्धेचे विजेते 
  • अमेरिकेच्या माइक ब्रायन आणि जॅक सॉक या जोडीने विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले.
  • ग्रँडस्लॅम दुहेरीच्या इतिहासात पहिल्यांदाज आपला भाऊ बॉबविना खेळणाऱ्या माइक ब्रायनचे हे कारकीर्दीतील १७वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
  • याबरोबरच त्याने आपला भाऊ बॉब ब्रायन व ऑस्ट्रेलियाच्या जॉन न्यूकोंब यांच्या १७ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी केली.
  • अंतिम फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा रावेन क्लासेन व न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस या जोडीला ६-३, ६-७, ६-३, ५-७, ७-५ असे पराभूत केले.
  • बॉब आणि माइक यांच्या जोडीने १६ ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. मात्र बॉबने दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली होती.
  • सॉकचे विम्बल्डन स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने २०१४मध्ये व्हासेक पोस्पिसिलच्या साथीने अजिंक्यपदाला गवसणी घातली होती.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी करण्याचा निर्णय

  • अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकाम खर्चात कपात करण्यासाठी राज्य सरकारने पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार असल्याने तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही. 
  • राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण १२१.२ मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची ८३.२ मीटर आणि तलवारीची उंची ३८ मीटर होती.
  • मात्र आता पुतळ्याची उंची ८३.२ ऐवजी कमी करुन ७५.७ मीटर करण्यात येणार असून, तलवारीची उंची ३८ मीटर ऐवजी ४५.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यामुळे तांबे, स्टील आणि इतर गोष्टींचा कमी वापर होईल. या बदलामुळे बांधकाम खर्च ३३८.९४ कोटींनी कमी झाला आहे.
  • यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून १२१.२ मीटरच राहणार आहे. तर स्मारकाची एकूण उंची २१० मीटर असणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी या शिवस्मारकाचे भुमीपूजन करण्यात आले होते.
  • या प्रकल्पाच्या कंत्राटासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी लार्सन अँड टूब्रो कंपनीची निविदा अंतिम पात्र ठरली.
  • हे स्मारक ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किमी आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किमी तर नरिमन पॉंइंट पासून २.६ किमी अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे.

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

  • भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची १६ जुलै रोजी ओदिशाच्या चांदीपूर तळावरुन अत्यंत कठोर चाचणी घेण्यात आली.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे आयुर्मान वाढवण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हे क्षेपणास्त्र किती उपयुक्त ठरु शकते यासाठी ही चाचणी होती.
  • ब्रह्मोसचे आयुर्मान आता १० वरुन १५ वर्ष झाले आहे. आयुर्मान वाढवण्यात आलेले ब्रह्मोस हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे.
  • अलीकडेच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विमानविरोधी आणि डोंगराळ भागातील लक्ष्यभेद करण्याची चाचणी करण्यात आली होती.
  • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) तसेच रशियाच्या एनपीओएमने संयुक्तपणे ब्रह्मोसची निर्मिती केली आहे.
  • ब्रह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे.
  • जमिनीवरुन हल्ला करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आवृत्ती २००७पासून भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्रांच्या ताफ्यात आहे.
  • सुखोई या भारताच्या अत्याधुनिक लढाऊ विमानावरुनही ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांनी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
  • तुषार अरोठेंच्या जागी योग्य व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत रमेश पोवारची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • ४० वर्षीय रमेश पोवार भारतासाठी दोनच कसोटी सामने खेळला आहे. या दोन सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतले होते.
  • याशिवाय त्याने ३१ एकदिवसीय सामन्यात ३४ गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रमेश पोवारने १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत.

महाराष्ट्राच्या काश्मिरा सांगळे यांना इंग्लंडमध्ये विंडरश पुरस्कार

  • रुग्णांच्या शुश्रूषा करण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल काश्मिरा सांगळे या महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्टचा इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतर्फे (एनएसएस) विंडरश पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
  • सांगळे या २००३मध्ये महाराष्ट्रातून लंडनला गेल्या. तेथे त्यांनी रुग्णसेवा केली. या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • व्हीलचेअरवरील रुग्णांच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सांगळे यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे.
  • भारतातही अपंग रुग्णांची हेळसांड थांबावी यासाठी आता भारतात रुग्णांचे पुनर्वसन व रोजगारासाठी केंद्र उभारण्याचा त्यांचा निर्धार आहे. या केंद्राद्वारे रोजगार संधीही उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर निलंबनाची कारवाई

  • श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल, प्रशिक्षक चंडीका हथरुसिंघे आणि संघ व्यवस्थापक अशनका गुरुसिन्हा यांच्यावर आयसीसीने ४ वन-डे व २ कसोटी सामन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
  • वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत बॉल टॅम्परिंग आणि खेळभावना न दाखवून वाद घातल्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे.
  • वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान, श्रीलंकन कर्णधार चंडीमलवर बॉलचा आकार बदलवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
  • या प्रकारानंतर लंकेच्या खेळाडूंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सामना सुरु होण्यासाठी दोन तास उशीर लागला.
  • सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या मध्यस्थीनंतर सामना सुरु झाल्यानंतर पंचांनी वेस्ट इंडिजच्या संघाला ५ धावा बहाल केल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा