चालू घडामोडी : १८ जुलै

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी

  • महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आणि अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत २२ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
  • ४० हजार कोटी रुपये केंद्राकडून आणि ७५ हजार कोटी रुपये नाबार्डकडून असे एकूण १ लाख १५ हजार कोटी रुपये यासाठी देण्यात आले आहेत.
  • या योजनेमध्ये राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा समावेश असून, नवीन आणि रखडलेले मिळून राज्यातील १०८ प्रकल्प या योजनेतून पूर्ण करण्यात येतील.
  • यामुळे राज्याची सिंचन क्षमता १८ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांवर जाणार आहे. तसेच राज्यातील ३ लाख ७७ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
  • पावसाळा संपल्यानंतर युद्ध पातळीवर या सिंचन प्रकल्पांचे काम सुरु करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये विदर्भातील ६६ तर मराठवाड्यातील १७ प्रकल्पांचा समावेश आहेत.

सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर

  • १८ जुलै रोजी सुरु झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारविरोधात लोकसभेत सादर केलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे.
  • या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत २० जुलै रोजी चर्चा होईल. केंद्रातील मोदी सरकार विरोधातील हा पहिलाच अविश्वास प्रस्ताव आहे.
  • लोकसभेच्या ५०हून अधिक सदस्यांनी अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला आहे. नियमांनुसार लोकसभेच्या सभापतींना हा ठराव १० दिवसांमध्ये चर्चेसाठी आणावा लागतो.
  • तेलगु देसम पार्टीचे खासदार के के श्रीनिवास यांनी शून्य प्रहारात रालोआ सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला.
  • आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याचे कारण पुढे करत टीडीपी मार्च २०१८मध्ये रालोआमधून बाहेर पडला होता.
  • टीडीपीच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळला होता.
  • संख्याबळामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला कोणताच धोका नाही. रालोआचे लोकसभेत ३१० खासदार आहेत.
  • अशावेळी अविश्वास प्रस्ताव हा फक्त सरकारविरोधात सांकेतिक विरोध दर्शवण्याचे माध्यम ठरेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • यापूर्वी २००३साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरोधात सोनिया गांधी यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र तो मंजूर करण्यात विरोधी पक्षांना अपयश आले.
  • लोकसभेतील सध्याचे संख्याबळ
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडी: भाजपा- २७३, शिवसेना- १८, लोजपा-०६, शिरोमणी अकाली दल-०४, इतर-०९ असे एकूण ३१० खासदार.
  • विरोधी पक्ष: काँग्रेस ४८, अण्णा द्रमुक ३७, तृणमूल काँग्रेस ३४, बीजेडी २०, इतर १२८ असे एकूण २६७ खासदार.

नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

  • भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने फ्रान्समध्ये सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. ८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
  • या स्पर्धेत भारताचा २०१२मधील चॅम्पियन केशॉर वॅलकॉटला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मी. लांब भाला फेकत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता.
  • नीरजने २०१६मध्ये वर्ल्ड अंडर-२० अॅथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ८६.४८ मीटर भालाफेक करत विश्वविक्रमासह एतिहासिक सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, रिओ ऑलिम्पिकची पात्रता निश्चित करण्यात तो अपयशी ठरला होता.

चित्रकार अंजोली इला मेनन यांना राष्ट्रीय कालिदास सन्मान

  • आपल्या चित्रांमधून स्त्रियांची विविध रूपे व त्यांचे भाव टिपणाऱ्या प्रसिध्द महिला चित्रकार अंजोली इला मेनन यांना मध्यप्रदेश सरकारने राष्ट्रीय कालिदास सन्मान प्रदान केला आहे.
  • दृश्य कलेत स्त्रीजीवनाची विविध रूपे मांडण्याच्या मेनन यांच्या कर्तृत्वाचा खास उल्लेख पुरस्कार समितीने केला आहे.
  • भारतातील अतिशय संवेदनशील व सिद्धहस्त कलाकारांपैकी त्या एक असून, विविध साधनांनी मेनन यांनी स्त्री प्रतिमा रेखाटल्या. मॅसोनाइटवर तैलरंगाने चित्रे रंगविणे, ही त्यांची खास पद्धत.
  • १९५८मध्ये त्यांचे चित्र प्रदर्शन दिल्लीत झाले होते तेव्हापासून आतापर्यंत त्यांची कलाकीर्द अव्याहत सुरू आहे.
  • जलरंगांतही त्यांनी काम केले आहे. इटलीच्या मुरानो बेटावर जाऊन त्यांनी काच-कलाकृती घडवल्या.
  • मुंबई विमानतळाच्या सर्वात मोठय़ा भित्तिशिल्पासह, अनेक भित्तिशिल्पे (म्यूरल) त्यांनी घडविली आहेत. त्यांना २०००मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • दिल्लीतील मेनोनजायटिस-थ्री जनरेशन्स ऑफ आर्ट (२००८), गॉड्स अँड अदर्स (२०००), यात्रा (२००६) ही त्यांची चित्र प्रदर्शने गाजली. पॅरिस, अल्जियर्स, साओ पावलो येथील महाप्रदर्शनांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • १९४०साली बंगालमध्ये (आताचा पश्चिम बंगाल) त्यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या मुंबईतील उपयोजित कलासंस्थेचा रस्ता पकडला.
  • नंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. नंतर फ्रेंच शिष्यवृत्तीवर त्यांना पॅरिसमधील इकोल द ब्यू आर्ट्स या संस्थेत कला शिकण्याची संधी मिळाली.

भारताचा विकास दर अनुमान आयएमएफने घटविला

  • भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात ७.३ टक्के तर २०१९-२० या आर्थिक वर्षात ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केला आहे.
  • दोन्ही अंदाज एप्रिल महिन्यातील अंदाजापेक्षा ०.१ व ०.३ टक्के कमी आहेत. तरीही येत्या काळात भारत ही सर्वाधिक जलद अर्थव्यवस्था असेल.
  • आयएमएफने एप्रिलमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, २०१८मध्ये भारताचा विकास दर यावर्षी ७.४ टक्के तर २०१९-२०मध्ये ७.८ टक्क्यांचे गाठण्याची शक्यता वर्तविली होती.
  • कठोर पतधोरण आणि वाढत्या इंधनाच्या किमती यामुळे भारताचा आर्थिक विकास दर पूर्वानुमानापेक्षा कमी राहील, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.
  • असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग हा चीनपेक्षा अधिक असेल. २०१८मध्ये चीनची अर्थव्यवस्था ६.६ टक्के तर २०१९मध्ये ती ६.४ टक्के दराने वाढेल.
  • जागतिक आढावा घेताना नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मात्र स्थिर ३.९ टक्के राहण्याचे अंदाजले आहे.

हिमा दास आसामची स्पोर्ट्स अॅम्बेसेडर

  • भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हिमा दासला आसाम राज्याची ‘स्पोर्ट्स अॅम्बेसेडर’ करण्यात येणार आहे. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी ही घोषणा केली.
  • जागतिक अजिंक्यपद (२० वर्षांखालील) स्पर्धेत आसामच्या हिमाने ५१.४६ सेकंदाची वेळ नोंदवून ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
  • अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.
  • राज्यात परतल्यानंतर आसाम सरकारतर्फे हिमाचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून, तिला ५० लाख रूपयांचे पारितोषिकही देण्यात येणार आहे.

फोर्ब्सच्या यादीत अक्षय कुमार, सलमान खान यांना स्थान

  • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाले आहे.
  • जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १०० सेलिब्रिटींची यादी फोर्ब्सने जाहीर केली. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.
  • या यादीत अक्षयकुमार ७६व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी तो ८०व्या स्थानावर होता. तर सलमान खान या यादीत ८२व्या स्थानावर आहे.
  • गेल्यावर्षी या यादीत ६५व्या स्थानावर वर्णी लागलेला शाहरुख खान यंदा मात्र पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
  • अक्षय कुमारने वर्षभरात २७५.४० कोटी कमविले आहेत. तर सलमानने २५६.३६ कोटी रुपये कमावले आहेत. दोघांच्याही कमाईत मागील वर्षीपेक्षा २२ टक्के वाढ झाली आहे.
  • अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर २८.५० कोटी डॉलर्स अर्थात १९३८ कोटी रुपयांसह या यादीत प्रथम स्थानी आहे.
  • अभिनेता जॉर्ज क्लुनी (२), मॉडेल कायली जेनर (३), फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो (१०), टेनिसपटू रॉजर फेडरर (२३), गायक बियान्स (३५), गोल्फपटू टायगर वूड्स (६६) यांचाही या यादीत समावेश आहे.

युरोपियन संघाकडून गुगलला ४.३ अब्ज युरोचा दंड

  • गुगलने आपल्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचा बेकायदा वापर केल्याप्रकरणी युरोपियन संघाने गुगलला ४.३ अब्ज युरोचा (३४,३०८ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.
  • गुगल अनेक फोन तयार कंपन्यांना पहिल्यांदा गुगल क्रोम ब्राऊजर इंस्टॉल करण्यासाठी दबाव आणते.
  • तसेच युरोपिअन संघात विकल्या जाणाऱ्या फोन्समध्येही गुगल सर्च आणि क्रोम पहिल्यापासूनच इन्टॉल केलेले असते.
  • युरोपिअन संघाच्या आरोपनुसार, गुगल सर्च इंजिनला मजबूत करण्यासाठी गुगल आपल्या अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करीत आहे. हे युरोपिअन संघाच्या अँटी ट्रस्ट नियमांनुसार बेकायदा आहे.
  • हा प्रकार येत्या ९० दिवसांत थांबवावा अन्यथा गुगलला त्यांच्या जागतिक स्तरावरील (अल्फाबेट या मुख्यालयाच्या) रोजच्या सरासरी उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून दररोज भरावी लागेल, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा