चालू घडामोडी : २४ जुलै

पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जुलै रोजी रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिका या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. २३ ते २७ जुलै दरम्यान पाच दिवसांचा मोदींचा हा दौरा आहे.
  • रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
  • या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मोदींनी रवांडा देशाला भेट दिली. दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेला रवांडा हा देश आहे.
  • यावेळी मोदी आणि रिपब्लिक ऑफ रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्यात द्विपक्षीय संवाद झाला.
  • या संपुर्ण दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान सुरक्षा, व्यापार, संस्कृती, कृषी, दुग्ध व्यवसायासंबंधी विविध करार करण्यात आले.
  • दोन्ही देशातील संबंध वृद्धींगत होण्यासाठी या दौऱ्यात भारताकडून २०० गायी रवांडा देशाला भेट म्हणून देण्यात आल्या.
  • रवांडामध्ये गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी गाय हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने, ‘गिरिंका’ या उपक्रमांतर्गत गरीब कुटुंबांना २०० गायी भारताने भेट म्हणून दिल्या.
  • रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांच्या विशेष पुढाकाराने ‘गिरिंका’ (एक कुटुंब एक गाय) ही राष्ट्रीय सामाजिक संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.
  • रवांडा हा देश छोटा असला तरीही राजधानीचे शहर असलेल्या किगलीत अत्यंत रचनात्मक रित्या मेट्रोचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच संपूर्ण देशात वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
  • महिला सशक्तीकरणातही रवांडा हा देश अव्वल स्थानी आहे. रवांडामध्ये दोन तृतीयांश महिला या खासदार आहेत.
  • या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गेल्या ४ वर्षात ५४ देशांना भेटी दिल्या आहेत. या दौऱ्यांवर १४८४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
  • त्यांनी गेल्या ४ वर्षातील १७१ दिवस विदेशात घालविले आहेत. त्यामुळे मोदींच्या पंतप्रधान कार्यकाळातील १२ टक्के वेळ परदेशात गेला आहे. मोदींच्या ४ वर्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट दिली.

एनपीएमधून सरकारी बँकांना बाहेर काढण्यासाठी ‘सशक्त’ मोहिम

  • वाढत्या थकित कर्जाचा सामना करणाऱ्या बँकांच्या ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकित कर्जाच्या मालमत्तांचा निपटारा करण्यासाठी बँका आणि वित्त कंपन्यांमध्ये आंतरकर्ज करार करण्यात आला आहे.
  • कोट्यवधी रुपयांच्या थकित कर्जातून सरकारी बँकांना बाहेर येता यावे याकरिता ‘सशक्त’ ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
  • याचाच एक भाग म्हणून विविध सरकारी तसेच खासगी बँका, वित्त कंपन्या यांच्या दरम्यान आंतरकर्ज करार झाला.
  • यानुसार ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकित कर्जाची खाती असलेल्या कर्जदार कंपन्यांच्या मालमत्तांचा तिढा सुटणार आहे.
  • आंतरकर्ज करारांतर्गत २२ सरकारी बँका, १९ खासगी बँका, ३२ विदेशी बँका, १२ वित्तीय कंपन्यांनी स्वाक्षरी केली आहे. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, हुडको यांचाही समावेश आहे.
  • या करारानुसार, ५० कोटी रुपयांवरील थकित कर्जाचे प्रत्येक खाते याबाबत नेमण्यात आलेली समिती हाताळेल.
  • संबंधित थकित कर्जदाराकडून ज्या बँकेची सर्वाधिक रक्कम थकित आहे, ती बँक याबाबतचा तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. निर्णय मात्र सर्वानुमते घेण्यात येईल.
  • त्यानंतर तो निर्णय सर्व कर्ज देणाऱ्या बँक, वित्त कंपन्यांना बंधनकारक असेल. हा कर्ज तिढा १८० दिवसांमध्ये सोडविणे बंधनकारक असेल.
  • थकित कर्जाची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पंजाब नॅशनल बँकेचे बिगर अध्यक्ष सुनिल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
  • या समितीने मालमत्ता पुनर्बाधणी कंपनी स्थापन करण्याची शिफारस सरकारकडे केली होती.
  • देशातील बँकांमधील एकूण अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) रक्कम डिसेंबर २०१७ अखेर ९ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

मराठा आंदोलन: काकासाहेब शिंदे कोण होते?

  • मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारत जलसमाधी घेतली.
  • त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.
  • गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे (वय २७) हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता.
  • गंगापूर तहसील कार्यालयासमोर शेकडो तरुणांचे सुरु असलेले ठिय्या व उपोषण आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत, मराठी समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रसासानाला दिला होता.
  • याच आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गंगापूर तहसील परिसरात तणाव निर्माण झाला. तसेच या घटनेनंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले.
  • या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
  • सरकारने काकासाहेबांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत आणि त्यांचा भावाला आठवड्याभरात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मेघा धाडे विजेती

  • कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली असून पुष्कर जोगने दुसरे स्थान पटकावले.
  • मेघा धाडेला १८ लाख ६० हजार रुपये आणि खोपोली येथे निर्वाणा लिजर रिअॅलिटी यांच्याकडून सिटी ऑफ म्युझिक या गृहप्रकल्पातील घर बक्षिस म्हणून मिळाले.
  • बिग बॉस स्पर्धेत तिसरी आलेली स्मिता गोंदकर हिला जेमिनी ऑईल यांच्याकडून उत्कृष्ठ आरोग्यासाठी बक्षिस मिळाले.
  • मेघा धाडेने कसोटी जिंदगी की, कस्तुरी, झुंज या मालिकांमध्ये तर मॅटर, मान सन्मान, एक होती राणी आदी चित्रपटात काम केले आहे.
  • गेले ३ महिने सुरु असलेल्या मराठी बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बिग बॉसचे टास्क पूर्ण करताना अनेक वादाचे प्रसंग उभे राहिले होते.
  • बिग बॉस मराठीच्या या पहिल्या पर्वात प्रथम १५ कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर ३ स्पर्धक हे वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आले होते.
  • यापैकी अंतिम फेरीत मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर यांनी स्थान मिळवले होते.

पाकिस्तानात निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी तृतीयपंथींची नेमणूक

  • पाकिस्तानात होत असलेल्या मतदान प्रक्रिया आणि निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १२५ तृतीयपंथींची नेमणूक करण्यात आली आहे.
  • हे तृतीयपंथी मतदान व इतर प्रक्रियेतील पारदर्शकता आणि व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत.
  • ट्रस्ट फॉर डेमोक्रॅटिक एज्युकेशन अँड अकाऊंटेबिलिटी या स्वयंसेवी संस्थेने निवडणुकीच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नागरीकांना प्रशिक्षण दिले आहे, त्यात या तृतीयपंथीयांचाही समावेश आहे.
  • या सर्वांची लाहोर, कराची, इस्लामाबाद, क्वेट्टा या शहरांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.
  • निवडणूक निरीक्षक म्हणून हे लोक कोठे मतदारांच्या अधिकारांचा संकोच होत असेल किंवा समाजातील अल्पसंख्यांकावर अन्याय होत असेल तर त्याची नोंद करतील.
  • याबरोबरच १३ तृतीयपंथी या निवडणुकीत विविध भागांतून निवडणूकही लढवत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या तृतीयपंथीयांची संख्या ५ लाख इतकी आहे.

डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतील तुरुंगात जीवघेणा हल्ला

  • २६/११च्या मुंबई हल्ल्यातील कटात पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेला सहाय्य करणाऱ्या डेव्हिड कोलोमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे.
  • पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक असलेल्या हेडलीला मुंबई हल्ल्याबद्दल दोषी ठरवत अमेरिकन न्यायालयाने ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. शिकागो तुरुंगात तो स्थानबद्ध आहे.
  • हेडलीच्याच बराकीत जेरबंद असलेल्या दोन कैद्यांनी त्याच्यावर ८ जुलै रोजी हल्ला केला. या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
  • हेडलीवर हल्ला करणारे दोघे कैदी भाऊ असून, काही दशकांपूर्वी पोलिसांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली आहे.
  • दाऊद सईद गिलानी असे मूळ नाव असलेला हेडली पाकिस्तान सरकार तसेच दहशतवादी संघटनांसाठी ‘डबल एजंट’ म्हणून काम करीत होता.
  • २००६ ते २००८ दरम्यान त्याने अनेक वेळा भारतात येऊन सीएसटी रेल्वेस्थानक, कॅफे लिओपोल्ड, हॉटेल ताज, नरिमन हाऊस तसेच ट्रायडंट हॉटेलचे फोटो व व्हिडीओ लष्कर ए तोयबाला दिले होते.
  • मुंबई हल्ल्यातील सहभाग उघड होताच अमेरिकेने त्याला पकडले, मात्र भारताच्या हवाली न करता त्याच्यावर आपल्याच देशात खटला चालवला.
  • फेब्रुवारी २०१६मध्ये त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई विशेष न्यायालयात कबुलीजबाब दिला होता.
  • २६/११ च्या हल्ल्यामुळे मुंबई हादरली होती. या हल्ल्यात २५०पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा