चालू घडामोडी : २६ जुलै

सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना मॅगसेसे पुरस्कार

  • आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार २०१८ या वर्षासाठी सहा जणांना जाहीर करण्यात आला. या सहा जणांमध्ये २ स्त्रियांचा तसेच २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
  • प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी या दोन भारतीयांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • याशिवाय पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी, व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोर या नवजात देशातील मारिया डी लार्देस मार्टिन्स क्रूझ या चौघांचाही समावेश आहे.
  • कंबोडियाच्या युक छांग यांनी आपल्या देशातील वंशसंहाराची स्मृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या स्मृतींमधून विद्वेषाला कायमची मूठमाती मिळावी, ही त्यांची यामागची संकल्पना.
  • ईस्ट तिमोरच्या मारिया यांनी सर्व वंश व वर्णाच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या लढ्यात गरिबी हटावला विशेष स्थान आहे.
  • फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी यांनी गेले अर्धशतक सामाजिक न्यायाची लढाई चालवली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा रोषही पत्करला.
  • व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम यांनी अपंगत्वावर मात करून देशातील अपंगांसाठी सारे जीवन वाहिले आहे.
 डॉ. भरत वाटवाणी यांच्याबद्दल 
  • महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले डॉ. भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवे जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • वाटवाणी यांच्या कार्यामुळे त्यांना मनोरुग्णांचा देवदूत मानले जाते. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असलेल्या वाटवाणी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी रस्त्यावरील अनेक मनोरुग्ण मुलांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन केले.
  • या मुलांवर उपचार करता यावेत आणि त्यांना निवारा मिळावा म्हणून त्यांनी १९८८ साली त्यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना केली.
  • या केंद्रात फुटपाथवर राहणाऱ्या मनोरुग्णांना आणले जाते. येथे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था करतानाच त्यांच्यावर मोफत मानसिक उपचार केले जातात व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली जाते.
 सोनम वांगचुक यांच्याबद्दल 
  • सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील आमिर खानने साकारलेले फुंगसुक वांगडु अथवा रँचो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे.
  • वांगचुक यांनी १९८८साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला.
  • शाळेची सोय नसल्याने लडाखमधील अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. वांगचुक यांनी लेहपासून १३ किलोमीटरवर फेय येथे मुलांसाठी शाळा सुरू केली.
  • या शाळेत नापास झालेल्या मुलांना शिकवले जाते. ही शाळा सौर ऊर्जेवर चालते. येथे मुलांना अभ्यासात पशुपालन, शेती, अन्न पदार्थ बनवणे तसेच अती तीव्र वातावरणात राहण्याचे धडे दिले जातात.
  • १९९४साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे.
  • परिणामी १९९६साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण फक्त ५ टक्के होते, ते २०१५साली ७५ टक्के झाले.
  • याशिवाय लडाखमधील लोकांची पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी वितळणाऱ्या बर्फाचे पाणी साठवून ठेवता येणारा हिमस्तुप तयार केला.
  • वांगचुक हे लडाखमध्ये विद्यार्थ्यांच्या एका समुहाने स्थापन केलेल्या स्टूडंट्स एजुकेशनल एंड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख (एसईसीओएमएल)चे ते संस्थापक आहेत.
  • अशाप्रकारे लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात कल्पक बदल केले. त्यांनी लडाखमध्ये शैक्षणिक क्रांती घडवली.
  • वांगचुक यांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०१६चा रोलेक्स अॅवॉर्ड फॉर इंटरप्राइज लॉस एंजेलस येथे प्रदान करण्यात आला होता.
 मॅगसेसे पुरस्काराबद्दल 
  • आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे ॲवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
  • सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • आतापर्यंत विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरूणा रॉय यांसारख्या अनेक भारतीय दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठ्या सरोवराचा शोध

  • इटलीच्या संशोधकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले आहे.
  • यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 
  • याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
  • युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवरचा शोध लागला आहे.
  • मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास २० किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे.
  • हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
  • मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्‍यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 
  • मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.
  • या नवीन शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्‍यता आहे.

पाकिस्तानात इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष

  • पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळवता आले नाही.
  • तरीही ६५ वर्षीय इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित आहे. इम्रान खान पाकिस्तानचे १९वे पंतप्रधान असतील.
  • पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.
  • नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी २७० जागांसाठी पार पडलेल्या निवणुकीत ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने जिंकल्या.
  • नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.
  • या निवडणुकीत पाकिस्तानची सत्ता बळकावू पाहणारा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफीज सईदच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
  • निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला आहे.
  • पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
  • २७२ पैकी दोन ठिकाणी अजूनही निवडणूक झालेली नाही त्यामुळे इम्रान यांना बहुमतासाठी १३६ हा आकडा जुळवून आणावा लागेल. सरकार स्थापनेसाठी त्यांना छोटया पक्षांची व अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
  • अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे.
  • निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर भारताबाबत इम्रान काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
  • इम्रान पंतप्रधान झाल्यास काश्मीर प्रश्न अधिक चिघळण्याची व भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
 इम्रान खान यांच्याबद्दल 
  • १९९२साली पाकिस्तानच्या विश्वकरंडक विजेत्या क्रिकेट संघाचे कर्णधार असलेले इम्रान खान यांनी पाकिस्तानला विश्वकरंडक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
  • त्यानंतर त्यांनी १९९६साली पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली.
  • सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे त्यांच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही.
  • मात्र २०१३साली खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा इम्रानला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते.
  • इम्रान खान हे पाकमधील कट्टरतावादी गटांची कायम पाठराखण करत आले आहेत. इम्रान यांच्या कार्यकाळात पाकमधील कट्टरपंथी शिरजोर होण्याची भीती आहे.
  • इम्रान यांच्या या भूमिकांमुळे पाकच्या उदारमतवादी वर्तुळात त्यांना ‘तालिबान खान’ या नावानेही ओळखले जाते.

कर्नाटकमध्ये दुर्मिळ रक्तगटाचा शोध

  • कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे.
  • ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे. 
  • या रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले असता या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.

व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाला मंजुरी

  • व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. एकत्रीकरणानंतर ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी असेल.
  • दोन्ही कंपन्या एकत्रित आल्यानंतर त्यांचे एकत्रित मूल्य २३ अब्ज डॉलरवर (दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) जाण्याची शक्यता आहे.
  • शिवाय या कंपनीकडे देशातील दूरसंचार उद्योगाचा ३५ टक्के बाजार हिस्सा राहणार असून, एकूण ग्राहक संख्या ४३ कोटींवर जाणार आहे.
  • यामुळे व्होडाफोन आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ यांच्यात येत्या काही दिवसांत नव्याने डेटायुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे.
  • सध्याचे ग्राहक राखून नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी या तिन्ही कंपन्या अधिक आकर्षक डेटा योजना व अन्य सुविधा सादर करण्याची शक्यता आहे. 
  • आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाद्वारे मोबाइल व्यवसायाच्या एकत्रीकरणासाठी दूरसंचार विभागाला एकत्रितरित्या ७२६८.७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  • या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारने ९ जुलैलाच मंजुरी दिली होती. मात्र, तत्पूर्वी दोन्ही कंपन्यांना सरकारने थकीत रक्कम भरण्याविषयी सूचना केली होती.
  • दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीमध्ये कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर गैरकार्यकारी संचालकपदाची जबाबदारी येणार आहे.
  • नव्या कंपनीच्या सीईओपदी व्होडाफोन इंडियाचे सध्याचे सीओओ बालेश शर्मा तर सीएफओपदी आयडियाचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अक्षय मुंद्रा यांची नियुक्ती होणार आहे.

पाकिस्तानात मुख्य न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिलेची नेमणूक

  • बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर या महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानसारख्या धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात पहिल्यांदाच एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
  • पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची नेमणूक  झाली नव्हती.
  • ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२मध्ये नेमणूक झाली.
  • बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व १९८०मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
  • त्यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७मध्ये नेमणूक झाली. नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले.
  • १९९८मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९ मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला.
  • नंतर त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर २०११मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले.
  • अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या होत्या.
  • ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी आहे.
  • पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा