चालू घडामोडी : २७ जुलै

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली

  • भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची २७ जुलै रोजी तिसरी पुण्यतिथी.
  • लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला.
  • २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.
  • अब्दुल कलाम यांचे संपुर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारासह पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली.
  • कलाम यांना कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.
  • १९६३साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले.
  • भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली.
  • या चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. यानंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
  • १९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते.
  • भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून २००२ रोजी त्यांनी देशाचे ११वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
  • अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.
  • अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. राजेंद्र शिंदे

  • मुंबईच्या सेंट झेवियर्स या ख्यातकीर्त महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. राजेंद्र शिंदे यांची महाविद्यालयाच्या प्राचार्य (प्रिन्सिपल) पदावर नियुक्ती झाली आहे.
  • काही प्रमाणात धार्मिक पगडा असलेल्या झेविअर्सच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे शिंदे हे महाविद्यालयाचे पहिलेच मराठी प्राचार्य आहेत.
  • गुणवत्तेचा दर्जा, कडक शिस्त, सातत्याने नवोन्मेष घडविण्याची उर्मी आणि विद्यार्थीपूरक धोरण यामुळे मुंबईत या महाविद्यालयाचा कमालीचा दबदबा आहे. येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असते.
  • याच महाविद्यालयात १९८०मध्ये विद्यार्थी म्हणून शिंदे यांनी प्रवेश घेतला होता. पुढे याच महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
  • १९८३मध्ये ते उपप्राचार्य झाले. आता येत्या १ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे २४वे प्राचार्य म्हणून ते पदभार स्वीकारतील.
  • सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा सर्व कारभार ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालविला जातो. दिल्ली, चेन्नई, कोलकात्यातही अशीच ख्रिश्चन महाविद्यालये आहेत. तिथेही आजवर बिगरखिस्ती माणूस प्राचार्य झालेला नाही.
  • मूळचे नाशिक जिल्ह्यातील ओढा गावचे असलेल्या राजेंद्र शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या, सरकारी शाळेत झाले.
  • पुढच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले. १९८०साली त्यांनी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी झेविअर्समध्ये प्रवेश घेतला.
  • पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी महाविद्यालयातील वनस्पती संग्रहालयचे अभिरक्षक म्हणून काम सुरू केले. हे काम करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात पीएचडीही केली.
  • टॅक्सनॉमी हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. औषधी वनस्पती, वनस्पतींची नावे यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे.
  • सामान्य माणसाला तुलनेने किचकट वाटणारा वनस्पतिशास्त्रासारखा विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी आहे.
  • पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्गाची भाषा शिकावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला संशोधनाची वाट दाखवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे.

शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

  • देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांनी २७ जुलै रोजी पौर्णिमेला या शतकातील (२००१ ते २१००) सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण अनुभवता आले.
  • या ग्रहणाचा कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरले. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल.
  • २७ जुलै रोजी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू झाले. १ तास दीड मिनिटे इतका केल चंद्राची खग्रास अवस्था होती.
  • जुलै महिन्यामध्ये सूर्य पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते.
  • या ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते.
  • चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते.
  • हे खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९वे ग्रहण होते. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते.
  • याच दिवशी सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा तांबडा ग्रह मंगळही प्रतियुतीमध्ये आला. तो २००३नंतर प्रथमच पृथ्वीपासून इतक्या कमी अंतरावर आला.
  • पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळाले.
  • जवळपास संपूर्ण भारतातून या ग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मीलन व मोक्ष) पाहायला मिळाल्या.

भारतीय महिला तिरंदाजी संघ विश्वक्रमवारीत प्रथम स्थानी

  • भारताच्या महिला तिरंदाजी कम्पाऊंड संघाने विश्वक्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीसह प्रथम स्थान पटकविले आहे.
  • कम्पाऊंड प्रकारात अव्वल स्थान मिळविण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. रिकर्व्ह प्रकारात दीपिका कुमारी यापूर्वी विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली होती.
  • अंताल्या आणि बर्लिन विश्वचषकात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या महिला संघाचे एकूण ३३४२.६ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावरील चायनीज तायपेई संघाचे सहा गुण कमी आहेत.
  • विश्वचषकात रौप्य संपादन करणाऱ्या दोन्ही संघात ज्योती सुरेखा वेन्नाम आणि मुस्कार किरार यांचा समावेश होता.
  • अंताल्या स्पर्धेत दिव्या घयाल हिचा तिसरी खेळाडू म्हणून तर बर्लिन स्पर्धेच्यावेळी तृषा देव हिचा संघात समावेश होता.
  • वैयक्तिक गटात अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारताचे दीपिका कुमारी आणि अभिषेक वर्मा या दोन खेळाडूंचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू अनुक्रमे रिकर्व्ह आणि कम्पाऊंड प्रकारात सातव्या स्थानावर आहेत.

पश्चिम बंगालचे नामांतरण बांगला करण्यासाठी ठराव मंजूर

  • पश्चिम बंगाल विधानसभेत पश्चिम बंगाल राज्याचे नामांतरण ‘बांगला’ असे करण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व भाषांमध्ये हे नामांतरण करण्यात यावे असे ठरावात म्हटले होते.
  • आता हा ठराव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. गृह मंत्रालयाने ठरावाला मंजुरी दिली तरच पश्चिम बंगालचं ‘बांगला’ असे नामांतरण केले जाऊ शकते.
  • याआधी २९ ऑगस्ट २०१६ रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेत नामांतरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता.
  • यानुसार पश्चिम बंगालचे नाव बंगालीमध्ये बांगला, तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये बंगाल असे करण्याचा प्रस्ताव होता.
  • मात्र त्यावेळी काँग्रेस, भाजपा आणि डाव्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे देता येणार नसल्याची सबब केंद्र सरकारने दिली होती.

बेंजामिन पवार्डने मारलेला गोल विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट

  • फ्रान्सचा बचावपटू बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात मारलेला गोल हा विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोल असल्याची घोषणा फिफाकडून करण्यात आली आहे.
  • ल्युकास हेरांडेजकडून मिळालेल्या पासवर उजव्या पायाने अफलातून फटका लगावत केलेला गोल हा तांत्रिकदृटय़ा अप्रतिम गोल असल्याचे फिफाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
  • सामन्याच्या ५७व्या मिनिटाला त्याने केलेल्या या गोलमुळे फ्रान्सला त्यावेळी २-२ अशी बरोबरी साधता आली. त्यानंतर फ्रान्सने तो सामना ४-३ असा जिंकला.
  • फिफा विश्वचषकातील एकूण १६९ गोलपैकी तो सर्वोत्तम असल्याचे प्रेक्षकांच्या मताद्वारे स्पष्ट झाले.
  • त्या गोलला कोलंबियाचा मध्यरक्षक ज्युआन क्विंटेरो याने जपानविरुद्ध फ्री किकवर मारलेला गोल आणि क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रीचने अर्जेंटिनाविरुद्ध केलेल्या गोलपेक्षा अधिक जनसमर्थन मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा