चालू घडामोडी : २९ जुलै

सौरभ वर्माला रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत रशिया ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • अंतिम फेरीत सौरभने जपानच्या कोकी वातानाबेची झुंज १९-२१, २१-१२, २१-१७ अशा ३ सेट्समध्ये मोडून काढली.
  • दुखापतीमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या सौरभने २०१६मध्ये चायनीज तैपेई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे.
  • याशिवाय सौरभने बेंगळुरूत झालेली अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धा जिंकून आशियाई स्पर्धेतील स्थानही निश्चित केले आहे.
  • याच स्पर्धेच्या मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
  • रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीने मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत रशियाचा व्लादिमिर इव्हानोव्ह आणि कोरियाची मिन क्यूंग किमने त्यांना पराभूत केले.

स्मृती मंधानाचे महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक

  • इंग्लंडमधील केआयए (KIA) सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे.
  • वेस्टर्न स्ट्रॉम संघाकडून खेळताना स्मृतीने १८ चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्मृतीने या सामन्यात १९ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी केली.
  • इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या केआयएसुपर लीग स्पर्धेत खेळणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
  • याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टर्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता.

भारतात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू

  • भारतात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘क्लॉ’ (कन्झर्वेशन, लेन्स आणि वाईल्डलाईफ) या समूहाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
  • भारतात गेल्या सात महिन्यांत सुमारे ५५ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील २६ मृत्यू हे मध्य भारतातील महाराष्ट्र (११), मध्यप्रदेशात (१५) झालेले आहेत.
  • गेल्या सात महिन्यांत सुमारे २२ वाघिणींचा मृत्यू झाला आहे. सुमारे १५ पिलांना जन्म देण्याची एका वाघिणीची क्षमता असते. ही बाब लक्षात घेतल्यास झालेली हानी फार मोठी आहे.
  • मध्य भारतात वीज प्रवाहाचा धक्का हे वाघांच्या मृत्यूचे एक मोठे कारण समोर आले आहे. सुमारे १२ वाघांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला.
  • रस्ते अपघातातील वाघमृत्यूची संख्याही अधिक आहे. ‘बाजीराव’ नावाचा ढाण्या वाघ महाराष्ट्राने अपघातात गमावला होता.
  • या ५५ पैकी १३ वाघांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. १५ वाघांचा मृत्यू अनैसर्गिक तर २७ मृत्यू नैसर्गिक असल्याचे समोर आले आहे. यातील २२ मृत्यू हे एक ते तीन वर्षे वयोगटातील वाघांचे आहेत.
  • २९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा