चालू घडामोडी : ३० जुलै

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा मसुदा जाहीर

  • घुसखोरांसाठी सर्वांत सोयीचे ठिकाण असलेल्या आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) मसुदा जाहीर करण्यात आला.
  • यानुसार आसाममधील एकूण ३.२९ कोटी अर्जांमधून २.८९ कोटी लोकांचे नावे या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली. तर ४० लाख लोकांची नावे यातून वगळण्यात आली.
  • कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकत्व सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांची नावे या मसुद्यामधून बाहेर ठेवण्यात आली.
  • हा केवळ मसुदा असून, त्याला अंतिम रूप देण्यात आलेले नाही. ज्या रहिवाशांची नावे या मसुद्यात समाविष्ट केलेली नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी दावा करण्याचा आणि या निर्णयावर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असल्याचे रजिस्ट्रार जनरल यांनी स्पष्ट केले आहे.
  • हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० तुकड्या तैनात करण्यात आल्या.
  • तसेच बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • शेजारील देशांमधून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करुन येथेच वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांची संख्या मोठी आहे. ही देशाच्या सुरक्षेसह इतर कारणांसाठी गंभीर बाब आहे.
 राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका 
  • नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनमध्ये (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) भारतातील अधिकृत नागरिकांच्या नाव, फोटो, पत्यासह माहिती दिलेली असते.
  • आसाममध्ये या राज्यातील अधिकृत भारतीय नागरिकांची माहिती असलेली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • यामध्ये नागरिकांची नावे, पत्ते आणि फोटोंचा समावेश आहे. यामुळे पहिल्यांदाच आसाममधील अवैध नागरिकांची माहिती कळू शकणार आहे.
  • देशातील नागरिकत्व कायद्यापेक्षा थोड्या वेगळ्या स्वरुपात आसाममध्ये अकॉर्ड १९८५ कायदा लागू आहे.
  • या कायद्यानुसार, २४ मार्च १९७१च्या मध्यरात्रीनंतर आसाममध्ये प्रवेश करणाऱ्यांनाच भारतीय नागरिक मानण्यात यावे, असे म्हटले आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सावो गेम्समध्ये सुवर्णपदक

  • भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलंडमधील सावो गेम्समध्ये ८५.६९ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक पटकावले.
  • आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन तैपेईच्या चाओ सुन चेंगचा पराभव केला. चेंगने ८२.५२ मीटरपर्यंत भालाफेक करीत रौप्य जिंकले.
  • २३ वर्षीय चेंग हा एकमेव आशियाई खेळाडू आहे ज्याने ९० मीटरपेक्षा पुढे भालाफेक करीत विक्रम नोंदवला आहे.
  • त्याने चीन तैपेईत गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सीटी गेम्समध्ये ९१.३६ मीटर अंतरावर भाला फेकत विक्रम नोंदवला होता.
  • नीरजने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मे महिन्यांत दोहा येथे झालेल्या डायमंड लीग मिटिंगमध्ये त्याने ८७.४३ मीटर भालाफेकत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
  • या सुवर्णपदकामुळे त्याने आशियातील विक्रमवीर चेंगला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावला आहे.

दाऊदी बोहरा समाजातील अनिष्ट खतना प्रथेवर प्रश्नचिन्ह

  • दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या अल्पवयीन मुलींच्या खतना प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
  • या प्रथेवर बंदी आणावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
  • या याचिकेबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बायकांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो असे म्हटले आहे.
  • खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेसाठी मारक ठरते. तसेच आरोग्यासाठीही हानीकारक आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
  • खतनासारख्या प्रथा या स्त्रियांचा स्वाभिमान धुळीला मिळवणाऱ्या आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.
  • दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या अल्पवयीन मुलींची सुंता करण्याच्या या अनिष्ट प्रथेवर संपूर्ण भारतात बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
 खतना प्रथेबद्दल 
  • मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे मुलांची सुंता म्हणजेच जननेंद्रियावरील त्वचा कापली जाते त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजातील मुलींमध्ये खतना केले जाते.
  • मुलींमध्ये खतना करताना त्यांच्या जननांगाचा भाग कापला जातो. महिलांच्या लैंगिक भावनांना शिस्त लावण्यासाठी हा प्रकार केला जातो, असे या समाजाचे म्हणणे आहे.
  • मुली ७ वर्षाच्या झाल्यावर त्यांना समाजातीलच एका स्त्रीकडे नेले जाते. आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता हा भाग कापला जातो.
  • हे करताना मुलींना अतोनात वेदना होतात. अनेकदा मुली काही दिवसांसाठी आजारी पडतात.
  • हा विषय अतिशय नाजूक असल्याने मुली, महिला या विषयावर विशेष बोलत नाहीत. त्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवणे जरा कठीणच.
  • पण तरीही याच समाजातील काही स्त्रियांनी एकत्र येऊन या प्रथेच्या विरोधात मोहिम सुरु केली आहे.
  • सहीयो म्हणजेच मैत्रिणी असे या मोहीमेचे नाव असून आरेफा जोहरी ही तरुण पत्रकार या ही मोहीम राबवत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा