चालू घडामोडी : ३१ जुलै

अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासाठी फाशीची शिक्षा

  • अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ लोकसभेत ३० जुलै रोजी आवाजी मतदानाने मंजूर झाले.
  • यापूर्वीच्या कायद्यामध्ये सज्ञान स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद असली तरी १२ किंवा १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्हती.
  • ती उणीव भरून काढून गुन्हेगारांवर वचक बसावा या हेतूने हे विधेयक संमत करण्यात आले. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय देण्याचे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
  • या विधेयकात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणातील किमान शिक्षा ७ वर्षांहून वाढवून १० वर्षे केली आहे. ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते. प्रसंगी मृत्युदंडही ठोठावला जाऊ शकतो.
  • तसेच १६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद १० वर्षांवरून २० वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते.
  • १६ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्काराबद्दल आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १२ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा असेल.
  • बलात्कार प्रकरणात दोषी अथवा निर्दोष ठरविलेल्या प्रकरणांचे अपील सहा महिन्यांच्या आत निकाली काढावे लागतील. तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची यात तरतूद आहे.
  • तसेच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता आरोपीला जामीन मिळू शकणार नाही.
  • पीडितेला तपासात होणारा त्रास पाहता, कोणताही वकील पीडितेच्या चारित्र्याबाबत प्रश्न करणार नाही, अशीदेखील तरतूद या विधेयकात आहे.

एक हजार कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला संघ

  • भारताविरुद्ध एजबस्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडसाठी पुरुष विभागातील १०००वा कसोटी सामना असणार आहे.
  • १००० कसोटी सामने खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरणार आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ८१२ कसोटी सामने खेळले आहेत.
  • इंग्लंडने मार्च १८७७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ते ९९९ कसोटी सामने खेळले आहेत.
  • त्यापैकी ३५७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे तर २९७ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ३४५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
  • या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीच्या अव्वल श्रेणी पंच मंडळातील वरिष्ठ सदस्य व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो हे आयसीसीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रिव्ह्ज यांचा रौप्य सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.
  • भारताविरुद्ध इंग्लंडने जून १९३२मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. उभय संघांदरम्यान ११७ कसोटी सामने खेळले गेले असून, इंग्लंडने ४३ सामन्यांत तर भारताने २५ सामन्यांत विजय मिळवला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत.
 इग्लंडची कसोटी क्रिकेटमधील वाटचाल 
  • पहिली कसोटी : १५ मार्च १८७७ रोजी इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली अधिकृत कसोटी खेळली. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४५ धावांनी जिंकला.
  • पहिला कर्णधार : जेम्स लिलीव्हाईट (ज्यु.) हे इंग्लंडच्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे पहिले कर्णधार.
  • पहिला विजय : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुस-या कसोटीत इंग्लंडने ४ विकेट राखून विजय मिळवला.
  • पहिली विकेट : कसोटीतील पहिल्या सामन्यात अॅलन हिल यांनी इंग्लंडकडून पहिली विकेट घेण्याचा मान मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या नॅट थॉम्सनचा त्रिफळा त्यांनी उडवला होता.
  • पहिले शतक : डब्लू जी ग्रेस यांनी ६ सप्टेंबर १८८० रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटीत इंग्लंडसाठी पहिले शतक झळकावत २९४ चेंडूंत १५२ धावा केल्या.
  • पहिला मालिका विजय : इंग्लंडने १८८०च्या दौऱ्यात घरच्या प्रेक्षकांसमोर पहिला कसोटी मालिका विजय मिळविला.
  • पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज : अल्फ्रेड शॉ यांनी इंग्लंडच्या पहिल्याच कसोटीत पाच विकेट घेतल्या होत्या आणि तशी कामगिरी करणारे ते पहिले इंग्लिश गोलंदाज ठरले.
  • दहा विकेट घेणारा पहिला गोलंदाज : १९५६मध्ये ऑफ स्पीनर जीम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दहा विकेट घेतल्या हेत्या. लेकर यांनी या सामन्यात एकूण १९ गडी बाद केले.

पोस्टाची पेमेंट बँक ऑगस्टपासून सुरु होणार

  • देशभरातील ६५० शाखा आणि १७ कोटी खात्यांसह बहुप्रतीक्षित ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (आयपीपीबी) ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेत रूजू होत आहे.
  • रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ऑगस्टपासून बँकेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
  • पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त झालेली आयपीपीबी ही एअरटेल आणि पेटीएमनंतरची तिसरी संस्था आहे.
  • देशभरात सध्या १.५५ लाख टपाल कार्यालयांचे (पैकी १.३३ लाख कार्यालये ग्रामीण भागात) जाळे पसरले आहे. ही कार्यालये पोस्टाच्या पेमेंट बँकेसाठी ग्राहक केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. या शिवाय ६५० शाखा अधिकृतरित्या कार्यरत राहणार आहेत.
  • याशिवाय आयपीपीबीतर्फे लवकरच देशभरात ५००० एटीएमचीही उभारणी करण्यात येणार आहे. तसेच, ग्रामीण भागात ३२५० अॅक्सेस पॉइंटची निर्मिती करण्यात येणार आहे.
  • शिवाय ग्रामीण भागात ११ हजार डाक सेवकांची आणि शहरी भागासाठी पोस्टमनची पदे निर्माण करून घरपोच बँकेची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
  • खातेधारकांना आपल्या आयपीपीबी खात्यामधून सुकन्या समृद्धी, आवर्ती योजना, स्पीड पोस्ट आदी योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
  • आयपीपीबीतर्फे लवकरच ऑनलाइन बँकिंग सेवेसाठी अॅप सादर करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना फोन बिल, डीटूएच, गॅस आणि विजेची देयके अदा करता येणार आहेत.
  • आयपीपीबीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक : सुरेश सेठी
 पेमेंट बँक म्हणजे काय? 
  • पेमेंट बँक म्हणजे आकाराने छोट्या असणाऱ्या बँका. या बँका शक्यतो मोबाइल फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध सेवा पोहोचवतात.
  • त्यामुळे बँकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेपर्यंत जाण्याची आवश्यकता भासत नाही.
  • कोणीही सामान्य व्यक्ती वा व्यावसायिक वा संस्था पेमेंट बँकेत खाते उघडू शकतो. पेमेंट बँक प्रत्येक खातेधारकाकडून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारू शकते.
  • सामान्य बँकांच्या तुलनेत पेमेंट बँकांची कार्यपद्धती थोडी वेगळी असते. या बँका केवळ रक्कम जमा करून घेणे अथवा परकी चलन स्वीकारू शकतात. याशिवाय त्या इंटरनेट बँकिंग आणि अन्य विशिष्ट सेवाही प्रदान करतात.

दिल्लीला क्षेपणास्त्राच्या सुरक्षाकवचाने सुसज्ज करण्यात येणार

  • अमेरीकेतील ९/११ प्रमाणे विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनने हल्ला होऊ नये म्हणून राजधानी दिल्लीला सुरक्षित आणि अभेद्य करण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न सुरु केले आहेत.
  • यामध्ये दिल्लीला क्षेपणास्त्राच्या सुरक्षाकवचाने सुसज्ज करण्यात येणार आहे. जुनी हवाई संरक्षण प्रणाली बदलून नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
  • तसेच व्हीआयपी नॉन-फ्लाय झोन आणि हल्ल्या करण्यासाठी येणाऱ्या विमानांना नेस्तनाभूत करण्याच्या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संरक्षण परिषदेमध्ये ‘नॅशनल अॅडवान्स्ड सर्फेस टू एअर मिसाइल सिस्टीम-२’ला मान्यता देण्यात आली. ही प्रणाली अमेरिकेकडून १ अब्ज डॉलर्सना खरेदी केली जाणार आहे.
  • या व्यतिरिक्त दिल्ली परिसरातील हवाई संरक्षण योजनेंतर्गत सुमारे ८९ व्हीआयपी परिसरांची पुनर्रचना करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रपती भवन, संसद, उत्तर आणि दक्षिण विभाग आदी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
  • ‘नॅशनल अॅडवान्स्ड सर्फेस टू एअर मिसाइल सिस्टीम-२’मध्ये ३डी रडार, लहान आणि मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे, प्रक्षेपक, अग्निशमन केंद्रे असतील.
  • त्यामुळे विविध दिशांनी एकाचवेळी हल्ला झाल्यास त्यांची माहिती वेगाने मिळून, क्षेपणास्त्रे शोधून ती नष्ट करणे सोपे होणार आहे.
  • अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्येही तसेच इस्राइलच्या काही शहरांमध्ये आणि मॉस्कोमध्येही सध्या अशाच प्रकारची प्रणाली कार्यरत आहे.

नितीन घोरपडे आयर्नमॅन किताबाचा मानकरी

  • औरंगाबादचा मॅरेथॉनपटू नितीन घोरपडेने जर्मनीतील हंम्बुर्ग येथील स्पर्धा जिंकत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटाकावला.
  • आयर्नमॅन हा किताब पटाकावणारा नितीन घोरपडे हा मराठवाड्यातील पहिलाच मॅरेथॉनपटू ठरला आहे.
  • हंम्बुर्ग आयर्नमॅन स्पर्धा २९ जुलै रोजी झाली. या स्पर्धेत ३.८ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालविणे आणि ४२.२ किमी धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धकाने हे सर्व सलग न थांबता करायचे असतात. ही तिन्ही आव्हाने पार करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ हा किताब दिला जातो.
  • यासाठी १५.५० तासांचा वेळ निश्चित करण्यात आला होता, परंतु नितीनने १२.५९ तासांत ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करीत 'आयर्नमॅन' हा किताब पटाकावला.
  • जगातील सर्वात खडतर मानली जाणारी ‘खार्दूंग ला’ मॅरेथॉन स्पर्धा नितीनने १२ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली होती. अशी कामगिरी करणारा तो मराठवाड्यातील पहिलाच धावपटू आहे. ही स्पर्धा ७२ किलोमीटर अंतराची असते.
  • मुंबई विद्यापीठातील स्टेडियममध्ये सलग २४ तास धावण्याचा विक्रमही नितीनने केला आहे. २४ तास धावताना त्याने ११५.६ किलोमीटर अंतर कापले.

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सीईओपदी सीमा नंदा

  • अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या सीमा नंदा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाच्या सीईओपदी नियुक्त होणाऱ्या सीमा नंदा भारतीय-अमेरिकी समुदायातील पहिल्याच नागरिक आहेत.
  • डेमोक्रॅटिक पक्षात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समितीच्या नियमित कामकाजाची जबाबदारी नंदा यांच्यावर आहे.
  • पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या सीईओ म्हणून नंदा यांच्यासमोर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे.
  • या निवडणुकीसाठीची धोरणे ठरविण्यात नंदा यांचा महत्त्वाचा सहभाग असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा