चालू घडामोडी : ०४ ऑक्टोबर

सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्याकरिता, केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
  • शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना ६२,६३२ कोटी रूपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
  • तसेच उत्पादन खर्चाच्या वर किमान ५० टक्के परतावा मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हायला मदत होणार आहे.
  • कृषी उत्पादन खर्च आणि मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर केंद्र सरकारने रबी पिकांच्या आधारभूत किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
  • या निर्णयानुसार गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रती क्विंटल १०५ रुपये, बार्ली प्रती क्विंटल ३० रुपये, मसूर प्रती क्विंटल २२५ रुपये, हरभरा प्रती क्विंटल २२० रुपये, मोहरी प्रती क्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
  • त्यामुळे आता गव्हाची एमएसपी प्रती क्विंटल १८४० रुपये, बार्ली प्रती क्विंटल १४४० रुपये, मसूर प्रती क्विंटल ४४७५ रुपये, हरभरा प्रती क्विंटल ४६२० रुपये, मोहरी प्रती क्विंटल २२१२ रुपये असेल.

मुकेश अंबानी सलग अकराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय

  • फोर्ब्स मॅगेझिनच्या ‘फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट २०१८’ या श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग अकराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय हे स्थान कायम राखले आहे.
  • अंबानी यांची संपत्ती ४७.३ अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी संपत्तीत सगळ्यात जास्त भर पडणाऱ्यांमध्येही अंबानी यांचा समावेश असून त्यांच्या संपत्तीत एका वर्षात ९.३ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
  • या यादीत विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी २१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
  • तर १८.३ अब्ज डॉलर्ससह आर्सेलरमित्तलचे अध्यक्ष व सीईओ लक्ष्मी मित्तल तिसऱ्या स्थानी आहेत.
  • प्रेमजी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ अब्ज डॉलर्सची तर मित्तल यांच्या संपत्तीत १.८ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
  • अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हे हिंदुजा ब्रदर्स १८ अब्ज डॉलर्स संपत्तीसह या यादीत चौथ्या स्थानी आहेत.
  • बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्री (१५.७० अब्ज डॉलर्स) या यादीत पाचव्या स्थानी आहेत.
  • देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर (१४.६ अब्ज डॉलर्स) सहाव्या स्थानी आहेत.
  • त्यानंतर सातव्या ते दहाव्या स्थानी अनुक्रमे गोदरेज कुटुंब (१४ अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (१२.६ अब्ज डॉलर्स), कुमार बिर्ला (१२.५ अब्ज डॉलर्स) व गौतम अदाणी (११.९ अब्ज डॉलर्स) यांची वर्णी लागली आहे.
  • बायोटेक्नॉलॉजीमधल्या अग्रणी किरण मजुमदार शॉ यांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ६६.७ टक्क्यांनी वाढून ३.६ अब्ज डॉलर्स झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे स्थान ३९ आहे.

आंग सान स्यू की यांचे मानद नागरिकत्व कॅनडाने काढून घेतले

  • म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांचे शिरकाण होत असताना मौन बाळगणाऱ्या म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान स्यू की यांचे मानद नागरिकत्व कॅनडाने काढून घेतले आहे.
  • एखाद्या देशाने दिलेले मानद नागरिकत्व काढून घेण्यात आलेल्या स्यू की या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
  • विशेष म्हणजे नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तीचे मानद नागरिकत्व काढून घेण्याचीही ही जगातील पहिलीच घटना म्हणावी लागेल.
  • नोबेल शांती पुरस्कार विजेत्या आंग सान स्यू की यांना कॅनडाच्या संसदेने २००७ रोजी मानद नागरिकत्व बहाल केले होते.
  • मात्र रोहिंग्या मुसलमानांवर म्यानमारच्या सेनेने सुरू केलेल्या अत्याचारावर स्यू की यांनी मौन बाळगले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे.
  • म्यानमारच्या या कारवाईवर आवाज उठवण्यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यावर मौन बाळगणेच पसंत केले.
  • कॅनडाने आंग सान स्यू की यांच्यासह नेल्सन मंडेला, बौध्द धर्म गुरू दलाई लामा आणि मलाला युसुफजाई यांनाही मानद नागरिकत्व दिले आहे.

इंडोनेशियाच्या मदतीसाठी भारताचे ऑपरेशन समुद्र मैत्री

  • भूकंप आणि सुनामीने दुरावस्था झालेल्या इंडोनेशियाच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन समुद्र मैत्री’ सुरू केले आहे.
  • या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने २ विमाने आणि नौसेनेच्या ३ जहाजांमध्ये मदत सामग्री पाठविली आहे.
  • भारताने विमान सी-१३०जे आणि सी-१७ या दोन विमानांमध्ये वैद्यकीय कर्मचारी, औषधे, वैद्यकीय सामग्री आणि मदत साहित्य पाठवले आहे.
  • याशिवाय ३ भारतीय नौदलवाहू जहाजे आयएनएस तीर, आयएनएस सुजाता आणि आयएनएस शार्दुल यांनाही इंडोनेशियाला पाठवले गेले आहे.
  • भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियाला खूप नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळेमुळे आतापर्यंत १४०० लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जन झाख्मी झाले आहेत.

भारत-उझबेकिस्तान दरम्यान १७ विविध करार

  • भारत आणि उझबेकिस्तानमध्ये विविध क्षेत्रात सहकार्यासाठी १७ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शावकत मिर्जियोयेव यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर हे करार करणायत आले.
  • भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानच्या रणनीतिक संवाद आणि संरक्षण सहकार्यासाठीचा हा पहिला प्रयत्न होता.
  • याशिवाय आतंकवादविरोधी कारवाया, लष्करी प्रशिक्षण आणि लष्करी औषध क्षेत्रातील सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त युद्ध सरावासाठी सहमती दर्शविली आहे.
  • याशिवाय दोन्ही देशांनी अफगाणिस्तानवर नियमित चर्चा सुरू करण्याचे ठरविले आहे.
महत्वाचे करार
  • राजनयिक पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा मुक्त यात्रा.
  • पर्यटन क्षेत्रात सहकार्यासाठी करार.
  • लष्करी शिक्षणामध्ये सहकार्यासाठी करार.
  • कायदा आणि न्याय क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एमओयू.
  • शेती आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी करार.
  • वैज्ञानिक, तांत्रिक आणि नवकल्पना क्षेत्रात सहकार्यासाठी करार.
  • आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी करार.
  • मादक पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी परस्पर सहकार्य करार.
  • शांततेसाठी बाह्य अंतराळात संशोधन करण्यासाठी सहकार्य करार.
  • उझबेकिस्तानच्या समरकंद नगर आणि उत्तर प्रदेशच्या आगरा नगरपालिकेच्या दरम्यान एमओयू.
  • परस्पर सहकार्य आणि भागीदारी स्थापित करण्यासाठी एमओयू.
  • भारत-उझबेकिस्तान व्यापार परिषदेच्या स्थापनेसाठी करार.
  • उझबेकिस्तान व भारतीय परराष्ट्र मंत्रालयांच्या दरम्यान २०१९-२०साठी सहकार्य करार.
  • उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल उद्योगाच्या विकासासाठी एमओयू.
  • उझबेकिस्तानच्या अन्दिजन भागातील उझबेक-इंडियन फ्री फार्मास्युटिकल झोनची स्थापना करण्यासाठी एमओयू.
  • उझबेकिस्तानचे सुरक्षा परिषद कार्यालय आणि भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात सहकार्य करण्यासाठी एमओयू.

आयसीआयसीआयच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

  • आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
  • त्यांच्या विरोधात व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.
  • चंदा कोचर यांच्यावर व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्जात नियमांना बगल दिल्याचा, नियम शिथील केल्याचा आरोप आहे.
  • बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांना बँकेच्या सगळ्या सहयोगी कंपन्यांच्या जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात आले आहे.
  • त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे आता आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतील.
  • बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.
  • बक्षी यांच्याकडे यापूर्वी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी होती.
  • चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
  • न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्त्वात आयसीआयसीआय बोर्डाने व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली आहे.
  • श्रीकृष्ण हे अर्थव्यवहाराचे जाणकार असल्याने ते याप्रकरणाची काटेकोर तपासणी करतील.

कसोटी पदार्पणातच पृथ्वी शॉचे अनेक विक्रम

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
  • पृथ्वी शॉने १५४ चेंडूत १३४ धावा केल्या. या शानदार खेळीत त्याने १९ चौकार ठोकले.
  • पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५वा खेळाडू ठरला. (१ला खेळाडू: लाला अमरनाथ व १४वा खेळाडू: रोहित शर्मा)
  • सचिन तेंडूलकरनंतर (वय: १७ वर्षे आणि १०७ दिवस असताना) कसोटीत शतक झळकावणारा पृथ्वी (वय: १८ वर्षे आणि ३२९ दिवस) हा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • देशांतर्गत स्पर्धांमधील प्रतिष्ठेच्या दुलीप आणि रणजी करंडक स्पर्धेतही त्याने पदार्पणातच्या सामन्यात शतक झळकावले होते. दुलिप, रणजी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
  • कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक झळकावणारा पृथ्वी (९९ चेंडू) ३रा फलंदाज आहे. (१ला: शिखर धवन (८५ चेंडू), २रा: ड्वेन स्मिथ (९३ चेंडू))
पृथ्वी शॉबद्दल
  • जन्म : ०९ नोव्हेंबर १९९९ (विरार येथे)
  • तो भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि स्पिन गोलंदाज आहे.
  • त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने २०१७-१८चा विश्वचषक जिंकला होता.
  • कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शॉने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांमध्ये ७ शतकंसह ५७.४४च्या सरासरीने १४३६ धावा केल्या आहेत.
  • इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पृथ्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी खेळतो.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१८

  • केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ मध्ये अव्वल ठरलेल्या राज्य आणि जिल्ह्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८मध्ये हरियाणाला सर्वोत्तम राज्याचा तर महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्याला सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • नागरिकांच्या सर्वाधिक सहभागासाठी उत्तर प्रदेशला सन्मानित करण्यात आले.
  • शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, नागरिकांचा सहभाग अशा विस्तृत मापदंडांवर आधारित देशभरातल्या ६८५ जिल्ह्यांमधल्या ६७८६ गावांमध्ये स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले.
पुरस्कार विजेते
  • अव्वल तीन राज्ये: १) हरियाणा २) गुजरात ३) महाराष्ट्र
  • अव्वल तीन जिल्हे: १) सातारा- महाराष्ट्र २) रेवडी-हरियाणा ३) पेडापल्ली-तेलंगण
  • सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाची राज्ये: १) उत्तर प्रदेश २) गुजरात ३) महाराष्ट्र
  • सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाचे जिल्हे: नाशिक आणि सोलापूर (महाराष्ट्र), चित्तोडगढ (राजस्थान).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा