चालू घडामोडी : ०८ ऑक्टोबर

नोर्दहॉस व रोमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

  • अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने नोबेल पुरस्कारासाठी या दोघांची निवड केली.
  • नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं संशोधन केलं आहे.
  • नोर्दहॉस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे.
  • त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.
  • अर्थव्यवस्था आणि हवामान यादरम्यान होणाऱ्या प्रभावांवर एक मॉडेल तयार करणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत.
  • रोमर हे न्यूयॉर्कच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी जागतिक बँकेचे प्रमुख अर्थतज्ञ म्हणून कार्य केले आहे.
  • या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळणार आहेत.
  • मागीलवर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थतज्ञ रिचर्ड थॅलर यांना प्रदान करण्यात आला होता.

महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी

  • महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.
  • या कायद्याचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • यामुळे हुक्का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे.
  • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुक्का पार्लरवरील बंदीचे विधेयक महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते.
  • कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर हुक्काबंदीच्या मागणीने जोर पकडला आणि त्यानुसार राज्य सरकारने त्याविरोधात विधेयक मंजूर केले होते.
  • डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता.

पर्यावरण प्रदूषण प्राधिकरणाची पुनर्रचना

  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकरणाची पुनर्रचना केली आहे. त्याचा कार्यकाल ३ ऑक्टोबर रोजी संपला होता.
  • या प्राधिकरणाचे सध्याचे अध्यक्ष माजी आयएएस अधिकारी भुरेलालच या पदावर कार्यरत राहतील. या प्राधिकरणाचे २० सदस्य आहेत.
  • पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकरण ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेली एक संस्था आहे.
  • राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचविण्याचे कार्य ही संस्था करते.
  • पर्यावरण मंत्रालयाने १९९८मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा,१९८६अंतर्गत यासंबंधी अधिसूचना जारी केली होती.

आशियाई पॅरा स्पर्धा २०१८

  • भालाफेकपटू संदीप चौधरीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ६०.०१ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
  • सुयश जाधवला ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात ३२.७१ सेकंद वेळेसह सुवर्णपदक.
  • सुयश जाधवला २०० मीटर वैयक्तिक मीडले आणि ५० मीटर फ्रिस्टाईल गटातही कांस्यपदक.
  • पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशाला रौप्य तर परमजीत कुमारला कांस्यपदक.
  • जलतरण प्रकारात देवांशीला १०० मी. बटलफ्लाय प्रकारात रौप्यपदक.
  • भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले.

जिमेक्स १८: भारत-जपान सागरी युद्धाभ्यास

  • भारत-जपानच्या संयुक्त सागरी युद्धाभ्यास जिमेक्स १८च्या तिसऱ्या आवृत्तीला आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरूवात झाली.
  • जिमेक्स १८चा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये एकमेकांमधील कार्यक्षमता आणि समुद्री सुरक्षा सहयोग वाढविणे आहे.
जिमेक्स १८
  • या युद्धाभ्यासाचे आयोजन ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये ४ दिवस बंदरांवर तर ४ दिवस समुद्रात असा २ टप्प्यात सराव केला जाईल.
  • बंदरावरील सरावात जहाजावरील चमूसोबत योजना आखणी, चर्चा आणि क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
  • तर सागरी टप्प्यात पाणबुडी विरोधी युद्धसराव, गन फायरिंग आणि क्रॉस चेक हॅलो ऑपरेशन इत्यादींचा समावेश आहे.
  • या सरावात जपानी नौदलाचे प्रतिनिधित्व कागा (इजुमो श्रेणीतील हेलिकॉप्टर विध्वंसक), इनाजुमा (मार्गदर्शक क्षेपणास्त्र विध्वंसक) आणि एस्कॉर्ट फ्लोटीला यांद्वारे केले जात आहे.
  • तर भारताचे प्रतिनिधित्व आयएनएस सातपुडा, पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज आयएनएस कदमत, क्षेपणास्त्र कॉर्वेट, आयएनएस शक्ती यांद्वारे केले जात आहे.
  • याव्यतिरिक्त या सरावात एक पाणबुडी, पी८आय हे लांब पल्ल्याचे समुद्री टेहळणी विमान आणि एक हेलिकॉप्टरही सहभागी होणार आहेत.
पार्श्वभूमी
  • सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याच्या उद्देशाने जानेवारी २०१२मध्ये भारत आणि जपान यांच्या नौदलांमध्ये जिमेक्स युद्धाभ्यासाला सुरुवात झाली.
  • या सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन जपानच्या किनारपट्टीवर करण्यात आले होते. तर यापूर्वीचा सराव डिसेंबर २०१३मध्ये चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आला होता.

डब्लूईएफचा फ्यूचर ऑफ वर्क इन इंडिया अहवाल

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ‘फ्यूचर ऑफ वर्क इन इंडिया’ नावाचा अहवाल जाहीर केला आहे.
  • हा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनने तयार केला आहे.
  • ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनने या अहवालासाठी ७०० लहान आकाराच्या कंपन्यांचे सर्वेक्षण केले. या कंपन्यांमध्ये २५,००० हून अधिक कर्मचारी काम करतात.
  • या अहवालासाठी कापड उद्योग, लॉजिस्टिक्स, वाहतूक, बँकिंग, वित्तीय सेवा आणि रिटेल कंपन्या या क्षेत्रातील कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
अहवालातील ठळक मुद्दे
  • वेगाने विकसित होणाऱ्या कंपन्या पुरुषांना कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देतात.
  • प्रत्येक तीन कंपन्यांपैकी एक कंपनी पुरुषांना कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देते.
  • प्रत्येक दहा कंपन्यांपैकी एक कंपनी महिलांना कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देते.
  • भारतात वेगाने रोजगार निर्मिती होत असली तरीही फक्त २६ टक्के महिला कार्यक्षेत्रात प्रवेश करत आहेत. हे प्रमाण जागतिक पातळीपेक्षा खूप कमी आहे.
  • रिटेल क्षेत्रातील ४५ टक्के कंपन्यांमध्ये तर लॉजिस्टिक्स व वाहतूक क्षेत्रातील ३६ टक्के कंपन्यांमध्ये एकही महिला कर्मचारी कार्यरत नाहीत.
  • केवळ ११ कपन्यांनी पुरुषांपेक्षा अधिक महिला कर्मचारी नियुक्त करण्यास प्राधान्य दिले.
  • केवळ एक चतुर्थांश कंपन्या महिला कर्मचार्यांना मातृत्व सुविधा प्रदान करतात.

इंटरपोल अध्यक्ष मेंग हाँगवेई यांचा राजीनामा

  • अचानक बेपत्ता झाल्यामुळे चर्चेत आलेले आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • इंटरपोलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी मेंग हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते.
  • सध्या मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीन ताब्यात घेतले आहे.
  • इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे मेंग हे पहिले चिनी व्यक्ती आहेत. नोव्हेंबर २०१६मध्ये इंटरपोलच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाल २०२०पर्यंत होता.
  • हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे.
  • १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दुबईत संघटनेची बैठक होईल, त्यामध्ये नवा प्रमुख निवडला जाईल.
आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना (इंटरपोल)
  • INTERPOL: International Criminal Police Organization
  • स्थापना: १९२३
  • सदस्य: १९२ देश
  • मुख्यालय: लिऑन, फ्रांस
  • इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस सहयोग संस्था आहे.
  • इंटरपोलची स्थापना १९२३ साली International Criminal Police Commission या नावाने झाली.
  • यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद, संघटीत गुन्हे आणि सायबर क्राइम यासंबधी गुन्ह्यांची प्रामुख्याने दखल घेतली जाते.
  • गुन्हेगारीविरुद्ध लढण्याकरता सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संघटना, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन संघासोबत मिळून इंटरपोलची यंत्रणा काम करते.
  • संघटीत गुन्हे, गुन्ह्यांचे नेटवर्क, अनधिकृत व्यवहार यांना संपुष्टात आणण्यासाठी तसेच कमकुवत समुदायाच्या रक्षणासाठी ही संस्था कार्यरत असते.
  • देशाची सीमारेषा ओलांडून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी व त्यांना अटक करण्यासाठी तसेच मानवी तस्करी थांबवण्याकरता इंटरपोलची मदत घेतली जाते.
  • त्याशिवाय जागतिक स्तरावरील दहशतवादाविरोधात लढण्याचे कार्यही इंटरपोल करते.

युथ ऑलिम्पिक २०१८

  • कोल्हापूरच्या तुषार मानेने भारताला मिळवून दिले पहिले पदक. १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई.
  • ज्युडो प्रकारात भारताच्या ताबाबी देवीला रौप्यपदक. ताबाबी ऑलिम्पिकमध्ये ज्युडो प्रकारात पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

गगनयान मिशनसाठी भारत-रशिया एकत्र काम करणार

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉस हे गगनयान मिशनसाठी एकत्रितपणे काम करणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर यासंबंधी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
  • या करारांतर्गत, अंतराळातील मानवी उड्डाण कार्यक्रमासाठी रोसकॉसमॉसने भारतीय अंतराळवीरांना सोयूझ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे.
  • अंतराळ स्थानक हे एक प्रकारचा राहण्यायोग्य उपग्रह आहे, जे पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करते.
  • भारत आणि रशियाचे अंतराळ सहकार्याचे संबंध फार जुने असून, सोव्हिएत युनियनने भारतीय अंतराळ कार्यक्रम सुरु करण्यास खूप सहकार्य केले होते.
  • याशिवाय, सोव्हिएत युनियनच्या सोयूझ अंतराळयानात भारताचे राकेश शर्मा (अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय) यांना अंतराळात पाठविण्यात आले होते.
  • ते सोव्हिएत युनियनच्या सोव्हिएत टी-११ या मोहिमेचा भाग होते. ही मोहीम २ एप्रिल १९८४ रोजी सुरु करण्यात आली होती.
मिशन गगनयान
  • हे मिशन २०२२मध्ये लॉन्च करण्यात येईल. या मोहिमेत तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाईल.
  • हे इस्रोचे पहिले मानवी मिशन असेल. हे मिशन यशस्वी झाल्यास मानवाला अंतराळात पाठविणारा (अमेरिका, रशिया आणि चीननंतर) भारत जगातील चौथा देश बनेल.
  • गगनयान मिशनसाठी सुमारे १०,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे मिशन पूर्णपणे स्वदेशी असेल.
  • या मोहिमेच्या वास्तविक प्रक्षेपणापूर्वी, इस्त्रो २ मानवरहित मिशन लॉन्च करणार आहे.

८ ऑक्टोबर: भारतीय हवाई दल वर्धापनदिन

  • राष्ट्रीय सुरक्षेमध्ये भारतीय हवाई दलाचे महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
  • स्थापना: ८ ऑक्टोबर १९३२
  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • प्रमुख: एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंग धनोआ
  • ध्येयवाक्य: ‘नभ:स्पृशं दीप्तम्’ (अर्थ: वैभवाने आकाश स्पर्श करा). भगवतगीतेच्या एका श्लोकातील हे वाक्य भारताचे माजी राष्ट्रपति राधाकृष्णन यांनी सुचविले होते.
  • तिन्ही दलाचे प्रमुख या नात्याने भारताचे राष्ट्रपती हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
  • २ मार्च १९४५ रोजी वायुदलाचे नामकर्ण रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. स्वातंत्र्यानंतर १९५०साली या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.
  • भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये (अमेरिका, रशिया आणि चीननंतर) चौथ्या स्थानी आहे.
  • भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण १,७००हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे.
  • यामध्ये ६०० लढाऊ विमाने तसेच ५००हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे.
  • या सर्व ६० एअरबेसची विभागणी एकूण ७ कमांड्सकडे करण्यात आली आहे.
  • वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत सर्वाधिक म्हणजे १६ एअरबेस आहेत तर सर्वात कमी म्हणजे ७ एअरबेसचे नियंत्रण सेंट्रल एअर कमांडकडे आहे.
  • तझाकिस्तानमधील फर्कहोर येथेही भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे. हा कोणत्याही भारतीय सुरक्षा दलाचा देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे.
  • सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
  • भारतीय हवाई दलातील अधिकारी निर्मल जीत सिंग सिख्खोन हे परविरचक्र हा सुरक्षा दलातील कामगिरीसाठी देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे हवाई दलातील पहिले अधिकारी ठरले. १९७१साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
  • हवाई दलात आतापर्यंत केवळ अर्जन सिंह यांना बहुप्रतिष्ठित ‘मार्शल ऑफ़ द एयरफोर्स’ हा दर्जा देण्यात आला आहे. २६ जानेवारी २००२ रोजी त्यांना हा दर्जा देण्यात आला. वायुसेनेचे ते एकमेव पंचतारांकित अधिकारी आहेत.
  • सध्या आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली भारतीय हवाई दलाकडे आहे.
  • हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय हवाई दलाकडे आहेत.

रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ नवीन बटालियन्सला मान्यता

  • केंद्रीय गृह मंत्रालयाने रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ नवीन बटालियन्सला मान्यता दिली आहे.
  • या ५ नवीन बटालियन मंगलोर (कर्नाटक), वाराणसी (उत्तर प्रदेश), हाजीपुर (बिहार), जयपूर (राजस्थान) आणि नूह (हरियाणा) येथे तैनात करण्यात येतील.
  • यासह, रॅपिड अॅक्शन फोर्सच्या एकूण बटालियन्स संख्या १५ झाली आहे.
  • वाराणसी हा उत्तर प्रदेशमधील रॅपिड ऍक्शन फोर्सचा (मेरठ, अलीगढ आणि अलाहाबादनंतरचा) चौथा बेस असेल.
रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ)
  • स्थापना: ७ ऑक्टोबर १९९२
  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • ध्येयवाक्य: Serving Humanity with Sensitive Policing
  • हे सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्सची विशेष प्रशिक्षित शाखा आहे.
  • दंगली रोखण्यासाठी, गर्दी नियंत्रण, मदत आणि बचाव कार्यसाठी या बलाची स्थापना करण्यात आली.
  • एखाद्या घटनेनंतर त्वरित घटनास्थळी पोहचता यावे यासाठी देशाच्या विविध भागात आरएएफच्या बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत.
  • एका आरएएफ बटालियनमध्ये १०००पेक्षा जास्त कर्मचारी असतात. त्यांच्याकडे आधुनिक उपकरणांसह अश्रुधूराचा मारा करणारी उपकरणे असतात. दंगलीच्या घटनेत गर्दी नियंत्रित करण्यासाठी यांचा वापर केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा