चालू घडामोडी : १६ ऑक्टोबर

बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी प्रियंक कानूनगो

  • प्रियंक कानूनगो यांची राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्कळ ३ वर्षांचा असेल.
  • १६ सप्टेंबर २०१८ रोजी स्तुति कक्कड यांचा कार्यकाल संपल्यापासून हे पद रिक्त होते. स्तुति यांची जागा आता प्रियंक घेतील.
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग
  • राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. हा आयोग भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  • बालसुरक्षा, त्या संबधित तक्रारी आणि सूचना यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
  • या आयोगाची स्थापना २००५मध्ये करण्यात आली, परंतु या आयोगाने मार्च २००७पासून कार्य करण्यास सुरवात केली.
  • २००७मध्ये बालहक्क संरक्षण कायदा २००५अंतर्गत संसदेच्या अधिनियमाद्वारे या आयोगाची स्थापना करण्यात आली.
  • भारताचे संविधान आणि संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेल्या बाल अधिकार सुनिश्चित करणे या आयोगाचे कार्य आहे.
  • तसेच समाजाच्या विभिन्न विभागांतील मुलांच्या अधिकारांचा व साक्षरतेचा प्रचार करणे आणि त्यांच्यासाठी असलेल्या या अधिकारांच्या सुरक्षा उपायांची त्यांना जाणीव करून देण्याचे कार्यही हा आयोग पार पडतो.

निधन: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन

  • जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे १६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते.
  • पॉल अॅलन आणि त्यांचा बालपणीचा मित्र बिल गेट्स यांनी मिळून मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा पाया रचला होता.
  • १९७५मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली व काही काळातच ही एक प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी बनली. यामुळे अॅलन आणि गेट्स हे दोघेही अब्जाधीश बनले.
  • त्यानंतर दोघांनीही समाजकार्याला वाहून घेतले. त्यांनी अनेक स्वयंसेवी संस्था स्थापन करुन जगभरात विविध विकासकामांना निधी पुरवला.
  1. पॉल अॅलन
  • त्यांचा जन्म २१ जानेवारी १९५३ रोजी अमेरिकेतील सिॲटलमध्ये झाला. संगणक क्षेत्रातील क्रांतीचे ते पाईक होते. त्यांच्या नावावर एकूण ४३ पेटंट आहेत.
  • १९७५मध्ये त्यांनी आणि गेट्स यांनी स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्टमधून १९८२ साली ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी वल्कन कंपनी सुरु केली.
  • अॅलन यांच्या आठवणी ‘आयडिया मॅन’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाल्या. त्यात त्यांच्या साहसी प्रवासाचा आढावा घेतला आहे.
  • अॅलन यांनी बेघर लोक, अडव्हान्स सायंटिफिक रिसर्चसारख्या क्षेत्राला मागील दोन दशकांत २ अब्ज डॉलरची मदत केली आहे.
  • वैज्ञानिक संशोधन संस्थांना त्यांची मदत फार मोलाची ठरली. तसेच त्यांनी सांस्कृतिक संस्थांनाही भरपूर मदत केली.
  • अॅलन इन्स्टिटय़ूट फॉर ब्रेन सायन्स व अॅलन इन्स्टिटय़ूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संस्था त्यांनी स्थापन केल्या.
  • क्रीडा प्रकारात रस असलेले अॅलन हे बास्केटबॉल टीम पोर्टलँड ट्रेल ब्लेजर्स आणि फुटबॉल टीम सिएटल सिहॉक्सचे मालक होते.
  • ते कल्पक तंत्रज्ञ होते आणि त्यांची दानशूरताही विज्ञान व क्रीडा क्षेत्राला संजीवनी देणारी होती.

अलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रयागराज

  • उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्याचे नामांतर प्रयागराज असे करण्यासाठी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
  • तसेच अलाहाबादचे नाव बदलण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज मेळा प्राधिकरण स्थापन केले आहे.
  • प्रयागराजमध्ये पुढील वर्षी कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभ मेळ्यात जगभरातून लाखो भक्त येण्याची शक्यता आहे.
  • यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने मुगलसराय रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय जंक्शन केले आहे.
अलाहाबाद (प्रयागराज)
  • अलाहाबाद किंवा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे, ते अलाहाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
  • हे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसलेले आहे. या शहराचे क्षेत्रफळ ८२ चौकिमी असून, त्याची लोकसंख्या ११,१७,०९४ आहे.
  • मुगल सम्राट अकबरच्या काळात १५७५मध्ये प्रयागराजचे नाव बदलून अलाहाबाद करण्यात आले. अलाहाबाद म्हणजे अल्लाचे शहर या अर्थाने अकबराने हे शहर वसवले.
  • इंग्रजांनी १८५८मध्ये आग्रा-अवध यांची संयुक्त राजधानी म्हणून अलाहाबादची निवड केली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अलाहाबाद महत्वाचे केंद्र होते.
  • अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करावे आणि त्याची प्राचीन ओळख परत मिळावी अशी मागणी संत आणि स्थानिकांनी वारंवार केली होती.
  • इंग्रजांच्या काळात मदन मोहन मलावीय यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतरही वेळोवेळी ही मागणी करण्यात येत होती.

१६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिवस

  • दरवर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
  • संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ १९८०पासुन हा दिवस पाळण्यात येतो.
  • अन्नवंचित लोक आणि त्यांची अन्न सुरक्षितता तसेच पोषणमूल्य असलेला आहार मिळण्याचा अधिकार याबाबत जाणीव व प्रबोधन करणारा हा दिवस आहे.
  • यंदाच्या अन्न दिनाची संकल्पना ‘आपली कृती हेच आपलं भविष्य’ (अवर अॅक्शन इझ अवर फ्युचर) ही आहे.
  • हा दिवस जगभरातील १५०पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. याद्वारे अन्नसुरक्षा, उपासमार आणि दारिद्र्य इत्यादीबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
अन्न व कृषी संघटना
  • इंग्रजी: Food and Agriculture Organization (FAO)
  • स्थापना: १६ ऑक्टोबर १९४५
  • मुख्यालय: रोम, इटली
  • सदस्य: १९४ देश
  • ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभर भूक निवारणासाठी प्रयत्न करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.

आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे दिल्लीमध्ये उद्घाटन

  • नवी दिल्लीतील प्रगती मैदानात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति ईरानी यांनी आंतरराष्ट्रीय रेशीम मेळाव्याचे उद्घाटन केले.
  • १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान या ३ दिवसीय मेळाव्याचे आयोजन इंडियन सिल्क एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने केले होते.
  • या मेळाव्यात देशातील रेशीम उत्पादनांच्या १०८ प्रदर्शकांनी भाग घेतला. या वेगवेगळ्या देशांतील २१८ खरेदीदारांनी देखील भाग घेतला.
पार्श्वभूमी
  • भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश आहे. तर चीन जगातील सर्वात मोठ्या रेशीम उत्पादक देश आहे.
  • रेशीम कृषी आधारित उद्योग आहे. रेशीम उद्योगामुळे देशभरात सुमारे ८० लाख कारागीर आणि विणकरांना ग्रामीण भागांमध्ये रोजगार प्राप्त होतो.
  • भारतात मलबेरी, एरी, तसर आणि मुगा या ४ प्रमुख रेशीम प्रकारांचे उत्पादन घेतले जाते. एकूण रेशीम उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन मलबेरी रेशीमचे घेतले जाते.
  • मलबेरी रेशीमचे उत्पादन मुखत्वे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये घेतले जाते.
  • भारतात एकूण रेशीम उत्पादनापैकी ९७ टक्के उत्पादन कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या फक्त ५ राज्यांमध्ये होते.

आयआरसीटीसीकडून ‘आस्क दिशा’ चॅटबॉट सुरु

  • इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) ‘आस्क दिशा’ नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजेंसयुक्त चॅटबॉट सुरु केला आहे.
  • हा चॅटबॉट वापरकर्त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तसेच मानवी-कर्मचाऱ्यांच्या मदतीविना तो वापरकर्त्याशी संवाद साधू शकतो. 
  • हा चॅटबॉट आयआरसीटीसी वेबसाइटवर कार्यरत झाला असून, लवकरच तो आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅन्ड्रॉइड अॅपवरही उपलब्ध होणार आहे.
आस्क दिशा
  • हा आयआरसीटीसीचा उपक्रम आहे. हा चॅटबॉट रेल्वे प्रवाशांना विविध सेवांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असेल.
  • यामध्ये भविष्यात आवाज ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि अनेक प्रादेशिक भाषाही समाविष्ट केल्या जाणार आहेत.
  • आस्क दिशा अतिशय अल्प काळात वापरकर्त्यांच्या समस्यांची उत्तर देऊ शकते. त्यामुळे चौकशीसाठी होणारा वेळेचा अपव्यय टळणार आहे. 

प्रेमा गोपालन सामाजिक उद्योजकता पुरस्कार

  • ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’च्या संस्थापिका प्रेमा गोपालन यांना ‘इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर’ (सामाजिक उद्योजकता) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात आजीविका निर्मिती याकरिता केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • इंडिया सोशल इंटरप्रेन्योरशिप ऑफ द ईयर या पुरस्काराची स्थापना २०१०मध्ये जुबिलेंट भारतीय फाउंडेशन आणि श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप यांनी संयुक्तपणे केली आहे.
  • श्वाब फाउंडेशन फॉर सोशल इंटरप्रेन्योरशिप वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी सलग्न संस्था आहे.
  • या पुरस्काराद्वारे अशा उद्योजकांना पुरस्कृत करण्यात येते, ज्यांच्या कार्याचा समाजावर चांगला प्रभाव पडतो.
प्रेमा गोपालन
  • प्रेमा गोपालन सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. १९८४मध्ये त्यांनी SPARC (सोसायटी फॉर द प्रोमोशन ऑफ एरिया रिसोर्स सेंटर)ची स्थापना केली.
  • त्यानंतर १९९३मध्ये त्यांनी ‘स्वयं-शिक्षण प्रयोग’ची स्थापना केली. सध्या देशातील ६ राज्यांमध्ये स्वयं-शिक्षण प्रयोग कार्यरत आहे.
  • स्वयं-शिक्षण प्रयोगात ५०० स्वयं मदत गटांचा समावेश आहे. या प्रयोगाच्या मदतीने आतापर्यंत १.४५ लाख महिलांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास मदत मिळाली आहे.

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुरज पनवारला रौप्यपदक

  • अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सुरज पनवारने त पुरुषांच्या ५००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
  • पनवारने पहिल्या टप्प्यात २० मिनिटे २३.३० सेकंद आणि दुसऱ्या टप्प्यात २० मिनिटे ३५.८७ सेकंद अशी एकूण ४० मिनिटे ५९.१७ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले.
  • इक्वेडोरच्या पॅटीन ऑस्करने ४० मिनिटे ५१.८६ सेकंदासह सुवर्णपदक नावावर केले, तर प्युओर्तो रिकोच्या जॅन मोरेयूने कांस्यपदक जिंकले.
  • यंदाच्या स्पर्धेतील अॅथलेटिक्समधले भारताचे हे पहिलेच आणि एकंदर तिसरे पदक आहे. यापूर्वी अर्जुन (थाळी फेक) आणि दुर्गेश कुमार (४०० मीटर अडथळ्याची शर्यत) यांनी २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा