चालू घडामोडी : १८ ऑक्टोबर

वैश्विक प्रतीस्पर्धात्मक अहवालात भारताला ५८वे स्थान

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वैश्विक प्रतीस्पर्धात्मक अहवालात भारताला ६२ गुणांसह ५८वे स्थान प्राप्त झाले आहे.
  • २०१७ च्या तुलनेत भारताच्या स्थानात ५ क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. जी-२० देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त लाभ भारताला मिळाला आहे.
  • उच्च आणि मध्यम वर्गाची अर्थव्यवस्थेत बदल करण्यासाठी चीन आणि भारताची कामगिरी समाधानकारक असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
  • भारताची वाटचाल योग्य असली तरी नोकरशाहीमध्ये कमी असल्यामुळे भारत थोडा पाठीमागे आहे.
  • या अहवालात १४० देशांच्या अर्थव्यवस्थांचे ९८ निकषांवर आणि उत्पादनक्षमतेच्या १२ स्तंभांवर मूल्यमापन करण्यात आले.
  • या यादीत ८५.६ गुणांसह अमेरिका प्रथम स्थानी आहे. त्याखालोखाल अनुक्रमे सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि जपान हे देश आहेत. चीन या यादीत २८व्या स्थानी आहे.
जागतिक आर्थिक मंच
  • इंग्रजी: World Economic Forum (WEF)
  • स्थापना: जानेवारी १९७१
  • मुख्यालय: कॉलॉग्नी, स्वित्झर्लंड
  • डब्ल्यूईएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्याची स्थापना क्लॉस एम श्वाब यांनी सार्वजनिक-खाजगी सहकार्याने जागतिक स्थिती सुधारण्यासाठी केली आहे.
  • ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहाय्याने ती कार्य करते.
  • व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि समाजातील अग्रगण्य लोकांना एकत्र आणून जागतिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही संस्था कटिबद्ध आहे.
  • जागतिक संस्था, राजकीय पुढारी, बुद्धिवादी लोकांना तसेच पत्रकारांना चर्चा करण्यासाठी या संस्थेने एक महत्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

ॲम्फीच्या अध्यक्षपदी निमेश शहा

  • असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ॲम्फीच्या अध्यक्षपदी निमेश शहा यांची नियुक्ती झाली आहे.
  • तर एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी कैलाश कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.
  • सध्या निमेश शहा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे (ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी आहेत.
  • ते सध्याचे ॲम्फीचे अध्यक्ष आणि या फंड संघटनेचे अध्यक्ष आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमण्यन यांची जागा घेतील. बालासुब्रमण्यन २०१६पासून या पदावर कार्यरत होते.
  • निमेश शहा यांना बँक तसेच वित्तीय सेवा क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीपूर्वी ते आयसीआयसीआय बँकेत कार्यरत होते.
  • म्युच्युअल फंड उद्योगातील सप्टेंबर २०१८अखेरची रक्कम २२.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. आधीच्या महिन्यात ती सर्वाधिक २५.२० लाख कोटी रुपये होती.
  • म्युच्युअल फंडमध्ये पुन्हा निधी ओघ वाढण्यासाठी करावे लागणाऱ्या प्रयत्नांकरिता शहा यांची कसोटी लागणार आहे.
  • ॲम्फीच्या संचालक मंडळात १५ संचालकांचा समावेश आहे. यामध्ये विविध फंड घराण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधित्व करतात.
ॲम्फी (AMFI)
  • पूर्ण रूप: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया
  • स्थापना: २२ ऑगस्ट १९५५
  • ही संस्था भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील मानक निर्धारक म्हणून कार्य करते. सध्या ४४ म्युच्युअल फंड कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत.
  • नैतिक आणि व्यावसायिक मानकांचा स्तर वाढवून देशामध्ये म्युच्युअल फंड बाजार विकसित करणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्वतंत्र संचालकपदी अरुंधती भट्टाचार्य

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.
  • भट्टाचार्य यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे.
  • अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे ४० वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
  • गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्य यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
  • अरुंधती यांच्या कार्यकाळातच एसबीआय आणि रिलायन्सच्या माध्यमातून डिजीटल पेमेंट सुविधा वाढविण्यात आली.
अरुंधती भट्टाचार्य
  • जन्म: १८ मार्च १९५६ (कोलकत्ता)
  • अरुंधती भट्टाचार्य या भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • २०१६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या २५व्या स्थानी होत्या.
  • भारतातील फॉर्च्युन इंडिया ५०० कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • १९७७साली त्या प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून एसबीआयमध्ये रुजू झाल्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी परकीय चलन, ट्रेझरी, रिटेल ऑपरेशन्स, मानव संसाधन आणि गुंतवणूक बँकिंगमध्ये काम केले आहे.
  • यामध्ये बँकेच्या मर्चंट बँकिंग शाखा- स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्सच्या मुख्य कार्यकारी पदाचाही समावेश आहे.
  • ऑक्टोबर २०१६मध्ये त्या निवृत्त होणार होत्या, परंतु एसबीआयच्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विवादास्पद विलीनीकरणामुळे त्यांना ऑक्टोबर २०१७पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

निधन: उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी

  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी उर्फ एन. डी. तिवारी यांचे १८ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
  • एकेकाळचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या तिवारी यांचे निधन त्यांच्या जन्मदिनीच झाले.
  • तिवारी यांचा जन्म नैनितालमध्ये १८ ऑक्टोबर १९२५ रोजी झाला. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. यानंतर त्यांनी एलएलबीदेखील केले.
  • महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटनेत सामील झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राजकारणात उतरले.
  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे दुर्मिळ योगायोगही त्यांच्या नशिबी आला.
  • गांधी घराण्याचे निकटवर्तीय असल्याने १९७६, १९८४ आणि १९८८मध्ये तीनवेळा त्यांना उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदावर संधी मिळाली.
  • तिवारी १९८८ मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, १९८९ मधील निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाला.
  • तिवारी यांनी ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मात्र, तिन्ही वेळा त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही.
  • ते राज्यसभा व लोकसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये खासदारही होते. २००२साली ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले.
  • तिवारी यांनी २००७ ते २००९ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. त्यावेळी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने त्यांनी राजीनामा दिला.

आकाश मलिकला तिरंदाजीमध्ये रौप्यपदक

  • अर्जेन्टिनामध्ये ब्युनास आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या आकाश मलिकने तिरंदाजीमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.
  • आकाशला अंतिम फेरीत अमेरिकेच्या ट्रेंटन कोव्लेसकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला.
  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे.

१२वी आशिया-यूरोप बैठक ब्रुसेल्समध्ये सुरु

  • १२व्या आशिया-यूरोप बैठकीला १८ ऑक्टोबरपासून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे सुरूवात झाली. ही बैठक २ दिवस चालेल.
  • ‘Global Partners for Global Challenges’ (जागतिक आव्हानांसाठी जागतिक भागीदार) ही यंदाच्या बैठकीची मुख्य संकल्पना आहे आहे.
  • या बैठकीमध्ये सहभागी देश कनेक्टिव्हिटी, व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, हवामानातील बदल, दहशतवाद, समुद्री सुरक्षा आणि सायबर स्पेसशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.
  • या बैठकीत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे प्रतीनिधीत्व उपराष्ट्रपती वेंगय्या नायडू करतील. यादरम्यान नायडू अनेक देशांच्या प्रमुखांसह द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होतील.
  • आशिया-यूरोप बैठक आशिया आणि यूरोपसाठी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी सहकार आणि वाटाघाटीकरिता सर्वोच्च मंच आहे.
आशिया-यूरोप बैठक
  • ASEM: Asia–Europe Meeting
  • या बैठकीत आशिया आणि यूरोपमधील ५१ देश चर्चेमध्ये भाग घेतात. याची स्थापना १ मार्च १९९६मध्ये केली गेली.
  • एएसईएमचे ५१ देश आणि युरोपियन युनियन व आसियान या क्षेत्रीय संघटनांसह एकूण ५३ सदस्य आहेत.
  • पहिल्या आशिया-यूरोप बैठकीचे आयोजन थायलंडच्या राजधानी बँकॉक येथे करण्यात आले होते.
  • एएसईएम जगातील ६२.३ टक्के लोकसंख्येचे, ५७.२ टक्के जीडीपीचे व जगातील ६० टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार

  • गुरुत्वाकर्षण विज्ञानात ४ दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला.
  • अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
  • प्रा. अष्टेकर सध्या पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक आहेत.
  • अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना १० हजार डॉलर पुरस्कार स्वरूपात देण्यात येणार आहे.
  • महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९मध्ये झाली होती.
प्रा. अभय अष्टेकर
  • अष्टेकर यांचा जन्म ५ जुलै १९४९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले.
  • त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण टेक्सास विद्यापीठातून झाले. तर १९७४मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली.
  • त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. तसेच त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतात महत्वाच्या पदावर काम केले आहे.
  • त्यांच्या मते, भौतिक आणि खगोल क्षेत्रात होणाऱ्या शोधांमध्ये अनेक दशकांपर्यंत गुरुत्वाकर्षणाचे प्रभुत्व राहील.
  • भौतिक क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांचे काम चांगले असून ते या क्षेत्रात चीनपेक्षाही पुढे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

निधन: ज्येष्ठ सतार व सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी

  • भारतीय शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ सतार व सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांचे १३ ऑक्टोबर रोजी मुंबईत वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांना गेल्या काही वर्षांपासून विविध व्याधींनी ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.
  • शास्त्रीय संगीतातले अलौकिक व्यक्तीमत्त्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित होत्या. सतार वादनातले त्यांचे कौशल्य अनन्यसाधारण होते.
  • मध्यप्रदेशातील मैहर या ठिकाणी त्यांचा जन्म २३ एप्रिल १९२७ रोजी झाला. उत्साद बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या त्या कन्या होत्या.
  • सरोद वादक आशिष खान, अमित भट्टाचार्य, बहाद्दुर खान, बसंत काब्रा आणि बासरी वादक हरिप्रसाद चौरासिया हे अन्नपूर्णा देवींचे शिष्य होते.
  • शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांचा १९७७मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
  • याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), विश्वभारती विद्यापीठाची देसीकोट्टम पदवी (१९९९), रत्न पुरस्कारासह (२००४) अनेक पुरस्कार मिळाले होते.

चीनकडून जगातील सर्वात मोठ्या मानवरहित ड्रोनचे परीक्षण

  • चीनने १६ ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठ्या मानवरहित परिवहन ड्रोन ‘फिहोंग-९८’च्या (एफएच-९८) उड्डाणाचे यशस्वी परीक्षण केले.
  • हा ड्रोन चायना ॲकेडमी ऑफ एअरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीने (सीएएईटी) विकसित केला आहे.
  • हा ड्रोन १.५ टन वजन उचलण्यास सक्षम आहे. हा सैन्य ड्रोन नसून, व्यावसायिक ड्रोन आहे. या ड्रोनचा वापर मालवाहतुकीसाठी करण्यात येणार आहे.
  • या ड्रोनचे कमाल वजन ५.२५ टन आहे. हा ड्रोन ४,५०० मी. उंचीवर आणि १,२०० किमी रेंजपर्यंत उड्डाण करू शकतो. याचा वेग १८० किमी प्रति तास आहे.
  • या ड्रोनला टेक-ऑफ व लँडिंगसाठी फक्त १५० मीटर धावपट्टीची आवश्यकता आहे. या ड्रोनचा वापर अतिदुर्गम भागात सामान वाहून नेण्यासाठी करता येणार आहे.

बेंगळुरूमध्ये क्रिप्टोकरन्सी एटीएम

  • भारतात बेंगळुरूमधील कॅम्प फोर्ट मॉलमध्ये १ क्रिप्टोकरन्सी एटीएम स्थापित करण्यात आले आहे.
  • हे एटीएम यूनोकॉइन नावाच्या कंपनीद्वारे स्थापित करण्यात आले आहे. याद्वारे यूनोकॉइनच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे क्रिप्टोकरन्सी खरेदी केली जाऊ शकते.
  • या एटीएमद्वारे वापरकर्ते १,००० ते १०,००० पर्यंत रक्कम जमा करू शकतात किंवा काढू शकतात.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
  • क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे डिजिटल चलन आहे. ही चलन भौतिक स्वरूपात उपलब्ध नसून, हे फक्त एक आभासी चलन आहे.
  • विविध देयकांसाठी (पेमेंट) ते एक विनिमय माध्यम म्हणून वापरले जाते. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
  • बिटकॉइनला जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखले जाते. ३ जानेवारी २००९ रोजी बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • इथीरियम, रिप्पल, लाइटकॉइन इत्यादी काही प्रमुख क्रिप्टोकरन्सी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा