चालू घडामोडी : १९ ऑक्टोबर

दृष्टीक्षेप: युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८

  • अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इतिहास रचला.
  • यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी युवा ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदकाची कमाई केली.
  • ३ सुवर्ण, ९ रौप्य आणि १ कांस्यपदक जिंकत भारताने एकूण १३ पदकांची कमाई पदकतालिकेत १७वे स्थान पटकावले.
  • रशिया (५९ पदके), चीन (३६ पदके), जपान (३९ पदके) यांनी पदकतालिकेत अनुक्रमे पहिली ३ स्थाने मिळविली.
भारताचे सुवर्णपदक विजेते
  • भारतीय वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालनिरुंगाने भारताला युवा ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
  • त्यांनतर ज्युडो प्रकारात भारताच्या ताबाबी देवीने भारताला प्रथमच आणि तेदेखील थेट सुवर्णपदक मिळवून देण्याचा सन्मान पटकावला.
  • ध्वजवाहकाचा मान देण्यात आलेल्या मनू भाकरनेही विश्वास सार्थ ठरवत भारताला नेमबाजीत एका सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
ग्रीष्मकालीन युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०१८
  • या स्पर्धांचे आयोजन अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे करण्यात आली. युवा ऑलिंपिकची ही तिसरी आवृत्ती होती.
  • या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारतीय युवा नेमबाज मनु भाकर भारतीय संघाची ध्वजवाहक होती.
  • या स्पर्धांमध्ये २०६ देश सहभागी झाले. कोसोवा आणि दक्षिण सुदान या देशांनी पहिल्यांदाच युवा ऑलिंपिकमध्ये भाग घेतला.
  • या स्पर्धांचे आयोजन ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले. यावेळी भारतातर्फे सर्वात मोठा संघ युवा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाठविला गेला होता.
  • या ग्रीष्मकालीन युवा ऑलिंपिकमध्ये ३२ खेळांमध्ये २४१ इव्हेंट्सचे आयोजन करण्यात आले होते.
  • आशियाच्या बाहेर आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच युवा ग्रीष्मकालीन ऑलिंपिक स्पर्धा आहे.
  • २०१०मध्ये युवा ग्रीष्मकालीन ऑलिंपिकचे आयोजन सिंगापूरमध्ये तर २०१४मध्ये नानजिंग (चीन) येथे करण्यात आले होते.
  • २०१४साली नानजिंग येथे झालेल्या युवा ऑलिंपिकमध्ये भारताने १ सुवर्ण व १ रौप्य अशी २ पदकांची कमाई केली होती.
  • पुढील ग्रीष्मकालीन युवा ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन २०२२मध्ये डकार (सेनेगल) येथे होणार आहे.

डॉ. शमा परवीन यांना सयीदा बेगम महिला वैज्ञानिक पुरस्कार

  • डॉ. शमा परवीन यांना जामिया मिलीया इस्लामिया संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘सयीदा बेगम महिला वैज्ञानिक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • सध्या त्या ‘सेंटर फॉर डिसिप्लिनरी रीसर्च इन बेसिक सायन्सेस’ या संस्थेत काम करीत असून विषाणूंच्या रेणवीय जीवशास्त्राचा वेध त्यांनी संशोधनातून घेतला आहे.
  • चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका व श्वसनारोगांतील विषाणू, मानवातील मेटॅन्यूमोव्हायरस विषाणूंवर त्यांचे संशोधन आहे.
  • अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ते त्याचे संदर्भही मोठय़ा प्रमाणात घेतले गेले आहेत.
  • अलाहाबाद येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे. १९३०मध्ये स्थापन झालेल्या या भारतातील सर्वात जुन्या संस्थेचे सदस्यपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते.
  • ब्राझीलमध्ये २०१५मध्ये झिकाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी भारतात फार मोठय़ा प्रमाणात संसर्ग झाला नव्हता. पण डॉ. परवीन यांनी हा रोग भारतातही येऊ शकतो, असे तेव्हाच सांगितले होते.
  • याच महिन्यात जयपूर येथे झिकाचे रुग्ण सापडल्याने त्यांनी दिलेला धोक्याचा इशारा खरा ठरला आहे.

मलेशियाच्या माजी उप-राष्ट्राध्यक्षांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक

  • मलेशियाचे माजी उप-राष्ट्राध्यक्ष अहमद जाहिद हमीदी यांना भ्रष्टाचार प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी संस्थेने ताब्यात घेतले आहे.
  • हमीदी २००९ ते २०१३ दरम्यान मलेशियाचे उप-राष्ट्राध्यक्ष होते. यापूर्वी त्यांनी मलेशियाचे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री पदावरही कार्य केले आहे.
  • यावर्षी मलेशियन भ्रष्टाचार विरोधी आयोगाने त्यांची अनेक वेळा चौकशी केली आहे. त्यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग, विश्वासघात आणि मनी लॉंडरिंग हे आरोप आहेत.
  • अहमद हमीदी मलेशियातील मुख्य विरोधी पक्ष यूनाइटेड मलय नॅशनल ऑर्गनायझेशनचे (यूएमएनओ) अध्यक्ष आहेत.
  • त्यांच्यावर ‘ययासन आकाल बुदी’ नावाच्या कल्याणकारी संस्थेच्या संबंधी १.९२ लाख डॉलरची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
  • यापूर्वी मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांनाही भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली होती.

चर्चित व्यक्ती: जमाल खाशोगी

  • इस्तांबुलमधील दूतावासात २ ऑक्टोबर रोजी गेलेले अमेरिकी नागरिक आणि पत्रकार जमाल खाशोगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे चर्चेत आले होते. ते वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होते.
  • अमेरिकेच्या दवाबानंतर जमाल खाशोगी यांची हत्या झाल्याचे सौदी अरेबियाकडून जवळपास २ आठवड्यानंतर मान्य करण्यात आले. या प्रकरणी चौकशी सुरु असून सौदीच्या १८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
  • खाशोगी यांच्या मृत्यूमुळे पुढच्या काही दिवसात अमेरिका व सौदी अरेबियामध्ये तणाव वाढणार आहे.
  • जमाल खाशोगी
  • त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९५८ रोजी सौदी अरेबियातील मदीना येथे झाला. ते स्तंभलेखक, पत्रकार आणि लेखक होते.
  • त्यांनी अल-अरब न्यूज चॅनल आणि अल-वतन वृत्तपत्रात काम केले आहे. सप्टेंबर २०१७मध्ये त्यांनी सौदी अरबिया सोडले होते.
  • खाशोगी हे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जायचे. सध्या ते वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होते.

भारताचा परकीय चलन साठा नीचांकी पातळीवर

  • १२ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठ्यात ५.१ अब्ज डॉलरची घट होत, तो ३९९.६० अब्ज डॉलर्सवरून ३९४.४६ अब्ज डॉलरवर गेला आहे.
  • गेल्या ७ वर्षांमधील भारताच्या परकीय चलन साठ्याची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. गुंतवणूकदारांद्वारे भारतातून गुंतवणूक काढून घेतल्याचा हा परिणाम आहे.
  • याबरोबरच, यावर्षी भारतीय रुपयाचे १२ टक्क्याने अवमूल्यन झाले आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ७३.३२ आहे.
  • परकीय चलन साठा हा एखाद्या देशाचा अन्य देशांच्या चलनाच्या स्वरूपात केलेला साठा असतो. हा साठा रोख, बँक ठेवी, रोखे आणि इतर वित्तीय स्वरूपात असू शकतो.
  • या साठ्याचा वापर परदेशी निर्यातदारांची देणी फेडण्यासाठी केला जातो. भारतात परकीय चलन साठा भारतीय रिझर्व बँकेद्वारे व्यवस्थापित केला जातो.

डब्ल्यूएसएच्या खजिनदारपदी सज्जन जिंदाल

  • जेएसडी स्टीलचे सीएमडी सज्जन जिंदाल यांची जागतिक स्टील असोसिएशनच्या (डब्ल्यूएसए) खजिनदार (कोषाध्यक्ष) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. त्यांच्या नियुक्तीची घोषणा टोकियो (जपान) येथे आयोजित जागतिक स्टील महासभेमध्ये करण्यात आली.
  • याशिवाय डब्ल्यूएसए बोर्डाने टाटा स्टीलचे एमडी टी. व्ही. नरेंद्रन आणि आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी निवास मित्तल यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती केली.
  • सध्याचे कार्यकारी उपाध्यक्ष आंद्रे जोहनपीटर यांची डब्ल्यूएसएच्या अध्यक्षपदी तर कोसेई शिंदो यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जागतिक स्टील असोसिएशन
  • डब्ल्यूएसए: वर्ल्ड स्टील असोसिएशन
  • स्थापना: १० जुलै १९६७
  • मुख्यालय: ब्रसेल्स (बेल्जियम)
  • ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे, ती स्टील उद्योगातील जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक आहे.
  • १६० स्टील उत्पादक या संस्थेचे सदस्य आहेत. जगातील ८५ टक्के स्टीलचे उत्पादन या संस्थेच्या सदस्यांद्वारे घेतले जाते.

१९ ऑक्टोबर: शास्त्रज्ञ एस. चंद्रशेखर यांचा जन्मदिन

  • पूर्ण नाव: सुब्रह्मण्यन चंद्रशेखर
  • जन्म: १९ ऑक्टोबर १९१० (लाहोर)
  • मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५
  • सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर हे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते.
  • त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मद्रास येथे झाले. तर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेजमधून त्यांनी पीएचडी संपादन केली.
  • ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. परंतु डॉ. चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे ‘चंद्रशेखर मर्यादा’ (चंद्रशेखर लिमिट).
  • या कामासाठी त्यांना १९८३साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
  • पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले.
  • त्यांनी सूर्यापेक्षा लहान असलेल्या ताऱ्यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे मांडले होते. त्यांच्या या संशोधनाला सुरुवातीला विरोध झाला होता.
  • परंतु १९८३साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चंद्रशेखर यांना जगातील सर्वोच्च नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
  • याशिवाय त्यांना पद्मविभूषण (१९६८), रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक, ब्रूस पदक व इतर अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
  • डॉ. चंद्रशेखर यांच्या संशोधनाचे विषय: ताऱ्यांची रचना, ताऱ्यांची गतिशीलता, स्टोकास्टिक प्रक्रिया, हायड्रोजन आयनचा क्वांटम सिद्धांत, हाइड्रोडायनामिक आणि हाइड्रोमैग्नेटिक स्थिरता, ब्लॅक होल, गुरुत्वतरंग इत्यादी.

बॉक्सर कॅनेलो अल्व्हरेझचा २,६५९ कोटी रुपयांचा करार

  • बॉक्सर कॅनेलो अल्व्हरेझने व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा कंपनी DZAN बरोबर २,६५९ कोटी रुपयांचा (३६५ दशलक्ष डॉलर्स) करार केला आहे. क्रीडा इतिहासतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.
  • यापूर्वी सर्वाधिक रक्कमेचा करार २०१४मध्ये झाला होता. अमेरिकेचा बेसबॉलपटू गिआनकार्लो स्टॅन्टोनने ३२५ मिलियन डॉलरचा हा करार केला होता.
  • या करारांतर्गत अल्वारेझ ११ लढती खेळणार आहे. १५ डिसेंबरपासून या लढती सुरु होणार आहेत.
  • कॅनेलो अल्व्हरेझ हा मेक्सिकोचा व्यावसायिक बॉक्सर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील ५३ लढतींपैकी ५० लढती जिंकल्या आहेत. यापैकी ३४ लढतींमध्ये त्याने नॉकआउटद्वारा विजय मिळविला आहे.
  • काही दिवसांपूर्वीच अल्वारेझने गेन्नडी गोलोव्किनला पराभूत करुन आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय संपादन केला होता आणि सप्टेंबरमध्ये तो मिडलवेट चॅम्पियनही बनला होता.
  • आतापर्यंत तो फक्त एका सामन्यात पराभूत झाला आहे तर दोन सामने अनिर्णीत (ड्रॉ) राहिले आहेत.
DZAN
  • ही एक व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा कंपनी आहे, ती प्रामुख्याने खेळांशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करते. या कंपनीची स्थापना ८ जुलै २०१५ रोजी लंडनमध्ये झाली.
  • सध्या ही कंपनी ऑस्ट्रिया, जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, इटली, कॅनडा आणि अमेरिकेत सेवा प्रदान करते.
  • DZAN प्रामुख्याने प्रीमियर लीग, बुंदेसलीग, ला लीगा, एनबीए, एनएफएल, फॉर्मूला वन आणि एमएमए यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे प्रसारण करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा