चालू घडामोडी : २६ ऑक्टोबर

शिल्पकार राम सुतार यांना टागोर पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • याशिवाय मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांना २०१४चा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • बांग्लादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला २०१५साठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. १९६१साली स्थापन झालेल्या या संस्थेने बंगाली संस्कृती, संगीत व साहित्य क्षेत्रात टागोर यांच्या कार्याच्या प्रचारासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार विजेते घोषित केले आहेत. या समितीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही समावेश आहे.
राम सुतार
  • राम सुतार हे जागतिक किर्तीचे शिल्पकार आहेत. गेल्या ५ दशकांहून अधिक काळ ते शिल्प निर्मिती करत आहेत.
  • त्यांच्या कलेतील योगदानासाठी त्यांना २०१६मध्ये पद्मभूषण आणि १९९९मध्ये पद्मश्री या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.
  • भारतातले दिग्गज शिल्पकारांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे. आतापर्यंत त्यांनी ५० पेक्षाही अधिक भव्य मूर्ती साकारल्या आहेत.
  • फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांची शिल्पे पोहचली आहेत.
टागोर पुरस्कार
  • केंद्र सरकारने २०११ साली रविंद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीपासून या पुरस्काराची सुरूवात केली.
  • १ कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पहिला टागोर पुरस्कार २०१२मध्ये पंडित रविशंकर यांना देण्यात आला होता. २०१३चा पुरस्कार जुबिन मेहता यांना मिळाला होता.

कुस्तीपटू पूजा धांडाला जागतिक स्पर्धेत कांस्यपदक

  • भारताची अव्वल कुस्तीपटू पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.
  • महिलांच्या ५७ किलो वजनी गटात नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला १०-७ असे नमवून पूजाने कांस्यपदकावर नाव कोरले.
  • जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती भारताची चौथी महिला कुस्तीपटू ठरली आहे. याआधी अलका तोमर (२००६), गीता फोगट आणि बबिता कुमारी (२०१२) यांनी जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
  • पूजाचे हे या वर्षातील हे दुसरे मोठे पदक ठरले. तिने यावर्षी गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक मिळवले होते.

भारताला राष्ट्रकुल लोक प्रशासन व व्यवस्थापन पुरस्कार

  • राष्ट्रकुल लोक प्रशासन व व्यवस्थापन पुरस्कार २०१८ (कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट अवॉर्ड २०१८) भारताने जिंकला आहे.
  • केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार मंत्रालय कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंटचा (सीएपीएएम) सदस्य आहे.
  • सीएपीएएम १९९८पासून दर २ वर्षांनी या पुरस्कारांची घोषणा करते. सार्वजनिक सेवेमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
  • सीएपीएएम ही एक ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था आहे. यात ५०पेक्षा अधिक राष्ट्रकुल देशांचे १,१०० वरिष्ठ सरकारी अधिकारी, अग्रगण्य शिक्षणतज्ञ आणि संशोधक समाविष्ट आहेत.
  • या संघटनेचे नेतृत्व नेटवर्किंग, ज्ञान आदान-प्रदान आणि सुशासनाला प्रोत्साहन देण्याऱ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांद्वारे केले जाते.

सरकारकडून SPARC वेब पोर्टलचे उद्घाटन

  • केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ ऑक्टोबर रोजी ‘शैक्षणिक आणि संशोधन सहयोग संवर्धन योजना’ (SPARC) वेब पोर्टल सुरू केले.
  • या योजनेसाठी राष्ट्रीय समन्वय एजन्सीचे कार्य आयआयटी खरगपूरद्वारे करण्यात येणार आहे.
  • देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधांच्या वातावरणाला प्रोत्साहन देणे आणि भारतीय उच्च शिक्षण संस्थांना विदेशी संस्थांसह मिळून संशोधन कार्यसाठी प्रेरित करणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहेत.
  • या योजनेंतर्गत केंद्र सरकार ६०० संयुक्त संशोधन प्रस्तावांसाठी सुमारे ४१८ कोटी रुपये उपलब्ध करून देईल.
  • या योजनेमध्ये एनआयआरएफच्या सर्वोत्तम १०० संस्था व देशातील निवडक सर्वश्रेष्ठ २८ संस्था सहभागी होतील. जानेवारी २०१९पासून या योजनेच्या अंतर्गत संस्थांचा शोध सुरू होईल.
  • SPARC योजनेमध्ये या देशांच्या संस्था सहभागी होतील: ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चीन, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, इस्त्राइल, इटली, जपान, नेदरलॅंड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, ब्रिटन आणि अमेरिका.

कृषी कुंभ २०१८चे लखनौमध्ये आयोजन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे आयोजित कृषी कुंभ २०१८चे २६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले.
  • शेतकऱ्यांच्या या मेळाव्यामुळे कृषी क्षेत्रात उत्तम संधी व नव तंत्रज्ञान अवलंबण्याचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.
  • तसेच २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
  • कृषी कुंभ २०१८साठी हरियाणा आणि राजस्थान ही भागीदार राज्ये आहेत तर इस्राईल आणि जपान हे भागीदार देश आहेत.
  • या मेळाव्यादरम्यान उत्तर प्रदेश सरकारने राज्यात उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) स्थापन करण्यासाठी इस्राईलबरोबर करार केला.
  • तसेच राज्यात कृषी आणि संबंधित क्षेत्रात गुंतवणुकीस चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जपानसोबत करार केला.

ट्रायडेंट जन्क्चर: नाटोच्या सदस्य देशांचा लष्करी युद्धाभ्यास

  • नाटोने नॉर्वेमध्ये ‘ट्रायडेंट जन्क्चर २०१८’ या सर्वात मोठ्या लष्करी युद्धाभ्यासाला सुरुवात केली. हा अभ्यास ७ नोव्हेंबर रोजी संपेल.
  • या सर्वात नाटोच्या सदस्य देशांतील सुमारे ५० सैनिक, ६५ जहाजे, १५० विमाने आणि १०,००० वाहने सहभागी होतील.
  • कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा सामना करण्यासाठी नाटोच्या सदस्य राष्ट्रांना सज्ज ठेवणे, हा या अभ्यासाचा हेतू आहे.
  • यामुळे सदस्य देशांच्या सैन्यांमधील समन्वयामध्येही वृद्धी होईल. या सरावात नाटोचे भागीदार देश स्वीडन आणि फिनलँडदेखील सहभागी होत आहेत.
नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन)
  • स्थापना: ४ एप्रिल १९४९
  • मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्टांनी केली.
  • २०१७मध्ये मोंटेनेग्रो हा देश नाटो मध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या २९ झाली आहे.
  • शीतयुद्धाच्या काळात रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांविरुद्ध काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्थापन केलेली ही एक संघटना आहे.
  • उत्तर अटलांटिक प्रदेशातील राष्ट्रांमध्ये राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य निर्माण करून सहकार्याच्या तत्वाचा प्रसार करणे व त्यासाठी आक्रमकांचा सामुदायिक प्रतिकार करणे व सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे, या गोष्टी सर्व सदस्य राष्ट्रांवर बंधकारक आहेत.

दिल्लीमध्ये वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिवल

  • २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिवल’चे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे.
  • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे.
  • सेंद्रीय शेती आणि ती करणाऱ्या महिला शेतकरी व उद्योजकांना प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनामागचा हेतू आहे. देशभरातल्या ५०० महिला उद्योजक या प्रदर्शनात भाग घेणार आहेत.
  • या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांच्या सबलीकरणासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे.
  • यामध्ये तांदूळ, ज्यूस, सुकामेवा, सेंद्रीय आइस्क्रीम, मश्रुम, सौंदर्य उत्पादने इत्यादी सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन मांडले जाते.

भारत मोबाइल काँग्रेसचे नवी दिल्लीमध्ये आयोजन

  • भारत मोबाइल काँग्रेसच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथे २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले.
  • दूरसंचार विभाग आणि आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
  • ‘न्यू डिजिटल होराइजन. कनेक्ट. क्रिएट. इनोवेट.’ ही यावर्षी या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
  • इंडिया मोबाइल काँग्रेस २०१८मध्ये दूरसंचार उद्योग, स्टार्टअप, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिटी इत्यादी क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले.
  • यामध्ये १,३०० प्रदर्शक सहभागी झाले. तसेच या संमेलनात अमेरिका, कॅनडा, युरोप, आसियान, बिमस्टेक देशांचे धोरणकर्ते आणि नियामक यांनीही भाग घेतला.
  • इंडिया मोबाइल काँग्रेसची सुरुवात २०१७मध्ये करण्यात आली होती. धोरणकर्ते, नियामक आणि उद्योगांसाठी हे संमेलन मंच प्रदान करते.
  • पहिल्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे आयोजन सप्टेंबर २०१७मध्ये करण्यात आले होते. यात ३२००० प्रतिनिधी, १५२ प्रवक्ते, १०० प्रदर्शक आणि १०० स्टार्टअप्स सहभागी झाले होते.

फेसबुकवर ब्रिटनमध्ये ५ लाख पाऊंडचा दंड

  • सोशल मीडियात अग्रेसर असणाऱ्या फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने (डेटा रेग्युलेटर) ५ लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे.
  • केंब्रिज अॅनालिटीकाच्या डाटा लीक प्रकरणी ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण न झाल्याबद्दल फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • या डाटा लीक प्रकरणामुळे सोशल मिडीयातील अग्रणी असलेल्या फेसबुकची मोठी नाचक्की झाली होती.
  • २००७ ते २०१४ दरम्यान फेसबुकच्या ५ लाख ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा बेकायदेशीर वापर अॅप्लिकेशन डेव्हलप करणाऱ्या अन्य संस्थेकडून केला गेला होता.
  • त्या माहितीच्या वापरासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केले नव्हते. पण फेसबुक वापरणाऱ्यांचे मित्र असले तरीही त्यांच्या माहितीचा वापर केला गेला होता.
  • ग्राहकांच्या डाटाच्या बेकायदेशीर वापराबाबत फेसबुकसारख्या मोठ्या कंपनीने अधिक चांगली काळजी घेतली नाही.
  • हे डाटा लीक प्रकरण २०१५मध्ये उघड झाले. त्यानंतरही फेसबुकने प्रभावी उपाय योजना केल्या नाहीत, असे आरोप फेसबुकवर आहेत.
  • डाटा लीक कायद्यांतर्गत १७ लाख पौंड किंवा वार्षिक उलाढालीच्या ४ टक्के इतका दंड आकारण्याची तरतूद आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे

  • श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी विद्यमान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी करून त्यांच्याजागी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे.
  • सिरिसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायंस (यूपीएफए) पक्षाने विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीचा (यूएनपी) पाठींबा काढून घेतल्यामुळे विक्रमसिंघे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
  • आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजावरून सिरिसेना आणि विक्रमसिंघे यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
  • श्रीलंकेच्या घटनेनुसार विक्रमसिंघे यांना बहुमाताशिवाय पंतप्रधान हटविले जाऊ शकत नाही. त्यामुळे सिरीसेना यांच्या निर्णयामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • राजपक्षे यांना पंतप्रधान बनवण्यात आले असले तरी बहुमत नसल्याने कोंडी होणार आहे. राजपक्षे व सिरीसेना यांच्या पक्षांकडे मिळून ९५ जागांचे बळ असून बहुमतापासून ते बरेच दूर आहेत.
  • दुसरीकडे विक्रमसिंघे यांच्या यूएनपी पक्षाकडे १०६ जागा असून बहुमतासाठी आणखी ७ जागांची त्यांना आवश्यकता आहे.
  • सिरिसेना हे एकेकाळी राजपक्षे यांचे सहकारी होते. पण २०१५मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये ते राजपक्षे यांना पराभूत करून राष्ट्रपती झाले.

इथिओपियाच्या राष्ट्रपतीपदी सेहल वर्क जेवडे

  • सेहल वर्क जेवडे यांची इथिओपियाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या इथिओपियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
  • त्या विद्यमान राष्ट्रपती मुलातु तेशोमे यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असेल. आफ्रिकेतील देशंमध्ये सध्या कार्यरत असलेल्या त्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत.
  • सेहल वर्क जेवडे एक राजकारणी असून, त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९५० इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे झाला.
  • संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरस यांच्या विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी यापूर्वी आफ्रिकन युनियनमध्ये काम केले आहे.
  • २०११ ते २०१८ या कलावधीत त्यांनी नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात महासंचालक म्हणून कार्य केले.
  • याव्यतिरिक्त त्यांनी सेनेगल, जिबूती आणि फ्रान्स या देशात राजदूत म्हणून काम केले आहे. त्यांनी आफ्रिकन युनियनमघ्ये इथिओपियाच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून देखील काम केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा