चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर

९२व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे

  • यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.
  • साहित्य संमेलनाच्या ९ दशकांच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा बहुमान लाभलेल्या त्या पाचव्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत.
  • यापूर्वी ज्येष्ठ कवयित्री कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर-१९६१), विदुषी दुर्गा भागवत (कराड-१९७५), ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके (आळंदी-१९९६) आणि ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष (इंदूर-२००१) यांना बहुमान लाभला होता.
  • अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत डॉ. ढेरे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
  • संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने निवड करावी, या साहित्य महामंडळाच्या नव्या घटनादुरुस्तीच्या अंमलबजावणीनुसार ही निवड करण्यात आली.
डॉ. अरुणा ढेरे
  • सर्जनशील कवयित्री आणि संशोधनात्मक लेखन करणाऱ्या लेखिका, असा डॉ. अरुणा ढेरे यांचा लौकिक आहे.
  • लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा वारसा त्यांना लाभला.
  • घरातच त्यांना वस्तुनिष्ठ संशोधनाचे बाळकडू मिळाले. मूळ पिंड कवितेचा असला तरी संशोधनाची वाट त्यांनी आपल्या लेखनातून प्रशस्त केली.
  • संशोधन आणि ललित साहित्यातही डॉ. अरुणा ढेरे यांची कामगिरी मोठी असली, तरी त्यांच्या कवितांचा ठसा अमीट आहे.
  • ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एमए आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९८३ ते १९८८ या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठात अध्यापन केले.
  • कवयित्री ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.
  • ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक समृद्ध झाली.
  • कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ११ ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
  • याशिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते.
  • त्यांचा ‘विस्मृतिचित्रे’ हा ग्रंथ गाजला. स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष कार्य केलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केले आहे.
  • महाराष्ट्राच्या संस्कृती आणि साहित्यविषयक समित्यांवर ढेरे यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. लोकसाहित्य समिती, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठीच्या ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
अरुणा ढेरे यांची साहित्यसंपदा
  • वैचारिक: अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, महाद्वार, लोक आणि अभिजात, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृतिचित्रे, स्त्री आणि संस्कृती, विवेक आणि विद्रोह, शाश्वताची शिदोरी
  • कथासंग्रह: काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, रूपोत्सव, लावण्ययात्रा, मनातलं आभाळ, मैत्रेयी, अज्ञात झऱ्यावर
  • कवितासंग्रह: निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र, बंद अधरों से
  • संपादन: दुर्गा भागवत: व्यक्ती, विचार आणि कार्य, स्त्री-लिखित मराठी कविता, स्त्री-लिखित मराठी कादंबरी, स्त्री-लिखित मराठी कथा
पुरस्कार-सन्मान
  • नागपूर येथील डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यास आणि अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान.
  • सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार.
  • लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार.
  • पुण्यातील साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार
  • ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथ पुरस्कार
  • मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार.

शांतता अभियानासाठी भारताकडून ३ दशलक्ष डॉलर्सचे योगदान

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानासाठी भारताने ३ दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले. या निधीचा वापर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानाच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येईल.
  • हा प्रशिक्षण कार्यक्रम ३ वर्ष चालेल. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आचरण आणि अनुशासनावर विशेष भर देण्यात येईल.
  • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानाद्वारे संघर्षामध्ये अडकलेल्या अस्थिर देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सैन्य, पोलिस अधिकारी आणि नागरी कर्मचारी (पीसकिपर्स) पाठवले जातात.
  • हे पीसकिपर्स संघर्षात अडकलेल्या राष्ट्रांच्या परिस्थितीचा आढावा घेतात आणि विविध पक्षांमध्ये शांती स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात.
  • या अभियानासाठी संयुक्त राष्ट्र्संघांच्या सदस्य देशांकडून सैन्य आणि कर्मचारी पुरविले केले जातात.
  • सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता अभियानात १,०४,६८० कर्मचारी (९०,४५४ सैनिक, १२,९३२ नागरी कर्मचारी आणि १,२९४ स्वयंसेवक) कार्यरत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघटना
  • इंग्रजी: United Nations
  • स्थापना: २४ ऑक्टोबर १९४५
  • मुख्यालय: न्युयॉर्क, अमेरिका
  • सदस्य: १९३ सदस्य राष्ट्रे + २ निरीक्षक राष्ट्रे (होली सी आणि पॅलेस्टाईन)
  • संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे, अशी उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • या संघटनेची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेची ६ मुख्य अंग: आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय, ट्रस्टीशिप कौन्सिल, सचिवालय.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालय वगळता इतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्य अंगांची मुख्यालये न्युयॉर्कमध्ये आहेत. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग (नेदरलँड्स) येथे आहे.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कामकाजाच्या इंग्रजी, फ्रेंच, रशियन, चीनी, स्पॅनिश आणि अरेबिक या ६ अधिकृत भाषा आहेत.
  • अँटोनियो गुटेरेस हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान महासचिव आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांचा कार्यकाळ ५ वर्ष असतो.
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन हे ५ देश स्थायी सदस्य असून, फक्त त्यांच्याकडेच नकाराधिकार आहे.
  • याशिवाय सुरक्षा समितीचे १० अस्थायी सदस्यही असतात. त्यांची निवड सदस्य राष्ट्रांमधून २ वर्षांसाठी केली जाते. दरवर्षी ५ राष्ट्रे बदलली जातात.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक सलग्न संस्था तसेच संयुक्त राष्ट्रासंघाशी संबंधित अनेक व्यक्तींना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार २०१८

  • ७३व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अध्यक्षा मारिया फर्नांडा एस्पिनोसा गारसेज यांनी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार २०१८च्या विजेत्यांची घोषणा केली.
  • या पुरस्काराचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:
  • अस्मा जहांगीर: पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या.
  • रेबेका ग्युमी: टांझानियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या.
  • जेओनिया वापिचाना: ब्राझिलच्या प्रथम महिला मूळ निवासी वकील.
  • फ्रंटलाइन डिफेंडर: आयर्लंडची मानवाधिकार संघटना.
संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार
  • इंग्रजी: युनायटेड नेशन्स ह्यूमन राइट्स अवॉर्ड
  • मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९६६मध्ये या पुरस्कारांची स्थापना केली.
  • पहिल्यांदा हा पुरस्कार १९६८मध्ये प्रदान करण्यात आला होता. हे पुरस्कार प्रत्येक पाच वर्षांनी प्रदान केले जातात.
अस्मा जहांगीर
  • या पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या मृत्यू फेब्रुवारी २०१८मध्ये झाला.
  • महिला आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी लढा देण्याऱ्या त्या एक वकील होत्या. 
  • पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष होण्याचा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
  • त्यांनी पाकिस्तान मानवाधिकार आयोगाची स्थापना केलीहोती. त्या पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थांच्या टीकाकार होत्या. यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
रेबेका ग्युमी
  • या टांझानियाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या व वकील आहेत. तसेच त्या म्सिचाना उपक्रमाच्या संस्थापक आहेत.
  • म्सिचाना उपक्रमाअंतर्गत बालिकांच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. २०१६मध्ये त्यांनी बालविवाह विरोधातील खटल्यामध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला.
  • त्यांनी टांझानिया विवाह कायद्याच्या विरोधातही याचिका दाखल केली होती, हा कायदा सध्या बालविवाहाला परवानगी देतो.
जेओनिया वापिचाना
  • ब्राझिलच्या प्रथम महिला मूळ निवासी वकील व मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. ब्राझिलमधील विधी विद्यालयातून पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या प्रथम मूळ निवासी पदवीधर आहेत.
फ्रंटलाइन डिफेंडर्स
  • फ्रन्टलाइन डिफेंडर्स ही आयर्लंडची मानवाधिकार संस्था आहे आणि ही संस्था मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. या संघटनेची स्थापना २००१मध्ये आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये केली गेली.
  • टीप: आतापर्यंत बाबा आमटे (१९८८ साली) या एकमेव भारतीय व्यक्तीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार देण्यात आला आहे.

ओलेग सेन्त्सोव्ह यांना प्रतिष्ठेचा साखारोव्ह पुरस्कार

  • मानवाधिकार कार्यकर्ते ओलेग सेन्त्सोव्ह यांना युरोपीय संसदेचा प्रतिष्ठेचा ‘साखारोव्ह पुरस्कार’ जाहीर झाला.
  • क्रिमियाच्या न्यायासाठीच्या रशियाविरुद्धच्या चळवळीत ओलेग सेन्त्सोव्ह यांनी मोठे योगदान दिले.
  • २०१४मध्ये रशियाने क्रिमियात आक्रमण करून त्या द्वीपकल्पाचा ताबा घेतला, त्यावेळी ते राजकीय कैदी म्हणून पकडले गेले.
  • रशियाच्या क्रिमियावर केलेल्या आक्रमणाचा विरोध करत त्यांनी उपोषण केले. पण त्यांना वैद्यकीय मदतीने १४५ दिवसांच्या उपोषणातही जिवंत ठेवण्यात आले.
  • त्यांच्यावर पूल, विजेचे खांब व लेनिनचा पुतळा उडवण्याचा कट रचल्याचा आरोप असून, गेल्या २० वर्षांपासून ते सायबेरियाच्या तुरुंगात खितपत पडले आहेत.
  • रशियाच्या अफगाणिस्तानातील आक्रमणासही सेन्त्सोव्हने विरोध केला होता. त्यासाठी त्यांना ६ वर्षे अंतर्गत विजनवास पत्करावा लागला होता.
  • मूळचे क्रिमियाचा असलेले सेन्त्सोव्ह हे उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत. ‘अ परफेक्ट डे फॉर बनानाफिश’, ‘द हॉर्न ऑफ द बुल’ हे लघुपट केल्यानंतर त्यांनी ‘गेमर’ व ‘ऱ्हायनो’ हे चित्रपटही साकारले.
  • नंतर युरोमेडन व ऑटोमेडन या चळवळीतील सहभागामुळे त्यांनी चित्रपट क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. पुढे ते क्रिमियाच्या न्यायासाठीच्या लढ्यातही सामील झाले.
साखारोव्ह पुरस्कार
  • हा पुरस्कार रशियन भौतिकशास्त्रज्ञ व शांततेचे नोबेल विजेते आंद्रे साखारोव्ह यांच्या नावाने दिला जातो. हा पुरस्कार मानवी हक्क व विचार स्वातंत्र्यासाठी दिला जातो.
  • युरोपियन संसदेद्वारे १९८८मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. याआधी हा पुरस्कार नेल्सन मंडेला, अलेक्झांडर डुबसेक, आँग सान स्यू की व मलाला युसुफझाई यांना मिळाला आहे.
  • आंद्रे साखारोव्ह हे रशियाच्या हायड्रोजन बॉम्बचे जनक होते व नंतर ते मानवी हक्क कार्यकर्ते बनले.
  • आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धेचे मानवजातीला असलेले संभाव्य धोके लक्षात आल्यामुळे त्या संबंधात जागृतीसाठी त्यांनी प्रयत्न केला.
  • भौतिकशास्त्रज्ञ असणाऱ्या आंद्रे साखरोव्ह यांना १९७५मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.

आयएटीएचा हवाई वाहतुकीविषयीचा अहवाल प्रकाशित

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) हवाई वाहतुकीविषयी अंदाजानुसार २०२४पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ असेल. जागतिक हवाई वाहतूक बाजारात सध्या भारत सातव्या स्थानी आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
  • २०३७पर्यंत जगभरातील हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट होऊन ८.२ अब्ज होईल.
  • २०२०च्या दशकादरम्यान चीन अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनेल.
  • तसेच २०२४मध्ये भारत अमेरिकेनंतर हवाई वाहतूक बाजारपेठेत तिसऱ्या स्थानी असेल.
  • सध्या भारतात घरगुती हवाई प्रवाशांच्या संख्येत १८.२८ टक्क्यांनी वाढ होत आहे. ही संख्या २०१८-१९मध्ये २४३ दशलक्ष आणि २०२०मध्ये २९३ दशलक्ष होईल.
  • २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीमध्ये १०.४३ टक्क्यांची वृद्धी झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ६५ दशलक्ष झाली आहे. २०२०मध्ये हा आकडा ७५ दशलक्ष होईल.
  • पुढील २० वर्षांमध्ये हवाई वाहतुकीतील सर्वाधिक वाढ आशिया-पॅसिफिक प्रदेशात होईल आणि पुढील २० वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट होईल.
  • हवाई वाहतुकीत आशिया-पॅसिफिक प्रदेशात ४.८ टक्के, आफ्रिकेत ४.६ टक्के आणि पश्चिम आशियामध्ये ४.४ टक्के वृद्धी होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना
  • इंग्रजी: International Air Transport Association (IATA)
  • स्थापना: १९ एप्रिल २०१८
  • मुख्यालय: मॉन्ट्रियल (कॅनडा)
  • ही कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक व्यापार संघटना आहे.
  • जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. सध्या ११७ देशांमधील २९० विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
  • हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित धोरण आणि मानदंड ठरविण्यामध्ये ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.
  • याव्यतिरिक्त, ही संस्था अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणदेखील प्रदान करते.

सलग ३ शतक झळकावणारा कोहली पहिला भारतीय

  • वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला.
  • यामुळे सलग ३ एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
  • याशिवाय असा विक्रम करणारा तो जगातील दहावा खेळाडू आहे. यात सलग ४ शतकांसह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा पहिल्या क्रमांकावर आहे.
  • कोहलीचे हे एकदिवसीय सामन्यांमधील ३८वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६२वे शतक ठरले.
  • विराटने २०१७मध्ये विंडीजविरुध्द नाबाद १११ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर या मालिकेत त्याने विंडीज विरुध्द सलग ३ शतके केली.
  • त्यामुळे विराटने एकाच संघाविरूध्द सलग ४ शतके करण्याचा विक्रमही केला. असा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
  • यापूर्वीच्या सामन्यामध्ये विराटने सर्वाधिक जलद आणि पदार्पणानंतर सर्वात कमी कालावधीत १० हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला होता.

भारत आणि जपान दरम्यान ६ विविध करारांवर स्वाक्षऱ्या

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यादरम्यान भारत आणि जपान यांच्यात ६ विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात हायस्पीड रेल्वे प्रकल्प, नौदल सहयोग इत्यादींचा समावेश आहे.
  • पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी मंत्रीस्तरीय २ + २ चर्चेच्या आयोजनास सहमती दर्शविली.
  • या चर्चेनंतर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ओडीए कर्जाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी भारत आणि जपान यांच्यात करार झाला.
  • याशिवाय, दोन्ही देशांमध्ये आयुष्मान भारत योजनेशीसंबंधी आरोग्य सेवा, डिजिटल भागीदारी, अन्न प्रक्रिया आणि नौसैनिक सहकार्यांसंबंधी करार झाले.
  • जपानने भारताच्या पुढाकाराने सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यासही सहमती दर्शविली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान जपानी गुंतवणूकदारांनी भारतात २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दिली
  • शिन्जो आबे यांच्याशी झालेल्या चर्चेत अनेक द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

क्लारा सोसाला मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ खिताब

  • पेराग्वेच्या क्लारा सोसा हिने मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१८ हा खिताब जिंकला. या सौंदर्य स्पर्धेच्या ६व्या आवृत्तीचे आयोजन म्यानमारमध्ये करण्यात आले होते.
  • क्लारा सोसो पेराग्वेची एक मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. यापूर्वी तिने मिस ग्रँड पेराग्वे २०१८ हा खिताब जिंकला आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पेराग्वेतील ती पहिली महिला आहे.
  • या स्पर्धेत भारताची मीनाक्षी चौधरी उपविजेती ठरली. तर इंडोनेशियाच्या नादिया पुरवोकोला तिसरे स्थान मिळाले.
  • गेल्यावर्षी मिस ग्रँड इंटरनॅशनल हा खिताब पेरूच्या मारिया जोसे लॉराने जिंकला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा