चालू घडामोडी : १ नोव्हेंबर

जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताला ६६वे स्थान

  • जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीय पासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे.
  • या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.
  • नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे.
  • संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.
  • भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (ॲक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत आहे.
  • केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे.
  • २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९०व्या स्थानी आहे. सीरिया ८८व्या तर सोमालिया ८७व्या स्थानी आहे.
  • पासपोर्ट निर्देशांक अलीकडे अत्यंत उपयुक्त ऑनलाइन साधन बनले आहे. याद्वारे जगातील पासपोर्टची स्थिती नागरिकांना कळते.
  • व्हिसामुक्त संपर्क अथवा आगमनानंतर व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) हे दोन निकषच त्यात प्रमुख आहेत. जेवढा पासपोर्ट शक्तिशाली तेवढा त्याचा व्हिसामुक्त संपर्क अधिक, असे साधे सूत्र यामागे आहे.

एफएसडीसीच्या १९व्या बैठकीचे आयोजन

  • आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या १९व्या बैठकीचे आयोजन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
  • या बैठकीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल, सेबीचे चेअरमन, आयआरडीएआयचे अध्यक्ष व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील मुख्य मुद्दे
  • आर्थिक आढावा: या बैठकीत जागतिक आणि स्थानिक आर्थिक परिस्थितीचे आणि वित्तीय क्षेत्राच्या कामगिरीचे पुनरावलोकन केले गेले. नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांमधील तरलता, तेलाचे दर, रुपया या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली.
  • आर्थिक क्षेत्रातील सायबर सुरक्षा: या बैठकीत आर्थिक क्षेत्रात कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या स्थापनेवर चर्चा केली गेली.
  • क्रिप्टोकरन्सी: या बैठकीत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित समस्यांवरदेखील चर्चा झाली. तसेच भारतात खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी योग्य कायदेशीर चौकट तयार करण्यावर चर्चाही झाली.
आर्थिक स्थिरता आणि विकास परिषद
  • इंग्रजी: Financial Stability and Development Council (FSDC)
  • एफएसडीसी वित्तीय स्थिरता, आर्थिक क्षेत्राचा विकास आणि अर्थव्यवस्थेचे नियमन यासाठीची सर्वात मोठी संस्था आहे.
  • २०१०मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी एफएसडीसीची स्थापना केली. केंद्रीय अर्थमंत्री एफडीएससीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
  • विविध नियामक संस्थांचे प्रमुख (उदा. आरबीआय, सेबी, आयआरडीए ई.), इंसॉल्वन्सी आणि बँकरप्सी मंडळाचे अध्यक्ष, अर्थ सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, वित्तीय सेवा विभागाचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार हे एफडीएससीचे सदस्य असतात.

आयटीबीपीच्या महानिदेशकपदी एस. एस. देसवाल

  • भारत तिबेट सीमा पोलीसच्या (आयटीबीपी) महानिदेशक पदावर एस. एस. देसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने देसवाल यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे. ते त्याच्या निवृत्तीपर्यंत म्हणजेच ऑगस्ट २०२१पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
  • वर्तमान महानिदेशक आर. आर. पनचंदा यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडून देसवाल यांनी महानिदेशक पदाचा पदभार स्विकारला.
  • या पदाबरोबरच ते सध्या कार्यरत असलेल्या सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) अतिरिक्त महानिदेशक पदाचे कामकाज सुद्धा ते सांभाळणार आहेत.
  • एस. एस. देसवाल १९८४च्या हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
भारत तिबेट सीमा पोलीस
  • भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) भारताच्या ५ केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलांपैकी एक आहे. १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली.
  • या दलाची स्थापना सेन्ट्रल रिझर्व पोलीस फोर्स कायद्यांतर्गत केली गेली आहे. भारत-तिबेट सीमेचे संरक्षण करण्याचे कार्य हे दल करते.
  • या दलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून, सध्या आयटीबीपीमध्ये ८९,४३२ जवान कार्यरत आहेत. ‘शौर्य–दृढ़ता–कर्मनिष्ठा’ हे आयटीबीपीचे ब्रीदवाक्य आहे. इन्स्पेक्टर जनरल बलबीर सिंग आयटीबीपीचे पहिले प्रमुख होते.
  • आयटीबीपीच्या नियमनासाठी १९९६मध्ये संसदेने भारत-तिबेट सीमा पोलीस दल अधिनियम १९९२ पारित केला. यामुळे आयटीबीपीकडे देशाच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली.

अनुपम खेर यांचा एफटीआयआय अध्यक्षपदाचा राजीनामा

  • ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने अध्यक्षपद सांभाळणे कठीण होत असल्याच्या कारणास्तव खेर यांनी राजीनामा दिला.
  • ऑक्टोबर २०१७मध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
  • भाजपाच्या निकटच्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांनी त्याच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली होती.
  • पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
अनुपम खेर
  • हे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत ५००हून अधिक चित्रपटांत व १००हून अधिक नाटकांत काम केले आहे.
  • डॅडी, लम्हे, राम लखन, खेल, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मैंने गाँधी को नहीं मारा, ए वेडनेसडे इत्यादी त्यांचे प्रमुख गाजलेले चित्रपट आहेत.
  • याव्यतिरिक्त त्यांनी बेंड इट लाइक बेकहॅम, ब्राइड अँड प्रेज्यूडिस, सिल्वर लाइनिंग्स प्लेबुक आणि द बिग सिक या हॉलीवूड चित्रपटांतही काम केले आहे.
  • भारता सरकारतर्फे त्यांना २००४मध्ये पद्मश्री आणि २०१६मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
  • इंग्रजी: Film and Television Institute of India (FTII)
  • ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
  • ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात वसलेली आहे.
  • १९६०साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था सायलेक्ट या जागतिक दर्जाच्या संस्थेशी संलग्न आहे.
  • या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात तंत्रज्ञ, अभिनेते अथवा दिग्दर्शक बनतात.

राहुल द्रविडला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान

  • भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
  • क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे आणि हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय आहे.
  • आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचे भिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे या ४ खेळाडूंचा यापूर्वीच समावेश झाला आहे.
  • आयसीसी हॉल ऑफ फेम या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.
  • हॉल ऑफ फेमच्या यादीत कोणत्या खेळाडूला समाविष्ट करून घ्यायचे, याचा निर्णय पूर्णपणे आयसीसीच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो.
राहुल द्रविड
  • राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी १५ वर्षे क्रिकेटमध्ये योगदान दिले आहे.
  • त्याने १६४ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये ३६ शतकांसह १३,२८८ धावा केल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये ३४४ सामन्यांमध्ये १२ शतकांसह १०,८८९ धावा केल्या आहेत.
  • तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २१० झेल पकडले असून, जो आजही एक विश्वविक्रम आहे.

झारसुगुडा विमानतळाच्या नामांतरास मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओदिशातल्या झारसुगुडा विमानतळाचे नामांतर ‘वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसुगुडा’ असे करण्यास मान्यता देण्यात आली.
  • रांची, रायपूर व भुवनेश्वरसारख्या शहरांना उडान योजनेद्वारे जोडणारे ओडिशातील हे पहिले विमानतळ आहे.
  • याशिवाय, ओडिशामध्ये जेपोर (कोरापुट जिल्हा), रुरकेला (सुंदरगड जिल्हा) आणि उत्केला (कालाहांडी जिल्हा) येथे इतर ३ विमानतळ बांधण्यात येत आहेत.
  • झारसुगुडा विमानतळ भुवनेश्वरनंतर ओडिशाचे कार्यान्वित झालेले दुसरे विमानतळ आहे. याची निर्मिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ओडिशा सरकारसह केली आहे.
  • हे विमानतळ १०२७.५ एकर क्षेत्रात पसरलेले आहे. याचा रनवे २,३९० मीटर लांब असून, यावर ए-३२०सारखी एअरबस विमाने उड्डाण अथवा लँड करू शकतात. हे विमानतळ रात्रीदेखील कार्यरत असेल.
  • वीर सुरेंद्र साई हे ओदिशातील विख्यात स्वातंत्र्य सैनिक आहेत. या महान व्यक्तिमत्वाला ही साजेशी आदरांजली देण्यासाठी या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आहे आहे.

निधन: सागरी जीवशास्त्रज्ञ रूथ गेट्स

  • प्रवाळ बेटांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या सागरी जीवशास्त्रज्ञ रूथ गेट्स यांचे २५ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • प्रवाळ बेटे वाचवण्यासाठी त्यांनी सुपर कोरल २०१५ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मांडला होता.
  • प्रवाळ व शैवाल यांचा संबंध, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ते वापरत असलेले रेणू, वाढत्या तापमानामुळे त्यांच्या या साहचर्यातील अडचणी अशा अनेक बाबींचे संशोधन त्यांनी रेणवीय जीवशास्त्राच्या साधनांनी केले होते.
  • हवामान बदल, तापमान वाढ यातही टिकून राहतील अशा प्रवाळांच्या प्रजाती तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
  • त्यांच्या या प्रयत्नांची दखल नेटफ्लिक्सच्या ‘चेसिंग कोरल’ या लघुपटात घेण्यात आली होती.
  • त्या हवाई विद्यापीठाच्या इन्स्टिट्युट ऑफ मरीन बायॉलॉजी या संस्थेच्या संचालक व इंटरनॅशनल सोसायटी फॉर रीफ स्टडीज या संस्थेच्या अध्यक्षा होत्या.
  • इंग्लंडमध्ये जन्मलेल्या गेट्स यांनी १९८४मध्ये सागरी जीवशास्त्रात न्यूकॅसल विद्यापीठातून पीएचडी केली. एकूण १०० विज्ञान नियतकालिकांत त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले.
  • कॅलिफोर्निया विद्यापीठात १९९० ते २००२ दरम्यान विविध पदांवर काम केले. २००३मध्ये त्या हवाई विद्यापीठात आल्या व स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली.

डब्ल्यूडब्ल्यूएफचा लिव्हिंग प्लॅनेट अहवाल

  • मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अनिर्बंध लुटीमुळे वन्य सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असा भयसूचक इशारा निसर्गरक्षणासाठी झटणाऱ्या ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या जागतिक स्वयंसेवी संस्थेने दिला आहे.
  • जगभरात १६,७००हून अधिक ठिकाणी आढळणाऱ्या सजीवांच्या ४ हजारांहून अधिक प्रजातींचे निरंतर सर्वेक्षण ही संस्था करीत असते.
  • त्याच्या आधारे सजीवसृष्टीच्या स्थितीचा आढावा घेणारा ‘लिव्हिंग प्लॅनेट’ हा अहवाल संस्थेने प्रसिद्ध केला.
या अहवालातील ठळक मुद्दे
  • सजीवांच्या असंख्य प्रजाती अल्पावधीत विनष्ट होण्याचा नवा विनाशकारी कालखंड सुरू झाला आहे व मानवाचा वाढता हव्यास पूर्ण करण्याची पृथ्वीची क्षमता संपत आली आहे.
  • त्यानुसार १९७० ते २०१४ या ४४ वर्षांच्या काळात मानवाकडून निसर्गावर केल्या जात असलेल्या अत्याचारांमुळे मासे, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी यासारख्या पाठीचे हाड असलेल्या सजीवांच्या ६० टक्के प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.
  • अहवालानुसार याच काळात गोड्या पाण्यातील जलचरांची संख्या याहूनही जास्त म्हणजे ८० टक्क्यांनी घटली आहे.
  • प्रादेशिक तुलना केली तर याचा सर्वाधिक फटका लॅटिन अमेरिका क्षेत्रास बसला. तेथील वन्यजीवांची संख्या ९० टक्क्यांनी घटली आहे.
  • गेल्या ५० लाख वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचे (मास एक्स्टिंग्शन) ५ कालखंड होऊन गेले. आता सहाव्या कालखंडाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून मिळतात.
  • विविध प्रजातींच्या विनष्टतेची स्थिती निरनिराळी असली तरी प्रजाती नष्ट होण्याचे सध्याचे प्रमाण काहीशे वर्षांपूर्वी होते त्याहून ते १०० ते १ हजार पटीने वाढले आहे.
  • या काळात माणसाने आपल्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वीची बेसुमार ओरबाडणूक सुरू केली व त्यामुळे अन्य सजीवांचे जगणे मुश्किल झाले.
  • सर्व सजीवसृष्टीचा वजनाच्या वा ‘बायोमास’च्या दृष्टीने विचार केला तर आज यात वन्यजीवांचा वाटा फक्त ४ टक्के राहिला आहे. बाकीचा हिस्सा मानवाचा (३६ टक्के) आणि पाळीव पशुधनाचा (६० टक्के) आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा