चालू घडामोडी : १२ नोव्हेंबर

देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन

  • वाराणसी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन केले.
  • वाराणसीमधील खिडकिया घाट येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे देशातील पहिलेच मल्टी मॉडेल टर्मिनल देशाला समर्पित केले.
  • यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
  • कोलकाता येथून आलेल्या एम. व्ही. रविंद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून १६ कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले.
  • वाराणसी-हल्दिया राष्ट्रीय जलमार्ग क्र.१वर स्थित या टर्मिनलमुळे आता गंगा नदीमार्गे देशातंर्गत मालवाहक जहाज सेवा सुरु झाली आहे.
  • हे टर्मिनल २०६ कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आले आहे. या टर्मिनलची जेट्टी २०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद आहे.
  • येथे मालाचा चढ-उतार करण्यासाठी जगातील अत्याधुनिक हेवी क्रेन लावण्यात आली आहे. जर्मनीत तयार केलेल्या या मोबाइल हार्बर क्रेनची किंमत २८ कोटी एवढी आहे.
  • सागरमाला (जलमार्ग विकास) प्रकल्पातंर्गत हा मार्ग बांधण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
  • पंतप्रधान मोदींनी २०१५मध्ये सागरमाला प्रकल्पाची सुरुवात केली होती. जेणेकरून रस्ते, हवाई मार्गासह जलमार्गाच्या माध्यमातून देश आर्थिकदृष्ट्या बळकट होऊन वेगाने विकास होऊ शकतो.
या जलमार्गाचे व टर्मिनलचे लाभ
  • या जलमार्गामुळे व्यापार अधिक अनुकूल होणार. यामुळे दक्षिण आशियातील उद्योग क्षेत्रात भारत आपले स्थान चीनप्रमाणे बळकट करू शकेल.
  • देशातंर्गत जलमार्गाने मालवाहतूक पर्यावरणपूरक असून त्यामुळे खर्चात बचत होईल.
  • या टर्मिनलमुळे ५०० थेट रोजगार आणि २ हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल असा अंदाज आहे.
  • या जलमार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर भारत थेट बंगालच्या उपसागराशी तसेच तसेच बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि अन्य दक्षिण आशियाई देशांशी जोडणे शक्य होणार आहे.

निधन: केंद्रीय मंत्री अनंत कुमार

  • केंद्रीय संसदीय कामकाज आणि रसायन व खते मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे १२ नोव्हेंबर रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता.
  • त्यानंतर जुलै २०१६पासून त्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.
  • त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी बंगळुरू (कर्नाटक) येथे झाला. सुरुवातीला ते भाजपाच्या विद्यार्थी संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हीपी) संबंधित होते.
  • ते १९८५मध्ये एबीव्हीपीचे राष्ट्रीय सचिव बनले. पुढे भाजपामध्ये सामील झाल्यानंतर त्यांना युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.
  • १९९६मध्ये त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सचिव बनविण्यात आले. तर २००४मध्ये त्यांना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • अनंतकुमार दक्षिण बेंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. १९९६पासून या मतदारसंघातून ते सलग ६ वेळा निवडून आले आहेत.
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालय सोपविण्यात आले होते.

आयआयटी मद्रासने विकसित केले कोल्ड स्टोरेज उपकरण

  • आयआयटी मद्रासने ५०० किलो क्षमतेच्या सौर उर्जेवर चालणाऱ्या पोर्टेबल कोल्ड स्टोरेज उपकरणाचा शोध लावला आहे.
  • या उपकरणाचा वापर भाज्या, फळे आणि इतर वस्तू दीर्घ काळासाठी सुरक्षित साठविण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • हे उपकरणाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना खराब होण्यापासून रोखण्यास मदत मिळेल.
  • या उपकरणाचे पहिले युनिट कांचीपुरम जिल्ह्यातील एका शेतात ठेवण्यात आले आहे.
  • या उपकरणाचे तापमान ४ ते १० अंश सेल्सियसपर्यंत ठेवता येते. या उपकरणाची किंमत सुमारे ५.५ ते ६ लाख रुपये आहे. याची क्षमताही आवश्यकतेनुसार कमी-जास्त केली जाऊ शकते.
  • या उपकरणासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून निधी पुरविला जात आहे.
  • आयआयटी मद्रासमधील विद्यार्थ्यांचा एक स्टार्टअप Tan90 या उपकरणाला शेतकऱ्यांपर्यंत कमीतकमी किंमतीत पोहचविण्याच्या योजनेवर कार्य करत आहे.
  • आयआयटी मद्रास ही चेन्नई (तमिळनाडू) येथे स्थित भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षण संस्था आहे. तिची स्थापना १९५९मध्ये पश्चिम जर्मनीच्या सहाय्याने करण्यात आली होती.

आंध्रप्रदेश उच्च न्यायालय स्थापनेस मंजुरी

  • आंध्रप्रदेशसाठी आंध्रप्रदेश उच्च न्यायालय स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
  • १ जानेवारी २०१९पासून आंध्रप्रदेश उच्च न्यायालय कार्य सुरू करणार आहे. हे भारताचे २५वे उच्च न्यायालय असेल.
  • सुरुवातीला हे न्यायालय एका अस्थायी इमारतीमध्ये स्थापन करण्यात येईल. हे अस्थायी उच्च न्यायालय १५ डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल.
  • नंतर हे उच्च न्यायालय आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती (जस्टीस सिटी) येथे विस्थापित केले जाईल.
  • जून २०१४मध्ये आंध्रप्रदेशच्या झालेल्या विभाजनानंतर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांसाठी हैदराबाद येथे एकच उच्च न्यायालय होते.
  • परंतु आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या स्थापनेनंतर हैदराबाद उच्च न्यायालय हे तेलंगणा उच्च न्यायालय या नावाने ओळखले जाईल.

स्वाती चतुर्वेदी यांना लंडन वृत्तपत्रस्वातंत्र्य पुरस्कार

  • शोधपत्रकारिता करणाऱ्या मुक्त पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांचा लंडन वृत्तपत्रस्वातंत्र्य पुरस्काराने गौरव करण्यात आला.
  • स्वाती चतुर्वेदी या शोधपत्रकार म्हणून परिचित आहेत. शोधपत्रकारितेसाठी प्रसंगी जिवावर उदार होण्याचे धाडस, माहिती खोदून काढण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे.
  • २० वर्षे शोधपत्रकारितेत काम करताना त्यांनी राजकीय वर्तुळ हादरवून सोडणाऱ्या अनेक बातम्या दिल्या आहेत. ज्या भारतातच नव्हे तर जगात नावाजल्या गेल्या.
  • सुरुवातीला त्यांनी दी इंडियन एक्स्प्रेस, हिंदुस्तान टाइम्स व दी स्टेट्समन या वृत्तपत्रात काम केले. नंतर त्या झी न्यूजमध्ये सहायक संपादक होत्या. ‘कहिये जनाब’ हा कार्यक्रम त्या सादर करीत असत.
  • भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ऑनलाइन माध्यमातून कसा शिवराळ भाषेत प्रचार केला, अनेकांना धमक्या दिल्या याचा भांडाफोड त्यांनी केला.
  • यावर त्यांनी लिहिलेले ‘आय एम ट्रोल: इनसाइड सिक्रेट वर्ल्ड ऑफ दी बीजेपी डिजिटल आर्मी’ हे पुस्तक विशेष गाजले.
  • त्यानंतर त्यांनी ‘डॅडीज गर्ल’ या कादंबरीत आरुषी तलवार प्रकरणाची आठवण करून देताना माध्यमांवरही सडकून टीका केली आहे.
  • कालांतराने त्या साहित्य लेखनाकडे वळल्या असून त्याही मार्गाने त्या राजकारणीच नव्हे तर माध्यमांचेही पितळ उघडे पाडीत आहेत.

लडाख पुनर्वसन प्रकल्पाला युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार

  • लडाख पुनर्वसन प्रकल्पाने सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी २०१८चा युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार जिंकला.
  • हा पुरस्कार लडाखमधील प्राचीन काळातील जीर्ण उच्चकुलीन गृहप्रकल्पाच्या पुनरुत्थानास हा पुरस्कार देण्यात आला.
  • हे पुनर्वसन कार्य लडाख आर्ट अँड मीडिया ऑर्गनायझेशनने (लॅमो: LAMO) केले आहे. ही एक जनकल्याण ट्रस्ट आहे.
इतर श्रेण्यांमधील विजेते
  • अवार्ड ऑफ एक्सलन्स: हा पुरस्कार क्योटोमधील (जपान) २०व्या शतकातील शिजो-ओचो ओफुने-होको फ्लोट मचियाच्या पुनर्वसनासाठी देण्यात आला. त्यात क्योटो संस्कृतीची झलक आहे.
  • अवार्ड ऑफ डिस्टिंक्शन: लॅमो सेंटर (लडाख)
  • अवार्ड ऑफ मेरिट: ५ मार्टिन प्लेस, सिडनी (ऑस्ट्रेलिया); एजिंग झुआंग, फुझियान (चीन); कमर्शियल बँक ऑफ हाँगकाँग वेअरहाऊस, सैतामा (जपान)
  • ऑनरेबल मेंशन: हेंगदाओहेजी टाउन, हेलाँगजिआंग (चीन); राजाभाई क्लॉक टॉवर आणि मुंबई विद्यापीठ ग्रंथालय इमारत (भारत); रटनसी मुल्जी जेठा कारंजे, मुंबई (भारत).
  • वारसा संदर्भात नाविन्यपूर्ण डिझाइन: काओमई इस्टेट १९५५, चियांग मै (थायलंड) आणि हार्ट्स मिल, पोर्ट अॅडलेड (ऑस्ट्रेलिया).
सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी यूनेस्कोचा आशिया-पॅसिफिक पुरस्कार
  • हा पुरस्कार २०००मध्ये स्थापित करण्यात आला.
  • या पुरस्काराद्वारे, त्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मानित केले जाते, ज्यांनी ऐतिहासिक वारसा इमारतींचे जतन करण्यासाठी कार्य केले आहे.
  • या पुरस्काराचा उद्देश अशा इमारतींच्या मालकांना इमारतींचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

सिंगापूरमध्ये ३३व्या आसियान परिषदेला सुरुवात

  • ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सिंगापूरमध्ये ३३व्या आसियान परिषदेला सुरुवात झाली सिंगापूरचे पंतप्रधान ली ह्सीन लूँग या परिषदेचे अध्यक्ष आहेत.
  • १५ नोव्हेंबर रोजी या परिषदेचा समारोप होईल. या परिषदेला भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ व १५ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत.
  • यंदाच्या या परिषदेची मुख्य संकल्पना ‘Resilient and Innovative’ (लवचिक आणि अभिनव) ही आहे.
  • या परिषदेत आसियानचे १० सदस्य देश आणि ८ भागीदार देशांचे प्रमुख भाग घेतील. याव्यतिरिक्त या परिषदेत सुमारे १०० देशांतील ४००पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होतील.
आसियान
  • इंग्रजी: Association of Southeast Asian Nations (ASEAN)
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व व स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि त्यासोबतच विवादांवर शांततेने तोडगा काढणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  • स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे ५ देश सदस्य होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  • नंतर १९९५साली व्हिएतनाम, १९९७साली लाओस व म्यानमार आणि १९९९साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

निवडणूक आयोगाची नवी वेबसाइट लाँच

  • भारतीय निवडणूक आयोगाने आपली नवी वेबसाइट https://eci.gov.in लाँच केली. आतापर्यंत निवडणूक आयोगाची वेबसाइट https://eci.nic.in होती.
  • देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या नव्या वेबसाइटचे अनावरण केले.
  • ही वेबसाइट मोबाइल-फ्रेंडली असून, निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती वापरकर्ता येथून प्राप्त करू शकतो. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहण्यास मदत होईल.
निवडणूक आयोग
  • भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.
  • भारतातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्य विधानसभा इत्यादी निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.
  • निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.
  • सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.
  • सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या ओमप्रकाश रावत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२२वे) आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा