चालू घडामोडी : १४ नोव्हेंबर

इस्रोकडून जीसॅट-२९ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) १४ नोव्हेंबर रोजी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-२९ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. कुठल्याही अडथळ्याविना हे प्रक्षेपण पार पडले.
  • श्रीहरीकोटोवरुन झालेले हे ६७वे प्रक्षेपण होते. जीसॅट-२९ हा भारताचा ३३वा दळणवळण उपग्रह आहे.
  • जीसॅट-२९ उपग्रह ३,४२३ किलो वजनाचा आहे. या उपग्रहामुळे ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचे दुर्गम भाग इंटरनेट सुविधेने जोडता येतील.
  • GSLV-MK-III D2 भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असून त्याला बाहुबली सुद्धा म्हटले जाते. या रॉकेटचे वजन ६४१ टन आहे.
  • हे रॉकेट बनवायला भारतीय शास्त्रज्ञांना १५ वर्षे लागली असून, या रॉकेटच्या एका उड्डाणासाठी येणारा खर्च ३०० कोटी रुपये आहे.
  • इस्रो सध्या वजनदार रॉकेटच्या चाचण्या करत आहे. मिशन गगनयानसाठी इस्रो सर्वात वजनदार रॉकेट विकसित करणार आहे. २०२२मध्ये मिशन गगनयान लाँच करणायत येणार आहे.
इस्रो
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना १९६९मध्ये करण्यात आली होती. इस्रो अंतरीक्ष विभागाच्या अंतर्गत कार्य करते.
  • १९७२मध्ये सरकारद्वारे अंतराळ आयोग आणि अंतरीक्ष विभागाच्या स्थापनेनंतर देशातील अंतराळ संशोधन कार्याला गती मिळाली.
  • ७०चे दशक भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील प्रयोगात्मक युग होते. या काळात भास्कर, रोहिणी, आर्यभट्ट आणि ऍपल सारखे प्रायोगिक उपग्रह कार्यक्रम चालविले गेले.
  • ८०च्या दशकात इन्सॅट आणि आयआरएससारखे उपग्रह कार्यक्रम सुरू करण्यात आले. आज इन्सॅट आणि आयआरएस हे इस्रोचे प्रमुख कार्यक्रम आहेत.
  • सध्या अंतराळ यानाचे स्वदेशातच प्रक्षेपण करण्यासाठी भारताकडे मजबूत प्रक्षेपण यान कार्यक्रम आहे.
  • इस्रोची अँन्ट्रिक्स ही व्यवसायिक शाखा भारतीय अंतराळ सेवांचे जगभरात विपणन करते. याद्वारे अनेक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण इस्रोने पूर्ण केले आहे.
  • अंतराळ संशोधनामध्ये भारताने फार मोठी आघाडी मिळवलेली आहे. या क्षेत्रात भारताचा क्रमांक जगातल्या पहिल्या ५ देशामध्ये आहे.
  • फेब्रुवारी २०१८मध्ये एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) इतिहास रचला होता.
  • एकाचवेळी १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रो ही जगातील सर्वात यशस्वी तसेच सर्वाधिक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करणारी संस्था ठरली.
  • इस्रोने २४ सप्‍टेबर २०१४ रोजी पहिल्याच प्रयत्नात ‘मंगळयान’ मंगळाच्या कक्षेत पोहचविण्याचा विक्रमही केला होता.
  • मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील पाचवा (अमेरिका, रशिया, जपान, चीन यांच्यानंतर) देश आहे.
  • केवळ ४५० कोटी इतक्या कमी खर्चात मंगळ मोहिम यशस्वी करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.

आयएसपीआरएलचा एडीएनओसीसह सामंजस्य करार

  • इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेडने (ISPRL) अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपनीसह (ADNOC) एक सामंजस्य करार केला.
  • या करारांतर्गत एडीएनओसी कर्नाटकमधील पादूरस्थित पेट्रोलियम साठ्याच्या (एसपीआर) स्टोरेज क्षमतेचा वापर करेल.
  • या साठ्याची स्टोरेज क्षमता सुमारे २.५ दशलक्ष टन (अंदाजे १७ दशलक्ष बॅरल्स) आहे. एडीएनओसी या स्टोरेजच्या २ चेंबर्सचा वापर करेल.
  • भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याच्या कार्यक्रमात गुंतवणूक करणारी एडीएनओसी ही पहिली विदेशी तेल व गॅस कंपनी आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा वाढेल.
पार्श्वभूमी
  • इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेड (आयएसपीआरएल) एक विशेष उद्देश वाहन (SPV: Special Purpose Vehicle) आहे.
  • हे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या तेल उद्योग विकास मंडळाची एक उपकंपनी आहे.
  • आयएसपीआरएलने विशाखापट्टणम (१.३३ एमएमटी), मंगळूर (१.५ एमएमटी) व पादुर (२.५ एमएमटी) या ३ ठिकाणी एकूण ५.३३ एमएमटी कच्च्या तेलाच्या साठयासाठी भूमिगत गुहांची निर्मिती केली आहे.
  • एसपीआर कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत हा ५.३३ एमएमटी कच्च्या तेलाचा साठा सध्या देशाची ९.५ दिवसांची कच्च्या तेलाच्या गरज भागवू शकतो.
  • जून २०१८मध्ये सरकारने ओडिशाच्या चंडीखोल आणि कर्नाटकच्या पादुर येथे ६.५ एमएमटी अतिरिक्त एसपीआर सुविधेच्या स्थापनेस तत्वतः मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत ११.५ दिवसांची वाढ होण्याची आशा आहे.
  • हायड्रोकार्बन पदार्थ साठवण्यासाठी जमिनीखाली या मानवनिर्मित गुहांचा वापर केला जातो. पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्यातील इंधन वापरले जाते.
  • भारतात भूगर्भात खोदकाम करुन इंधनाचा साठा करावा, हा निर्णय १९९८साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी घेतला होता.

फिल्पकार्टचे सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

  • फिल्पकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी १३ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला.
  • फिल्पकार्टवर सध्या वॉलमार्टचे नियंत्रण असून फिल्पकार्टचे ७७ टक्के मालकी हक्क वॉलमार्टकडे आहेत. मे २०१८मध्ये हा १.०५ लाख कोटी रुपयांमध्ये विक्रीचा हा व्यवहार झाला होता.
  • यानंतर ६ महिन्यातच बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप झाले होते. बन्सल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
  • त्यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
  • बिन्नी यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपास करणाऱ्या समितीला आढळले नाहीत.
  • बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर कल्याण कृष्णमुर्ती फ्लिपकार्टच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळतील.
  • सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७साली ४ लाख रुपये भांडवलावर फ्लिपकार्ट कंपनी सुरु केली होती. स्थापनेसापासून बिन्नी यांची कंपनीमध्ये महत्वाची भूमिका होती.
  • वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये हिस्सा खरेदी केला तेव्हा सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी स्वत:चा ५ टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा ७ हजार कोटींना विकला व कंपनीतून बाहेर पडले. पण बिन्नी यांनी स्वत:चा ५.५ टक्के हिस्सा राखून ठेवला होता.

अनंतकुमार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन नियुक्त्या

  • केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना रसायने आणि खते मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
  • तर केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
  • १२ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे निधन झाल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता.
  • त्यानंतर जुलै २०१६पासून त्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.
  • अनंतकुमार दक्षिण बेंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. १९९६पासून या मतदारसंघातून ते सलग ६ वेळा निवडून आले आहेत.
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालय सोपविण्यात आले होते.

नवी दिल्लीत ग्लोबल डिजिटल कंटेट मार्केट परिषद

  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने १४ व १५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ग्लोबल डिजिटल कंटेट मार्केट २०१८ या परिषदेचे आयोजन केले.
  • या परिषदेत संगीत, चित्रपट, प्रसारण आणि प्रकाशन तसेच सामूहिक व्यवस्थापन या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली गेली.
  • चित्रपट संगीत आणि माध्यम क्षेत्रातील सृजनशील उद्योगांमुळे जागतिक बौद्धीक संपदा संघटनेने (डब्ल्यूआयपीओ) या परिषदेसाठी यजमान देश म्हणून भारताची निवड केली आहे.
  • या परिषदेत जगभरातील डिजिटल उद्योगातील, विविध सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत. यावर्षीच्या परिषदेत आशिया-प्रशांत क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.
  • या परिषदेचा मुख्य उद्देश चित्रपट, संगीत, खेळ आणि सृजनशील उद्योगातील नवीन संधींबाबत चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

दिल्लीत भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन

  • १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत सांस्कृतिक राज्य मंत्री महेश शर्मा यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे (इंडियन इंटरनॅशनल ट्रेड फेअर) उद्घाटन केले.
  • या मेळाव्याची संकल्पना ‘भारतातील ग्रामीण उद्योग’ अशी आहे. यावर्षी या मेळाव्यासाठी अफगाणिस्तान हा भारताचा भागीदार देश आणि नेपाळ हा फोकस देश आहे. झारखंड हे या मेळाव्याचे भागीदार राज्य आहे
  • हा मेळा विविध प्रकारच्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी एक उत्कृष्ट मंच आहे. यात विविध राज्य, सरकारी विभाग तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होत आहेत.
  • या मेळाव्यात ऑटोमोबाईल, जूट उत्पादने, कपडे, घरगुती भांडी, प्रक्रिया केलेले अन्न, सौंदर्य उत्पादने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने इत्यादी विविध प्रकारच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविले जाते.
पार्श्वभूमी
  • भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात १९८०मध्ये झाली. याचे आयोजन भारतीय व्यापार संवर्धन संस्थेद्वारे केले जाते.
  • भारतीय व्यापार संवर्धन संस्था ही भारत सरकारची नोडल एजन्सी आहे. हा मेळा दरवर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानात आयोजित केला जातो.

१४ नोव्हेंबर: जागतिक मधुमेह दिन

  • मधुमेह आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो.
  • या दिनाचे आयोजन जागतिक मधुमेह संस्थेद्वारे (IDF: International Diabetes Federation) करण्यात येते.
  • ही संस्था जागतिक स्तरावर मधुमेहविषयक संशोधन, शिक्षण, उपचारांची दिशा देणारी नावाजलेली संस्था आहे.
  • यावर्षासाठी जागतिक मधुमेह दिनाची संकल्पना ‘कुटुंब आणि मधुमेह’ (The Family and Diabetes) ही निश्चित करण्यात आली आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने १९९१पासून मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०३०पर्यंत मधुमेह हा मनुष्यहानी घडवणारा सातवा मोठा आजार ठरणार आहे, असा इशारा दिला आहे.
  • डायबेटीसवर वरदान ठरणाऱ्या इन्शुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक बँटिंगचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे.
  • देशात दर १० हजार लोकसंख्येमागे सुमारे ३२५ मधुमेहाचे रुग्ण आढळतात. यात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा समावेश सर्वाधिक आहे.
  • तर जगात सुमारे ४१५ दशलक्ष लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. म्हणजेच प्रत्येक ११ प्रौढ व्यक्तींमध्ये १ मधुमेहाच रुग्ण आहे. २०४०पर्यंत मधुमेह पीडितांची संख्या ६४२ दशलक्ष होण्याची शक्यता आहे.
मधुमेह (डायबेटिस)
  • पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा झाल्यामुळे रक्तातील साखर वाढून पेशींमध्ये साखर कमी पडते. या स्थितीला मधुमेह म्हणतात.
  • इन्शूलीन आणि ग्लुकॅगॉन ही स्वादूपिंडात तयार होणारी संप्रेरके शरीरातील ग्लुकोजचे नियंत्रण करतात. इन्शुलीन रक्तातील साखर कमी करते, तर ग्लुकॅगॉन साखर वाढविते.
  • इन्शुलीन तयार होण्याच्या प्रक्रियेत अनियमितता किंवा इन्शुलीनला पेशींनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही, तर ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
  • खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागणे, वजन घटणे आणि अशक्तपणा जाणवणे ही मधुमेहाची काही लक्षणे आहेत.
  • मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व तसेच सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.
  • मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होण्याची शक्यात असते.
  • मधुमेहाचे २ प्रकार असतात. त्यातल्या पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते.
  • दुसऱ्या प्रकारात (टाइप-२) स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. परिणामत: रक्तातली साखर वाढत राहते. भारतात मधुमेहाचे रुग्ण बहुतांशी या दुसऱ्या प्रकारचे आहेत.
  • सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल, असे एकही औषध उपलब्ध नाही. तो आटोक्यात ठेवता येऊ शकतो. योग्य आहार व पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे.

१४ नोव्हेंबर: बालदिन

  • जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतात १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन (चिल्ड्रन्स डे) म्हणून साजरा केला जातो.
  • १९६४पूर्वी भारतात २० नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात होता. हा जागतिक बालदिन असून तो संयुक्त राष्ट्रांद्वारे सुरु करण्यात आला आहे.
  • १९६४मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारताने घेतला.
पंडित जवाहरलाल नेहरू
  • पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद शहरात येथे झाला. पंडित नेहरूंचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. ते स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरू यांचे पुत्र होते.
  • ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते.
  • त्यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजमधून पदवी पूर्ण केली होती. नंतर ते भारतात आले आणि राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
  • १९२९मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरमधील रावी नदीच्या काठी त्यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावत पूर्ण स्वराज्याचा ठराव पास केला.
  • पंडित नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या हाती असते, असे ते कायम म्हणत. लहान मुले पंडित नेहरूंना ‘चाचा नेहरू’ अशीच हाक मारत.
  • पंडित नेहरू यांनी १९३५साली तुरुंगात आपले ‘Toward Freedom’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे आत्मचरित्र १९३६साली अमेरिकेत प्रकाशित करण्यात आले होते.
  • पंडित नेहरू यांनी प्राचीन भारत, वेदांचे अनेक वर्षे सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या ‘Discovery of India’ या पुस्तकामधून त्यांचे भारतीय संस्कृती आणि भारताच्या इतिहासाविषयी अनन्यसाधारण ज्ञान लक्षात येते.
  • पंडित जवाहरलाल नेहरू हे शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तींमधील एक म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध होते.
  • पंडित जवाहरलाल नेहरुंना १९५० ते १९५५ या काळात तब्बल ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कधीही मिळाला नाही.
  • १९५५ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

ट्विटर इंडियाची #PowerOf18 मोहिम

  • ट्विटर इंडियाने २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये युवकांना सामावून घेण्यासाठी #PowerOf18 ही मोहिम सुरू केली आहे.
  • या अभियानाची सुरुवात ट्विटरचे संस्थापक व सीईओ जॅक डॉर्सी यांनी आयआयटी दिल्ली येथे केली. युवकांना चर्चेसाठी प्रेरणा देणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.
  • #PowerOf18 ही मोहीम युवकांसाठी स्त्रोत म्हणून काम करेल, याद्वारे त्यांना निवडणुकीबद्दल माहिती मिळेल आणि ते आपल्या आवडीच्या सामाजिक विषयांवर चर्चा करू शकतील.
  • या अभियानाद्वारे मतदानाच्या महत्वाबद्दल जनजागृती करण्याचे कार्यदेखील केले जाणार आहे.
  • भारतात करण्यात आलेल्या एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणानुसार ६० टक्के युवक देश व जगातील घडणाऱ्या घटनांच्या माहितीसाठी समाज माध्यमांचा (सोशल मिडिया) वापर करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा