चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर


महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबादमध्ये सुरु

  • केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरन कौर बादल यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले.
  • हे पार्क औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात वाहेगाव आणि धनगांव गावात आहे. महाराष्ट्रातले पहिले मेगा फूड पार्क १ मार्च २०१८ रोजी सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आले.
  • तिसऱ्या मेगा फूड पार्कलाही मंत्रालयाने मंजुरी दिली असून ते वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
  • पैठण मेगा फूड पार्कसाठी १२४.५२ कोटी रुपये खर्च आला असून १२० एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे.
  • यामध्ये ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रि-कुलिंग, रायपनिंग चेंबर्स, फ्रीझर रुम, अन्न तपासणी प्रयोगशाळा, दुधाचे टँकर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.
  • या मेगा फूड पार्कमुळे औरंगाबाद तसेच नाशिक, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांनाही लाभ होईल.
  • या पार्कमुळे सुमारे ५ हजार लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. या पार्कमधील अत्याधुनिक सुविधांमुळे महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीला मोठी चालना मिळेल.

मेगा फूड पार्क योजना
  • अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने या योजनेची सुरुवात केली होती.
  • या पार्कमध्ये विशेषतः पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा आणि उद्योजकांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते.
  • या योजनेद्वारे पुरवठा साखळीच्या प्रत्येक स्तरावर अन्न पदार्थांच्या नासाडीमध्ये घट होणार आहे.
  • या योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक फूड पार्कला ५० कोटी रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते.


मिताली राज: टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू

  • भाताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांना मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे.
  • मितालीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८५ सामन्यांमध्ये २२८३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या खात्यात २२०७ धावा (८७ सामन्यांमध्ये) आहेत.
  • मितालीनं १७ अर्धशतके केली आहेत. तर रोहित शर्माने ४ शतके व १५ अर्धशतके केली आहेत.
  • महिला क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत मिताली जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूझीलंडची सूजी बेट्स (२९९६) ही पहिल्या, वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (२६९१) दुसऱ्या स्थानी आणि इंग्लंडची एडवर्ड (२६०५) तिसऱ्या स्थानी आहे.
  • पुरुष क्रिकेटचा विचार केल्यास न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील (२२७१) पहिल्या स्थानी आहे. मितालीने त्यालाही मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१०२ धावा केल्या आहेत.
  • त्यानंतर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा क्रमांक लागतो. पाचव्या स्थानी सुरेश रैना, तर सहाव्या स्थानी महेंद्रसिंग धोनी आहे.

मिताली राजचे अन्य विक्रम
  • महिला वनडे क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार करणारी पहिली खेळाडू.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ७ अर्धशतके झळकावणारी पहिला खेळाडू.
  • महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके.
  • आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या २ अंतिम सामन्यांमध्ये (२००५ व २०१७) भारताचे कर्णधारपद भूषविणारी एकमेव खेळाडू.
  • २००३मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५मध्ये पद्मश्री व २०१७मध्ये युथ स्पोर्ट्स आयकॉन ऑफ एक्सिलेन्स पुरस्काराने सन्मानित.


सिरिल रामफोसा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी

  • दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा भारताच्या २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
  • भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होणारे ते दक्षिण अफ्रिकेचे दुसरे नेते आहेत. यापूर्वी नेल्सन मंडेला १९९५मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झाले होते.
  • सिरिल रामफोसा अँटी-अपार्थीड नेते आणि महात्मा गांधींचे अनुयायी आहेत.
  • डिसेंबर २०१७मध्ये जेकब झुमा यांनी राजीनामा दिल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष झाले. ते २०१४ ते २०१८ दरम्यान उपराष्ट्राध्यक्षही होते.
  • एप्रिल २०१८मध्ये त्यांनी ‘गांधी वॉक’ नावाच्या कार्यक्रमात ५ हजार लोकांचे नेतृत्व केले होते.
  • दक्षिण आफ्रिका हे भारताचा महत्त्वपूर्ण सहकारी असून ब्रिक्सचा सदस्यही आहे.

पार्श्वभूमी
  • भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
  • सामान्यतः प्रजासत्ताक दिनाला सामरिकदृष्ट्या महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते.
  • ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियानच्या सदस्य देशांचे प्रमुख २०१८च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते.


कर्करोग संशोधनात सहकार्यासाठी भारत-युके सामंजस्य करार

  • कर्करोग संशोधनात सहकार्यासाठी भारत आणि युनायटेड किंग्डमने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
  • हा सामंजस्य करार पुढील ५ वर्षांसाठी कर्करोगावरील संशोधनासाठी करण्यात आला आहे.
  • या कराराअंतर्गत, बायोटेक्नोलॉजी आणि कर्करोग संशोधनासाठी यूके दरवर्षी ५ दशलक्ष पाउंड खर्च करेल. याशिवाय इतर संभाव्य निधी भागीदाराकडूनही गुंतवणूक मिळवेळ.
  • भारत आणि युकेमधील या कर्करोग संशोधनात, कर्करोगावरील औषधांची उच्च किंमत आणि कर्करोगास प्रतिबंध अशा काही मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
  • या संशोधांसाठी क्लिनिकल संशोधन, लोकसंख्याशास्त्रीय संशोधन, आधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व भौतिकशास्त्राचे विशेषज्ञ एकत्रितपणे कार्य करतील.
  • या सहकार्याने दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ कर्करोगाच्या स्वस्त उपचारांसाठी उपाय विकसित करतील.


जागतिक सीमाशुल्क संघटनेची प्रादेशिक बैठक जयपूरमध्ये

  • जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या प्रादेशिक बैठकीचे आयोजन जयपूरमध्ये (राजस्थान) करण्यात येत असून, आशियातील ३३ सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
  • या बैठकीत बांधकाम क्षमता, सीमाशुल्कामध्ये सुधारणा, डिजिटल सीमा शुल्क, क्योटो प्रोटोकॉल, ई-कॉमर्स इत्यादी मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
  • जागतिक सीमाशुल्क संघटनेचे उपसंचालक रिकार्डो त्राविनो आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एस. रमेश हे संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्ष असतील.

जागतिक सीमाशुल्क संघटना
  • ही एक एक स्वतंत्र आंतर-सरकारी संस्था आहे. तिचे मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये स्थित आहे.
  • या संस्थेची स्थापना १९५२मध्ये सीमाशुल्क सहकारी परिषद (कस्टम्स को-ऑपरेशन कौन्सिल) म्हणून झाली.
  • सदस्य देशांना सीमाशुल्क संबंधित कार्यात कुशलता आणण्यास मदत करणे या हा या संघटनेचा उद्देश आहे. यामुळे सदस्य देश राष्ट्रीय विकासाचे लक्ष्य प्राप्त करू शकतील.
  • याशिवाय आधुनिक सीमाशुल्क व्यवस्था आणि पद्धतींची अंमलबजावणी आणि त्यांचा प्रचार करणे, हेदेखील या संघटनेचे मुख्य कार्य आहे.
  • जागतिक सीमाशुल्क संघटनेमध्ये १००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय अधिकारी, तांत्रिक तज्ञ आणि इतर अधिकारी आहेत.
  • ही संस्था ६ विभागात विभागली गेली आहे. यातील प्रत्येक प्रदेशाचे प्रतिनिधित्व वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कौन्सिलमध्ये निवडण्यात आलेले उपाध्यक्ष करतात.


अरुणाचल प्रदेशातील २ पर्यटन सर्किट प्रकल्पांचे उद्घाटन

  • केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील २ उत्तर-पूर्वी पर्यटन सर्किट प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
  • या प्रकल्पांचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि राज्य पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी केले.

भालुकपोंग-बोम्दिला-तवांग प्रकल्प
  • या प्रकल्पाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मार्च २०१५मध्ये मंजूरी दिली होती. या प्रकल्पांतर्गत गृहनिर्माण, कॅफे, लास्ट मैल कनेक्टिव्हिटी, शौचालय बांधणी इत्यादी कार्ये करण्यात आली आहेत.
  • याव्यतिरिक्त जेमिथांग, बुमला खिंड, जंग, सोरंग मठ, ग्रितसंग त्सो सरोवर, त्सो सरोवर, लुमला, सेला सरोवर, लुम्पो, थिन्ग्बू आणि ग्रेंखा गरम पाण्याचे झरे या स्थळांवर विविध सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

नाफरा-सेप्पा-पाप्पू, पासा, पाक्के व्हॅलीज-सांगदुपोटा-नवे सागाली-जीरो-योम्चा प्रकल्प
  • या प्रकल्पाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने डिसेंबर २०१५मध्ये मंजूरी दिली होती.
  • या प्रकल्पांतर्गत हेलीपॅड, ट्रेकिंग मार्ग, लाग हट, क्राफ्ट बाजार, राफ्टींग केंद्र, इको पॉइंट, पर्यटन मदत केंद्र, पार्किंग, बहुउद्देशीय हॉल इत्यादी सुविधांचा विकास करण्यात आला आहे.

स्वदेश दर्शन योजना
  • देशात विषय (थीम) आधारित पर्यटन परिक्रमा (सर्किट) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन योजना’ ९ मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
  • या पर्यटन प्रकल्पांना एका एकात्मिक पद्धतीने उच्च पर्यटन मूल्य, स्पर्धात्मकता आणि स्थायित्व अश्या सिद्धांतांवर विकसित केले जाणार आहे.
  • देशाच्या पर्यटनासाठी पायाभूत घटकांचा विकास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहे.
  • या योजनेंतर्गत विकासासाठी सुरुवातीला पुढील १३ पर्यटन परिक्रमा प्रकल्प निवडण्यात आले आहेत: बुद्धिस्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
  • ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. या प्रकल्पांसाठी राज्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार निधी देण्यात येणार आहे.


युवा सहकार-कोऑपरेटिव्ह एंटरप्राइज सपोर्ट व नवकल्पना योजना

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी युवा सहकार-कोऑपरेटिव्ह एंटरप्राइज सपोर्ट व नवकल्पना योजना सुरू केली.
  • सहकारी व्यावसायिक उपक्रमांकडे तरुणांना आकर्षित करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • ही योजना नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कारपोरेशनद्वारे (NCDC) निर्मित १ हजार कोटी रुपयांच्या कोऑपरेटिव्ह स्टार्ट-अप अँड इनोवेशन फंडशी संबंधित आहे.
  • कोऑपरेटिव्हना नवीन क्षेत्रांत कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
  • या योजनेअंतर्गत ३ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्पांसाठी २ टक्के व्याजदरावर मुदत कर्ज (टर्म लोन) उपलब्ध करून देण्यात येईल. १ वर्षापासून कार्यरत असलेले सर्व कोऑपरेटिव्ह या कर्जासाठी पात्र असतील.
  • या योजनेअंतर्गत उत्तर-पूर्व भारत, एस्पिरेशनल डिस्ट्रीक्स आणि महिला, अनुसूचित जाती व जमातीच्या सदस्यांना अधिक इंसेंटीव्ह (प्रोत्साहन निधी) देण्यात येईल.


सिद्धार्थ तिवारी बीआयएसच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रतिनिधी

  • बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने (बीआयएस) आशिया-पॅसिफिक विभागाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ तिवारी यांना नियुक्त केले आहे. ते एली रेमोलोना यांची जागा घेतील.
  • ते बीआयएस आणि आशिया व पॅसिफिक विभागातील मध्यवर्ती बँकांमधील परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी कार्य करतील.
  • ते मध्यवर्ती बँकांसोबत विविध विषयांवर समन्वय वाढविण्याचे कार्य करतील. यामुळे आर्थिक स्थिरतेला चालना मिळेल.

बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस)
  • बीआयएस ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे, या बँकेचे नियंत्रण मध्यवर्ती बँकांद्वारे केले जाते. मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून ही संस्था कार्य करते.
  • या बँकेची स्थापना १७ मे १९३० रोजी करण्यात आली. तिचे मुख्यालय बेसल (स्वित्झर्लंड) येथे स्थित आहे. सध्या जगातील ६० मध्यवर्ती बँका बीआयएसच्या सदस्य आहेत.
  • ही बँक मध्यवर्ती बँका व काही आंतरराष्ट्रीय संस्थांना बँकिंग सेवाही प्रदान करते.


नागपूर, वर्धा व बुलढाणा जिल्हा बँका होणार राज्य सहकारी बँकेत विलीन

  • डबघाईला आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
  • देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यातील बैठकीत या विलिनीकरणावर शिक्काबोर्तब करण्यात आले.
  • त्यानुसार या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया राज्य बँकेने सुरू केली असून यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या मान्यतेने येत्या ३ महिन्यांत ही विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी
  • राज्यातील ३१ जिल्हा सहकारी बँकांपैकी १४ बँका आर्थिक अडचणीत आहेत. सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी या बँकांची स्थिती नाजूक आहे. तर वर्धा, नागपूर व बुलढाणा या जिल्हा बँका डबघाईस आल्या आहेत.
  • सत्तांतरानंतर या बँकांना वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मदत केली.
  • मात्र थकबाकी वसुलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँका सावरू शकलेल्या नाहीत. ग्राहकांचाही या बँकावरील विश्वास उडाल्यामुळे लोकांनी पाठ फिरविली आहे.


देशातील पहिले बटन असलेले क्रेडिट कार्ड लॉन्च

  • इंडसइंड बँकेने भारतातील पहिले बटन असलेले इंटरॅक्टीव्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डचे नाव इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड असे आहे.
  • हे कार्ड अमेरिकेतील पिट्सबर्गस्थित डायनामिक्स कंपनीद्वारे उत्पादित केले गेले आहेत. ही कंपनी बॅटरीवर चालणारे इंटेलीजंट पेमेंट कार्ड तयार करते.
  • या कार्डच्या सहाय्याने ग्राहकांना पॉइंट ऑफ सेलवर पेमेंट करण्यासाठी पुढील ३ प्रकारचे पर्याय उपलब्ध होतील.
  • १. क्रेडिट, २. ट्रान्झॅक्शनला ईएमआयमध्ये (६, १२, १८ आणि २४ महिन्यांच्या) कन्व्हर्ट करणे, ३. रिवॉर्ड पॉईंट्सचा वापर करणे.
  • यासाठी ग्राहकाला फक्त कार्डवरील बटण दाबावे लागेल. या ३ पर्यायांसाठी एलईडी लाइट्सचा वापर केला गेला आहे.


दिल्ली पोलिसांसाठी ई-लर्निंग पोर्टल ‘निपुण’ सुरू

  • दिल्ली पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ई-लर्निंग पोर्टल ‘निपुण’ सुरू केले. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध होईल.
  • कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. यासाठी विशेष अभ्यासक्रम काही तज्ञांनी डिझाइन केले आहेत.
  • या पोर्टलवर उपलब्ध असलेले अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग, फिक्की, एनएचआरसी, एनसीपीसीआर आणि जानकी देवी मेमोरियल कॉलेज यांनी CLAP प्रकल्पांतर्गत तयार केले आहेत.
  • दिल्ली लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीने काही विशेष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी दिल्ली पोलिसांना मदत करण्यास सहमती दर्शविली आहे.
  • या पोर्टलवर कायदा, स्थायी आदेश, चौकशी चेकलिस्ट, केस फाइलसाठी अर्ज, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निर्णय उपलब्ध असतील.
  • हे अभ्यासक्रम अन्वेषण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनादेखील उपयुक्त ठरतील. दिल्ली पोलीस अधिकारी लॉग इन करून या पोर्टलचा वापर करू शकतात.
  • हे अभ्यासक्रम कधीही कुठेही बघता येऊ शकतात. यामुळे पोलिस सहजतेने त्यांच्या कौशल्यामध्ये वृद्धी करू शकतात आणि त्यांच्या दैनंदिन कार्यशैलीमध्ये समन्वय स्थापित करू शकतात.


१२ नोव्हेंबर: सार्वजनिक सेवा प्रसारण दिन

  • देशभरात प्रतिवर्षी १२ नोव्हेंबरला ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ पाळला जातो.
  • १९४७मध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी ‘ऑल इंडिया रेडियो (दिल्ली)च्या स्टुडिओला पहिली आणि शेवटची भेट दिली होती. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिन पाळला जातो.
  • राष्ट्रीय प्रसारण दिन (National Broadcasting Day) भारतात दरवर्षी २३ जुलैला पाळला जातो.
  • १९२७मध्ये २३ जुलैला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने बॉम्बे स्टेशनवरून रेडियो प्रसारण सुरू केले होते. १९३६मध्ये याचे नाव बदलून ‘ऑल इंडिया रेडियो’ केले गेले आणि १९५७पासून ते ‘आकाशवाणी’च्या नावाने ओळखले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा