चालू घडामोडी : २० नोव्हेंबर

इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची घोषणा

  • दिल्लीस्थित थिंक टँक विज्ञान आणि पर्यावरण केंद्राला इंदिरा गांधी शांती, निरस्त्रीकरण व विकास पुरस्कार २०१८ने सन्मानित केले जाणार आहे.
  • या केंद्राला हा पुरस्कार पर्यावरण शिक्षण व सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानासाठी देण्यात येत आहे.
  • विज्ञान आणि पर्यावरण केंद्र पर्यावरण सुरक्षिततेसाठी जनजागृती करण्यात यशस्वी ठरले आहे.
  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्यूरीने या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी या केंद्राची निवड केली आहे.
विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE)
  • ही एक ना-नफा तत्वावर सार्वजनिक हितासाठी कार्य करणारी नवी दिल्ली स्थित संशोधन संस्था आहे.
  • या संस्थेची स्थापना १९९०मध्ये अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झाली.
  • ही संस्था भारतात पर्यावरण संबंधी मुद्दे, हवामानातील बदल व धोरण निर्मिती इत्यादीसाठी भारतात कार्य करते.
  • ही संस्था मुख्यत्वे या पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरुकता पसरविण्याचा प्रयत्न करते.
मनमोहन सिंग यांना २०१७साठीचा पुरस्कार
  • २०१७ या वर्षासाठीचा हा पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देण्यात आला. ते २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १३वे पंतप्रधान होते.
  • देशाच्या आर्थिक व सामाजिक विकास आणि शेजारील राष्ट्रांशी भारताचे चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • नामांकित अर्थशास्त्रज्ञ असलेले सिंग यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणूनही कार्य केले आहे.
इंदिरा गांधी शांती, निरस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार
  • हा पुरस्कार इंदिरा गांधी ट्रस्टतर्फे १९८६पासून प्रदान केला जातो. या पुरस्काराचे नाव देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर ठेवण्यात आले आहे.
  • प्रशस्तीपत्र, चषक आणि २५ लाख रुपये हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणाऱ्या लोकांना किंवा संस्थांना दिला जातो.
  • यापूर्वी हा पुरस्कार यूनिसेफ (१९८९), राजीव गांधी (१९९१), एम. एस. स्वामीनाथन (१९९९), कोफी अन्नान (२००३), अँजेला मर्केल (२०१३), इस्रो (२०१४), संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायुक्त (२०१५) यांना प्रदान करण्यात आला आहे.

न्या. ए. पी. साही पटना उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

  • न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप साही यांची पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी न्या. साही यांना शपथ दिली. यापूर्वी न्या. साही अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
  • न्या. साही हे न्या. न्या. मुकेश कुमार शाह यांची जागा घेतील. न्या. शाह यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
  • भारताच्या राज्यघटनेत कलम २१४अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
  • उच्च न्यायालयात १ मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेले संख्येनुसार इतर न्यायाधीश असतात.
  • उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. 
  • सध्या देशात २४ उच्च न्यायालये कार्यरत आहेत. तर २५व्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या स्थापनेला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
  • महाराष्ट्रचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची नागपूर, औरंगाबाद आणि पणजी (गोवा) अशी ३ खंडपीठे आहेत.

धम्म चक्का असलेले बोधचिन्ह आंध्रप्रदेशचे नवे राज्यचिन्ह

  • आंध्रप्रदेश राज्य सरकारने २०१४मध्ये राज्य विभाजीत झाल्यापासून सुमारे ५ वर्षांनी अधिकृत वापरासाठी राज्यचिन्हाचा स्वीकार केला आहे.
  • ‘धम्म चक्का’ किंवा ‘द व्हील ऑफ लॉ’ चित्रित असलेले बोधचिन्ह आंध्रप्रदेशचे राज्यचिन्ह म्हणून निश्चित केले आहे.
  • हे बोधचिन्ह अमरावती स्कूल ऑफ आर्टकडून प्रेरित आहे. यामध्ये हिरव्या, लाल आणि पिवळा रंगांचा वापर केला आहे.
  • या चिन्हात ‘धम्म चक्का’ (पाली भाषेत) म्हणजेच ‘धर्म चक्र’ (संस्कृत भाषेत) याने सर्वाधिक जागा व्यापलेली आहे.
  • याशिवाय, यामध्ये राष्ट्रीय चिन्हालादेखील राज्य चिन्हाखाली स्थान देण्यात आले आहे. सोबतच त्यात त्रिरत्नाचे वलय, पाईन वृक्षाची पाने आणि मौल्यवान रत्ने चित्रित आहेत.
  • २०१४मध्ये आंध्रप्रदेश पुनर्गठन कायदा २०१४च्या (तेलंगाना कायदा) तरतुदींनुसार आंध्रप्रदेश राज्य तेलंगाना आणि शेष आंध्रप्रदेश राज्यात विभागले गेले होते.
  • या कायद्याने दोन्ही राज्यांच्या सीमा निर्धारित केल्या व हैदराबादला नव्या तेलंगाना राज्याची कायमस्वरूपी राजधानी आणि आंध्रप्रदेशची तात्पुरती राजधानी म्हणून निश्चित केले.
  • राज्य निर्मितीपासून १० वर्ष हैद्राबाद हीच दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असेल. गुंटूर जिल्ह्यातील अमरावती येथे आंध्रप्रदेशची नियोजित राजधानी विकसित होत आहे.
आंध्रप्रदेशची इतर राज्य प्रतीके
  • राज्य प्राणी: काळे हरीण (ब्लॅक बक किंवा कृष्णा जिंका)
  • राज्य वृक्ष: कडूनिंब
  • राज्य पक्षी: रोझ रिंग्ड पॅराकीट
  • राज्य फुल: चमेली (विभाजनापूर्वी वॉटर लिली)
राष्ट्रीय चिन्ह (राजमुद्रा)
  • भारताचे राष्ट्रीय चिन्ह (राजमुद्रा) सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.
  • त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले ४ सिंह आहेत. समोरून बघितल्यावर ३ सिंह दिसत असल्यामुळे चिन्हात तीनच सिंह दाखवले जातात.
  • त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा (वेगाचे प्रतिक) व उजव्या बाजूस बैल (कष्टाचे प्रतिक) आहे.
  • गोलाकार चक्राच्या खाली देवनागरी लिपीत 'सत्यमेव जयते' (English: Truth Alone Triumph) हे वाक्य कोरले आहे. हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे.
  • हे चिन्ह भारतीय कामकाजाच्या सरकारी कागदपत्रांवर शिक्क्याच्या रुपात वापरले जाते, त्याचप्रमाणे भारतीय नोटांवरही हे चिन्ह वापरतात. अशोक चक्र हे भारताच्या ध्वजावर रेखाटलेले आहे.

जलज श्रीवास्तव भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष

  • १९८४च्या बॅचचे आयएएस अधिकारी जलज श्रीवास्तव यांची भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.
  • यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली महानगरपालिकेचे अध्यक्ष व दिल्ली सरकारमध्ये व्हॅट विभागाचे मुख्य सचिव म्हणून काम केले होते.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण
  • इंग्रजी: Inland Waterways Authority of India (IWAI)
  • स्थापना: २७ ऑक्टोबर १९८६
  • मुख्यालय: नोएडा (उत्तर प्रदेश)
  • आयडब्ल्यूएआय देशांतर्गत जल वाहतूक विकास आणि नियमन करण्यासाठी नोडल संस्था आहे.
  • या प्राधिकरणाचे मुख्य कार्य अंतर्देशीय जलमार्ग परिवहनासाठी आवश्यक आधारभूत रूपरेखा तयार करणे आहे.

१९ नोव्हेंबर: जागतिक शौचालय दिन

  • १९ नोव्हेंबरला जगभरात जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो. लोकांना शौचालयांचा वापर करण्यासाठी जागरूक करणे, हा जागतिक शौचालयाचा दिनाचा उद्देश आहे.
  • अजूनही जगभरात ८९२ दशलक्ष लोक उघड्यावर शौचाला जावे लागते. जगातील सर्व लोकांसाठी सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्यांचा भाग आहे.
  • यावर्षीच्या जागतिक शौचालय दिनाची मुख्य संकल्पना ‘नेचर बेस्ड सोल्युशन्स’ आहे आणि घोषवाक्य ‘व्हेन नेचर कॉल्स’ हे आहे.
  • जागतिक शौचालय दिनाची (वर्ल्ड टॉयलेट डे) स्थापना २००१मध्ये जागतिक शौचालय संघटनेने केली होती.
  • १२ वर्षानंतर २०१३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने याला अधिकृत संयुक्त राष्ट्र जागतिक शौचालय दिन घोषित केले. याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या जल संघटनेने सादर केला होता.
  • जागतिक शौचालय संघटना आंतरराष्ट्रीय गैर-लाभकारी संस्था आहे. ती जगभरात स्वच्छता आणि शौचालयाची स्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहे.

वज्र प्रहार: भारत-अमेरिका संयुक्त सैन्य अभ्यास

  • भारत आणि अमेरिकेदरम्यान ‘वज्र प्रहार’ या संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन राजस्थानमधील बिकानेर येथील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये सुरु झाला.
  • हा सैन्य अभ्यासात दोन्ही देशांचे विशेष दल सहभागी होत असून, याचा उद्देश दहशतवादविरोधी ऑपरेशनचा अभ्यास करणे हा आहे.
  • या युद्धसरावात अमेरिकन सैन्याचे प्रतिनिधित्व अमेरिकन पॅसिफिक कमांडच्या स्पेशल फोर्स ग्रुपद्वारे केले जात आहे.
  • या अभ्यासात १२ दिवस वाळवंटी आणि ग्रामीण भागात प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये आंतर-कार्यक्षमता आणि सहकार्य वाढेल.
  • या अभ्यासात दोन्ही देशांचे सैनिक बंधकांना सोडविणे, वाळवंटाच्या परिस्थितीचा करणे आणि युद्धात गोळीबार करण्याचे प्रशिक्षण घेतील.

अंकिता आणि करमनला तैपेई ओईसी ओपन स्पर्धेचे विजेतेपद

  • भारताच्या अंकिता रैनाने आणि करमन कौरने तैपेई ओईसी ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यांना बक्षिसस्वरूप ५,५०० डॉलर्स आणि १६० गुण मिळाले.
  • अंतिम सामन्यात अंकिता आणि करमनने रशियाच्या ओल्गा दोरोशिना आणि नातेला द्जालामिद्जे यांना ६-३, ५-७, १२-१२ असे पराभूत केले.
  • या स्पर्धेचे महिला एकेरीचे जेतेपद थायलंडच्या लुकसिका कुम्खुमने मिळविले.
  • तैपेई ओपन ही महिला व्यावसायिक खेळाडूंसाठी असलेली टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा इनडोर कार्पेट कोर्टवर खेळली जाते.
  • या स्पर्धेचे आयोजन तैवानमधील तैपेई शहरात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात केले जाते.

अलेक्झांडर जवेरेवला एटीपी स्पर्धा २०१८चे विजेतेपद

  • जर्मनीचा युवा टेनिसपटू अलेक्झांडर जवेरेवने सर्बियाच्या नोवाक जोकोविचला पराभूत करत एटीपी स्पर्धा २०१८चे विजेतेपद जिंकले.
  • अंतिम सामन्यात जवेरेवने जोकोव्हिकवर ६-४, ६-३ अशी मात करत ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली.
  • ही स्पर्धा जिंकणारा गेल्या १० वर्षांच्या इतिहासातील जवेरेव हा सर्वात तरूण टेनिसपटू आहे.
  • १९९५साली जर्मनीच्या बोरीस बेकरने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा जवेरेव हा जर्मनीचा दुसरा टेनिसपटू आहे.
अलेक्झांडर जवेरेव
  • अलेक्झांडर जवेरेवचा जन्म २० एप्रिल १९९७ रोजी जर्मनीमध्ये झाला. माजी रशियन टेनिस खेळाडू अलेक्झांडर जवेरेव सिनियर यांचा तो पुत्र आहे.
  • मे २०१७मध्ये त्याने इटालियन ओपनमध्ये नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. तर २०१७मध्ये कॅनडा मास्टर्समध्ये त्याने रॉजर फेडररला पराभूत केले होते.
  • ऑक्टोबर २०१३ ते जून २०१४ तो जगातील क्रमांक एकचा जूनियर खेळाडू होता. २०१३च्या जूनियर फ्रेंच ओपनचा तो उपविजेता होता. यानंतर त्याने २०१४मध्ये जूनियर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा