चालू घडामोडी : २३ नोव्हेंबर

करतारपूर साहिब कॉरिडोरला मंत्रिमंडळाची मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने करतारपूर साहिब कॉरिडोर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
  • केंद्र सरकार गुरुदासपूर जिल्ह्यातून पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडोरचे निर्माण करणार आहे.
  • गुरूनानक देव यांच्या ५५०व्या जयंतीच्या निमित्ताने हा कॉरीडॉर बांधण्यात येणार आहे. २०१९मध्ये गुरुनानक देव यांची ५५०वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.
  • या निर्णयामुळे भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून वाहत येणाऱ्या रावी नदीच्या किनारी असलेल्या गुरुद्वारा करतारपूर साहिब जाण्याची सुविधा मिळणार आहे. कर्तारपूर साहिब हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल येथे स्थित आहे.
  • करतारपूर साहिब शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांचे निवासस्थान आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील सुमारे १७ वर्षे येथे व्यतीत केली होती. त्यामुळेच शिखांसाठी हे श्रद्धास्थान आहे.
  • पाकिस्ताननेही आपल्या हद्दीत हा कॉरिडोर विकसित करण्याचे काम सुरू करण्याचे जाहीर केले असून,२०१९पर्यंत हा कॉरिडोर पूर्ण होणार आहे.

इतर मागासवर्गीय आयोगाचा कार्यकाळ वाढवण्यास मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर मागास वर्गांच्या उपवर्गीकरणासाठी तयार केलेल्या आयोगाचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली.
  • आता या आयोगाचा कार्यकाळ ३१ मे २०१९पर्यंत असेल. या आयोगाला देण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे.
  • ऑक्टोबर २०१७मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर संविधानाच्या कलम ३४० अंतर्गत या ५ सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.
  • दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी या आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
  • या आयोगाच्या अहवालाद्वारे ओबीसी श्रेणीतील अत्यंत मागासवर्गीय वर्गांना सब-कोटा प्रदान केला जाऊ शकतो.
  • हा आयोग शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी वर्गातील असमानतांचा अभ्यास करेल. यानंतर ओबीसी श्रेणीचे उपवर्गीकरण केले जाईल.
  • याच आयोगाद्वारे उपवर्गीकरणाचे प्रमाण, नियम आणि इतर मापदंड निश्चित केले जाणार आहेत.
  • २०१५मध्ये मागासवर्गीय आयोगाने ओबीसी वर्गातील मागासलेल्या वर्गांसाठी उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. सध्या देशातील ११ राज्यांनी राज्य सेवांसाठी ओबीसी वर्गाचे उप-वर्गीकरण केले आहे.
  • संविधानाच्या कलम ३४० अंतर्गत १९७९मध्ये मंडल आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाने शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी उच्च शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती.

अजयभूषण पांडे यांची महसूल सचिवपदी नियुक्ती

  • १९८४च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी अजयभूषण पांडे यांची केंद्र शासनात महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जळगावचे जिल्हाधिकारी, महावितरण कंपनीचे व्यवस्थापैकीय संचालक या पदांवरील त्यांची कारकीर्द प्रशंसनीय कामामुळे गाजली होती. 
  • जळगावचे जिल्हाधिकारी असताना नगरपालिकेत चाललेला गैरव्यवहारांना त्यांनी चाप लावला होता. अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई पांडे यांनी केली होती.
  • मूळचे बिहारचे असलेल्या पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि अमेरिकेतील नामवंत विद्यापीठातून एमएस आणि डॉक्टरेट पदवी मिळविली आहे.
  • वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर या विभागाशी संबंधित कंपनीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ज्यूट पॅकेजिंग मटेरियल कायद्यात बदल

  • आर्थिक व्यवहारांच्या केंद्रीय समितीने ज्यूट (ताग) पॅकेजिंग मटेरियल अधिनियम १९८७च्या अंतर्गत आवश्यक नियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या समितीने १०० अन्नपदार्थ आणि २० टक्के साखर विविध प्रकारच्या ज्यूट बॅगमध्ये पॅक करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयामुळे ज्यूट क्षेत्राला फायदा होईल व ज्यूट उद्योगातील विविधीकरणास चालना मिळेल.
  • यामुळे ज्यूटची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारेल. तसेच ज्यूट उत्पादनांच्या मागणीमध्ये वाढ होईल.
  • यामुळे प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, आंध्रप्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा येथील शेतकऱ्यांना लाभ होईल.
ज्यूट (ताग)
  • कापसानंतर शेती आणि वापराच्या दृष्टीने ताग हे अत्यंत महत्वाचे तंतुमय वनस्पती आहे. त्याची लागवड हवामान, हंगाम आणि मातीवर अवलंबून असते. 
  • जगातील एकूण तागाच्या उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन गंगेच्या त्रिभुज प्रदेशात घेतले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे. जगातील ६० टक्के तागाचे उत्पादन एकटा भारत करतो.
  • भारताखालोखाल ताग उत्पादनात बांगलादेश आणि चीन या देशांचा क्रमांक लागतो.
  • पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि ओडिशा ही भारतातील प्रमुख ताग उत्पादक राज्य आहेत.
  • देशभरात सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह तागाच्या शेतीवर अवलंबून आहे.
  • भारतात ज्यूट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर सरकारी खरेदीवर अवलंबून आहे. सरकार दरवर्षी ६,५०० कोटी रुपयांच्या ज्यूट उत्पादनांची खरेदी करते.
  • सरकारकडून ज्यूटच्या प्रचारामुळे त्याच्या मागणीत वाढ होईल, ज्याचा थेट परिणाम ज्यूट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.

यूएनईपी कार्यकारी संचालक पदी जोयस मसुया

  • जोयस मसुया यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) हंगामी कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सध्याचे कार्यकारी संचालक एरिक सोलहेईम यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर जोयस यांची नियुक्ती झाली आहे.
  • एरिक सोलहेईम यांच्यावर अनावश्यक दौऱ्यांवर अधिक वेळ आणि पैसे खर्च केल्याच्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
  • संयुक्त राष्ट्रांच्या तपासणीमध्ये एरिक यांनी अनावश्यक ५ लाख डॉलर्स प्रवासखर्च केल्याची माहिती समोर आली होती.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
  • यूएनईपी: युनायटेड नेशन्स एन्वायरनमेंट प्रोग्राम
  • स्थापना: ५ जून १९७२
  • मुख्यालय: नैरोबी (केनिया)
  • यूएनईपी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे नियंत्रण व अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
  • जून १९७२मध्ये यूएनईपीची स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव पर्यावरण परिषदेच्या (स्टॉकहोम परिषद) परिणामस्वरूप झाली होती.
  • या संस्थेचे मुख्यालय नैरोबी येथे असून, ६ सहा इतर देशांमध्ये प्रादेशिक कार्यालये देखील आहेत. 
  • यूएनईपी मुख्यतः पर्यावरणीय शिक्षण, शाश्वत विकासाठी पर्यावरणाचा सदुपयोग करण्यावर भर देणे, पर्यावरण संवर्धन इत्यादी कार्ये करते.

व्हॉट्सॲपच्या भारतातील प्रमुखपदी अभिजीत बोस

  • इन्स्टंट मेसेजिंग सेवा देणारी कंपनी व्हॉट्सॲपच्या भारतातील प्रमुखपदी अभिजीत बोस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • गेल्या काही दिवसात व्हॉट्सॲपवरील खोट्या बातम्यांच्या प्रसाराबद्दल बरेच विवाद झाले होते. यामुळे काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंगची घटनाही घडली होती.
  • यामुळे व्हॉट्सॲपने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी संदेश फॉरवर्ड करण्याच्या सुविधेवर मर्यादा आणल्या होत्या.
  • व्हॉट्सॲपची स्थापना २४ फेब्रुवारी २००९ रोजी जैन कूम आणि ब्रायन ॲक्टन यांनी केली होती. फेब्रुवारी २०१४मध्ये फेसबुकने व्हॉट्सॲपला १९ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले.

२३ नोव्हेंबर: गुरुनानक देव जयंती

  • २३ नोव्हेंबर २०१८ रोजी गुरुनानक देव यांची ५४९वी जयंती साजरी केली जात आहे. ते शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे प्रथम गुरु होते.
  • त्यांचा जन्म पंजाबमधील ननकाना साहिब येथे झाला. शीख धर्माचे धार्मिक पुस्तक गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांची शिकवण संकलित करण्यात आली आहे.
  • २२ सप्टेंबर १५३९ रोजी पाकिस्तानमधील करतारपूर येथे त्यांचे निधन झाले.
गुरु नानक देव यांची ५५०वी जयंती
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीच्या उत्सवासाठी राष्ट्रीय अंमलबजावणी समितीची स्थापना केली आहे.
  • ही समिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्य सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा या समितीचे सदस्य आहेत.
  • केंद्र सरकारने गुरु नानक देव यांची ५५०वी जयंती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचे ठरविले आहे.
  • या उत्सवात अनेक प्रकारचे धार्मिक व शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापक समिती नॉलेज पार्टनर असेल.
  • याशिवाय केंद्र सरकार पंजाबमधील सुलतानपुर लोधी या स्थळाला स्मार्ट सिटी म्हणू विकसित करणार आहे.
  • या ठिकाणी गुरु नानक देव यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ व्यतीत केला होता. या शहराला ‘पिंड बाबे नानक दा’ या नावानेही ओळखले जाते.
  • या ठिकाणी एक उच्च क्षमतेची दुर्बीण स्थापित करण्यात येणार असून, त्याद्वारे पाकिस्तानातील करतारपूर साहिब ठिकाण बघता येऊ शकेल. गुरू नानक देव यांनी अखेरचा काळ करतारपूर साहिबमध्ये व्यतीत केला होता.
  • अमृतसरमध्ये गुरुनानक युनिव्हर्सिटी बनविण्यात येणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयही गुरुनानक देव यांच्याशी संबंधित स्थानकांवर विशेष ट्रेन चालवणार आहे.
  • या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालय आणि पोस्टल विभाग गुरू नानक देव यांच्या स्मरणार्थ नाणी व पोस्टल स्टॅम्प देखील प्रकाशित करणार आहे.

२१ नोव्हेंबर: जागतिक मत्स्यपालन दिन

  • जगभरात २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मत्स्यपालन दिन म्हणून साजरा केला जातो.
  • मत्स्यपालनाशी संबंधित लोकांची आजीविका (उदरनिर्वाह) आणि महासागर पर्यावरणाच्या सुरक्षा सुनिश्चित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.
  • या दिवशी जगभरात सेमिनार, कार्यशाळा, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शन इत्यादींचे आयोजन केले जाते.
भारतातील मत्स्यपालन व्यवसाय
  • मत्स्य उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यामुळे देशभरात लाखो लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि देशातील अन्न सुरक्षादेखील सुनिश्चित होते.
  • भारताची सुमारे ७,५१६ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि यापैकी २ दशलक्ष किमी क्षेत्र विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये (जीडीपी) मत्स्य उद्योगाचा वाटा सुमारे १.०७ टक्के आहे.
  • आंतर्देशीय मत्स्यउत्पादन भारतातील मत्स्य व्यवसायाचा महत्वाचा भाग आहे. यात प्रामुख्याने नद्या, तळी, सरोवर, तलाव इत्यादींमध्ये मत्स्य व्यवसाय केले जातो.
  • १९५०मध्ये भारतातील आंतर्देशीय मत्स्य उत्पादन १.९२ लाख टन होते. २००७मध्ये ते ७.८२ लाख टनांपर्यंत वाढले होते.

निधन: भाषाशास्त्रज्ञ डॉ. प्रमोदचंद्र भट्टाचार्य

  • आसाममधील संस्कृती आणि भाषेचे गाढे अभ्यासक आणि विद्वान भाषाशास्त्रज्ञ डॉ. प्रमोदचंद्र भट्टाचार्य यांचे १२ नोव्हेंबर रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले.
  • भट्टाचार्य यांनी चिनी-तिबेटी भाषांचा सखोल अभ्यास करून या भाषांचा देशातील इंडो-आर्यन व ईशान्य भारतातील भाषांवर झालेला परिणाम तपासून पाहिला.
  • आसामच्या बोडो भाषेचे संशोधन त्यांनी केले. त्यासाठी त्यांना १९६५मध्ये गुवाहाटी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली.
  • त्यांच्या प्रयत्नातून बोडो भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समावेश झाला.
  • बोडो फोक साँग अँड टेल्स (१९५७) व धिस इज आसाम (१९५८ सहलेखक बी. एन. शास्त्री) ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.
  • आसामी भाषेतही त्यांनी विपुल लेखन केले. भाषा व भाषाशास्त्रातील विषयांवर त्यांनी २० पुस्तिका लिहिल्या.
  • पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया व शिलाँगच्या नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल इंडिया कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च या संस्थेचे ते सदस्य होते.
  • त्यांनी वेगवेगळ्या आदिवासी भाषांचा अभ्यास करताना नॉर्थ ईस्टर्न लँग्वेज सोसायटीची स्थापना १९८०मध्ये केली.
  • १९८१मध्ये त्यांनी लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ आसाम ही आणखी एक संस्था स्थापन केली. इन्स्टिट्यूट ऑफ नॉर्थ ईस्टर्न लँग्वेजेस या संस्थेचे ते संचालक होते.
  • ईशान्य भारतातील लोकसंस्कृतीच्या दस्तावेजीकरणाचे मोठे कामही त्यांनी केले, अन्यथा हा लोकसंस्कृतीचा वारसा काळाच्या ओघात नष्ट झाला असता.
  • त्यांच्या अभ्यासातूनच बोडो भाषेला शिक्षणक्रमात स्थान मिळाले व आता पदवीसाठी त्या भाषेचा आधुनिक भारतीय भाषा म्हणून समावेश झाला आहे.
  • ते लोकसाहित्यकार व शिक्षणतज्ज्ञही होते. बी बरुआ कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले होते. त्याआधी ते आसामी भाषा शिकवीत होते.
  • आसाम साहित्य सभेने त्यांना ‘साहित्याचार्य’ सन्मान देऊन गौरवले. डॉ. लीला गोगोई पुरस्कार, डॉ. कृष्णा कांत हांडिक पुरस्कार, उपेंद्रनाथ ब्रह्मा पुरस्कार, कालिचरण शर्मा पुरस्कार असे अनेक मान-सन्मान त्यांना लाभले.

निधन: पाकिस्तानी लेखिका, शायरा फहमीदा रियाज

  • पाकिस्तानच्या प्रसिद्ध उर्दू लेखिका, शायरा फहमीदा रियाज यांचे दीर्घ आजाराने २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.
  • त्या साहित्यिक जगात त्यांच्या स्त्रीवादी व क्रांतिकारी विचारधारांसाठी ओळखल्या जात होत्या. पाकिस्तानमध्ये त्या मानवी हक्कांसाठी देखील सक्रिय होत्या.
  • साहित्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्या जगासमोर आणणाऱ्या काही विशेष लेखकांपैकी फहमीदा आहेत.
  • पाकिस्तानमध्ये लष्करचे हुकुमशाह जिया-उल-हक यांची सत्ता असताना त्या सहा वर्षे भारतात निर्वासित म्हणून राहिल्या होत्या.
  • त्यांचा जन्म २८ जुलै १९४५ रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झाला. त्या सुप्रसिद्ध प्रगतिशील उर्दू लेखक, कवी, मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या.
  • त्यांना उर्दू, सिंधी आणि फारसी या भाषा ज्ञात होते. त्यांचे पहिले पुस्तक ‘स्टोन ऑफ जुबन’ १९६७मध्ये प्रकाशित झाले.
  • धूप, पूरा चांद, आदमी की जिंदगी या त्यांच्या काही कविता आहेत. तर जिंदा बहर, गोदवरी और करांची या त्यांच्या प्रसिध्द कादंबऱ्या आहेत.
  • अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी रेडिओ पाकिस्तानमध्ये न्यूजकास्टर म्हणून काम केले.
  • १९८८मध्ये त्यांना पीपीपी सरकारमध्ये पाकिस्तानच्या नॅशनल बुक कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • बेनझीर भुत्तोंच्या दुसऱ्या कार्यकाळात त्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित होत्या. २००९मध्ये त्यांना उर्दू डिक्शनरी बोर्डचे मुख्य संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा