चालू घडामोडी : ०३ नोव्हेंबर

सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशांची नियुक्ती

  • न्या. हेमंत गुप्ता, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. मुकेश कुमार रसिकभाई शाह आणि न्या. अजय रस्तोगी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. या सर्वांना सरन्यायाधीश रंजन गोगोई शपथ दिली.
  • राज्यघटनेच्या कलम १२४नुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चौघांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या शिफारशीनुसार केली.
  • या कॉलेजियममध्ये सरन्यायधीश रंजन गोगोई, न्या. मदन लोकुर, न्या. कुरियन जोसेफ, न्या. ए. के. सिकरी आणि न्या. एस.ए. बोबडे यांच्या समावेश आहे.
  • या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या २८ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कमाल संख्या ३१ आहे.
  • या नियुक्तीपूर्वी न्या. गुप्ता मध्यप्रदेश, न्या. रेड्डी गुजरात, न्या. शाह पटना आणि न्या. रस्तोगी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

पार्कर सोलर प्रोब: सूर्याच्या सर्वात जवळ जाणारे अंतरिक्षयान

  • नासाद्वारे सूर्य आणि त्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले अंतराळयान पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वात जवळ जाणारे पहिले मानव निर्मित अंतरिक्षयान ठरले आहे.
  • या यानाने सूर्यापासून ४.३ कोटी किमी अंतरावर पोहचण्याचा यापूर्वीचा विक्रम मोडला असून, यापूर्वी हा विक्रम जर्मन-अमेरिकन अंतरिक्षयान हिलियस-२च्या नावावर होता.
पार्कर सोलर प्रोब
  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने १.५ अब्ज डॉलर्स खर्च करून तयार केलेले हे मानवरहित अंतरिक्षयान १३ ऑगस्ट २०१८ रोजी अवकाशात प्रक्षेपित केले.
  • सौरमालेतील कोणकोणत्या गोष्टींचा पृथ्वीवर प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडण्यात आले आहे.
  • हे यान ७ वर्षे सूर्याभोवती फिरता-फिरता सूर्याचा अभ्यास करणार आहे. सौर वादळे निर्माण होण्याच्या कारणांचा अभ्यासदेखील हे यान करणार आहे.
  • हे यान १० लाख डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या सूर्याच्या कोरोनाच्या जवळ जाणार आहे.
  • कोरोनाचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे हा नासाच्या या अभियानाचा एक उद्देश आहे.
  • पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या अत्यंत जवळ म्हणजेच सुमारे ६१.६३ लाख किमी अंतरावर जाणार आहे. २०२४पर्यंत हे यान तेथे पोहचेल असा अंदाज आहे.
  • या संपूर्ण मोहिमेदरम्यान ते सूर्याला २४ प्रदक्षिणा घालणार आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये पार्कर शुक्र ग्रहापासून २,४१४ किलोमीटर अंतरावरुन गेले होते.
  • या अंतराळयानाचे भौतिकशास्त्रज्ञ युजीन न्यूमॅन पार्कर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ताऱ्यांमधून ऊर्जा प्रसारित करण्याच्या अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या. नासाचे एखाद्या मोहिमेला जीवित व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रेल्वेची अनारक्षित मोबाईल तिकिट सुविधा सुरु

  • केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित मोबाईल तिकिट सुविधा (यूटीएस: अनरिजर्व्ड टिकटिंग सिस्टम) सुरू केली आहे.
  • या सेवेमुळे प्रवासी यूटीएस मोबाईल अॅपद्वारे त्याच्या मोबाईलवर तिकीट बुक करू शकतात. त्यामुळे प्रवाशांना तिकीटांसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही.
  • या अॅपच्या मदतीने प्लॅटफॉर्म तिकीट, अनारक्षित तिकिट (दूरच्या गाड्यांचेसुद्धा) आणि मासिक पास बुक केले जाऊ शकतात.
  • ही तिकिटे कागदरहित असतील, ज्यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
  • ही सेवा पूर्णतः कॅशलेस आहे. यामध्ये आरवॉलेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय किंवा ई-वॉलेटमधूनच तिकीट बुक केले जाऊ शकते.
  • या सेवेचा फायदा घेण्यासाठी ‘यूटीएस मोबाईल अॅप’ इंस्टॉल करावे लागेल. हे अॅप Android, iOS आणि Windows Storeवर उपलब्ध आहे.
  • यूटीएस अॅपद्वारे खालील तीन ‘C’ना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
    • कॅशलेस व्यवहार: रोख्रहित व्यवहार अर्थात डिजिटल पेमेंट.
    • कॉन्टॅक्टलेस तिकीट सुविधा: तिकीट काढण्यासाठी प्रत्यक्ष तिकीट विक्रीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही.
    • कस्टमर कन्विनियंस अँड एक्सपीरियंस: प्रवाशांची सुविधा व अनुभव.

ओडिशामध्ये सौरा जलनिधि योजनेचा शुभारंभ

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडीशामध्ये ‘सौरा जलनिधि’ योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांद्वारे सिंचनामध्ये सौर उर्जेच्या वापरास चालना देणे आहे.
  • या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना ९० टक्के सबसिडीसह ५००० सौरपंप देण्यात येतील. यामुळे २५०० एकर शेतजमीन सिंचनाखाली येईल.
  • नवीन पटनायक यांनी या योजनेचा वेब पोर्टलही लॉन्च केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात ३० जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला.
  • पहिल्या टप्प्यात पंप चालविण्यासाठी वीज उपलब्ध नाही अशा नसलेल्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे.
  • ही योजना दरवर्षी १.५२ लाख मानवीदिन रोजगारांची निर्मिती करेल आणि ५,००० कुटुंबांना उपजीविकेसाठी मदत करेल. याशिवाय कार्बन उत्सर्जनात घट करण्यासही सहाय्य करेल.
  • वैध किसान ओळखपत्र असलेल्या आणि ज्यांच्याकडे किमान ०.५ एकर शेतजमीन असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी २७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
  • ही योजना आपल्या शेतकऱ्यांच्या खर्चाचा भार कमी करेल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करेल.
  • ही योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मुबलक वीज मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
  • ही योजना हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यास आणि प्रदूषण कमी करण्यास प्रोत्साहन देईल.

भारत-जपान दरम्यान तुरगा जलविद्युत प्रकल्पासाठी ऋण करार

  • भारत आणि जपानने तुरगा जलविद्युत प्रकल्पासाठी १,८१७ कोटी रुपयांच्या ऋण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • ही कर्जाची रक्कम तुरगा पंपस्टोरेज (I) जलविद्युत प्रकल्पासाठी वापरली जाईल. या प्रकल्पामुळे पश्चिम बंगालच्या औद्योगिक विकास व राहणीमानाच्या स्तरामध्ये वृद्धी होईल.
  • या करारावर भारत सरकारच्या वतीने वित्त मंत्रालयाने तर जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सीच्या (JICA) वतीने कात्सुओ मात्सुमोतो यांनी स्वाक्षरी केली.
  • पश्चिम बंगालमधील वीज टंचाईच्या समस्येवर मात करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामुळे येथील औद्योगिक विकासाला गती मिळेल.
  • १९५८पासून भारत व जपान दरम्यान चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील धोरणात्मक व आर्थिक सहकार्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यत्व सर्व देशांसाठी खुले

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्यत्व खुले करण्यास मंजुरी दिली आहे.
  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या बैठकीत यासंबंधी प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यानंतर आयएसएच्या करारात योग्य सुधारणा करून सदस्यत्व खुले करण्यात येईल.
  • यामुळे सौर ऊर्जेचा जागतिक कार्यक्रमपत्रिकेत समावेश होऊन सौर ऊर्जेचा विकास आणि वापर यांना वैश्विक आवाहन मिळेल.
  • तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सर्वसमावेशक होईल आणि याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.
  • सदस्यत्वाच्या विस्तारामुळे विकसनशील देशांमध्ये सौर उर्जेच्या व्यापक वापरामध्ये वृद्धी होईल.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • इंग्रजी: International Solar Alliance (ISA)
  • भारताचा उपक्रम असलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात पॅरिस येथे आयोजित युनायटेड नेशन्स क्लाइमेट चेंज कॉन्फरन्स (COP 21) दरम्यान नोव्हेंबर २०१५मध्ये करण्यात आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते.
  • याचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये (NISE) स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय अंतर-सरकारी संस्था आहे.
  • कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध असलेले १२१ सध्या आयएसएचे सदस्य आहेत.
  • या देशांना सूर्याच्या या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे आयएसएचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • याशिवाय एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे, हेदेखील आयएसएचे उद्दिष्ट आहे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी आयएसए प्रयत्नशील आहे.

नासाची केप्लर दुर्बिण सेवानिवृत्त

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ‘केप्लर’ दुर्बिणीला सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. २००९मध्ये ही दुर्बिण कार्यान्वित करण्यात आली होती.
  • केप्लरमधील इंधन संपल्यामुळे नासासाठी अनेक ग्रहांचा शोध लावणारे केप्लर स्पेस टेलीस्कोप मिशन संपविण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • केप्लरचे इंधन पूर्णपणे संपुष्टात येण्यापूर्वीही त्यातील सर्व माहिती संकलित करण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले. सध्या केप्लर पृथ्वीपासून सुरक्षित कक्षेमध्ये आहे.
केप्लर अंतराळ दुर्बिण
  • केप्लर दुर्बिण मार्च २००९मध्ये लॉन्च करण्यात आली. या दुर्बिणीमध्ये त्या काळातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा वापरण्यात आला होता.
  • सूर्याहून इतर ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहांना शोधण्यासाठी नासाने हे यान अंतराळात पाठविले होते.
  • या दुर्बिणीचे नाव प्रसिद्ध जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ जोहान्स केप्लर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
  • ही दुर्बिण फक्त ३.५ वर्षे कार्य करण्यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु या दुर्बिणीचा कार्यकाळ ९ वर्षे ७ महिने आणि २३ दिवसांचा ठरला.
  • या कालावधीत केप्लरने ५,३०,५०६ ताऱ्यांचे अवलोकन केले आणि २६६३ ग्रहांच्या शोधात सहकार्य केले. केप्लर दुर्बिणीमुळे ब्रम्हांडातील खूप महत्वाची माहिती मिळाली.

रोहित शर्मा सर्वात वेगवान २०० षटकार मारणारा खेळाडू

  • १ नोव्हेंबर २०१८ रोजी वेस्टइंडीजविरुद्धच्या तिरुवनंतपुरम येथे झालेल्या सामन्यात रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान २०० षटकार मारणारा खेळाडू बनला.
  • हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने सर्वात कमी सामन्यांमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
  • रोहित १९३व्या एकदिवसीय सामन्याच्या १८७व्या डावात हा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या (१९५ डाव) नावावर होता.
  • षटकारांचे द्विशतक पूर्ण करणारा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीनंतर दुसरा भारतीय आणि जगातील असा सातवा खेळाडू ठरला आहे.
सर्वात वेगवान २०० षटकार मारणारे खेळाडू
खेळाडू देश डाव
रोहित शर्मा भारत १८७
शाहिद आफ्रिदी पाकिस्तान १९५
ए. बी. डिव्हिलियर्स आफ्रिका २०४
ब्रेंडन मॅक्कुलम न्यू झीलँड २२८
ख्रिस गेल वेस्टइंडीज २४१
एमएस धोनी भारत २४८
सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
खेळाडू देश षटकार
शाहिद आफ्रिदी पाकिस्तान ३५१
ख्रिस गेल वेस्टइंडीज २७५
सनथ जयसूर्या श्रीलंका २७०
एमएस धोनी भारत २१८
एबी डिव्हिलियर्स आफ्रिका २१४
ब्रँडन मॅक्कुलम न्यू झीलँड २००
रोहित शर्मा भारत २००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा