चालू घडामोडी : ०५ नोव्हेंबर

तटरक्षक दलाची गस्तीनौका आयसीजीएस वराह कार्यान्वित

  • भारतीय तटरक्षक दलाने गस्तीनौका आयसीजीएस वराह आपल्या ताफ्यात सामील करून घेतली आहे.
  • हे ऑफशोर पेट्रोल व्हेसल (ओपीव्ही) प्रकारातील जहाज आहे. या गस्तीनौकेचा वापर सागरी किनारपट्टीवर गस्त घालण्याकरिता करण्यात येणार आहे.
  • चेन्नईच्या लार्सन अँड टुब्रोद्वारे कट्टुपल्ली शिपयार्डमध्ये याची बांधणी करण्यात आली असून, ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे जहाज आहे.
  • या जहाजामध्ये अत्याधुनिक दिशादर्शन आणि दळणवळण उपकरणे, सेन्सर आणि यंत्रणा वापरण्यात आली आहेत.
  • यामध्ये एक ३० मिमी आणि दोन १२.७ मिमीच्या बंदुका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या जहाजाचा कमाल वेग २६ नॉट्स आहे.
  • यामध्ये इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टम, ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट हाय पॉवर एक्सटर्नल फायर फाइटिंग सिस्टम यांचा वापर करण्यात आला आहे.
  • पार्श्वभूमी
  • मार्च २०१५मध्ये संरक्षण मंत्रालयाने लार्सन अँड टुब्रोसोबत ७ ओपीव्ही तयार करण्यासाठी करार केला होता.
  • यापैकी २ ओपीव्ही यापूर्वीच तटरक्षक दलाला सोपविण्यात आल्या असून, ते सध्या भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर तैनात आहेत.
  • तिसरे ओपीव्ही २०१९च्या सुरूवातीला तटरक्षक दलाकडे सोपविण्यात येईल. तर मार्च २०२१पर्यंत तटरक्षक दलाला सातही ओपीव्ही देण्यात येतील.


५ नोव्हेंबर: राष्ट्रीय आयुर्वेद दिन


  • आयुष मंत्रालयाद्वारे धन्वंतरीच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी तिसरा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला.
  • या निमित्ताने आयुष मंत्रालयाने नीती आयोगाच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे आयुर्वेदामधील उद्योजकता व व्यवसाय विकासावरील सेमिनारचे आयोजन ४ व ५ नोव्हेंबर रोजी केले होते.
  • आयुर्वेद क्षेत्राशी संबंधित भागधारक आणि व्यवसायिक यांना आयुर्वेद क्षेत्रातील नवीन संधींबद्दल जागरूक करणे, हे या सेमिनारचे लक्ष्य होते.
  • हा सेमिनार म्हणजे आयुर्वेद उत्पादनांचा बाजारपेठेतील हिस्सा २०२२पर्यंत तिप्पट करण्याचे आयुष मंत्रालयाचे ध्येय साध्य करण्यासाठी उचलण्यात आलेले एक पाऊल आहे.
  • तिसऱ्या आयुर्वेद दिनाच्या प्रसंगी आयोजित मुख्य कार्यक्रमात सुमारे ८०० लोक उपस्थित होते.
  • याशिवाय ५ नोव्हेंबर रोजी आयुष आरोग्य प्रणालीची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविण्यासाठी आयुष-आरोग्य व्यवस्थापन सूचना यंत्रणा (ए-एचएमआयएस) कार्यान्वित करण्यात आली.
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार
  • आयुर्वेद क्षेत्रातील प्रसिद्ध वैद्यांना या दिनी ‘राष्ट्रीय धनवंतरी आयुर्वेद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रख्यात आयुर्वेद वैद्य शिव कुमार मिश्रा, माधव सिंह भघेल आणि इतूजी भवदासन नंबूदरी यांचा समावेश होता.
  • त्यांना प्रशस्तीपत्र, धन्वंतरीची प्रतिमा आणि ५ लाख रुपये रोख पुरस्कारस्वरूप देण्यात आले. विजेत्यांची निवड आयुष मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती.


राज्य शासनाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर


  • राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला.
  • तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी तबलावादक विनायक थोरात यांना जाहीर झाला.
  • राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी हे पुरस्कार जाहीर केले. ५ लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

जयंत सावरकर

  • त्यांची अभिनयाची कारकीर्द वयाच्या २०व्या वर्षापासून सुरु झाली. नाट्यसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची १० वर्षे त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले.
  • त्यानंतर विजय तेंडूलकर लिखित ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकामध्ये पहिल्यांदा सावरकरांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली.
  • त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले. जयंत सावरकर यांनी आकाशवाणी केंद्रातही काम केले होते.
  • आचार्य अत्रे यांच्या ‘सम्राट सिंह’ या नाटकात त्यांनी विदुषकाची भूमिका साकारली आणि ती प्रचंड गाजली होती.

पं. विनायक थोरात

  • यांनी तबल्याचे शिक्षण सुरुवातीला वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.
  • त्यानंतर रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाले. सोलो वादनाचे कार्यक्रम सुरु असताना शिलेदारांच्या सहवासात आल्यावर संगीत नाटकांना साथ करायला सुरुवात केली.
  • वयाच्या ५व्या वर्षापासून अनेक दिग्गज कलावंतांना तबला साथ करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.


ओडिशा सरकारचे एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण


  • ओडिशा सरकारने एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण २०१९ लाँच केले. या धोरणाचा उद्देश राज्यातील एरोस्पेस व संरक्षण उपकरणे निर्मिती करण्याऱ्या उद्योगांना चालना देणे आहे.
  • यामुळे राज्यातील औद्योगिकरणाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
  • या धोरणामध्ये जमीनीचे मुली, इमारत, प्लांट आणि यंत्रे यांच्या किंमतीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.
  • याद्वारे राज्यात एरोस्पेस आणि संरक्षण उपकरणे तयार करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  • या धोरणांतर्गत पहिल्या ३ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरारला (ओईएम) १००० कोटी रुपये गुंतवणूक आणि १००० स्थानिक रोजगार उपलब्ध करण्यासाठी १०० कोटी रुपयांची भांडवली सवलत देण्यात करण्यात येणार आहे.
  • या धोरणाद्वारे राज्यात मोठ्या एरोस्पेस आणि संरक्षण निर्मात्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
  • यामुळे राज्याच्या विकासास मदत होईल आणि संबंधित उद्योगांना देखील त्याचा लाभ होईल.


लखनऊमधील इकाना स्टेडियमला अटलजींचे नाव


  • उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने राजधानी लखनऊमधील इकाना स्टेडियमचे त्याला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नाव दिले आहे.
  • त्यामुळे आता इकाना स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या नावाने ओळखले जाणार आहे.


अमेरिकेच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सौरभ नेत्रावळकर


  • मुळचा मुंबईकर असलेल्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे.
  • २०१०साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सौरभ नेत्रावळकरने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
  • याचसोबत २०१३साली कर्नाटकविरुद्ध रणजी सामन्यात सौरभने मुंबईचं प्रतिनिधीत्व केले होते. यानंतर २०१५मध्ये तो अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी स्थायिक झाला.
  • आता सौरभच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा संघ ओमानमध्ये आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.
  • अमेरिकेच्या संघात सौरभशिवाय सनी सोहैल आणि जस्करन मल्होत्रा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
  • सनीने पंजाब आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर जस्करन हिमाचल प्रदेश संघाचा सदस्य होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा