चालू घडामोडी : ०९ नोव्हेंबर

भारतीय लष्कराच्या ताफ्यात २ नव्या तोफा दाखल

  • भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढविण्याच्या उद्देशाने २ नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल केल्या आहेत.
  • ३० वर्षानंतर भारतीय लष्करात २ नव्या अत्याधुनिक तोफा दाखल झाल्या आहेत. यापैकी एक तोफ अमेरिकन आणि दुसरी कोरियन बनावटीची आहे.
  • नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली एम७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर आणि के-९ वज्र या २ नव्या तोफा संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांनी राष्ट्रसेवेत समर्पित केल्या.
  • ही संरक्षण सामग्री देशाला अर्पण करण्यामुळे केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे.
  • याबरोबरच निर्मला सितारामण यांनी ६ बाय ६ फिल्ड आर्टिलरी ट्रॅक्टर्सदेखील लष्करात सामील करून घेतले.
  • या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ट्रॅक्टर्सची निर्मिती अशोक लेलॅण्डने केली आहे. हे ट्रॅक्टर्स जुन्या झालेल्या तोफा वाहून नेणाऱ्या वाहनांची जागा घेतील.
के-९ वज्र तोफ
  • या तोफा दक्षिण कोरियाच्या हानवा तेचविन कंपनीकडून अर्ध जोडणी असलेल्या स्थितीत आयात करण्यात आल्या असून, भारतात लार्सन ॲण्ड टुब्रोतर्फे त्यांची पूर्ण जोडणी करण्यात आली आहे.
  • के-९ वज्र या तोफेवर ४,३६६ कोटी रुपयांचा खर्च होणार असून, याचे कार्य नोव्हेंबर २०२०पर्यंत पूर्ण होणार आहे.
  • एकूण १०० तोफांपैकी सुरुवातीस १० तोफा सैन्यदलास सोपवण्यात येणार आहेत. उर्वरित ९० तोफा मुख्यत्वेकरून भारतात निर्मित केल्या जातील. 
  • यापैकी ४० तोफा नोव्हेंबर २०१९ आणि उर्वरित ५० तोफांचा नोव्हेंबर २०२०मध्ये सैन्यात समावेश करण्यात येईल.
  • या तोफेची २८ ते ३८ किलोमीटर क्षेत्रापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही तोफ वाळवंटात वापरासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.
  • ही तोफ ३० सेकंदामध्ये ३ तोफगोळे आणि ३ मिनिटांमध्ये १५ तोफगोळ्यांचा मारा करू शकते.
  • या तोफेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दिवसासहीत रात्रीच्या वेळेसही ही तोफ अचूक लक्ष्यभेद करू शकते.
  • या तोफा तैनात झाल्यानंतर पश्चिम सीमेवरील भारताच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
एम७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफ
  • १५५ मिमीच्या अल्ट्रा लाईट (अती हलक्या) हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून घेण्यात आल्या असून, भारतात महिंद्र डिफेन्स आणि बीएई सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून या तोफांची जुळणी करण्यात आली आहे.
  • ही तोफ बहुआयामी, वजनाने हलकी तसेच हेलिकॉप्टरद्वारे नेता येण्यासारखी आहे. यामुळे देशातल्या दुर्गम भौगोलिक भागात या तोफा सहजतेने तैनात करता येतील.
  • या अत्याधुनिक तोफेचे वजन केवळ ४.२ टन आहे. तर मारकक्षमता सुमारे २४ ते ३१ किमी आहे. ही तोफ ३० सेकंदामध्ये ३ तोफगोळ्यांचा मारा करू शकते.
  • २०२१पर्यंत एकूण १४५ एम७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवण्यात येतील. या तोफेच्या प्रकल्पाचा खर्च ५,००० कोटी रुपये एवढा आहे.
  • अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगातल्या इतर काही देशांच्या लष्करात या तोफा तैनात आहेत.
  • अफगाणिस्तान आणि इराण सारख्या दुर्गम भागात या तोफांची कार्यक्षमता सिद्ध झाले आहे.

निधन: ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग

  • ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.
  • अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारल्या असून, रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री’ म्हणून त्या ओळखल्या जायच्या.
  • अभिनयापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्या ते हॉटेल व्यावासायिक, उद्योजिका असा झाला.
  • लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला होता. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव पैंगणकर. कमलाकर सारंग यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला.
  • मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून त्यांनी अभिनय प्रवासाला सुरुवात केली.
  • नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता त्यामधून सामाजिक संदेश देण्यावर भर दिला.
  • कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
  • त्यांच्या अभिनय प्रवासात विजय तेंडूलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील त्यांनी साकारलेली ‘चंपा’ ही भूमिका वादळी ठरली.
  • सामना, हा खेळ सावल्यांचा आदी चित्रपट तसेच रथचक्र ही हिंदी मालिकाही त्यांनी केली.
  • नाटकांमागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी, बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
  • आजवरच्या अभिनय प्रवासाच्या वाटचालीचा आणि केलेल्या भूमिकांचा मागोवा घेणारा ‘मी आणि माझ्या भूमिका’ हा एकपात्री कार्यक्रमही त्यांनी सादर केला आहे.
  • लालन सारंग यांनी २०१२मध्ये सुमारे १२ वर्षानंतर जयवंत दळवी लिखित कालचक्र नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले होते.
  • गाजलेल्या कलाकृती: आक्रोश, आरोप, कमला, कालचक्र, गिधाडे, घरकुल, घरटे अमुचे छान, जंगली कबुतर, जोडीदार, तो मी नव्हेच, धंदेवाईक, मी मंत्री झालो, रथचक्र, राणीचा बाग, लग्नाची बेडी, सूर्यास्त, स्टील फ्रेम इत्यादी.
पुरस्कार आणि सन्मान
  • लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मानित.
  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार.
  • २००६साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार.

कर्नाटकचा पादूरस्थित पेट्रोलियम साठा भरण्यास मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने परदेशातील राष्ट्रीय तेल कंपन्यांकडून कर्नाटकचा पादूरस्थित पादुर धोरणात्मक पेट्रोलियम साठा (एसपीआर) भरण्यास मंजुरी दिली आहे.
  • पादुर स्थित एसपीआर सुविधा एक भूमिगत दगडी गुहा आहे जिची एकूण क्षमता २.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) आहे. यात ४ कक्ष आहेत ज्यातील प्रत्येकाची क्षमता ०.६२५ एमएमटी आहे.
पार्श्वभूमी
  • इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व लिमिटेडने (आईएसपीआरएल) विशाखापट्टणम (१.३३ एमएमटी), मंगळूर (१.५ एमएमटी) व पादुर (२.५ एमएमटी) या ३ ठिकाणी एकूण ५.३३ एमएमटी कच्च्या तेलाच्या साठयासाठी भूमिगत गुहांची निर्मिती केली आहे.
  • एसपीआर कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत हा ५.३३ एमएमटी कच्च्या तेलाचा साठा सध्या देशाची ९.५ दिवसांची कच्च्या तेलाच्या गरज भागवू शकतो.
  • जून २०१८मध्ये सरकारने ओडिशाच्या चंडीखोल आणि कर्नाटकच्या पादुर येथे ६.५ एमएमटी अतिरिक्त एसपीआर सुविधेच्या स्थापनेस तत्वतः मंजुरी दिली आहे, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत ११.५ दिवसांची वाढ होण्याची आशा आहे.
  • हायड्रोकार्बन पदार्थ साठवण्यासाठी जमिनीखाली या मानवनिर्मित गुहांचा वापर केला जातो. पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्यातील इंधन वापरले जाते. 
  • भारतात भूगर्भात खोदकाम करुन इंधनाचा साठा करावा, हा निर्णय १९९८साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी घेतला होता.

सौरभ चौधरीला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

  • भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत मागील ४ माहिन्यांतील हे त्याचे चौथे सुवर्णपदक आहे.
  • मेरठचा १६ वर्षीय सौरभ अर्जुनसिंग चिमा तसेच अनमोल जैन यांच्यासोबतीने सांघिक स्पर्धेतदेखील सुवर्णाचा मानकरी ठरला.
  • आठ खेळाडूंच्या वैयक्तिक फायनलमध्ये सौरभने सुवर्णपदक पटकविले. अर्जुनने रौप्य आणि चायनीज तायपेईचा हुआंग वेई-ते याने कांस्य जिंकले. अनमोल १९५.१ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
  • सौरभने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. नंतर त्याने विश्व चॅम्पियनशिप आणि युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण कामगिरी केली होती.

सेशेल्सने जारी केला जगातील पहिला ब्लू बाँड

  • समुद्र आणि मासेमारी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, सेशेल्स देशाने जगातील पहिला ब्लू बाँड (Sovereign Blue Bond) जारी केला आहे.
  • या बाँडच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी १५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूकदेखील केली आहे.
  • याअंतर्गत ब्लू ग्रांट निधीद्वारे अनुदानही प्रदान केले जाईल. हा निधी सेशल्सच्या कन्झर्वेशन अँड क्लायमेट अॅडॅप्टेशन ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केला जाईल. 
ब्लू बॉण्डची वैशिष्ट्ये
  • या बाँडच्या माध्यमातून कोणताही देश सागरी संशाधनांच्या शाश्वत वापरासाठी कोणत्याही भांडवल बाजारातून निधी गोळा करू शकतो.
  • या बाँडद्वारे सरकारी व खाजगी अशा दोन्ही स्त्रोतांमधून गुंतवणूक मिळविता येऊ शकते.
  • यामुळे सेशेल्सला शाश्वत मत्स्यपालन सुनिश्चित करण्यात मदत होईल.
  • सेशेल्सने जारी केलेल्या ब्लू बाँड्सला जागतिक बँकेने ५ दशलक्ष डॉलर्सची हमी दिली आहे.
  • याव्यतिरिक्त Global Environment Facilityकडून ५ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज सवलतीच्या दरात देण्याची तरतूद केली आहे. 
  • या बॉण्डद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नापैकी किमान १२ दशलक्ष डॉलर्स स्थानिक मच्छीमार समुदायांसाठी कमी व्याजदरातील कर्जाच्या स्वरूपात वाटप केले जातील.
  • तर उर्वरित रक्कम शाश्वत मत्स्य प्रकल्पांच्या शोधासाठी निधी जमविण्यासाठी वापरली जाईल. सेशल्स डेव्हलपमेंट बँक (डीबीएस) हा निधी व्यवस्थापित करेल. 
सेशेल्स
  • सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात स्थित ११५ बेटांचा द्वीपसमूह आहे. सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया आहे.
  • सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केनियाच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.
  • सेशेल्सचे अजंपशन बेट भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. भारत तेथे लष्करी तळ स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

९ नोव्हेंबर: राष्ट्रीय विधी सेवा दिन

  • भारतात ९ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश सर्व नागरिकांसाठी कायदेशीर मदत सुनिश्चित करणे आहे.
  • तसेच समाजातील दुर्बल घटकांना निशुल्क आणि कार्यक्षम कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, हादेखील या दिनाचा उद्देश आहे.
  • समाजाच्या वंचित आणि दुर्बल अशा प्रत्येक घटकापर्यंत कायदेशीर सेवा आणि त्या सेवांची उपलब्धता पोहचविण्यासाठी या दिवशी जनजागृती करण्यात येते.
  • या दिवशी देशभरात लोकांना समान कायदेशीर प्रदान करण्यासाठी लोक अदालत आयोजित केल्या जातात.
  • या दिनाची सुरुवात १९९५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशातील गरीब व दुर्बल समूहाला निशुल्क कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केली.
  • याचा उद्देश महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मानवी तस्करीचे बळी ठरलेल्या व्यक्ती यांना मोफत कायदेशीर मदत करणे हा आहे.

ट्रम्प यांनी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना केले बडतर्फ

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनातील अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.
  • ट्रम्प यांनी २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर सध्या त्याबाबत तपास सुरू आहे.
  • सेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.
  • काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील.
  • रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. 

चीनने सादर केला व्हर्चुअल न्यूज रीडर

  • चीनच्या सरकारी न्यूज चॅनेल शिन्हुआ या वृत्तसंस्थेने एक व्हर्चुअल न्यूज रीडर (वृत्तवाचक) सादर केला.
  • व्हर्चुअल अँकर निर्माण करण्यात चीनी सर्च इंजिन सोगोची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सोगोने खास शिन्हुआसाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • हा व्हर्चुअल न्यूज अँकर आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर कार्य करतो. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.
  • शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, व्हर्चुअल अँकर हा रोबोट किंवा मानवाचे थ्रीडी डिजिटल मॉडेल नाही. तर ते केवळ मानवासारखे दिसणारे अॅनिमेशन आहे.
  • प्रोफेशनल न्यूज अँकर ज्या पद्धतीने बातम्या वाचतात त्याचप्रमाणे आर्टिफिशियल न्यूज अँकर बातम्या देईल असा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.
  • या आर्टिफिशियल न्यूज अँकरचा आवाज, ओठांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे प्रोफेशनल अँकरसारखेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • व्हर्चुअल न्यूज अँकर वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी सलग २४ तास काम करू शकतो. तसेच यामुळे खर्चातही कपात होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा