चालू घडामोडी : १८ नोव्हेंबरq

राष्ट्रीय महिला आयोगावर ३ नवे सदस्य नामांकित

  • महिला व बाल कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगावर ३ सदस्यांना राष्ट्रीय महिला आयोग कायदा १९९०च्या कलम ३ अंतर्गत नामांकित केले आहे.
  • हे ३ नामांकित सदस्य चंद्रमुखी देवी, सोसो शैजा आणि कमलेश गौतम भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते ३ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत पदावर कार्यरत राहतील.
  • या नवीन नियुक्त्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगामध्ये २ पदे रिक्त आहेत. सध्या रेखा शर्मा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
  • बिहारच्या माजी आमदार असलेल्या चंद्रमुखी देवी २०११ आणि २०१४ दरम्यान बिहार राज्य महिला आयोगाच्या सदस्य होत्या.
  • सोसो शॉजा सध्या भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्या आहेत. १९७४मध्ये मणिपूरचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री बनलेल्या यांगमासो शेजा यांच्या त्या कन्या आहेत.
  • तसेच कमलेश गौतम भारतीय जनता पक्षाच्या कानपूर-बुंदेलखंड विभागाचे प्रभारी आहेत.
राष्ट्रीय महिला आयोग
  • इंग्रजी: National Commission for Women (NCW)
  • ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने जानेवारी १९९२मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे.
  • १९९०च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली.
  • महिला अधिकारांचे रक्षण करण्यासाठी ही देशातील सर्वात मोठी संस्था आहे. हा आयोग महिला अधिकारांच्या संबंधात सरकारला सल्ला देतो.
  • याव्यतिरिक्त महिला अधिकारांशी संबंधित संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेण्याचे कार्यही हा आयोग करतो.
  • राष्ट्रीय महिला आयोग ‘राष्ट्र महिला’ नावाचे मासिक हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित करते.
  • या आयोगात १ अध्यक्ष आणि ५ सदस्य असतात. त्यांची निवड कमाल ३ वर्षे मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत केली जाते.

निर्भया निधीअंतर्गत ३ प्रस्तावांना मान्यता

  • केंद्र सरकारने निर्भया निधीअंतर्गत १०२३ फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये स्थापन करण्याच्या मंजुरीसह ३ प्रस्तावांना मान्यता दिली.
  • महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या सचिवालयाच्या अध्यक्षतेखाली निर्भया निधीच्या अधिकारित समितीने हा निर्णय घेतला.
मंजूर करण्यात आलेले ३ प्रस्ताव
  • १०२३ फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये: हा प्रस्ताव बलात्कार व पोक्सो अॅक्ट अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याच्या हेतूने कायदा व न्याय मंत्रालयाने सादर केला. यानुसार पहिल्या टप्प्यात ९ राज्यांमध्ये ७७७ फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये स्थापन करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात २४६ फास्ट ट्रॅक विशेष न्यायालये स्थापन केली जातील. यासाठी ७६७.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी फॉरेंसिक किट: हा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर केला. या किट्समुळे राज्य फॉरेंसिक विज्ञान प्रयोगशाळांची क्षमता वाढेल.
  • ५० रेल्वे स्थानकांवर देखरेख ठेवण्यासाठी व्हिडिओ यंत्रणेची स्थापना: हा प्रस्ताव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सादर केला.
निर्भया निधी
  • वित्त मंत्रालयाने २०१३मध्ये १००० कोटी रुपयांच्या या निधीची स्थापना केली होती.
  • देशातील महिलांच्या सुरक्षेसाठीच्या उपायांमध्ये वाढ करण्यासाठी या निधीची स्थापना करण्यात आली आहे.
  • महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या सचिवालयाच्या अध्यक्षतेखाली निर्भया निधीच्या अधिकारित समितीद्वारे या निधीचे परीक्षण केले जाते.
  • विविध मंत्रालयांद्वारे या निधीच्या वापरासाठी प्रस्ताव सादर केले जातात.

एनजीटीकडून फॉक्सवॅगनवर १०० कोटींचा दंड

  • राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनला १०० कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे.
  • भारतात डिझेल गाड्यांमधील कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी वास्तविक आकड्यात फेरबदल करता येतील असे उपकरण वापरल्याचा आरोप कंपनीवर आहे.
  • एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फॉक्सवॅगनच्या गाड्यांपासून होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली.
  • या समितीमध्ये पर्यावरण मंत्रालय, अवजड उद्योग, सीपीसीबी आणि ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. एनजीटीने या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सोपवण्यास सांगितले आहे.
  • लवादाला दिलेल्या उत्तरादाखल कंपनीने देशातील ३.२३ लाख वाहने भारतीय बाजारातून परत घेऊन त्यात कार्बन उत्सर्जन कमी करणारी उपकरणे लावण्यात येतील, असे सांगितले आहे.
  • फॉक्सवॅगन कंपनीने कारमध्ये बसवलेले उपकरण हे एक सॉफ्टवेअर होते. ज्याच्या माध्यमातून डिझेल वाहनांमधील कार्बन उत्सर्जनाच्या आकड्यांमध्ये बदल केला जात, असे तपासात समोर आले आहे.
  • सप्टेंबर २०१५मध्ये फॉक्सवॅगनने २००८ ते २०१५ दरम्यान जगभरात विक्री केलेल्या १.११ कोटी गाड्यांमध्ये हे ‘डिफिट डिव्हाइस’ बसवल्याचे मान्य केले होते. ज्यामुळे उत्सर्जन परिक्षणावेळी प्रदूषण स्तर कमी दिसत असत.
  • या उपकरणासह जगभरात सुमारे १ कोटी वाहने विकल्याचे कंपनीने मान्य केले होते. एकट्या अमेरिकेने फॉक्सवॅगनवर १८ बिलियन डॉलरचा दंड ठोठावला होता.

निधन: प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी

  • जाहिरात क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व ॲलेक पदमसी यांचे १७ नोव्हेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
  • हमारा बजाज, सर्फ, चेरी ब्लॉसम, शू पॉलिस, एमआरएफ मसल मॅन, लिरील गर्ल, फेअर अँड लव्हली यासह अनेक आकर्षक जाहिराती त्यांनी केल्या आहे.
  • वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरुवात केलेल्या पदमसी यांनी ६० वर्षांत ७० इंग्रजी व हिंदी नाटकांतून भूमिका केल्या.
  • ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हँसे’ या नाटकापर्यंत त्यांनी अनेक उत्तमोत्तम नाटके केली.
  • शेक्सपिअर, आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.
  • त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती.
  • त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, टागोर रत्‍न पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

निधन: ज्येष्ठ अनुवादिका डॉ. मृणालिनी गडकरी

  • अभिजात बंगाली साहित्याचे दालन मराठी वाचकांसाठी खुले करणाऱ्या ज्येष्ठ अनुवादिका डॉ. मृणालिनी गडकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • शरश्चंद्र यांच्या 'देवदास' या साहित्यकृतीच्या अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • जर्मन विषयातून एम. ए. केल्यानंतर त्यांनी 'रवींद्रनाथांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता : एक तौलनिक अभ्यास' या विषयावर प्रबंध सादर करून पीएचडी संपादन केली.
  • त्यांनी बंगालीतील १६ पुस्तकांचा मराठी अनुवाद केला. त्यांनी अनुवादित केलेल्या 'काबुलीवाल्याची बंगाली बायको' या पुस्तकाला जी. ए. कुलकर्णी उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार मिळाला होता.
  • मेहता पब्लिशिंग हाउसतर्फे ‘नष्ट मेअर नष्ट गद्या’ या पुस्तकाला रणजित देसाई अनुवाद पुरस्कार मिळाला होता. कोलकाता स्थित शरद समितीतर्फे त्यांना शरद पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा