चालू घडामोडी : ०१ डिसेंबर

तीन हजार कोटींच्या लष्करी साहित्य खरेदीला मंजुरी

  • लष्करी साहित्य खरेदीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) मंजुरी दिली आहे.
  • नौदलाच्या २ स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि लष्कराच्या अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया खरेदीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली डीएसीची ही बैठक पार पाडली.
  • भारत १ अब्ज डॉलर मोजून रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे. या दोन्ही फ्रिगेटस ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील.
  • ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • भारतीय लष्कराचा मुख्य रणगाडा अर्जुनसाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • एआरव्ही गाडी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केली आहे. सरकारी कंपनी बीईएमएल या एआरव्ही गाडया बनवणार आहेत.
  • लष्करी साहित्य त्वरित मिळविण्यासाठी सरकारकडून संरक्षण अधिग्रहण परिषदेची स्थापना २००१मध्ये करण्यात आली.
  • केंद्रीय संरक्षण मंत्री डीएसीचे अध्यक्ष असतात. डीएसी लष्करी साहित्याच्या अधिग्रहणासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करते.

मानव संसाधन विकास मंत्रालयाच भाषा संगम उपक्रम

  • शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील सर्व २२ भारतीय भाषांचा परिचय करून देण्यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘भाषा संगम’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे.
  • भाषा संगम हा उपक्रम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २८ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८पर्यंत चालेल.
  • या उपक्रमाचा उद्देश भाषिक आणि राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देणे आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या विविध भाषा जाणून घेण्याची संधी मिळेल.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संबंधित अथवा मान्यताप्राप्त शाळांमधील १ली ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश केला जाईल.
  • या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त विविध प्रदेशांमधील क्षेत्रीय भाषेमध्ये बोलणे शिकविणे आहे.
  • त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक भाषेतील ५ वाक्ये शिकविण्यात येतील. यानंतर त्यांना प्रार्थनेच्यावेळी त्यांना हि वाक्ये बोलावी लागतील.
भारतीय संविधानाचे आठवे परिशिष्ट
  • संविधानाचे आठवे परिशिष्ट भारतीय भाषांशी संबंधित आहे. यामध्ये २२ भारतीय भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
  • यापैकी १४ भाषा संविधानात समाविष्ट केल्या होत्या. १९६७मध्ये सिंधी भाषेचा यात समावेश करण्यात आला.
  • त्यानंतर १९९२मध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली तर २००४मध्ये बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आल्या.

रेल्वे मंत्रालयाचे ‘ई-दृष्टि’ सॉफ्टवेअर

  • केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या वक्तशीरपणावर देखरेख ठेवण्यासाठी ‘ई-दृष्टि’ सॉफ्टवेअर लाँच केले.
  • या सॉफ्टवेअरचा वापर प्रवासी रेल्वे आणि मालगाडी अशा दोन्हीसाठी देशभरात कोणत्याही ठिकाणी करता येणार आहे.
  • हे सॉफ्टवेअर केंद्रीय रेल्वे माहिती प्रणालीद्वारे (सीआरआयएस) विकसित करण्यात आले आहे.
  • या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने रेल्वे मंत्री त्यांच्या कार्यालयात बसून कोणत्याही गाडीच्या हालचालींवर देखरेख ठेवू शकतात.
  • याशिवाय कोणत्याही प्रवासी रेल्वे व मालगाडीचे उत्पन्न, वक्तशीरपणा, लोकांच्या तक्रारी, रेल्वे स्थानक याबद्दल माहिती मिळवू शकतात.
  • या सॉफ्टवेअरला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) बेस किचनशी देखील जोडण्यात आले आहे.
  • याद्वारे रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारींचा पाठपुरावा करता येणार आहे. तसेच रेल्वेमंत्री लाइव्ह व्हिडीओद्वारे IRCTCच्या स्वयंपाकघरावरही देखरेख ठेवू शकतात.
  • या सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेमधील आरक्षित आणि अनारक्षित जागांची माहिती देखील मिळेल.

अभिनव बिंद्राला मानाचा ‘दी ब्लू क्रॉस’ पुरस्कार

  • भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडून (ISSF) मानाचा ‘दी ब्लू क्रॉस’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
  • नेमबाजी क्षेत्रातील ब्लू क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
  • अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
  • बिजींग ऑलिम्पिक २००८मध्ये त्याने १० मीटर एयर रायफल प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
  • १९८०नंतर भारतासाठीचे हे पहिलेच सुवर्णपदक होते. १९८०मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले होते.
  • त्यापूर्वी अभिनवने २००६साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदकही पटकावले होते.
  • याशिवाय ७ राष्ट्रकुल पदके आणि ३ आशियाई खेळांची पदकेही त्याच्या नावावर जमा आहेत. २००२, २००६, २०१० आणि २०१४च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
  • त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या पुरस्कारांनी सन्मान केला आहे.

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सव सुरु

  • १ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागालँडची राजधानी कोहिमा येथे १९व्या हॉर्नबिल महोत्सवाचे उद्घाटन केले.
  • १ डिसेंबर १९६३ रोजी नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. नागालँड हे भारताचे १६वे राज्य होते.
  • नागालँडचे मुख्यमंत्री: नेफू रियो
हॉर्नबिल महोत्सव
  • दरवर्षी नागालँडमध्ये १ ते १० डिसेंबर दरम्यान हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो. हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे.
  • या महोत्सवाचे नाव भारतीय हॉर्नबिल पक्ष्याचा नावावरून ठेवण्यात आले आहे. 
  • या महोत्सवात सांस्कृतिक कला, क्रीडा स्पर्धा आणि भोजन मेळावे आयोजित केले जातात. याशिवाय चित्रकला, लाकूड नक्षीकाम व शिल्पकला यांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येते.

स्लोव्हेनियाच्या सशस्त्र सैन्यदलाच्या प्रमुखपदी महिलेची नेमणूक

  • सशस्त्र सैन्यदलाच्या प्रमुखपदी एका महिलेची नेमणूक करणारा स्लोव्हेनिया हा नाटोचा पहिला सदस्य देश ठरला आहे.
  • मेजर जनरल अलेंका एर्मेंक यांना स्लोव्हेनियाच्या सैन्याच्या प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्लोव्हेनियाच्या सैन्यात सुमारे ७५०० सैनिक आहेत.
  • स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक हा मध्य युरोपामधील एक देश आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या देशाचे प्रचलित चलन युरो आहे.
  • याच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी, पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया, नैऋत्येला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे.
  • सुरुवातीला स्लोव्हेनिया युगोस्लाव्हियाचा भाग होता. १९९१साली युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला. २००४मध्ये तो युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये सामील झाला.
नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन)
  • स्थापना: ४ एप्रिल १९४९
  • मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्टांनी केली.
  • २०१७मध्ये मोंटेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या २९ झाली आहे.
  • शीतयुद्धाच्या काळात रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांविरुद्ध काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्थापन केलेली ही एक संघटना आहे.
  • उत्तर अटलांटिक प्रदेशातील राष्ट्रांमध्ये राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य निर्माण करून सहकार्याच्या तत्वाचा प्रसार करणे व त्यासाठी आक्रमकांचा सामुदायिक प्रतिकार करणे व सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे, या गोष्टी सर्व सदस्य राष्ट्रांवर बंधकारक आहेत.
  • नाटोच्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या सैन्याचा एकत्रित खर्च जगाच्या संरक्षण खर्चाच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

निधन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे १ डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
  • अमेरिकेच्या हयात असलेल्या माजी अध्यक्षांपैकी ते सर्वांत वयोवृद्ध होते. अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे त्यांचे चिरंजीव आहेत.
  • जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या पत्नी बारबरा बुश यांचे एप्रिलमध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांची प्रकृतीही खालावली होती.
  • जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष होते. १९८९ ते १९९३ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
  • बिल क्लिंटन यांच्याकडून बुश यांना पराभव स्वीकारावा लागला आणि अवघ्या ४ वर्षात त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.
  • त्यापूर्वी रॉनल्ड रेगन यांच्या अध्यक्षकाळात ते अमेरिकेचे ८ वर्षे उपराष्ट्राध्यक्ष होते. १९७६ ते १९७७ या कालावधीत ते सीआयएच्या संचालकपदावरही होते.
  • १२ जून १९२४ रोजी जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचा जन्म झाला. तेलउद्योगात नाव कमावल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. रिपब्लिकन पक्षाचे ते प्रतिनिधी होते.
  • शीतयुद्ध संपुष्टात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर देशात आर्थिक स्तरावरील त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली.

१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

  • प्रतिवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. एड्स रोगाविषयी जागरुकता पसरविणे हा त्याचा उद्देश आहे.
  • हा दिवस १९८८मध्ये प्रथम साजरा झाला. यावर्षी जागतिक एड्स दिनाची मुख्य थीम ‘नो युअर स्टेटस’ (Know Your Status) ही आहे.
  • एचआयव्ही ही एक प्रमुख जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. यामुळे आतापर्यंत ३५ दशलक्षांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
  • २०१७मध्ये जागतिक स्तरावर एचआयव्हीमुळे ९.४० लाख लोक मरण पावले.
  • २०१७च्या अखेरीस जागतिक स्तरावर सुमारे ३६.९ दशलक्ष लोक एचआयव्ही संक्रमित होते. २०१७मध्ये १.८ दशलक्ष नवीन लोकांना एचआयव्हीची बाधा झाली.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आफ्रिकन क्षेत्र एड्सने सर्वाधिक प्रभावित आहे. २०१७मध्ये या क्षेत्रात २५.७ दशलक्ष लोक एचआयव्हीने संक्रमित होते.

१ डिसेंबर: बीएसएफ स्थापना दिवस

  • प्रतिवर्षी १ डिसेंबर रोजी दरवर्षी सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. बीएसएफची स्थापना १ डिसेंबर १९६५ रोजी झाली होती.
  • बीएसएफचे ब्रीदवाक्य ‘Duty Unto Death’ हे आहे. बीएसएफचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे १७,११८ कोटी रुपये आहे.
  • सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) भारताच्या ५ निमलश्करी दलांपैकी एक आहे. याला भारतीय प्रदेशाच्या सीमा सुरक्षांची पहिली तुकडीही म्हटले जाते.
  • बीएसएफ शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते. भारताच्या सीमा सुरक्षित करणे हा बीएसएफचा उद्देश आहे.
  • बीएसएफ जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. यात १८६ बटालियन आहेत, ज्यामध्ये २,५७,३६३ कर्मचारी कार्यरत आहेत.
  • यात हवाई (एअर) तुकडी, समुद्री (मरीन) तुकडी, आर्टिलरी रेजिमेंट आणि कमांडो युनिट देखील समाविष्ट आहे.
  • बीएसएफला इंडो-पाक सीमा, भारत-बांग्लादेश सीमा आणि नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यासह तैनात केले जाते. नक्षलवादी विरोधी कारवायांमध्येही बीएसएफ कार्य करते.

२७ नोव्हेंबर: भारतीय अवयवदान दिन

  • २७ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • उद्देश: मृत्युनंतर अवयव दान करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे.
  • अवयवदानामध्ये मृत्युनंतर एखाद्या व्यक्तीचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, आतडे, फुफ्फुसे हे अवयव गरजू व्यक्तीला दान केले जातात.
  • ९व्या भारतीय अवयवदान दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल ऑर्गेन अँड टिशू ट्रान्सप्लंट ऑर्गनायझेशनने (NOTTO) केले होते.
  • या कार्यक्रमात अवयवदानाच्या बाबतीत तमिळनाडुला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तमिळनाडुला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला.
  • ब्रेन स्टेम मृत्यू प्रमाणन, अवयवदान वितरण आणि ग्रीन कॉरिडॉर अनिवार्य करणारे तामिळनाडू भारतातील पहिलेच राज्य आहे.
  • याशिवाय अवयवदानाबद्दल जनजागृतीसाठी महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • तसेच डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांना भारतातील पहिल्या हस्त प्रत्यारोपणासाठी सन्मानित करण्यात आले.
  • तर पुण्याच्या शैलेश पुणताम्बेकर यांना भारतातील पहिल्या युटेरिन प्रत्यारोपणासाठी सन्मानित करण्यात आले.
  • टीप: जागतिक अवयवदान दिवस प्रतिवर्षी २३ ऑगस्टला साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा