चालू घडामोडी : ६ फेब्रुवारी

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

  • राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी यांचा समावेश आहे.
  • याशिवाय ललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली.
  • संगीत नाटक अकादमी ही भारत सरकारने दिल्लीमध्ये स्थापन केलेली एक राष्ट्रीय स्तरावरील संगीत व नाट्य कलेची ॲकॅडमी आहे.
  • केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करते.
  • १९५२पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
अभिराम भडकमकर
  • नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • श्री.भडकमकर यांनी गेली २ दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे.
  • नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे श्री.भडकमकर उत्तम कलावंतही आहेत.
  • त्यांचा ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
  • दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे श्री.भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
  • आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहिली आहे.
  • त्यांनी ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. तसेच विविध नाटकेही त्यांनी लिहिली आहेत.
सुनील शानबाग
  • नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे.
  • प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी १९७४ ते १९८४ अशी सलग दहा वर्षे २५ कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली.
  • त्यांनी कला क्षेत्रातील मित्रांच्या सहकार्याने १९८५मध्ये ‘अपर्णा रिप्रेटरी कंपनीची’ स्थापना केली व या माध्यमातून वर्षाला ५० नाट्य प्रयोग होत असत.
  • त्यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
पंडित योगेश सामसी
  • प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
  • श्री.सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले.
  • यानंतर श्री.सामसी यांना सलग २ दशके प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले.
  • उस्ताद विलायत खाँ, पं. अजय चक्रवर्थी, पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा आदी प्रसिद्ध गायक व नृत्यकालाकारांना श्री.सामसी यांनी तबल्याची साथ केली आहे.
डॉ.प्रकाश खांडगे
  • लोककलांचे अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले.
  • लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ.खांडगे १९७८ पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘प्रयोगात्मक लोककला’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.
  • त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे व ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली.
  • डॉ.खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये ४ वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले होते.
  • नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय ते राज्य व केंद्राच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर कार्यरत आहेत.
डॉ.संध्या पुरेचा
  • ललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ.संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली.
  • प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगणा असलेल्या डॉ.पुरेचा या मुंबई स्थित कला परिचय संस्थेच्या संचालिका तसेच सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत.
  • आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ.पुरेचा यांनी भरत नाट्यमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाट्य शास्त्र’ विषयावर संशोधनही केले आहे.
  • ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या संगीत नाटक अकादमी फेलोशिपचे स्वरूप आहे.

इस्रोच्या जीसॅट-३१चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारताचा संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे (GSAT-31) ६ फेब्रुवारी रोजी फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • उड्डाणानंतर ४२ मिनिटांनी ३:१४ वाजता हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थिरावला. हे प्रक्षेपण युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन-५ रॉकेटद्वारे करण्यात आले.
  • एरियनस्पेसद्वारे भारतासाठी करण्यात आलेले हे २३वे यशस्वी उड्डाण होते. गेल्या वर्षी जीसॅट-११ या भारताच्या सर्वात जड (वजन ५८५४ किलो) उपग्रहाचे प्रक्षेपणही एरियनस्पेसनेच केले होते.
  • भारताच्या जीसॅट-३१सह या रॉकेटद्वारे सौदी अरेबियाचा जियो स्टेशनरी उपग्रह-१/ हेलास उपग्रह-४ यांचेही प्रक्षेपण करण्यात आले.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा (इस्रो) हा ४०वा संदेशवाहक उपग्रह आहे. जीसॅट-३१ आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह इनसॅट-४ सीआरची जागा घेईल.
  • या उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम आहे. हा उपग्रह भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-३१ हा उपग्रह १५ वर्षे कार्यरत राहिल.
  • जीसॅट ३१चा वापर व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजिटल सॅटेलाईट, न्यूज एकत्रीकरण, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस आणि इतर सेवांसाठी होईल.
  • त्याचबरोबर हा उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपाँडरच्या मदतीने अरबी सागर, बंगालची खाडी व हिंदी महासागराच्या विशाल समुद्री क्षेत्रावर संदेशवहनासाठी उपयोगी ठरेल.
एरियनस्पेस
  • एरियनस्पेस १९८०मध्ये स्थापन झालेली एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही जगातील पहिली व्यावसायिक प्रक्षेपण सेवा प्रदाता कंपनी आहे.
  • या कंपनीचे मुख्यालय कॉरकोरोनस (फ्रान्स) येथे आहे. एरियन ५, सोयुझ २ आणि वेगा हे या कंपनीचे प्रमुख प्रक्षेपक (रॉकेट) आहेत.
  • मे २०१७च्या आकडेवारीनुसार, एरियनस्पेसने २५४ मोहिमांमध्ये ५५०हून अधिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. वजनदार उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठीही एरियनस्पेस सेवा प्रदान करते.
  • एरियनस्पेसचे वेगा रॉकेट चार टप्प्यांचे रॉकेट आहे, जे छोटे व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी विकसित केले आहे. या रॉकेटची उंची ३० मीटर असून ते २५०० किलोपर्यंत भार वाहून नेण्यास सक्षम आहे.

भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक देश

  • पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनला आहे.
  • देशात एलपीजीची मागणी २०२५पर्यंत ३४ टक्के वाढण्याची शक्यता पेट्रोलियम सचिव एम. एम. कुट्टी यांनी व्यक्त केली आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत ६.३१ कोटी गरीब महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०२०पर्यंत आणखी २ कोटी कनेक्शन देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
  • एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर १५ टक्के वाढ झाली आहे. २०१४-१५मध्ये एलपीजी ग्राहकांची संख्या १४.८ कोटी होती ती संख्या २०१७-१८ मध्ये वाढून २२.४ कोटी झाली आहे.
  • लोकसंख्या वाढ आणि ग्रामीण भागात एलपीजीचा झालेला विस्तार यामुळे एलपीजी ग्राहकांच्या संख्येत सरासरी ८.४ टक्के वाढ झाली आहे.
  • यामुळे २.२५ कोटी टनसह भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश झाला आहे.
  • २०२५ पर्यंत एलपीजीचा वापर वाढून ३.०३ कोटी टनपर्यंत जाईल. २०४० पर्यंत हा आकडा ४.०६ कोटी टनवर जाईल.
  • सरकारने देशात एलपीजीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. विशेषत: ग्रामीण कुटुंबात एलपीजीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
  • देशात एलपीजीचा पुरवठाही ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही संख्या २०१४ मध्ये ५५ टक्के होती.
पंतप्रधान उज्ज्वला योजना
  • देशातल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली.
  • केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरूवात केली होती. या योजनेचे घोषवाक्य ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ आहे.
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ओआयसी, बीपीसीएल व एचपीसीएल या तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्याने या योजनेची अंमलबजावणी केली आहे.
  • ही योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे.
  • अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, मागासवर्गीय, बेटावरील रहिवासी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, चहाच्या मळ्यात काम करणारे लोक हे या योजनेचे प्रमुख लाभार्थी आहेत.
  • सुरुवातीला सरकारने ३१ मार्च २०१९पर्यंत दारिद्रय रेषेखालच्या कुटुंबातल्या ५ कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचे लक्ष्य ठेवले होते.
  • परंतु नियोजित वेळेपूर्वीच हे लक्ष्य साध्य झाल्यामुळे यामध्ये वाढ करून ८ कोटी कुटुंबांना मोफत एलपीजी सुविधा प्रदान करण्याचे सुधारित लक्ष्य ठेवले आहे. तसेच यासाठी १२,८०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही अर्थसंकल्पात केली आहे.
  • समाजातल्या सर्व गरीबापर्यंत योजनांचा लाभ पोहोचायला हवा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • या योजनेमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होण्याबरोबरच महिला सबलीकरणाचे उद्दिष्टही साध्य होत आहे.

अझीम प्रेमजी यांना अर्न्स्ट अँड यंग जीवनगौरव पुरस्कार

  • विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young) जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • ईवाय (EY) नावाने प्रख्यात असलेली अर्न्स्ट अँड यंग ही बहुराष्ट्रीय व्यावसायिक सेवा प्रदाता कंपनी आहे.
अझीम प्रेमजी
  • अझीम हशिम प्रेमजी यांचा जन्म २४ जुलै १९४५ रोजी मुंबईमध्ये झाला. हे प्रसिध्द भारतीय उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत.
  • वडिलांच्या अचानक मृत्यू झाल्यानंतर १९६६मध्ये त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या विप्रो या वनस्पती तेलाच्या कंपनीची धुरा हाती घेतली.
  • त्यावेळी ते अमेरिकेतील स्टॅँडफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगची पदवी संपादन करीत होते. विप्रो कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी या कंपनीचा मोठा विस्तार केला.
  • एकीकडे साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले.
  • त्यांनी विप्रो प्लुइडपॉवर, विप्रो टेक्नॉलॉजिस, इन्फ्रास्ट्रक्चर, लायटिंग, इकोएनर्जी, मॉड्युलर फर्निचर अशा अनेक कंपन्या काढल्या.
  • माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात विप्रो इन्फोटेक, माइंडट्री, नेटक्रॅकर अशा कंपन्यांद्वारे कम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली मुद्रा उमटवली.
  • गुणवत्तेसंदर्भात भारतात ‘६-सिग्मा’ ही प्रणाली त्यांनीच आणली व लागू केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत मोलाचे मानला जाणारे ‘पीसीएसएम लेव्हल:५’ हे प्रमाणपत्र त्यांच्या कंपनीस मिळालेले आहे.
  • कारभारातील पारदर्शकता, उच्च गुणवत्ता, सचोटी अशी ‘विप्रो’ उद्योगसमूहाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
  • १९८०च्या दशकात त्यांनी विप्रोला आयटी क्षेत्राशी जोडले. सध्या विप्रो देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.
  • दानशूरतेच्या बाबतीतहीर प्रेमजी यांनी एक मानदंड प्रस्थापित केला आहे. अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून ते विविध समाजोपयोगी आणि शैक्षणिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीतून काम करत आहेत.
  • जागतिक स्तरावर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या ‘गिव्हिंग प्लेज’ नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिले भारतीय उद्योजक आहेत.
  • फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये अव्वल १००मध्ये त्यांचा समावेश होतो.
  • त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने २००५साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने तर २०११साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

डिसेंबर अखेरीस अर्थसंकल्पीय तुटीची स्थिती

  • डिसेंबर अखेरीस अर्थसंकल्पीय अथवा वित्तीय तुटीचे प्रमाण संपूर्ण वर्षासाठीच्या निर्धारित ६.२४ लाख कोटींच्या लक्ष्याच्या ११३.६ टक्के झाली आहे.
  • अर्थसंकल्पीय अथवा वित्तीय तूट हे सरकारचे महसुली उत्पन्न आणि खर्चातील तफावत असते. महसुली उत्पन्नाची गणना करताना त्यात कर्जे समाविष्ट नसते. त्यामुळे वित्तीय तुटीमुळे कर्जाची आवश्यकता लक्षात येते.
  • चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या काळात सरकारी महसूल व खर्चातील फरक ७.०१ लाख कोटी रुपयांवर आला आहे.
  • वर्ष २०१८-१९ साठी सरकारने वित्तीय तुटीचे लक्ष्य सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ३.३ टक्के किंवा ६.२४ लाख कोटी रुपये इतके निश्चित केले होते.
  • २०१९-२०च्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने वित्तीय तुटीचे सुधारित लक्ष्य सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ३.४ टक्के किंवा ६.३४ लाख कोटी रुपये इतके निश्चित केले आहे.
  • चालू आर्थिक वर्षांत डिसेंबर २०१८पर्यंत एकूण महसुली उत्पन्न १०.८४ लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेत हे ६२.८ टक्के आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ६६.९ टक्के होते.
  • सध्याच्या वर्षातील महसूल प्राप्तीचे लक्ष्य २०१९-२०च्या अंतरिम अर्थसंकल्पात आधीच्या १७.२५ लाख कोटी रुपयांवरून वाढवून १७.२९ लाख कोटी करण्यात आले आहे.
  • कर संकलनाद्वारे झालेले एकूण महसुली उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ६३.२ टक्के आहे. मागील वर्षी ते ७३.४ टक्के होते.
  • डिसेंबर अखेरीस सरकारचा एकूण खर्च १८.३२ लाख कोटी रुपये (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ७५ टक्के) आहे.
  • नवीन वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) मधून अपेक्षेपेक्षा कमी गोळा होत असलेला महसूल आणि एकंदरीत उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ यामुळे वित्तीय तूट यंदा फुगत चालली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान एफडीआयची स्थिती

  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २०१८-१९च्या एप्रिल ते सप्टेंबर कालावधीसाठी थेट परकीय गुंतवणुकीशी (एफडीआय) संबंधित माहिती प्रसिद्ध केली आहे.
  • यातील काही मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
  • एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान भारतातील थेट परकीय गुंतवणूकीत ११ टक्क्यांची घट होऊन, ती २२.६६ अब्ज डॉलर्स इतकी झाली.
  • २०१७-१८ आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर कालावधीसाठी थेट परकीय गुंतवणूक २५.३५ अब्ज डॉलर्स होती.
  • एप्रिल-सप्टेंबर २०१८-१९ दरम्यान भारतात सर्वाधिक एफडीआय, सेवा (४.९१ अब्ज डॉलर), कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर (२.५४ अब्ज डॉलर), टेलिकम्युनिकेशन (२.१७ अब्ज डॉलर), व्यवसाय (२.१४ अब्ज डॉलर), रसायने (१.६ अब्ज डॉलर) आणि वाहने (१.५९ अब्ज डॉलर) या क्षेत्रांमध्ये आला आहे.
  • एप्रिल-सप्टेंबर २०१८-१९ दरम्यान ८.६२ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह सिंगापूर भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश ठरला.
  • सिंगापूर खालोखाल मॉरिशस (३.८८ अब्ज डॉलर), नेदरलँड (२.३१ अब्ज डॉलर), जपान (१.८८ अब्ज डॉलर) अमेरिका (९७० दशलक्ष डॉलर) व युनायटेड किंगडम (८४५ दशलक्ष डॉलर) हे सर्वात मोठे गुंतवणूकदार देश आहेत.
  • वर्ष २०१७-१८दरम्यान थेट परकीय गुंतवणूक ५ वर्षांच्या किमान वृद्धीसह ३ टक्क्यांनी वाढून ४४.८५ अब्ज डॉलर्स होती.
  • एफडीआयच्या घटलेल्या वृद्धी दराचा प्रतिकूल परिणाम देशाच्या व्यापारतोलावर आणि रुपयाचे मूल्यावर होण्याची शक्यता आहे.

विजय माल्याच्या प्रत्यार्पणास युके गृहसचिवांची मान्यता

  • युनायटेड किंग्डमच्या गृहसचिवांनी विजय माल्याचे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय विजय माल्यावर ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
  • अलीकडेच त्याला नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित झालेला तो देशातील पहिलाच आरोपी आहे.
  • विजय माल्या यांनी १७ भारतीय बँकांकडून सुमारे ९ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. १७ मार्च २०१६ रोजी या १७ बँकांनी विजय माल्याला भारत सोडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
  • परंतु त्यापूर्वीच विजय माल्या देशातून पलायन करून युनायटेड किंगडमला गेला होता. फेब्रुवारी २०१८मध्ये भारत सरकारने माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती.
  • विजया माल्यावर आयकर विभाग व केंद्रीय अन्वेषण विभाग वित्तीय फसवणूक आणि मनी लॉंडरिंगसारख्या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.
  • एप्रिल २०१७मध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या मागणीवरून स्कॉटलंड यार्डने मल्ल्याला अटक केली होती. परंतु तो जामिनावर सुटला होता.
  • ९ मे २०१७रोजी सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते.

व्हेनेझुएलामधील राजकीय व आर्थिक अस्थिरता

  • दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियन गणराज्य व्हेनेझुएला राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या गर्तेत गेला आहे.
  • एकीकडे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरूद्ध जनआंदोलन होत असून, विरोधी नेते जुआन गुएडो यांनी स्वतःला ‘हंगामी अध्यक्ष’ घोषित केले आहे.
  • तर दुसरीकडे व्हेनेझुएलात सत्ताबदल झाला नाही, तर तेथे लष्करी कारवाई करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
  • युरोपीय महासंघाच्या १९ देशांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि लोकशाही मार्गाने अध्यक्षीय निवडणुकीचे आवाहन करत गुएडो यांना समर्थन देणाऱ्या संयुक्त घोषणेवर स्वाक्षरी केली होती.
  • तसेच १४ सदस्यीय लीमा गटाच्या समुहाने कॅनडामधील ओटावा शहरातील एका बैठकीनंतर १७ सूत्री घोषणापत्र प्रसिद्ध केले असून, यानुसार १४ पैकी ११ देशांनी व्हेनेझुएलामध्ये तत्काळ सत्तांतराचे आवाहन केले होते.
  • मादुरो यांनी नव्याने निवडणूक घेण्यास नकार दिल्याने युरोपीय महासंघाचे १९ सदस्य देश तसेच लीमा गटाचे ११ दक्षिण अमेरिकन देश यांनी जुआन गुएडो यांना देशाचे हंगामी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
  • यामुळे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असलेले निकोलस मादुरो यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.
पार्श्वभूमी
  • व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे निकटवर्ती व उपराष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हाती एप्रिल २०१३मध्ये सत्ता आली.
  • तेव्हापासून आजपर्यंत ते सत्तेवर आहेत. चावेझ यांच्या कारकीर्दीत ते व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री व उपाध्यक्ष होते.
  • २०१८मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ६७ टक्के मतांसह मादुरो यांनी विजय मिळविला होता. जानेवारी २०१९मध्ये २०१९ ते २०२५ या काळाकरता त्यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती.
  • निकोलस मादुरो यांचा हा अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ असून, निवडणुकीत मतांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे मादुरो यांच्याविरोधात देशात निदर्शने होत असून, यामुळे व्हेनेझुएलामध्ये तणाव वाढला आहे.
  • या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांनी मादुरो यांना थेट आव्हान देत स्वतःला हंगामी अध्यक्ष घोषित केले होते.
  • देशाच्या घटनेच्या कलम २ अंतर्गत राष्ट्रीय संसदेच्या नेत्याला तात्पुरत्या स्वरुपात सत्ता हातात घेत निवडणुकीची घोषणा करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद गुएडो यांनी केला आहे.
  • गुएडो यांना अमेरिका तसेच दक्षिण अमेरिकन देशांनी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. युरोपीय देश देखील गुएडो यांच्या समर्थनार्थ सरसावले आहेत. तर रशिया आणि चीनने निकोलस मादुरो यांची पाठराखण केली आहे.
व्हेनेझुएला
  • व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. याची राजधानी काराकास आहे. या देशाचे चलन बोलीवर आहे.
  • व्हेनेझुएलाला ५ जुलै १८११ रोजी स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले तर १३ जानेवारी १८३० रोजी तो ग्रान कोलंबियाकडून स्वतंत्र झाला. त्याच्या स्वातंत्र्याला २९ मार्च १८४५ रोजी मान्यता देण्यात आली.
  • दीर्घकाळापासून व्हेनेझुएला आर्थिक संकटाला तोंड देत असून महागाई तसेच औषधांच्या कमतरतेमुळे मोठ्या संख्येने लोक देशातून पलायन करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा