चालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१४

·        उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. अझिझ कुरेशी यांची मिझोरम राज्यपालपदी बदली, तर मेघालयचे राज्यपाल डॉ. कृष्णकांत पॉल यांची उत्तरखंडच्या राज्यपालपदी, तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना पुढील आदेश मिळेपर्यंत पदमुक्त करण्यात आले आहे.
·        ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताचा सर्वातMS Dhoni यशस्वी कसोटी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
·        वनडे आणि टी-२० कडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे धोनीने सांगितले.
·        धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीत ९० कसोटी सामन्यांमधून ४ हजार ८७६ धावा तडकावल्या आहेत. त्याच्या नावावर ६ शतकं, ३१ अर्धशतकांची नोंद आहे. २२४ ही त्याची वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईत त्याने ही खेळी केली होती.
·        दरम्यान, धोनीच्या राजीनाम्यामुळे ६ जानेवारीला सुरू होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या सिडनी कसोटीचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे.
·        इंडोनेशियाच्या हवाई हद्दीतून रविवारी बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानातील ४० प्रवाशांचे मृतदेह आढळले आहेत.
·        इंडोनेशियातून उड्डाण केल्यानंतर ज्या ठिकाणी हे विमान अखेरचे दिसले, तेथील समुद्रातच हे मृतदेह तरंगताना आढळल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
·        अमेरिकेने पाकिस्तानला ५३ कोटी २ लाख डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली. ‘केरी-लुगर २०१०’ या करारानुसार ही मदत देण्यात आली आहे.
·        ऊर्जा, दहशतवादविरोधी कारवाया आर्थिक विकास, सामाजिक सलोखा, शिक्षण आणि आरोग्य सोयींसाठी मदत देण्यात आली आहे.
·        आतापर्यंत पाकिस्तानला साडेतीन अब्ज डॉलरची मदत मिळालेली आहे. तसेच येत्या पाच वर्षांत साडेसात अब्ज डॉलरची मदत दिली जाईल.
·        जानेवारी २०१५मध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी पाकिस्तान दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मदत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
·        मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात विदर्भ विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प आणि विदर्भातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी अनेक योजनांचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. ते खालील प्रमाणे....
१.    अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाईल पार्क बनवणार
२.    फळप्रक्रिया उद्योगांना चालना देणार
३.    अकोला विमानतळाचा निर्णय होऊन कृषी विद्यापीठ जमीन देत नाही, एक महिन्यात जमीन अधिग्रहित करणार
४.    अमरावती मौजा बेलोरा येथे विमानतळावर मोठी धावपटी तयार करणार
५.    विमानतळावर नाईट लँडिंग संदर्भात प्रयत्न करणार
६.    पुढील २ वर्षात २ हजार कोटींची गुंतवणूक आणणार
७.    नागपुरात अत्याधुनिक कृषी मार्केट तयार करणार
८.    विदर्भात बदली झाल्यानंतर कामावर हजर होणार नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
९.    राज्य महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यासंदर्भात कारवाई सुरु करणार
१०.     महिन्यातील २ दिवस विदर्भाच्या निर्णयासाठी राखीव
११.     सगळ्या नगर परिषदांमधील सीइओचे पद भरणार
१२.     इको टुरीझमच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करवून देण्यासंदर्भात आराखडा तयार करणार
१३.     लोणार सरोवराला वर्ल्ड हेरिटेज घोषित करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु
१४.     NIT च्या जागी नागपूर क्षेत्र विकास प्राधिकरणची स्थापना करणार
१५.     पूर्व विदर्भातील मालगुजारी तलावातील गाळ काढून तेथील जमिनी सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करणार
१६.     सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामाला प्राधान्य देण्यात येइल.
·        मराठी माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचे नेते गंगाराम तळेकर यांचे २९ डिसेंबर रोजी रात्री सवा दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
·        तळेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे डबेवाल्यांना धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून डबेवाल्यांनी ३० डिसेंबर मंगळवार रोजी कामबंद ठेवले.
·        तळेकर यांच्या पार्थिवावर पुणे जिल्ह्यातील गडद या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
·        मूळचे पुणे जिल्ह्यातील असलेल्या तळेकर यांचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले होते. कायम पांढरा झब्बा, लेंगा आणि गांधी टोपी अशा मराठमोळ्या वेषात वावरणाऱ्या तळेकर यांनी कॉर्पोरेट जगाला मॅनेटमेंटचे धडे दिले होते. त्यासाठी ते अनेक देशांत फिरले होते.
·        इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स चार्लस् याने तळेकर यांना इंग्लंडला बोलावून त्यांचा खास सन्मान केला होता. अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून गंगाराम तळेकर हे रघुनाथ मेदगे यांच्यासह उपस्थित होते.
·        बेंगळुरूत रविवारी झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात हाय अॅलर्ट घोषित केला. शहरातील गस्तीत वाढ करण्यात आली असून, ३१ डिसेंबरसाठी वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
·        शहरातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, सुमारे ४६ हजार पोलिस शहरात तैनात असतील. सार्वजनिक-धार्मिक स्थळांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
·        मुंबईच्या सुरक्षेसाठी....
१.    पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
२.    सुमारे ४६ हजार पोलिस तैनात असणार
३.    शहरातील मोक्याच्या ठिकाणी फोर्सवन, शीघ्र कृती दलाच्या तुकड्या
४.    राज्य राखीव सुरक्षा दलाच्या २० तुकड्या
५.    बंदोबस्तासाठी ११०० होमगार्ड
६.    बॉम्ब शोधक- नाशक पथकाची १४ पथके
७.    सार्वजनिक-धार्मिक स्थळांवर विशेष लक्ष
·        सरकारी तसेच खासगी क्षेत्राच्या प्रकल्पांसाठी विनासायास जमीन अधिग्रहीत करणे शक्य व्हावे, म्हणून आज मोदी मंत्रिमंडळाने विकासाच्या मार्गात अडसर ठरलेल्या भूसंपादन कायद्यातील अनेक  जाचक तरतुदींना वगळणाऱ्या अध्यादेशाला मंजुरी दिली.
·        भूसंपादनासाठी कलम १०५ (३) अंतर्गत व्यापकपणे वापरल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या १३ कायद्यांशिवाय संरक्षण आणि संरक्षण उत्पादन, विद्युतीकरणासारख्या ग्रामीण पायाभूत सुविधा, स्वस्त तसेच गरिबांसाठी घरे, औद्योगिक कॉरिडॉर आणि सामाजिक पायाभूत सुविधा अशा पाच उद्देशांसाठीही जमीन अधिग्रहणासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
·        आपल्या युजर्सना सातत्याने नवीन काही देणाऱ्या फेसबुकने सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘इयर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र, फेसबुकने दिलेल्या या भेटीमुळे अनेकांना मनस्ताप झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेसबुकने आपल्या युझर्सची माफी मागितली आहे.
·        विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे यासाठी प्रस्तावित असणाऱ्या विधेयकावर केंद्र सरकारने नुकताच वटहुकूम काढला. त्यामुळे विमा क्षेत्रात आगामी नव्या वर्षात ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
·        श्रीलंकेत होणाऱ्या निवडणुकांमध्ये अभिनेता सलमान खान श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्रा राजपक्षे यांचा प्रचार करणार आहे.
·        सरकारने २० वर्षांनंतर पुन्हा एक रुपयाच्या नोटा छापण्याचाOne ruppe निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे. या नोटेवर सध्याचे वित्त सचिव राजीव महर्षी यांची स्वाक्षरी असेल
·        ९.७ सेंटिमीटर लांब व ६.३ सेंटिमीटर रुंद या नोटेवर वॉटरमार्कमध्ये सत्यमेव जयतेविना अशोक स्तंभाचे चित्र असेल. मध्यभागी सामान्यत: न दिसणारा -१- आकडा असेल. उजवीकडे ‘भारत’ शब्द छापलेला असेल. समोरील भाग गुलाबी व हिरव्या रंगाच्या छटांचा असेल.
·        केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अपंग व्यवहार विभागाचे नाव आता अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग असे करण्यात आले आहे. या संदर्भातील राजपत्रित अधिसूचना केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
·        म्यानमार देशाची आर्थिक राजधानी यांगूनमधील नागरिकांनी तब्बल ६० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर २७ डिसेंबर रोजी पहिल्या पालिका निवडणुकीत मतदान केले.
·        सरकार देशभरात एक जानेवारीपासून एलपीजी गॅसची सबसिडी थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेची सुरुवात करत आहे. त्याच्या प्रचार-प्रसाराचे महत्त्वपूर्ण काम पेट्रोलियम मंत्रालयाचे विशेष पोर्टल mylpg.in करत आहे.


चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१४

·        बेंगळुरूमधील प्रसिद्ध चर्च स्ट्रीट येथे रविवार २९ डिसेंबर रोजी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाला आहे.
·        या बॉम्बस्फोटामध्ये एक महिला मृत्युमुखी पडली. याशिवाय आणखी एक जण जखमी झाला आहे.
·        स्फोटात बळी पडलेल्या भवानी देवी (३७) यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
·        हा बॉम्बस्फोट ISIS चा ट्विटर हॅंडलर मेहदी मसरूर बिस्वास याच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा घडवण्यात आला असावा, असा संशय खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केला आहे.
·        जगभरात फैलाव झालेल्या इबोला या जीवघेण्या रोगाला रोखणाऱ्या लसीची निर्मिती रशियाच्या संशोधकांनी केली आहे. लवकरच या लसीची चाचणी आफ्रिकेत इबोलाच्या रुग्णांवर घेण्यात येणार आहे.
·        रशियातील सेंट पिट्सबर्ग येथील ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एन्फ्लुएन्झा’ मधील शास्त्रज्ञांच्या गटाने इबोलारोधक लस तयार केली आहे. या लशीच्या चाचण्या घेण्याचे काम आफ्रिकेत सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात त्या पूर्ण होतील.
·        ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्ट’नुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत भारताची क्रमवारी १५ने घसरून ८३ झाली आहे. World Economic Forum
·        वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे (डब्ल्यूईएफ) २००२ पासून जगभरातील देशांमधील तंत्रज्ञान उपलब्धता, पायाभूत सोयीसुविधा, मनुष्यबळ यांचा आढावा घेऊन ‘नेटवर्क रेडीनेस इंडेक्स’ प्रसिद्ध केला जातो. यावरून तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमध्ये जागतिक पातळीवरील विविध देशांच्या परिस्थितीचा अंदाज येतो.
·        सन २०१४च्या अहवालानुसार या क्रमवारीत भारत ८३व्या स्थानावर घसरला आहे. गेल्यावर्षी या क्रमवारीत भारत ६८व्या स्थानी होता.
·        फिनलँड, सिंगापूर, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे हे देश या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकांवर आहेत.
·        ‘ब्रिक्स’ देशांमध्येही (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) भारत सर्वात पिछाडीवर आहे. एकूण १४८ देशांचा या यादीमध्ये समावेश आहे.
·        लोकपाल कायद्यात अधिसूचित केलेल्या नव्या नियमानुसार देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःसह पत्नी आणि मुलांच्या नावे परदेशातील बँक खात्यात ठेवलेल्या पैशांचा तपशील जाहीर करावा लागणार आहे.
·        कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी या संदर्भात नवा फॉर्म जारी केला आहे. त्यात स्वतः कर्मचारी, त्याची पत्नी आणि मुले यांची संपत्ती, तसेच देणी यांचा तपशील द्यावा लागेल.
·        सरकारी कर्मचारी अधियम, २०१४ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्याची पत्नी, तसेच त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, देणी या बद्दलची माहिती ३० एप्रिल २०१५ पर्यंत द्यावी लागेल.
·        नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमातळावर जेट एअरवेजच्या विमानाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ही आग किरकोळ असून विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
·        अमेरिका आणि ‘नाटो’च्या सैन्याने रविवारी अधिकृतपणे अफगाणिस्तान युद्धाला पूर्णविराम दिला. काबूल येथील लष्करी मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमानंतर याची घोषणा करण्यात आली.
·        ११ सप्टेंबर २००१ मध्ये अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर पाडल्यानंतर, अमेरिकेने अल-कायदाला आश्रय देणाऱ्या तालिबान सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य उतरविले होते. यामुळे अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तब्बल १३ वर्षांच्या हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळाला.
·        आता १ जानेवारीपासून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल सिक्युरिटी इसिस्टंस फोर्स अफगाणिस्तानात कार्यरत राहणार आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याला तालिबानी दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी केवळ सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका ही फोर्स पार पाडणार आहे.
·        त्यात १३ हजार ५०० सैनिकांचा समावेश असणार असून, त्यातील बहुतांश अमेरिकेचे सैनिक असतील.
·        दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातDubai film festival देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ यंदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
·        आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गात विश्वविक्रम केला आहे.
·        नाशिकच्या कविता राऊतने २५ किलोमीटर अंतराच्या पहिल्यावहिल्या कोलकाता मॅरेथॉनमध्ये महिला गटात सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कविताने ही शर्यत १ तास ३३ मिनिटे आणि ३९ सेकंदांत पूर्ण केली.
·        शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जळगावच्या विजय चौधरीने पुणे जिल्ह्याच्या सचिन येळभरचा अवघ्या एक गुणाने पराभव करीत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान पटकावला.
·        ५८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजय ४१ वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
·        आसाममधील बोडो दहशतवाद्यांच्या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी केंद्र आणि आसाम राज्य सरकारने आता संयुक्‍त लष्करी कारवाईला प्रारंभ केला असून, आसाम रायफल्स, निमलष्करी दले आणि आसाम पोलिस यांनी “ऑपरेशन ऑल आउट” ही मोहीम सुरू केली आहे.
·        जगात सर्वांत मोठे सर्चइंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलच्या बहुचर्चित स्वयंचलित कार ‘गुफी’चे गेल्या आठवड्यात सादरीकरण करण्यात आले आहे.
·        गुगलने तयार करण्यात आलेल्या या मोटारीचा हा नमुना असून, नव्या वर्षात या मोटारीची चाचणी सॅन फ्रॅन्सिस्को येथील बे एरियामध्ये सार्वजनिक रस्त्यांवर केली जाणार आहे.
·        बाबरी मशीदप्रकरणातील सर्वात वयोवृद्ध याचिकाकर्ते मोहम्मद फारूक यांचे येथे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी ते एक होते.
·        दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलेले व “एक दुजे के लिए”या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक के. बालचंदर यांचे नुकतेच निधन झाले.
·        तमिळ चित्रपटसृष्टीमधील पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते.
·        चित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०१०मध्ये सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

चालू घडामोडी - २७ व २८ डिसेंबर २०१४

·        भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवार २८ डिसेंबर रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला धुक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहू शकले नाहीत.
·        झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४२ जागा मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. झारखंडमध्ये प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रघुवर दास यांची मुख्यमंत्रिपदी भाजपकडून निवड करण्यात आली होती.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी त्यांना देण्यात आलेल्या संरक्षणासंदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेली माहिती देण्यास मेहसाणा पोलिसांनी नकार दिला आहे.
·        संबंधित चौकशी स्थानिक गुप्तचर खात्याअंतर्गत येत असल्याने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत येत नाही, असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले आहे.
·        संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार एक वर्षाच्या आत, म्हणजे १ जानेवारी २०१५ पूर्वी १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करणे अनिवार्य आहे.
·        आज जलद संपर्काचे माध्यम बनलेला ईमेल २७ डिसेंबर रोजी ३२ वर्षांचा झाला. मात्र आजच्या काळातील संदेशवहनाचे महत्त्वाचे माध्यम झालेला हा ईमेल म्हणजे मुंबईत जन्मलेल्या एका अमेरिकन-भारतीयाने जगाला दिलेली देणगी आहे.
·        व्ही. ए. शिवा अय्यादुराई या भारतीय-अमेरिकनानेच १९७८ मध्ये ईमेलचा शोध लावला होता आणि त्यावेळी ते जेमतेम १४ वर्षांचे होते.
·        भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टिचितचा नवा विक्रम नोंदवला. त्याच्या नावावर कसोटी, वन-डे व टी-२० क्रिकेटमध्ये मिळून ४६० डावांमध्ये १३४ यष्टिचित जमा आहेत. ३३ वर्षीय धोनीने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला (४८५ डावांमध्ये १३३ यष्टि.) मागे टाकले.
·        रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर मिचेल जॉन्सनला यष्टिचित बाद करून त्याने हा विक्रम नोंदवला.
·        या यादीत श्रीलंकेचाच रोमेश कालुवितरणा (२७० डावांमध्ये १०१ यष्टि.) तिसऱ्या स्थानावर आहे. नयन मोंगिया या यादीत दहाव्या स्थानावर आहे. धोनीने कसोटीत ३८, वन-डेत ८५ आणि टी-२०त ११ फलंदाजांना यष्टिचित केले आहेत.
·        गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे डावखुरा स्पिनर प्रज्ञान ओझावर आयसीसीने बंदी घातली आहे. त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.
·        चेन्नईतील आयसीसीच्या सेंटरमध्ये ओझाच्या शैलीची तपासणी झाली होती, त्यात त्याच्या गोलंदाजीची शैली आयसीसीच्या नियमात बसणारी नसल्याचे स्पष्ट झाले. शैलीत सुधारणा करेपर्यंत ओझा गोलंदाजी करू शकत नाही.
·        एअर एशियाचे इंडोशेनियाहून सिंगापूरच्या दिशेने जाणारे क्यु झेड - ८५०१ क्रमांकाच्या ‘एअरबस ३२०-२००’ प्रकारातील विमान अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
·        विमानात एकूण १६२ प्रवासी असून त्यात १४९ इंडोनेशियन, ३ कोरियन तसेच सिंगापूर, ब्रिटन आणि मलेशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.
·        सोनी पिक्चरच्या ‘द इंटरव्ह्यू’ या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले आहे. कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये हल्ले होण्याच्या भीतीने सोनी पिक्चरने हा चित्रपट मागे घेतला होता.
·        मात्र, ओबामा यांच्या पुढाकाराने हा चित्रपट गेल्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला. पाठोपाठ कोरियातील इंटरनेट सेवा काही काळासाठी विस्कळित झाली होती.
·        अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादाने आणखी खालची पातळी गाठली आहे. कोरियाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची तुलना माकडाशी केली असून, या सर्व कटामागे ओबामाच असल्याचा आरोप केला आहे.
·        अमेरिकेनेच इंटरनेट विस्कळीत केल्याचा आरोप उत्तर कोरियाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाच्या संरक्षण समितीची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर या समितीचा प्रवक्ता म्हणाला, ‘या प्रकरणाच्या पाठीशी ओबामाच आहे. ओबामा सतत अस्वस्थ होत असतात. आणि त्यानंतर विषुववृत्ताच्या जंगलांमधील माकडांसारखे वर्तन करत असतात.’ कोरियाकडून या आधीही ओबामा यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.
·        पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर सद्दाम याला पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे. तर त्याच्या एका साथिदाराला पकडण्यात आले आहे.
·        चीनमधील वेंझोऊ या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे. हा पश्चिमेकडील उत्सव असल्याने तो साजरा करण्यास चीनमध्ये विरोध होऊ लागल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
·        अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (बुश सीनिअर) यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते ९० वर्षांचे आहेत.
·        सीनिअर बुश यांना मंगळवारी रात्री धाप लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ह्युस्टन मेथडॉलॉजिस्ट हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.