न्या. टहलियानी महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त
- मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
- राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून न्या. टहलियांनी यांना राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शपथ दिली.
- २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला २०१० साली न्या. टहलियानी यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी शिक्कामोर्तब केले होते. तसेच न्या. टहलियानी यांनी दिलेल्या निकालाची प्रशंसाही केली होती.
- राज्याचे माजी लोकायुक्त पी.व्ही. गायकवाड गेल्या वर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले होते. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे तब्बल चार हजाराहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत.
स्वच्छ भारत अभियानाच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांचा राजीनामा
- नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे.
- १९८०च्या गुजरात बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या विजयालक्ष्मी जोशी या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिव होत्या. त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशनचा कार्यभारही सोपवण्यात आला होता.
- जोशी यांच्या निवृत्तीसाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक होता. मात्र त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. केंद्र सरकारनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
- जोशी यांचे पती व माजी आयएएस अधिकारी जी. पी. जोशी यांनीदेखील २००८ मध्ये स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती.
- याआधी गृहसचिव एल. सी. गोयल यांनीही सरकारकडं स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र, इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या मुख्य संचालकपदाची जबाबदारी देऊन त्यांना थांबवण्यात आले.
चीनचे लष्करी सामर्थ्याचं शक्तिप्रदर्शन
- दुसऱ्या महायुद्धात चीनने जपानवर मिळवलेल्या विजयाला ३ सप्टेंबर २०१५ रोजी ७० वर्षे पूर्ण झाली असून हा विजयदिवस चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचं शक्तिप्रदर्शन घडवत साजरा केला.
- यावेळी चीन येत्या काळात तीन लाख सैनिकांची कपात करणार आहे, अशी घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली. चीनकडे सध्या २० लाखांवर सैनिकांचं बळ आहे. १९८० नंतर चिनी सैन्याच्या संख्येतील ही चौथी कपात असेल.
- चीन आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर १४५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका अवाढव्य खर्च करतो. जगात अमेरिकेनंतर लष्करावर खर्च करणारा चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लष्कराचा आकार छोटा करून आधुनिक शस्त्रांचा वापर वाढवून आधुनिकीकरण करण्यावर चीनने भर दिला आहे.
- चीनने थिनमेन स्क्वेअरवर आयोजित केलेल्या भव्यदिव्य अशा परेडला रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क-जीन-हाई, भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्यासह विविध ३० देशांचे खास दूत उपस्थित होते.
- आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, रणगाडे, ड्रोन्स आणि इतर लष्करी साहित्य हे या परेडचा भाग होते. सुमारे २०० लढाऊ जेट विमानांनी आकाशात झेप घेतली. पाकिस्तान व रशियासह १७ देशांमधील १ हजार विदेशी सैनिक सहभागी झालेली आणि दीड तास चाललेली ही परेड सुमारे ४० हजार प्रेक्षकांनी पाहिली.
- ‘कॅरियर किलर्स’ असे वर्णन करण्यात आलेले ‘डाँगफेंग-२१ डी’ हे जहाजभेदी आंतरखंडीय क्षेपणास्त्र या परेडचे मुख्य आकर्षण होते. १७०० किलोमीटर अंतरावरून विमानवाहक जहाजे उडवून देण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
- जिंगपिंग यांनी सैन्याची सलामी स्वीकारल्यानंतर चीन हा शांतताप्रिय देश आहे. शांतता प्रस्थापित करून विकासाच्या मार्गाने पुढे जायचं हे चीनचे धोरण राहिलं आहे आणि यापुढेही राहिल, असं प्रतिपादन केलं.
राष्ट्रकुल पथदीप घोटाळा
- राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी पथदीप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात दिल्ली महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांसह पाचजणांना चार वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास सहा वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
- २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धात आरोपींना शिक्षा झालेला हा पहिलाच खटला आहे. इतर प्रकरणे अजून बाकी आहेत. राष्ट्रकुल पथदीप घोटाळ्यात सरकारला १.४२ कोटी रुपयांचा फटका बसला होता.
- सीबीआयचे विशेष न्यायाधीश ब्रिजेश गर्ग यांनी दिल्ली महापालिकेचे अधीक्षक अभियंता डी. के. सुगन, कार्यकारी अभियंता ओ. पी. महला, लेखापाल राजू व्ही व निविदा लिपीक गुरुशरण सिंग, स्वेका पॉवरटेक इंजिनियरिंग प्रा. लि. चे संचालक जे. पी. सिंग यांना चार वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा दिली.
- संबंधित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टी. पी. सिंग यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
आंध्रात ‘हायवे’वर विश्रांती कक्ष
- राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी आंध्र प्रदेशामधील महामार्गांवर दर शंभर किलोमीटरमागे एक विश्रांती कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालकांसाठी असणाऱ्या या 'रेस्ट रूम'मध्ये लाउंज, प्रसाधनगृहे व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
- रस्ते सुरक्षा विभागाच्या बैठकीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या निर्णयाची घोषणा केली.
- आंध्र प्रदेशमधील महामार्गांवरील वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी सरकारतर्फे १० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात येणार आहे.
जगात तीन हजार अब्ज वृक्ष
- नुकत्याच झालेल्या एका पाहणीत जगभरातील वृक्ष मोजले गेले आणि त्यांची संख्या आहे ३.०४ हजार अब्ज असल्याची माहिती समोर आली आहे. या संशोधनाबाबतचा वृत्तांत 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकेच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
- येल विद्यापीठातील वनस्पती अभ्यासक थॉमस क्राउदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगाच्या विविध भागांमधील ४ लाख २९ हजार ७७५ ठिकाणी वृक्ष मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा वापरली. यामध्ये काही लाख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
- उपग्रहांच्या माध्यमातून वृक्षांची गणना करण्यात आली. त्याबाबतची छायाचित्रे संशोधनासाठी ग्राह्य धरण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा