चालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५


दिनविशेष

  • ५ सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन
    भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस

‘एक श्रेणी एक वेतन’ योजना लागू

    One Rank One Pension
  • तब्बल चार दशकांपासून रखडलेली माजी सैनिकांची ‘एक श्रेणी एक वेतन’ ची (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) मागणी मान्य करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.
  • समान पदावर आणि समान काळ काम करणाऱ्या व्यक्तीला समान निवृत्तीवेतन मिळावे. हे वेतन देताना निवृत्तीची तारीख विचारात घेतली जाऊ नये, अशी निवृत्त सैनिकांची मागणी होती.
  • गेल्या ४२ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते. मात्र, भाजप सत्तेवर येऊन १५ महिने उलटल्यानंतरही यावर काहीच निर्णय होत नसल्याचं पाहून माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले होते.
  • चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीवर दरवर्षी ८ ते १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
 अशी लागू होईल योजना... 
  • १ जुलै २०१४ पासून लागू होणार ‘वन रँक वन पेन्शन’
  • २०१३ हे वर्ष या योजनेचे आधार वर्ष (बेस इयर) असेल.
  • दर पाच वर्षांनी एक सदस्य समितीद्वारे योजनेचा आढावा घेतला जाईल.
  • माजी सैनिकांना मागील थकीत पेन्शन पुढील दोन वर्षांत चार हप्त्यांमध्ये विभागून देणार.
  • शहीद व मृत सैनिकांच्या विधवांना थकबाकीची रक्कम एकरकमी देणार.
  • स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांना ही योजना लागू होणार नाही.
  • निवृत्तीवेतनाच्या पुनर्मुल्यांकनासाठी एक सदस्यीय न्यायालयीन समिती नेमणार.
 निवृत्ती वेतनासाठीचे नियम 
  • सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या ५० टक्के. (यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्यक)
  • विशेष कुटुंब निवृत्तिवेतन (कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)  : अखेरच्या पगाराच्या ६० टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.
  • सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये
  • अपंग निवृत्तिवेतन (शंभर टक्के अपंग असल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,१०० रुपये 
  • उदार कुटुंब निवृत्तिवेतन (अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास) : अखेरच्या पगाराइतके.
  • युद्धजखमी निवृत्तिवेतन (युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास) : शेवटच्या पगाराइतके.
 माजी सैनिकांचा खालील धोरणांना विरोध 
  • सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना लागू होणार नाही. 
  • तसेच पाच वर्षांनी एक सदस्यीय समिती पेन्शनच्या रकमेत बदल करण्याबाबत विचार करणार आहे.
  • पेन्शन आढावा समितीला प्रत्येकवेळी सहा महिन्यांची मुदत देणार आहे.
 सैनिकांच्या मागण्या 
  • १ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी.
  • चाळीस टक्के सैनिक सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना ओआरओपी लागू केलीच पाहिजे.
  • पेन्शनचा आढावा घेऊन रकमेत बदल करण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी तीन माजी सैनिक, एक कार्यरत सैनिक आणि एक सरकारी प्रतिनिधी अशी पाच जणांची समिती स्थापन करावी.
  • पेन्शन आढावा समितीला सहा ऐवजी एकाच महिन्याची मुदत द्यावी.
  • कोणत्याही परिस्थितीत ज्युनिअर सैनिकाला सिनिअर सैनिकापेक्षा जास्त पेन्शन देऊ नये.
सरकारच्या ‘वन रँक वन पेन्शन’ बाबतच्या धोरणात बदल होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे माजी सैनिकांच्या संघटनेने जाहीर केले आहे.

चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात

    Fourth Vishva Marathi Sahitya Sammelan
  • ५ सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झाली.
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’  भरविण्यात येणार आले आहे.
  • टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या संमेलनासाठी प्रा. शेषराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
 चौथ्या विश्व साहित्य संमेलनाबद्दल... 
  • अध्यक्ष : प्रा. शेषराव मोरे
  • कालावधी : ५ व ६ सप्टेंबर २०१५
  • आयोजक : ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ आणि ‘महाराष्ट्र मंडळ’
  • उद्घाटक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
  • स्वागताध्यक्ष : खासदार राहुल शेवाळे
  • विशेष उपस्थिती : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह
संमेलनातील इतर कार्यक्रम
  • सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारीत कार्यक्रम
  • निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य
  • सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान
  • ‘मला उमगलेले सावरकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद
  • उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघड्याच्या निनादात, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढली गेली.
यापूर्वीची विश्व मराठी साहित्य संमेलने
वर्ष
ठिकाण
अध्यक्ष
पहिले (२००९)
सॅनफ्रॅन्सिको
डॉ. गंगाधर पानतावणे
दुसरे (२०१०)
दुबई
मंगेश पाडगांवकर
तिसरे (२०११)
सिंगापूर
महेश एलकुंचवार

कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना

    Telecom Regulatory Authority in India
  • मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
  • सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते. एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.
  • ‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.

पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाच देशांच्या मदतीने प्रकल्प उभारणी

  • पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद शहरातील विकासकामाच्या नावाखाली, पाकिस्तान सरकारने पाच देशांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. या पाच देशांमध्ये चीनबरोबरच दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि तुर्कस्तानचा समावेश आहे.
  • काश्मीर खोऱ्यात २००५मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मुजफ्फराबादचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीसाठी या देशांची मदत घेण्यात आली आहे.
  • या शहरामध्ये चीनचे ३००० आणि दक्षिण कोरियाचे ३०० कामगार दाखलही झाले आहेत. या परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
  • या प्रदेशामध्ये दक्षिण कोरियाने १०० मेगावॉटचे दोन, ८९ मेगावॉटचा एक जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला आहे, तर चीनच्या मदतीने झेलम नदीवर ११०० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे. ९६९ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
  • या परिसरात सौदी अरेबिया विद्यापीठ बांधत असून, हे विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात एका इमारतीत सुरू झाले आहे.

झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवतावादी पदक

    Jhumpa Lahiri
  • पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी (National Humanities Medal) निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
  • मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
  • पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले आहे.
 झुम्पा लाहिरी यांच्याबद्दल... 
  • झुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्ये एका बंगाली कुटुंबामध्ये झाला आहे.
  • या लेखिकेची इंटरप्रिटर ऑफ मालदीवज, द नेमसेक, द लोलॅंड इत्यादी पुस्तके भारतात आणि परदेशात ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.
  • त्यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात पुलित्झर पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. तसेच त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट बनवला आहे.

फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत १५५व्या स्थानावर

  • फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत १५५व्या स्थानावर पोहोचले आहेत.
  • फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती.
  • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

ओडिशातील व्हिलर द्विपला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

  • जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
  • बीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.
  • व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक

सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

  • सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर २०१५ रोजी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं.
  • आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.  ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’, ‘देव’ यासरख्या  जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा