भारत पाकिस्तान दरम्यान सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालक स्तरीय पाच दिवसांच्या चर्चेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
लपून गोळीबार करण्यासह जम्मू- काश्मीरमधील शस्त्रसंधी भंगाच्या घटना, घुसखोरी, कच्छच्या रणमधील अतिक्रमण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे यावेळी भारत उपस्थित करण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ ८ तारखेला अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करेल आणि ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान सीमा सुरक्षा दलासोबत होणाऱ्या बोलण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अमृतसरहून नवी दिल्लीला येणार आहे.
भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक करतील.
आशियाई नेमबाजी क्रमवारीत नारंग अव्वल
भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने ५० मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने ५० मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.
नारंगने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने ६२६.३ गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत १८५.८ गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.
३२ वर्षीय नारंगचे आता ९७१ गुण झाले आहेत. चीनच्या शेंगबो झाओने ८९६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पिस्तूल विभागात जितूने १९२९ गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.
गुरप्रित सिंगने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.
नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांची मुंबईला भेट
बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६मधील शांतता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबईला भेट दिली.
यावेळी त्यांनी गरिबी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
गरिबी निर्मुलनासाठी बांगलादेशात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी महम्मद युनुस यांनी माहिती दिली. यात विशेष करुन त्यांनी राबविलेला ग्रामीण बँकेचा प्रयोग, सुक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत विवेचन केले.
ते म्हणाले की, जगभरातील बहुतांश गरीब समाज आजही बँकिंग क्षेत्रापासून लांब आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बँकांच्या लाभक्षेत्रात आणले पाहिजे.
कर्जाची परतफेड ही गरिबांकडून जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. यासाठी प्रस्थापित व्यावसायीक बँकांऐवजी गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
भारतात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. महिलांना आणि गरिबांना अधिकाधिक संधी देऊन देशाचे विकासचक्र अधिक गतिमान करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे
भारतामधील बिबट्यांची प्रथमच गणना करण्यात आली असून देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
गेल्या वर्षी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेची पद्धत वापरूनच बिबट्यांची गणनाही करण्यात आली. या पद्धतीनुसार बिबट्यांचे छायाचित्रण, त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा संकलित करण्यात आला आहे.
व्याघ्रगणनेच्या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव व्ही. झाला यांच्या नेतृत्वाखाली ही गणना करण्यात आली. या गणनेमुळे देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या बिबट्यांची विस्तृत माहिती उपलब्ध झाली आहे.
शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत व पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या, सुमारे साडेतीन लाख कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भागाचा अभ्यास या मोहिमेदरम्यान करण्यात आला.
मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत भारतीय वंशाच्या मुलीला १६२ गुण
ब्रिटनमध्ये लिडिया सेबास्टियन या भारतीय वंशाच्या मुलीला मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत १६२ गुण मिळाले असून तिने अल्बर्ट आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. ती अवघी बारा वर्षांची आहे.
लिडियाने कॅटेल ३ बी प्रश्नपत्रिकेतील दीडशे प्रश्न सोडवले व तिला १६२ गुण मिळाले. तिने तिच्या गटात कमाल गुण मिळवले आहेत.
यात अठरा वर्षांखालील मुलांना जास्तीत जास्त १६२ गुण मिळू शकतात तर प्रौढांना कमाल १६१ गुण मिळू शकतात. हॉकिंग व आईनस्टाईन यांचा बुद्धय़ांत १६० असल्याचे मानले जाते.
लिडिया ही इतर क्षेत्रातही हुशार आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला व्हायोलिन येते तर वयाच्या सहाव्या महिन्यात ती बोलायला शिकली.
‘इसिस प्रूफ’ रायफल ‘क्रुसेडर’ची निर्मिती
अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे, ती रायफल इसिसच्या दहशतवाद्यांना वापरता येणार नाही, त्यात बायबलमधील भाग व ख्रिश्चन चिन्हे कोरलेली आहेत.
एआर १५ या रायफलीचे नामकरण ‘क्रुसेडर’ असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस व दुसऱ्या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे.
स्पाईकस टॅक्टिकल कंपनीच्या मते, मुस्लिम दहशतवादी ही रायफल वापरू शकणार नाहीत कारण त्यांची धर्मावर श्रद्धा असते व या रायफलवर ख्रिश्चन धर्माची चिन्हे आहेत.
या रायफलला पीस, वॉर व गॉड विल्स इट अशी तीन सेटिंग्ज आहेत. या रायफलची विक्री झाली असून तिची किंमत ९६० ते ३००० डॉलर दरम्यान आहे.
अमेरिकी शस्त्रास्त्रे जिहादींच्या हातात पडत आहेत अशी भीती व्यक्त होत असल्याने ही रायफल तयार केली आहे. इसिसच्या व्हिडिओत दहशतवादी एम १६ या इराकी सैनिकांकडून हिसकावलेल्या रायफली वापरलेल्या दिसत आहेत तसेत अमेरिकेने तेथे जी शस्त्रास्त्रे टाकली होती ती इसिसकडे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा