गैरसोयीबद्दल क्षमस्व

     काही वैयक्तिक कारणांमुळे ११ सप्टेंबर २०१५ पासून चालू घडामोडी पोस्ट करणे शक्य होत नाही. यामुळे या ब्लॉगच्या वाचकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
     लवकरच चालू घडामोडी नेहमीप्रमाणे पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाकरिता धन्यवाद.

From,
Admin
MPSC TOPPERS

चालू घडामोडी - ९ व १० सप्टेबर २०१५


डॉ. ‌विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार

    Dr. Vikas Amte
  • विविध क्षेत्रात राहून विदर्भाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यांना दरवर्षी 'नागभूषण पुरस्कार' देऊन सन्मानीत केले जाते. याद्वारे एकप्रकारे विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय लौकिकाचा सन्मान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. ‌विकास आमटे यांना जाहीर झाला आहे.
  • राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याद्वारे विदर्भासाठी भरघोस कार्य केलेल्यांचा सन्मान केला जातो.
  • १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारासाठी यंदा कुष्ठरोग्यांसाठी आपले जीवन वेचलेल्या डॉ. विकास आमटे यांची निवड करण्यात आली आहे.
  • वडील बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत सेवारत असलेले डॉ. विकास आमटे हे वरोऱ्याच्या महारोगी सेवा समितीचे सचिव आहेत. आतापर्यंत त्यांना संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात आता नागभूषण पुरस्काराची भर पडली आहे. 
  • आतापर्यंत हा पुरस्कार स्व.आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरेई ससाई, जी. एम. टावरी, स्व.प्राचार्य राम शेवाळकर, डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व.कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, अॅड. व्ही.आर. मनोहर व पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

वूमन्स-२०

  • आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली आहे.
  • जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
  • गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
  • वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
 वूमन्स-२० चे स्वरूप 
  • जी २० समुहात असणाऱ्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील
  • त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
  • सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला
  • राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील
सदस्य देश
  • अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया , दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, इंग्लंड, अमेरिका आणि यूरोपीयन युनियन
 जी-२० काय आहे? 
  • आशियात १९९९ मध्ये आलेल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर विविध देशातील अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत जी-२० ची स्थापना झाली.
  • जागतिक आर्थिक विकासात सहकार्य या सूत्राने जगातील विकसित विकसनशील असे २० देश एकत्र येऊन बनलेला हा एक मुख्य गट आहे.
  • जागतिक सकल उत्पादनाचे (जीडीपी) ८५ टक्के प्रतिनिधित्व करणारा हा जी-२० गट आहे.

ब्रिटनच्या राणीचा विश्वविक्रम

    Queen Elizabeth
  • ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी ब्रिटीश सत्तेमध्ये ६३ वर्षे (२३,२२७ दिवस) महाराणी पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असाही विक्रम त्यांनी बनविला आहे.
  • ९ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.
 अन्य विक्रम 
  • सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली महिला.
  • एलिझाबेथ यांचा विवाह समारंभ अधिक काळ चालला. 
  • सर्वाधिक देशांच्या नाण्यांवर एलिझाबेथ यांची प्रतिमा 
  • सर्वांत प्राचीन राजघराणे सांभाळणारी महिला.
  • राणीपदावर असताना ११६ देशांना २६५ भेटी दिल्या.
  • अमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट. व्हाइट हाउसलादेखील भेट.
  • विन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.

‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर

  • दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल ४२५ कोटी रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.
  • मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
  • उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला २५००० चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे. जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता.

फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय

  • फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
  • त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.

भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

  • भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.
  • या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.
  • तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.

डीआरडीओच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती

    J-Manjula
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
  • या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला. 
  • हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
  • मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.

चालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५


अहमद जावेद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

    New CP Ahmed Javed (L) and Rakesh Maria (R)
  • मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
  • १८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
  • ते पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.

कार्मिक मंत्रालयाचा आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसाठी नवा नियम

  • केंद्र सरकारने सनदी अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी केली असून, त्यानुसार कामानिमित्त परदेशात गेलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर अधिक बंधने टाकण्यात आली आहेत.
  • यानुसार पूर्वपरवानगीशिवाय सुटी लांबवणाऱ्या किंवा कामानंतर एक महिन्यापेक्षा जास्त काळ परदेशात थांबणाऱ्या आयएएस किंवा आयपीएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांवर त्यांची नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते.
  • कामानिमित्त परदेशात गेलेले काही अधिकारी काम पूर्ण झाल्यावरही पुन्हा देशात परतत नाहीत. त्याचवेळी काही अधिकारी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता परदेशामध्ये राहून रजेवर जातात. या सगळ्याचा विचार करून कार्मिक मंत्रालयाने सनदी अधिकाऱयांबाबत नवी नियमावली तयार केली.
 काय आहे नवीन नियम? 
  • भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवा, भारतीय पोलीस सेवा या व इतर भारतीय स्तरावरील सेवांमधील अधिकारी मंजूर केलेल्या सुटीपेक्षा जास्त काळ विनापरवानगी गैरहजर राहिल्यास, परदेशातील काम संपल्यावर तेथून वेळेत परत न आल्यास एक महिन्यापर्यंत वाट पाहण्यात येईल.
  • त्यानंतर संबंधित अधिकारी ज्या केडरमधून आला असेल तेथून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. या नोटिसीला जर संबंधित अधिकाऱ्याने उत्तर दिले नाही. तर राज्य सरकार त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले. त्यानंतर दोन महिन्यात त्याला कामावरून कमी केले जाईल.
  • जर राज्य सरकारने ही कारवाई केली नाही, तर केंद्र सरकार स्वतःहून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकेल.

ओएनजीसीद्वारे व्हॅनकोरनेफ्टमधील १५ टक्के हिस्सा खरेदी

    ONGC Videsh Limited
  • तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने रशियातील व्हॅन्कोर तेलक्षेत्रात कार्यरत व्हॅनकोरनेफ्ट या कंपनीचे १५ टक्के भांडवली समभाग १.२६८ अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात ताब्यात घेतले आहेत.
  • रशियातील सैबेरिया क्षेत्रात क्रॅस्नोयाक प्रदेशातील तुरुखान्स्की जिल्ह्यात व्हॅन्कोर हे तेलक्षेत्र आहे. रशियातील दुसरा मोठा तेलसाठा असलेले या क्षेत्राचे त्या देशाच्या एकूण तेल उत्पादनांत त्याचे ४ टक्के योगदान आहे.
  • येथून दिवसाला ४.४२ लाख पिंप म्हणजे दरसाल अडीच अब्ज पिंपे तेल मिळविता येईल आणि त्यापैकी ३३ लाख टन उत्पादित तेल ओएनजीसी विदेशला प्रतिवर्षी प्राप्त होऊ शकेल.
  • २०१३मध्ये ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने मोझांबिकमधील गॅस साठ्यासाठी ४.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजले होते. तर २००९ मध्ये २.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजून रशियाची इंपेरियल एनर्जी कंपनी विकत घेतली होती.

निमलष्करी आणि केंद्रीय सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव

  • निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केली.
  • ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारोहात बोलत होते. सध्याच्या घडीला सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त ५.०४ टक्के इतके आहे.
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे सीआयएसएफ हे पहिले दल आहे. सीआयएसएफमधील जवांनाची संख्या सध्या १.४७ लाख असून ती भविष्यात दोन लाख करण्याचा सरकारचा इरादा आहे.

स्नॅपडीलद्वारे सिलिकॉन व्हॅलीतील ‘रिडय़ूस डाटा’ची खरेदी

    Snapdeal
  • ई-व्यापारातील भारताची अग्रणी नवउद्यमी कंपनी स्नॅपडीलने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील रिडय़ूस डाटा ही नवोद्योगी कंपनी ताब्यात घेतली आहे.
  • माउंट व्ह्य़ू येथील ही कंपनी डिजिटल जाहिरातींचे फार वेगळ्या स्वरूपाचे डिस्प्ले तयार करते. असीफ अली यांनी २०१२ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती व त्यांचे ग्राहक अमेरिका, भारत व ब्रिटन या देशात आहेत.
  • स्नॅपडीलने याच वर्षांत फ्रीचार्ज, मार्टमोबी व लेटसगोमो लॅबस या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. स्नॅपडीलचे ४ कोटी वापरकर्ते असून एकूण दोन लाख विक्रेते आहेत.
  • स्नॅपडीलचे संस्थापक : रोहित बन्सल

सीरियामधील जझल हा अखेरचा तेलप्रकल्पही इसिसच्या ताब्यात

  • सीरियामधील सरकारच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेल प्रकल्पही हस्तगत करण्यात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने यश मिळविले आहे.
  • पालमिरा या सीरियामधील ऐतिहासिक शहराच्या वायव्येस जझल तेल प्रकल्प आहे. सीरियामधील नैसर्गिक वायुच्या मुख्य क्षेत्रापासूनही हे ठिकाण जवळच आहे.
  • सीरियामध्ये सध्या बाशर अल असद यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या फौजा इसिसच्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी शर्थ करीत आहेत. राक्का या इसिसचे सध्या मुख्यालय असलेल्या शहरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १६ दहशतवादी ठार झाले आहेत.
  • सीरियामध्ये मार्च २०११ मध्ये सुरु झालेल्या संघर्षानंतर लक्षावधी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर या संघर्षामुळे सीरियन निर्वासितांचा लोंढा युरोपकडे वाहू लागला आहे.
  • सीरियाचे राष्ट्राध्यक्ष : बाशर अल असद

पाक, बांगलादेशमधील निर्वासितांना भारतात आश्रय

  • युरोपातील निर्वासितांचा प्रश्न जगभर गाजत असतानाच पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक समुदायांचा भारतातील प्रवेश आणि वास्तव्य अधिकृत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
  • सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या आणि भारतातील निवासाची वैधता संपलेल्या किंवा वैधतेचा कोणताही पुरावा नसलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) कायदा-१९४६ आणि परदेशी कायदा-१९४६ यामधून वगळण्यात आले आहे. 
  • त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायातील निर्वासित त्यांच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरही भारतामध्ये वास्तव्य करू शकणार आहेत.
  • हा निर्णय मानवीयतेच्या भावनेने घेण्यात आला आहे. या दोन्ही देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि बुद्धिस्ट धर्माच्या निर्वासितांनी सुरक्षिततेसाठी भारताचा आश्रय घेतला होता.

काळ्या पैशांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव

  • परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने स्विस सरकारला केली आहे.
  • निओ कॉर्प ही १९८५ मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे. कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
  • भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे.
  • स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

निर्वासितांसाठी ऑस्ट्रिया-जर्मनीच्या सीमा खुल्या

  • सिरियातील यादवीमुळे हजारो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत. या निर्वासितांना हंगेरीतील सरकारने रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे. 
  • जर्मनी इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी ६ अब्ज युरो (६.७ अब्ज डॉलर्स) इतका निधी येत्या वर्षभरात उपलब्ध करणार आहे. स्थलांतरितांची काळजी घेण्यासाठी हा निधी देण्याचा घेतला आहे.
  • गेले काही आठवडे व महिने जर्मनी हे स्थलांतरितांचे आश्रयस्थान ठरले आहे. जर्मनी हा युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने निर्वासित येत आहेत.
  • एकूण आठ लाख निर्वासित येणे अपेक्षित असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या चार पट असेल. त्यासाठी १० अब्ज युरो खर्च येणार आहे.
  • या आठवडाअखेरीस बावरिया ओलांडून १७ हजार स्थलांतरित येण्याची शक्यता आहे. जर्मनीत काही प्रमाणात स्थलांतरितांविरोधात निषेध मेळावे झाले असून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. विशेष करून पूर्व जर्मनीत हे घडत आहे.

चालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५


भारत पाकिस्तान दरम्यान महासंचालक स्तरीय चर्चा

    BSF-Pak Rangers meet
  • भारत पाकिस्तान दरम्यान सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालक स्तरीय पाच दिवसांच्या चर्चेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
  • लपून गोळीबार करण्यासह जम्मू- काश्मीरमधील शस्त्रसंधी भंगाच्या घटना, घुसखोरी, कच्छच्या रणमधील अतिक्रमण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे यावेळी भारत उपस्थित करण्याची शक्यता आहे.
  • पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ ८ तारखेला अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करेल आणि ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान सीमा सुरक्षा दलासोबत होणाऱ्या बोलण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अमृतसरहून नवी दिल्लीला येणार आहे.
  • भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक करतील.

आशियाई नेमबाजी क्रमवारीत नारंग अव्वल

    Gagan Narang
  • भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने ५० मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने ५० मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.
  • नारंगने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने ६२६.३ गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत १८५.८ गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.
  • ३२ वर्षीय नारंगचे आता ९७१ गुण झाले आहेत. चीनच्या शेंगबो झाओने ८९६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पिस्तूल विभागात जितूने १९२९ गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे. 
  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.
  • गुरप्रित सिंगने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांची मुंबईला भेट

    Muhammad Yunus
  • बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६मधील शांतता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबईला भेट दिली.
  • यावेळी त्यांनी गरिबी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. 
  • गरिबी निर्मुलनासाठी बांगलादेशात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी महम्मद युनुस यांनी माहिती दिली. यात विशेष करुन त्यांनी राबविलेला ग्रामीण बँकेचा प्रयोग, सुक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत विवेचन केले.
  • ते म्हणाले की, जगभरातील बहुतांश गरीब समाज आजही बँकिंग क्षेत्रापासून लांब आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बँकांच्या लाभक्षेत्रात आणले पाहिजे. 
  • कर्जाची परतफेड ही गरिबांकडून जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. यासाठी प्रस्थापित व्यावसायीक बँकांऐवजी गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
  • भारतात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. महिलांना आणि गरिबांना अधिकाधिक संधी देऊन देशाचे विकासचक्र अधिक गतिमान करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. 
 बांगलादेशात ग्रामीण बँक यशस्वी 
  • बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के गरीब महिलांचा सहभाग होता. या चळवळीत कर्जाच्या परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के इतके होते.
  • या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबरच आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण बँकेमार्फत सामाजिक उद्योगाची संकल्पनाही राबविण्यात आली. महिलांच्या सहभागातून ही संकल्पनाही यशस्वी झाली. 

देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे

    12 to 14 thousand Leopards in India
  • भारतामधील बिबट्यांची प्रथमच गणना करण्यात आली असून देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
  • गेल्या वर्षी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेची पद्धत वापरूनच बिबट्यांची गणनाही करण्यात आली. या पद्धतीनुसार बिबट्यांचे छायाचित्रण, त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा संकलित करण्यात आला आहे. 
  • व्याघ्रगणनेच्या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव व्ही. झाला यांच्या नेतृत्वाखाली ही गणना करण्यात आली. या गणनेमुळे देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या बिबट्यांची विस्तृत माहिती उपलब्ध झाली आहे.
  • शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत व पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या, सुमारे साडेतीन लाख कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भागाचा अभ्यास या मोहिमेदरम्यान करण्यात आला. 

मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत भारतीय वंशाच्या मुलीला १६२ गुण

  • ब्रिटनमध्ये लिडिया सेबास्टियन या भारतीय वंशाच्या मुलीला मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत १६२ गुण मिळाले असून तिने अल्बर्ट आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. ती अवघी बारा वर्षांची आहे.
  • लिडियाने कॅटेल ३ बी प्रश्नपत्रिकेतील दीडशे प्रश्न सोडवले व तिला १६२ गुण मिळाले. तिने तिच्या गटात कमाल गुण मिळवले आहेत. 
  • यात अठरा वर्षांखालील मुलांना जास्तीत जास्त १६२ गुण मिळू शकतात तर प्रौढांना कमाल १६१ गुण मिळू शकतात. हॉकिंग व आईनस्टाईन यांचा बुद्धय़ांत १६० असल्याचे मानले जाते.
  • लिडिया ही इतर क्षेत्रातही हुशार आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला व्हायोलिन येते तर वयाच्या सहाव्या महिन्यात ती बोलायला शिकली.

‘इसिस प्रूफ’ रायफल  ‘क्रुसेडर’ची निर्मिती

  • अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे, ती रायफल इसिसच्या दहशतवाद्यांना वापरता येणार नाही, त्यात बायबलमधील भाग व ख्रिश्चन चिन्हे कोरलेली आहेत.
  • एआर १५ या रायफलीचे नामकरण ‘क्रुसेडर’ असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस व दुसऱ्या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे.
  • स्पाईकस टॅक्टिकल कंपनीच्या मते, मुस्लिम दहशतवादी ही रायफल वापरू शकणार नाहीत कारण त्यांची धर्मावर श्रद्धा असते व या रायफलवर ख्रिश्चन धर्माची चिन्हे आहेत.
  • या रायफलला पीस, वॉर व गॉड विल्स इट अशी तीन सेटिंग्ज आहेत. या रायफलची विक्री झाली असून तिची किंमत ९६० ते ३००० डॉलर दरम्यान आहे.
  • अमेरिकी शस्त्रास्त्रे जिहादींच्या हातात पडत आहेत अशी भीती व्यक्त होत असल्याने ही रायफल तयार केली आहे. इसिसच्या व्हिडिओत दहशतवादी एम १६ या इराकी सैनिकांकडून हिसकावलेल्या रायफली वापरलेल्या दिसत आहेत तसेत अमेरिकेने तेथे जी शस्त्रास्त्रे टाकली होती ती इसिसकडे आहेत.

चालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५


माजी सैनिकांचे उपोषण मागे

  • ‘समान हुद्दा समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पंधरा वर्षे सेवा करणाऱ्या प्रत्येक जवानाला तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या जवानालाही या योजनेचा लाभ होणार आहे” असा खुलासा केला.
  • त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. परंतु लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी म्हटले.
 दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ 
    Delhi Metro Badarpur-Faridabad line
  • ६ सप्टेंबर २०१५ रोजी दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
  • यावेळी पंतप्रधानांनी एस्कॉर्ट्स मुजेसर स्टेशनपासून बाटा चौक पर्यत मेट्रोने प्रवास करत मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
  • औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियानाला राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी मेट्रो मार्गाची सुरवात करण्यात आली आहे. दिल्लीतील बदरपूर पासून फरीदाबादमधील मुजेसर स्थानकापर्यत ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
  • आयटीओ ते बदरपूरपर्यतच जाणारी मेट्रो आता फरीदाबाद ते मुजेसर स्टेशन म्हणजे १४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान नऊ स्थानके आहेत. याप्रकल्पासाठी तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
  • हरियाणाचे मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर

काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देणाऱ्यांना बक्षीस

  • केंद्र सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली असून, या संदर्भात केंद्रीय आयकर विभागाने नवीन मार्गदर्शिका काढली आहे.
  • यानुसार जे लोक करबुडवे, काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देतील त्यांना संबंधितांच्या करवसुलीच्या दहा टक्के अथवा पंधरा लाख यापैकी जी रक्कम अधिक असेल ती बक्षीस म्हणून देण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष करविभागाच्या (सीबीडीटी) संमतीने बक्षीस देण्यात येईल.
  • परदेशात जाणारा काळा पैसा रोखण्याचे सीबीडीटीसमोर मोठे आव्हान आहे. या संदर्भात एक विशेष तपास पथकही केंद्र सरकारने तयार केले आहे.

राज्यातील शिक्षकांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना

  • राज्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना लागू करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.
  • राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आजारात या योजनेचा फायदा होईल. राज्यातील शेकडो रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत.
  • सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो. या नवीन योजनेत शिक्षकांना मेडिकल कार्ड दिले जाणार असून, रुग्णालयात ते दाखविल्यावर पैसे न भरता उपचार घेता येतील.
  • शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार रामनाथ मोते व नागो गाणार यांनी ही योजना सुचवली आहे.

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

    Shane Watson
  • ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शेन वॉटसनला नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेत संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
  • वॉटसनने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत ५९ कसोटी सामने खेळले आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेत खेळली होती. मायकेल क्लार्क, ख्रिस रॉजर्स यांच्यानंतर आता वॉटसननेही निवृत्ती जाहीर केली आहे.
  • वॉटसनने एक कसोटी आणि नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे.

‘गोंडवाना’च्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर

  • गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहील. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध सुरू होता.
  • डॉ. विजय आईंचवार यांच्या नियुक्तीची मुदत संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार डॉ. एम. डी. चांदेकर यांच्याकडे होता.
  • पूर्णवेळ कुलगुरूंच्या निवडीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार आणि गोव्याचे डॉ. रेड्डी यांचा समावेश होता.
  • चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासासाठी २०११ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

चीन आणि पाकिस्तानचा संयुक्त युध्दसराव

  • चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलाने संयुक्त सरावाला ६ सप्टेंबर २०१५ रोजी सुरवात केली. या सरावामध्ये दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.
  • हा सराव किती काळ चालणार आणि कोठे सुरू आहे, याबाबत माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानमध्ये २०११, चीनमध्ये २०१३ आणि पुन्हा पाकिस्तानमध्ये २०१४ मध्ये असा सराव झाला होता.

इटालियन ग्रां. प्री.मध्ये लुइस हॅमिल्टन विजेता

  • लुइस हॅमिल्टनने इटालियन ग्रां. प्री. शर्यत जिंकून विश्वविजेतेपदाकडे आगेकूच करताना ५३ गुणांची आघाडी घेतली. हॅमिल्टनचे हे फॉर्म्युला-वन शर्यतीचे ४०वे जेतेपद आहे. या जेतेपदामुळे हॅमिल्टनच्या खात्यात एकूण २५२ गुण जमा झाले आहेत.
  • या शर्यतीत सबेस्टीयन वेटेलने दुसरे स्थान तर विल्यम्सच्या फेलिपे मासाने तिसरे स्थान पटकावले.
  • विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत १९९ गुणांसह मर्सिडिजचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानावर, तर १७८ गुणांसह फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावर आहे.

अपूर्वी चंडिलाला रौप्यपदक

    ISSF World Cup Finals Apurvi Chandela wins silver
  • जयपूरची युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंडिलाने आयएसएसएफ रायफल आणि पिस्तुल विश्वचषक स्पर्धेतील १० मीटर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली.
  • इराणच्या अहमदी ईलाहेने सुवर्णपदक जिंकले तर सर्बिच्या आंद्रीया अर्सोव्हिकने कांस्यपदक मिळवले.
  • एप्रिल महिन्यात चँगवॉन (कोरिया) येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी (रायफल/पिस्तुल) स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई करून अपूर्वीने आधीच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवले आहे. 
  • तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे. वर्षभरातील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामधील १० सर्वोत्तम गुण ग्राह्य धरून विश्वचषक अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होते.

व्हिलर बेटाचे कलाम बेट म्हणून नामांतर

  • क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island)  म्हणून नामांतराची अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल.
  • ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात १९९३ मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले. कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या.
  • ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम (८३) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला. या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनायक

भ्रष्टाचारच्या निपटाऱ्यासाठी आठ वर्षे : सीव्हीसी 

    Central Vigilance Commission
  • सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्धची भ्रष्टाचार; तसेच शिस्तभंगाच्या प्रकरणांचा अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षांचा कालावधी लागत असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केलेल्या नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील तपास अहवालांवर फर्स्ट स्टेज अॅडव्हाइस (एफएसए) दिला जातो, तर सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाल होण्यापूर्वी 'सेकंड स्टेज अॅडव्हाइस' (एसएसए) दिला जातो. दर वर्षी सुमारे पाच हजार प्रकरणांत हे अॅडव्हाइस मागविले जातात.
  • अनियमितता झाल्याच्या तारखेपासून भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांमध्ये अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षे लागतात, तर अनियमिततेचा शोधण्यासाठी सरासरी दोन वर्षे लागतात.
  • तीन सदस्यांच्या समितीने हा अभ्यास केला आहे. निष्पाप अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच दोषी अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळू नये यासाठी भ्रष्टाचार व अनियमिततेच्या प्रकरणांचा वेळेत निपटारा होण्याची गरज आहे, असे समितीने म्हटले आहे.

मालवाहतुकीच्या वाहनांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी सस्ताभाडा.कॉम

  • प्रवासी वाहतुकीसाठी बुक केल्या जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच आता मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग करता यावे यासाठी www.sastabhada.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूक धारकांची नोंद करण्यात येणार आहे.  इंब्युलीयन्स इन्फोवेब कंपनीच्या मदतीने www.sastabhada.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सस्ताभाडा या संकेतस्थळावरून ट्रक किवा टेम्पो बुक केल्यास गाडीच्या मालकासह वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होणाच्या विश्वास संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी व्यक केला आहे.
  • इंब्युलीयन्स इन्फोवेब प्रायवेट लिमिटेडने यासाठी एक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली मुळे कोणतीही जीपीएस प्रणालीचा वापर न करता किवा वाहकाकडे कोणतेही साधन न देताही वाहने ट्रॅक होऊ शकतात. 
  • सध्या ही कंपनी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत आहे.

चालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५


दिनविशेष

  • ५ सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन
    भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस

‘एक श्रेणी एक वेतन’ योजना लागू

    One Rank One Pension
  • तब्बल चार दशकांपासून रखडलेली माजी सैनिकांची ‘एक श्रेणी एक वेतन’ ची (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) मागणी मान्य करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.
  • समान पदावर आणि समान काळ काम करणाऱ्या व्यक्तीला समान निवृत्तीवेतन मिळावे. हे वेतन देताना निवृत्तीची तारीख विचारात घेतली जाऊ नये, अशी निवृत्त सैनिकांची मागणी होती.
  • गेल्या ४२ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते. मात्र, भाजप सत्तेवर येऊन १५ महिने उलटल्यानंतरही यावर काहीच निर्णय होत नसल्याचं पाहून माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले होते.
  • चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीवर दरवर्षी ८ ते १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
 अशी लागू होईल योजना... 
  • १ जुलै २०१४ पासून लागू होणार ‘वन रँक वन पेन्शन’
  • २०१३ हे वर्ष या योजनेचे आधार वर्ष (बेस इयर) असेल.
  • दर पाच वर्षांनी एक सदस्य समितीद्वारे योजनेचा आढावा घेतला जाईल.
  • माजी सैनिकांना मागील थकीत पेन्शन पुढील दोन वर्षांत चार हप्त्यांमध्ये विभागून देणार.
  • शहीद व मृत सैनिकांच्या विधवांना थकबाकीची रक्कम एकरकमी देणार.
  • स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांना ही योजना लागू होणार नाही.
  • निवृत्तीवेतनाच्या पुनर्मुल्यांकनासाठी एक सदस्यीय न्यायालयीन समिती नेमणार.
 निवृत्ती वेतनासाठीचे नियम 
  • सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या ५० टक्के. (यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्यक)
  • विशेष कुटुंब निवृत्तिवेतन (कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)  : अखेरच्या पगाराच्या ६० टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.
  • सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये
  • अपंग निवृत्तिवेतन (शंभर टक्के अपंग असल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,१०० रुपये 
  • उदार कुटुंब निवृत्तिवेतन (अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास) : अखेरच्या पगाराइतके.
  • युद्धजखमी निवृत्तिवेतन (युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास) : शेवटच्या पगाराइतके.
 माजी सैनिकांचा खालील धोरणांना विरोध 
  • सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना लागू होणार नाही. 
  • तसेच पाच वर्षांनी एक सदस्यीय समिती पेन्शनच्या रकमेत बदल करण्याबाबत विचार करणार आहे.
  • पेन्शन आढावा समितीला प्रत्येकवेळी सहा महिन्यांची मुदत देणार आहे.
 सैनिकांच्या मागण्या 
  • १ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी.
  • चाळीस टक्के सैनिक सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना ओआरओपी लागू केलीच पाहिजे.
  • पेन्शनचा आढावा घेऊन रकमेत बदल करण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी तीन माजी सैनिक, एक कार्यरत सैनिक आणि एक सरकारी प्रतिनिधी अशी पाच जणांची समिती स्थापन करावी.
  • पेन्शन आढावा समितीला सहा ऐवजी एकाच महिन्याची मुदत द्यावी.
  • कोणत्याही परिस्थितीत ज्युनिअर सैनिकाला सिनिअर सैनिकापेक्षा जास्त पेन्शन देऊ नये.
सरकारच्या ‘वन रँक वन पेन्शन’ बाबतच्या धोरणात बदल होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे माजी सैनिकांच्या संघटनेने जाहीर केले आहे.

चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात

    Fourth Vishva Marathi Sahitya Sammelan
  • ५ सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झाली.
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’  भरविण्यात येणार आले आहे.
  • टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या संमेलनासाठी प्रा. शेषराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
 चौथ्या विश्व साहित्य संमेलनाबद्दल... 
  • अध्यक्ष : प्रा. शेषराव मोरे
  • कालावधी : ५ व ६ सप्टेंबर २०१५
  • आयोजक : ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ आणि ‘महाराष्ट्र मंडळ’
  • उद्घाटक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
  • स्वागताध्यक्ष : खासदार राहुल शेवाळे
  • विशेष उपस्थिती : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह
संमेलनातील इतर कार्यक्रम
  • सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारीत कार्यक्रम
  • निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य
  • सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान
  • ‘मला उमगलेले सावरकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद
  • उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघड्याच्या निनादात, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढली गेली.
यापूर्वीची विश्व मराठी साहित्य संमेलने
वर्ष
ठिकाण
अध्यक्ष
पहिले (२००९)
सॅनफ्रॅन्सिको
डॉ. गंगाधर पानतावणे
दुसरे (२०१०)
दुबई
मंगेश पाडगांवकर
तिसरे (२०११)
सिंगापूर
महेश एलकुंचवार

कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना

    Telecom Regulatory Authority in India
  • मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
  • सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते. एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.
  • ‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.

पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाच देशांच्या मदतीने प्रकल्प उभारणी

  • पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद शहरातील विकासकामाच्या नावाखाली, पाकिस्तान सरकारने पाच देशांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. या पाच देशांमध्ये चीनबरोबरच दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि तुर्कस्तानचा समावेश आहे.
  • काश्मीर खोऱ्यात २००५मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मुजफ्फराबादचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीसाठी या देशांची मदत घेण्यात आली आहे.
  • या शहरामध्ये चीनचे ३००० आणि दक्षिण कोरियाचे ३०० कामगार दाखलही झाले आहेत. या परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
  • या प्रदेशामध्ये दक्षिण कोरियाने १०० मेगावॉटचे दोन, ८९ मेगावॉटचा एक जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला आहे, तर चीनच्या मदतीने झेलम नदीवर ११०० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे. ९६९ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
  • या परिसरात सौदी अरेबिया विद्यापीठ बांधत असून, हे विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात एका इमारतीत सुरू झाले आहे.

झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवतावादी पदक

    Jhumpa Lahiri
  • पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी (National Humanities Medal) निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
  • मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
  • पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले आहे.
 झुम्पा लाहिरी यांच्याबद्दल... 
  • झुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्ये एका बंगाली कुटुंबामध्ये झाला आहे.
  • या लेखिकेची इंटरप्रिटर ऑफ मालदीवज, द नेमसेक, द लोलॅंड इत्यादी पुस्तके भारतात आणि परदेशात ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.
  • त्यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात पुलित्झर पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. तसेच त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट बनवला आहे.

फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत १५५व्या स्थानावर

  • फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत १५५व्या स्थानावर पोहोचले आहेत.
  • फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती.
  • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

ओडिशातील व्हिलर द्विपला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

  • जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
  • बीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.
  • व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक

सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

  • सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर २०१५ रोजी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं.
  • आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.  ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’, ‘देव’ यासरख्या  जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.

चालू घडामोडी - ४ सप्टेंबर २०१५


राष्ट्रीय शेअर बाजाराचा मॉरिशस स्टॉक एक्स्चेंजशी करार

    National Stock Exchange
  • भांडवलविषयक ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस (एसईएम) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
  • या करारांतर्गत नव्या निर्देशांकाची निर्मिती करण्याविषयी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दोन्ही भांडवल बाजार समन्वयाने यापुढे काम करणार आहेत. 
  • दोन्ही शेअर बाजार मिळून सिक्युरिटीज मार्केट्स, निर्देशांक निर्मिती आणि भांडवलविषयक नव्या योजना यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण तसेच ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत. अशा प्रयत्नामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध अधिक दृढ होतील.
  • एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ : चित्रा रामकृष्ण
 स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस 
  • एसईएम जुलै १९८९पासून कार्यरत आहे. अल्पावधीतच या भांडवल बाजाराने चांगली उलाढाल केली आहे.
  • आज एसईएम आफ्रिकेतील महत्त्वाचे स्टॉक एक्स्चेंज आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मॉरिशस शेअर बाजाराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • बहुचलनी भांडवल उभारणी तसेच आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये ट्रेडिंग यासाठीही हा शेअर बाजार महत्त्वाचा आहे.

नौदलात महिलांना पूर्ण सेवाकाळ

    Indian Navy Logo
  • लष्कर व हवाई दलापाठोपाठ नौदलातही महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे. यामुळे देशरक्षणाच्या तिन्ही आघाड्यांवर महिलांचे कर्तृत्व झळाळणार आहे.
  • नौदलात आत्तापर्यंत महिला अधिकाऱ्यांची कमाल १४ वर्षांसाठीच नियुक्ती होत असे. संरक्षण दलांमध्ये पेन्शनसाठी २० वर्षांच्या सेवाकाळ पूर्ततेची अट असल्याने, महिलांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.
  • याविरोधात नौदलातील १९ महिला अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे दाद मागितली होती. या याचिकेत त्यांनी लष्कर व हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पूर्ण सेवाकाळ नियुक्तीकडे लक्ष वेधले होते व हा भेदाभेद संपवण्याची विनंती केली होती. त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय घेतला.
  • संरक्षण दलांत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा २०१० साली दिल्ली हायकोर्टाकडेच एका याचिकेद्वारे आला होता. त्यावर हायकोर्टाने या दोन्ही दलांमध्ये महिलांना पूर्ण सेवाकाळाचा अधिकार बहाल केला होता. तेव्हापासून लष्कर व हवाई दलात पुरुष-महिला अधिकारी समान स्तरावर आले.

१९६५च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त नाणे

  • भारत पाकिस्तानदरम्यान १९६५ मधील युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ५ रुपयांचे नवे नाणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • भारतीय नाणे कायदा २०११ नुसार हे नाणे चलनात आणण्यात येईल. याशिवाय सध्या असलेले पाच रुपयांचे नाणेही चलनात असेल.
  • नाण्याच्या एका बाजूला तीन सिंह असलेला अशोकस्तंभ आणि इंग्रजी अक्षरात ‘इंडिया’ असे लिहिलेले असेल. तर दुसऱ्या बाजूला मध्यभागी ‘अमर जवान’चे स्मारक दोन्ही बाजूला ऑलिव्ह वृक्षाची पाने असतील.
  • शौर्य आणि बलिदानाचा अर्थ प्रतित करणारे इंग्रजी शब्दही दुसऱ्या बाजूला नाण्याच्या आतील परिघावर लिहिलेली असतील. तसेच ‘अमर जवान’च्या स्मारकाच्या चित्राखाली २०१५ हे वर्षही लिहिलेले असेल. तसेच नाण्यावर ‘१९६५ च्या कारवाईचे सुवर्ण वर्ष’ असे शब्द इंग्रजी भाषेत लिहिलेले असतील.

उदय प्रकाश साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार

    Uday Prakash
  • कन्नड विचारवंत आणि साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता साहित्यिकांनी निषेधाचे हत्यार उपसले आहे. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांनी २०१०-११मध्ये मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत हत्येचा कडाडून निषेध केला आहे.
  • उदय प्रकाश यांनी कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ संताप व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी पुरस्कार नम्रतापूर्वक आणि संपूर्ण विचारपूर्वक परत करत असल्याचे म्हंटले आहे.
  • ज्यांच्यामुळे पुरस्कार मिळाला त्या निर्णायक मंडळाचे सदस्य, अशोक वाजपेयी आणि चित्रा मुद्गल यांच्याप्रती त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
  • ‘मोहन दास’ या साहित्यकृतीसाठी उदय प्रकाश यांना वर्ष २०१०-११चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे निधन

  • गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसुझा यांचे पणजी येथील मणिपाल रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. विल्फ्रेड डिसुझा यांनी तीन वेळा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिली होती. 
  • आधी दोनवेळा ते काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर 'गोवा राजीव काँग्रेस'च्या रुपाने त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि स्वत:च्या बळावर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
  • प्रथम १८ मे १९९३ ते २ एप्रिल १९९४, नंतर ८ एप्रिल १९९४ ते २३ नोव्हेंबर १९९८ आणि तिसऱ्यांदा २९ जुलै १९९८ ते ८ फेब्रुवारी १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ राहिला.
  • बेणोली, कलंगुट आणि साळगाव अशा तीन मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. २००७मधील विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
  • विल्फ्रेड यांना ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या त्यांना दोन फेलोशीप मिळाल्या होत्या. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना १९९६ मध्ये माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

मर्वान अटापट्टूचा श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

    Marvan Atapattu
  • गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तान आणि भारताविरोधातील कसोटी मालिकांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाल्याने, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक मर्वान अटापट्टूने श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्याचा राजीनामा 'श्रीलंका क्रिकेट'चे प्रमुख सिदाथ वेट्टिमुनी यांनी स्वीकारला आहे.
  • श्रीलंकेचे तत्कालीन प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांची नियुक्ती इंग्लंडच्या सहायक प्रशिक्षकपदी झाल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी अटापट्टूची निवड सप्टेंबर २०१४मध्ये झाली होती. पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्यापूर्वी २०११पासून फलंदाजी प्रशिक्षक आणि हंगामी प्रशिक्षक प्रमुख म्हणूनही त्याने काही काळ काम केले होते.
  • अटापट्टूने श्रीलंकेसाठी खेळताना ९० कसोटी सामन्यांमध्ये आणि २६८ एका दिवसाच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे ५५०२ आणि ८५२९ धावा केल्या आहेत.
  • अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेचा माजी फलंदाज चंडिका हथुरुसिंघेचा विचार मुख्य प्रशिक्षक म्हणून होण्याची शक्यता आहे. हुथुरूसिंघेने बांगलादेशचा प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. हथुरूसिंघेबरोबरच ग्रॅहम फोर्डचाही विचार होण्याची शक्यता आहे.
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर श्रीलंकेच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक चामिंडा वाझ यांनीही राजीनामा दिला होता.

चालू घडामोडी - ३ सप्टेंबर २०१५


न्या. टहलियानी महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त

    Justice M.L. Tahaliyani becomes Maharashtra Lokayukta
  • मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
  • राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून न्या. टहलियांनी यांना राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शपथ दिली.
  • २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला २०१० साली न्या. टहलियानी यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेवर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी शिक्कामोर्तब केले होते. तसेच न्या. टहलियानी यांनी दिलेल्या निकालाची प्रशंसाही केली होती.
  • राज्याचे माजी लोकायुक्त पी.व्ही. गायकवाड गेल्या वर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले होते. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे तब्बल चार हजाराहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत.
 कारकीर्द 
  • १९८७ : वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी म्हणून सुरुवात.
  • १९९७ : मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश.
  • २००० : त्यांची शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी बढती.
  • २००९ : मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
  • २०१० : मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी बढती.

स्वच्छ भारत अभियानाच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांचा राजीनामा

    Swachh Bharat Abhiyaan
  • नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनच्या सचिव विजयालक्ष्मी जोशी यांनी वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे.
  • १९८०च्या गुजरात बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या विजयालक्ष्मी जोशी या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिव होत्या. त्यांच्याकडे स्वच्छ भारत मिशनचा कार्यभारही सोपवण्यात आला होता.
  • जोशी यांच्या निवृत्तीसाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक होता. मात्र त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. केंद्र सरकारनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
  • जोशी यांचे पती व माजी आयएएस अधिकारी जी. पी. जोशी यांनीदेखील २००८ मध्ये स्वेच्छा निवृत्ती  स्वीकारली होती.
  • याआधी गृहसचिव एल. सी. गोयल यांनीही सरकारकडं स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र, इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या मुख्य संचालकपदाची जबाबदारी देऊन त्यांना थांबवण्यात आले.

चीनचे लष्करी सामर्थ्याचं शक्तिप्रदर्शन

    China showcases military strength
  • दुसऱ्या महायुद्धात चीनने जपानवर मिळवलेल्या विजयाला ३ सप्टेंबर २०१५ रोजी ७० वर्षे पूर्ण झाली असून हा विजयदिवस चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचं शक्तिप्रदर्शन घडवत साजरा केला.
  • यावेळी चीन येत्या काळात तीन लाख सैनिकांची कपात करणार आहे, अशी घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली. चीनकडे सध्या २० लाखांवर सैनिकांचं बळ आहे. १९८० नंतर चिनी सैन्याच्या संख्येतील ही चौथी कपात असेल.
  • चीन आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर १४५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका अवाढव्य खर्च करतो. जगात अमेरिकेनंतर लष्करावर खर्च करणारा चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लष्कराचा आकार छोटा करून आधुनिक शस्त्रांचा वापर वाढवून आधुनिकीकरण करण्यावर चीनने भर दिला आहे.
  • चीनने थिनमेन स्क्वेअरवर आयोजित केलेल्या भव्यदिव्य अशा परेडला रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क-जीन-हाई, भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्यासह विविध ३० देशांचे खास दूत उपस्थित होते.
  • आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, रणगाडे, ड्रोन्स आणि इतर लष्करी साहित्य हे या परेडचा भाग होते. सुमारे २०० लढाऊ जेट विमानांनी आकाशात झेप घेतली. पाकिस्तान व रशियासह १७ देशांमधील १ हजार विदेशी सैनिक सहभागी झालेली आणि दीड तास चाललेली ही परेड सुमारे ४० हजार प्रेक्षकांनी पाहिली.
  • ‘कॅरियर किलर्स’ असे वर्णन करण्यात आलेले ‘डाँगफेंग-२१ डी’ हे जहाजभेदी आंतरखंडीय क्षेपणास्त्र या परेडचे मुख्य आकर्षण होते. १७०० किलोमीटर अंतरावरून विमानवाहक जहाजे उडवून देण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
  • जिंगपिंग यांनी सैन्याची सलामी स्वीकारल्यानंतर चीन हा शांतताप्रिय देश आहे. शांतता प्रस्थापित करून विकासाच्या मार्गाने पुढे जायचं हे चीनचे धोरण राहिलं आहे आणि यापुढेही राहिल, असं प्रतिपादन केलं.

राष्ट्रकुल पथदीप घोटाळा

  • राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी पथदीप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात दिल्ली महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांसह पाचजणांना चार वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास सहा वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
  • २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धात आरोपींना शिक्षा झालेला हा पहिलाच खटला आहे. इतर प्रकरणे अजून बाकी आहेत. राष्ट्रकुल पथदीप घोटाळ्यात सरकारला १.४२ कोटी रुपयांचा फटका बसला होता.
  • सीबीआयचे विशेष न्यायाधीश ब्रिजेश गर्ग यांनी दिल्ली महापालिकेचे अधीक्षक अभियंता डी. के. सुगन, कार्यकारी अभियंता ओ. पी. महला, लेखापाल राजू व्ही व निविदा लिपीक गुरुशरण सिंग, स्वेका पॉवरटेक इंजिनियरिंग प्रा. लि. चे संचालक जे. पी. सिंग यांना चार वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा दिली.
  • संबंधित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टी. पी. सिंग यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.

आंध्रात ‘हायवे’वर विश्रांती कक्ष

  • राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी आंध्र प्रदेशामधील महामार्गांवर दर शंभर किलोमीटरमागे एक विश्रांती कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालकांसाठी असणाऱ्या या 'रेस्ट रूम'मध्ये लाउंज, प्रसाधनगृहे व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
  • रस्ते सुरक्षा विभागाच्या बैठकीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या निर्णयाची घोषणा केली.
  • आंध्र प्रदेशमधील महामार्गांवरील वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी सरकारतर्फे १० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात येणार आहे.

जगात तीन हजार अब्ज वृक्ष

  • नुकत्याच झालेल्या एका पाहणीत जगभरातील वृक्ष मोजले गेले आणि त्यांची संख्या आहे ३.०४ हजार अब्ज असल्याची माहिती समोर आली आहे. या संशोधनाबाबतचा वृत्तांत 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकेच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
  • येल विद्यापीठातील वनस्पती अभ्यासक थॉमस क्राउदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगाच्या विविध भागांमधील ४ लाख २९ हजार ७७५ ठिकाणी वृक्ष मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा वापरली. यामध्ये काही लाख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
  • उपग्रहांच्या माध्यमातून वृक्षांची गणना करण्यात आली. त्याबाबतची छायाचित्रे संशोधनासाठी ग्राह्य धरण्यात आली.
 अहवालातील ठळक मुद्दे 
निम्म्याने घटले वृक्ष
  • विश्वाच्या उत्पत्तीनंतर ५.६ हजार अब्ज वृक्ष पृथ्वीवर होते. मात्र, त्यानंतर वृक्षांची संख्या कमी होत गेली. ही संख्या अंदाजे निम्म्याने कमी झाल्याचे संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे.
  • १५ अब्ज : दर वर्षी जगात तोडली जाणारी झाडे
  • पाच अब्ज : दर वर्षी नव्याने लावली जाणारी झाडे
  • १० अब्ज : दर वर्षी नष्ट झालेली झाडे
  • ३०० वर्षे : पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट होण्यासाठी लागणारा कालावधी
  • १.४ हजार अब्ज : उष्ण कटीबंधीय आणि उप उष्णकटीबंधीय प्रदेशातील वने
झाडे कमी होण्याची कारणे
  • बेसुमार वृक्षतोड
  • वातावरणातील बदल
  • पाण्याच्या कमतरेतेमुळे झाडांचे आयुर्मान घटण्याचे प्रमाणही मोठे
  • नव्याने लावलेल्या झाडांचे संवर्धन होण्याचे प्रमाण कमी
वृक्षांचे प्रमाण जास्त असलेले प्रदेश
उत्तर अमेरिका | रशिया | स्कँडिनेव्हिया | आफ्रिका खंड

काय करता येईल?
  • वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी सर्वच देशांनी पुढाकार घेण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.
  • केवळ वृक्षारोपण न करता वृक्षांचे जतन आणि संवर्धनही महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
  • वातावरणातील बदलास कारणीभूत असलेल्या अनेक मानवनिर्मित गोष्टींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे.