चालू घडामोडी - २६ ऑगस्ट २०१५


सानिया मिर्झाच्या ‘खेलरत्न’ पुरस्काराला स्थगिती

  Sania Mirza
 • भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याच्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय क्रीडादिनी २९ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे.
 • जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान मिळविल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सानियाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता.
 • मात्र, लंडन २०१२ पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या गिरीशा याने आपणच या पुरस्कारासाठी लायक असल्याचे सांगून कर्नाटक उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
 • या याचिकेच्या सुनावणीनंतर कर्नाटक न्यायालयाने हा पुरस्कार स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. 
 • क्रीडा सचिव अजित शरण यांच्या माहितीनुसार क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शिफारशीनंतर सानियाला ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
 • हा पुरस्कार मिळविणारी ती दुसरी टेनिसपटू ठरली. यापूर्वी लिअँडर पेसला १९९६ मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

अभिनव बिंद्राला प्रशिक्षणासाठी ५००० युरोंचा निधी

 • ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटाकविणारा अभिनव बिंद्रा याला जर्मनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ५००० युरोंची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
 • नेमबाज अभिनव बिंद्रा हा १ ते ११ सप्टेंबर दरम्यान जर्मनीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीमधून ही मदत अभिनवला देण्यात येणार आहे.
 • अंदाजित खर्चाच्या ९० टक्के रक्कम आगाऊ मंजूर करण्यात आली आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत अभिनव बिंद्राला मंजूर करण्यात आलेल्या रकमेतून त्याचा खर्च करण्यात येईल. 
 • पिस्तुलाची चाचणी, परीक्षण आणि देखभालीसाठी हा निधी देण्यात येणार आहे.

‘प्यासा’ व्हेनिस ‘क्लासिक’ स्पर्धेत

 • महान चित्रपटनिर्माते गुरूदत्त यांची अजरामर कलाकृती असलेल्या ‘प्यासा’ या एकमेव भारतीय चित्रपटाचा आगामी ७२व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्पर्धा विभागात प्रीमियर दाखविण्यात येणार आहे.
 • अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या ४५ तज्ज्ञांच्या गटाने चार महिने अहोरात्र काम करून हा चित्रपट मूळ दर्जा चित्रांमध्ये (रिस्टोअर) मिळविल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील रसिकांसाठी तो उपलब्ध झाला आहे.
 • रिस्टोअर करण्यात आलेल्या इतर वीस चित्रपटांशी आता ‘प्यासा’ स्पर्धा करणार आहे. रिस्टोअर केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या व्हेनिस क्लासिक्स अवॉर्ड या पुरस्कारासाठी ही स्पर्धा होणार आहे.

‘ईस्ट इंडिया कंपनी’वर आता भारतीयाचे राज्य

 • भारतावर १०० वर्षे राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता विकत घेतली आहे.
 • संजीव मेहता यांनी १.५ कोटी डॉलरला ही कंपनी विकत घेतली आहे. संजीव मेहता यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केले आहेत. संजीव यांनी ४० भागधारकांकडून ही हिस्सेदारी खरेदी केली आहे.
 • कधीकाळी भारतावर राज्य केलेल्या कंपनीला एका भारतीय व्यक्तीने खरेदी केले आहे. शिवाय ईस्ट इंडिया कंपनी आता नवीन व्यवसायांना सुरूवात करणार आहे. तसेच ई-कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू करणार आहे.
 ईस्ट इंडिया कंपनी 
 • ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० मध्ये करण्यात आली होती. १७व्या आणि १८व्या शतकात कंपनीने जगभरातील व्यवसायांवर ताबा मिळवून अनेक देशांवर राज्य केले.
 • ईस्ट इंडिया कंपनीने इ.स.१७५७ मध्ये भारतात प्रवेश केला होता. हळूहळू ‘फोडा आणि राज्य करा’ (डिवाइड अँड रूल) धोरणाचा अवलंब करून पूर्ण भारतावर राज्य केले.

सोनियांविरुद्धची अमेरिकेतील याचिका रद्द

 • भारतात १९८४मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात अमेरिकेतील न्यायालयाने दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात आली आहे.
 • ‘शीख्स फॉर जस्टीस’ ही संस्था, तसेच मोहिंदरसिंग आणि जसबीरसिंग या शीखविरोधी दंगलीतील दोन पीडितांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात न्यूयॉर्कमधील इस्टर्न डिस्ट्रिक्ट न्यायालयात खटला दाखल केला होता.
 • या दंगलीत सहभागी असलेले कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना सोनिया गांधी वाचवत आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
 • अमेरिकेतील एलियन टॉर्ट क्लेम्स कायदा, तसेच पीडित संरक्षण कायद्याअंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सोनिया यांना समन्स ही पाठविण्यात आले होते.
 • न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना हे प्रकरण आपल्या न्यायधिकरण क्षेत्राच्या बाहेर असल्याने याचिका रद्दबातल करण्याचा निर्णय सुनाविला.

खून प्रकरणी इंद्राणी मुखर्जींना अटक

 • ‘स्टार इंडिया‘चे माजी प्रमुख पीटर मुखर्जी यांच्या पत्नी इंद्राणी मुखर्जी यांना खून प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली.
 • इंद्राणी यांची मुलगी शीना बोरा यांच्या २०१२मध्ये खून झाला होता. या प्रकरणात इंद्राणी यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली.
 • शीना यांच्या मृतदेहाची रायगड जिल्ह्यातील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यासाठी इंद्राणी यांना त्यांच्या वाहन चालकाने मदत केली होती, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
 • पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर इंद्राणी यांचे नाव या प्रकरणी समोर आले होते. इंद्राणी यांना ३१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहेत.

'इंडिकॅश'चा वापर विपणन व प्रचार-प्रसाराची वाहिनी

  Indicash
 • भारतात सर्वप्रथम व्हाइट लेबल एटीएमची 'इंडिकॅश' ही नाममुद्रा प्रस्तुत करणाऱ्या टाटा कम्युनिकेशन्स पेमेण्ट सोल्यूशन्स लि.ने देशभरात फैलावलेले आपल्या एटीएम जाळ्याचा अधिकाधिक महसुली वापरासाठी विपणन व प्रचार-प्रसाराची वाहिनी म्हणून वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
 • इंडिकॅश एटीएम केंद्राची बाह्य-दृश्यता, अंतर्भाग ब्रॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन आणि डिजिटल स्क्रीनवरील फ्लॅश कन्टेंट अशा तीन माध्यमातून जाहिरातीच्या अमर्याद संधी उपलब्ध असून, त्याचा पुरेपूर महसुली वापर करण्यात येणार आहे.
 • इंडिकॅशने अल्पावधीत २१ शहरे, तसेच तीन हजारांहून गावे व निमशहरी भागांत ६,००० एटीएमचे जाळे निर्माण केले आहे.
 व्हाइट लेबल एटीएम म्हणजे काय? 
 • नामसंकेताप्रमाणे कोणत्याही बँकेचे नाव (लेबल) न लावणारे एटीएम केंद्र म्हणजे 'व्हाइट लेबल' एटीएम होय. अशा एटीएमच्या संचालनात तीन बिगर-बँकिंग संस्था एकत्र आल्या असतात.
 • जसे या 'इंडिकॅश' या व्हाइट लेबल एटीएम नाममुद्रेचे प्रवर्तक टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सर्व्हिसेस, प्रत्यक्ष एटीएम केंद्राचे अधिकृत चालक/फ्रँचाइझी आणि रूपे, व्हिसा, मास्टरकार्ड यांसारख्या कार्ड पेमेंट नेटवर्कच्या चालक कंपन्यांचा सहभाग असतो.
 • बँकांच्या सामान्य एटीएमप्रमाणे व्हाइट लेबल एटीएमचा कार्डधारकांना वापर करता येतो.

उत्तर प्रदेशच्या लोकायुक्त निवडीवरून वाद

 • उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदासाठी राज्य सरकारने सुचविलेले रवींद्र सिंग (निवृत्त) यांचे नाव राज्यपाल राम नाईक यांनी फेटाळले आहे. मंत्रिमंडळाची शिफारस स्वीकारणे बंधनकारक नसल्याचे सांगत राज्यपालांनी याबाबतची फाइल परत पाठविली आहे.
 • लोकायुक्त नियुक्तीची एक प्रक्रिया ठरलेली आहे. त्यात मंत्रिमंडळाचा थेट संबंध नाही. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशांनी चर्चेद्वारे योग्य व्यक्तीचे नाव या पदासाठी सुचविणे अपेक्षित असते, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.
 • न्या. सिंग यांच्या नावाबाबत किंवा एकूणच लोकायुक्तपदाबाबत कोणतीही चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली नसल्याचे, विरोधी पक्षनेते स्वामी प्रसाद मौर्य आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी स्पष्ट केल्यानंतर राज्यपालांनी फाइल परत पाठविली आहे.
 • न्या. सिंग यांची सत्ताधारी समाजवादी पक्षाशी जवळीक असून, ती लोकायुक्तपदाच्या नियुक्तीमध्ये मोठी अडचण असल्याचे स्पष्ट मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे.

सौदी अरेबियात महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

  Women register to vote for the first time in Saudi Arabia
 • सौदी अरेबियात या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकांत महिला पहिल्यांदाच मतदान करणार आहेत; तसेच त्यांना निवडणूकही लढविता येणार आहे.
 • महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे त्यांची नावे मतदारयाद्यांमध्ये नोंदवण्याच्या कामाला २३ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहेत.
 • हा निर्णय म्हणजे सामाजिक सुधारणांच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

1 टिप्पणी: