पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी राजधानी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या साक्षीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. तिन्ही सेना दलांचे प्रमुख, केंद्रीय मंत्री आणि अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
आपल्या वक्तृत्वकलेसाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तब्बल ८६ मिनिटे १० सेकंद बोलले. या भाषणाने त्यांनी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा प्रदीर्घ भाषणाचा विक्रम मोडला. १९४७ मध्ये नेहरूंनी ७२ मिनिटे भाषण केले होते. गेल्या वर्षी मोदी ६४ मिनिटे बोलले होते.
स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशाला संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देशास उद्देशून भाषण केले.
लोकशाही ही राज्यघटनेची मोठी देणगी आहे, तो वारसा जपण्यासाठी सतत काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या लोकशाही संस्था तणावाखाली आहेत, कारण संसदेचे रूपांतर चर्चेच्या मंचाऐवजी संघर्षांच्या आखाडय़ात झाले आहे. त्यावर उपाय म्हणून लोकशाही संस्थांमध्ये आतूनच सुधारणा घडून आल्या पाहिजेत.
गेली अनेक शतके आपण धर्मनिरपेक्षता जपली आहे, पण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता काही लोकांची हा धागा विस्कटण्याची षड्यंत्रे यशस्वी होणार नाहीत याची काळजी घेऊन एकता जपली पाहिजे.
एखाद्या देशाची बलस्थाने ही आर्थिक वाढ, नैसर्गिक स्रोतांचे समान वाटप व मूल्यांची जपणूक ही असतात. आर्थिक विकासाची फळे गरिबांना मिळाली पाहिजेत. भूकमुक्त भारताचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे.
आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरा आहे. गुरू हा मडके घडवणाऱ्या हातांसारखा शिष्याला कौशल्याने घडवतो, पण आज शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेला, विद्वत्तेला महत्त्व आहे का, याचे विद्यार्थी, शिक्षक व अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे.
शेजारी देशांनी त्यांच्या भूमीचा वापर दहशतवादाच्या प्रसारासाठी होणार नाही याची काळजी घ्यावी. आम्ही मैत्रीसाठी हात पुढे केला असला तरी शांतता व सुरक्षितता भंग करणारी प्रक्षोभक कृत्ये आम्ही सहन करणार नाही हेच आमचे धोरण आहे.
अतुलनीय शौर्याला पुरस्काराची मानवंदना
केंद्र व राज्य सुरक्षा दलांच्या मिळून एकूण ८२४ कर्मचाऱ्यांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य व इतर पदकांसाठी निवड करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना म्यानमारच्या हद्दीत शिरून ठार मारणाऱ्या ‘२१ पॅरा’ रेजिमेंटच्या ८ जवानांचा राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळवणाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल नेक्टर संजेबाम यांना दुसरा सर्वोच्च सन्मान असलेले 'कीर्तीचक्र' जाहीर झाले.
तर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी धाडसाने सामना करताना शहीद झालेले महार रेजिमेंटचे नायब सुभेदार राजेश कुमार यांनाही मरणोत्तर 'कीर्तीचक्र' सन्मानाने गौरवले आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला राबवलेल्या मोहिमेत एक पाकिस्तानी बोट बुडवणाऱ्या 'राजरतन' या तटरक्षक जहाजाचे प्रमुख कमांडंट चंद्रशेखर जोशी यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेतील नौदलाचे कमांडर मोहन मोकाशी व कॅप्टन राजेश धनकर यांनाही शौर्यपदके मिळणार आहेत.
शौर्यासाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक २७ जुलैच्या गुरुदासपूरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग यांच्यासह पंजाबच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. सिंग यांचे सहकारी पोलीस निरीक्षक बलबीर सिंग व हवालदार तारासिंग यांच्यासह मेघालय पोलिसांचे जिल्हा पोलीस अधीक्षक टी.सी. चाको यांनाही या सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
एकूण शौर्यपदकांपैकी सर्वाधिक ६४ पोलीस पदके देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) मिळाली आहेत.
उच्चपदस्थ माओवादी नेत्यांविरुद्ध शूर कारवाई केल्याबद्दल 'शौर्यचक्र' देण्यात आलेले सीआरपीएफचे दुसरे सर्वोच्च पदावरील अधिकारी एच.के. झा हे एकमेव निमलष्करी अधिकारी आहेत.
याशिवाय २ कीर्तिचक्र, ४९ सेना शौर्यपदक, २ नौसेना शौर्यपदक आणि ३ वायुसेना शौर्यपदकेही देण्यात येणार आहेत.
सार्वजनिक बँकांसाठी 'इंद्रधनुष' आराखडा सादर
भांडवलाची चणचण भासणाऱ्या देशातील सार्वजनिक बँकांना ठोस सहाय्यभूत ठरणारा आराखडा 'इंद्रधनुष' नावाने मोदी सरकारने १४ ऑगस्ट रोजी सादर केला.
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बँकांसाठी मोठय़ा पदावरील नेमणूका करण्यासाठी बँक मंडळ तसेच बँकिंग व्यवस्थेत कमी राजकीय हस्तक्षेपाची यंत्रणा घोषित केली.
सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापनामध्ये कमालीचे बदल घडवून आणणारी ही सात कलमी योजना आहे.
या आराखड्यानुसार बँकांना तातडीने २० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्यही उपलब्ध होत आहे.
'ताजमहल' ट्विटरवर
भारताची जागतिक ओळख व जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या 'ताजमहल'च्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन केले.
आग्रा येथे यमुना नदीकाठी दिमाखात उभा असलेला 'ताजमहल' हा उत्तर प्रदेशसाठी अद्भुत असा ठेवा आहे. 'ताजमहल'ची भुरळ जगभरातील पर्यटकांना आहे.
अशावेळी 'ट्विटर' या सोशल माध्यमाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील या नंबर वन पर्यटन स्थळाचं ट्विटर अकाउंट सुरू करण्याची कल्पना सत्यात उतरवली आहे.
मुख्यमंत्री अखिलेश यांनी 'ताजमहल'च्या ट्विटर अकाउंटचं उद्घाटन करताना 'ताजमहल'च्या पार्श्वभूमीवर टिपलेला पत्नी डिंपल यादव आणि मुलासोबतचा खास फोटोही शेअर केला आहे.
एखाद्या ऐतिहासिक वास्तूचं ट्विटर अकाउंट सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
'सेबी'च्या संचालक मंडळावर अरूण साठे यांची नियुक्ती
केंद्र सरकारने 'सेबी'च्या संचालक मंडळावर ज्येष्ठ वकील अरूण साठे यांची नियुक्ती केली आहे.
अरूण साठे यांची सेबीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
सेबीच्या संचालक मंडळावर पाच सदस्य नेमण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. त्या अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अरूण साठे हे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे मोठे बंधू असून, ते काहीवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही पूर्णवेळ कार्यकर्ते होते. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वायव्य मुंबईतून सुनील दत्त यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते पराभूत झाले होते.
देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर राजकारणाशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केली जात असल्यामुळे केंद्र सरकारवर आधीपासूनच टीका करण्यात येते आहे. त्यातच आता अरूण साठे यांच्या नियुक्तीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र सिंग यांच्या केलेल्या नियुक्तीविरोधात तेथील विद्यार्थी दोन महिन्यांपासून संपावर आहेत. त्याचवेळी अनेक नामवंत कलाकारांनीही या नियुक्तीला विरोध केला आहे.
रिझर्व्ह बॅंक आणि सेबीतील अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तिथे अद्याप नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचाही कार्यकाळ येत्या काही महिन्यांमध्य संपुष्टात येणार आहे.
गुगलकडून भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
देशभरात ६९वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना लोकप्रिय सर्ज इंजिन गुगलनेही भारतीयांना डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गुगलने खास डुडल तयार केले आहे. या डुडलमधून महात्मा गांधींनी नेतृत्त्व केलेल्या दांडी यात्रेचे स्मरण करुन देण्यात आले आहे.
नुकतीच गुगलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळचा एल निनो परिणाम हा सर्वात जास्त प्रभावी
सध्या प्रशांत महासागरातील एल निनो प्रवाहांमुळे केवळ भारतासह अमेरिकेतील कॅलिफोर्नियातही मान्सूनलाच फटका बसला आहे.
यावेळचा एल निनो परिणाम हा सर्वात जास्त प्रभावी असून, गेल्या ६५ वर्षांत एल निनोचा इतका गंभीर परिणाम जगाच्या हवामानावर झाला नव्हता असे मत अमेरिकेतील हवामानतज्ञांनी मांडले आहे.
खाली भारताच्या मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल निनो आणि ला निना या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
चैन सिंग रिओ ऑलिम्पिक साठी पात्र
गबाला, अझरबैजान येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात अंतिम फेरीत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागलेला चैन सिंग रिओ ऑलिम्पिक साठी पात्र ठरला आहे.
चैनने पात्रता फेरीत १२०० पैकी ११७४ गुणांची कमाई करीत अंतिम फेरी गाठली. ऑलिम्पिककरिता पात्र होण्यासाठी आवश्यक गुणांचा निकष पूर्ण झाल्याने चैन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल. अंतिम लढतीत ४०३.७ गुणांसह त्याने आठवे स्थान मिळवले.
याआधी झालेल्या तीन विश्वचषक स्पर्धामध्ये निसटत्या फरकाने चैनची ऑलिम्पिक पात्रतेचे निकष चुकले होते.
दोन दिवसांपूर्वी प्रकाश नान्जप्पाने ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला होता.
हरयाणात यंत्रमानवामुळे कामगाराचा मृत्यू
हरयाणातील मनेसर येथील एका फॅक्टरीत रोबोटने वेल्डिंगचे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्याला उचलून मेटल प्लेटवर आपटल्याने कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला.
दोन महिन्यांपूर्वीच जर्मनीमध्ये फोक्सवॅगन फॅक्टरीत रोबोटने एका कर्मचाऱ्याला मेटल प्लेटवर आदळल्याने त्या कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता.
मनेसरच्या इंडस्ट्रियल मॉडेल टाऊनशिपमध्ये 'एसकेएच मेटल्स' या कंपनीमध्ये हा प्रकार घडला. यावेळी ६३ कामगार आणि ३९ रोबोट विभागात काम करीत होते. ही कंपनी वाहनांना लागणारे साहित्य बनविते.
मेटल शीट वेल्डिंगसाठी रोबोटमध्ये प्री प्रोग्रॅम्ड असतात. परंतु, रोबोटचे काम सुरू असताना एक मेटल शीट खाली पडली. त्यावेळी तिथे काम करीत असलेला रामजी लाल हा मेटल शीट व्यवस्थित करण्यासाठी खाली वाकला असता, रोबोटने त्याला उचलून मेटल शीटवर फेकले.
या प्रकरणी फॅक्टरी व्यवस्थापन व कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोशालींविरोधात 'कोर्ट मार्शल'
गुजरातजवळील समुद्रामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संशयित नौकेवरील स्फोट प्रकरणात, तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोशाली यांच्यावर 'कोर्ट मार्शल' होणार आहे.
या प्रकरणात दहशतवाद्यांनी स्वत:हून स्फोट घडवून आणल्याचे संरक्षण मंत्रालय आणि अन्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते, तर ही नौका तटरक्षक दलानेच नष्ट केल्याचा दावा लोशाली यांनी केला होता. त्यामुळे या कारवाईविषयी संशय निर्माण झाला होता.
इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ भारत दौऱ्यावर
१३ ऑगस्ट रोजी भारत दौऱ्यावर आलेले इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी व्यापार, गुंतवणूक याबाबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.
या बैठकीत इराणकडून मोठय़ा प्रमाणात तेल मिळविण्यासाठी गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी तेलाच्या तस्करीप्रकरणी इराणमध्ये दोन वर्षांपासून कैदेत असलेल्या नऊ भारतीयांबाबतही चर्चा करण्यात आली. या नऊ जणांच्या सुटकेसाठी १९ कोटी रुपये दंड इराणकडून सुनावण्यात आला आहे.
याशिवाय झरीफ यांनी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी मे महिन्यात तेहरानला भेट दिली होती. त्या वेळी गडकरी आणि झरीफ यांच्यात इराणमधील चाबाहार बंदर विकसित करण्याबाबत करार झाला होता. हे बंदर विकसित झाल्यास भारताला इराणशी सागरी व्यापार करणे सोपे होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा