चालू घडामोडी - १४ ऑगस्ट २०१५


भारत-पाकिस्तानमध्ये 'एनएसए'पातळीवर प्रथमच चर्चा

    National Security Advisor Ajit Doval (L), and Pak NSA Sartaj Aziz (R)
  • पंजाबच्या उधमपूरमध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात आलेला हल्ला त्याचप्रमाणे पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणार शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील चर्चा दिल्लीत २३ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • पाकिस्तानकडून या बैठकीचा होकार आला असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ भारत दौऱ्यावर येणार आहेत.
  • या बैठकीत प्रथमच दहशतवादाशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा होणार असून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
  • सदर बैठक सर्व प्रश्नांवरील व्यापक बैठक नाही, मात्र त्यामधून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अधिक व्यापक चर्चा होईल.
 पार्श्वभूमी 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने उफा येथे भेट झाल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि अझिझ यांच्यात दिल्लीत २३-२४ ऑगस्ट रोजी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले होते.
  • उफा येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीरचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर नाराज झाले होते व त्यांनी या दौऱ्याला विरोध केला होता.

अजिंक्य रहाणेचे एकाच कसोटीत सर्वाधिक झेल

    Ajinkya Rahane
  • भारतीय संघातील अजिंक्य रहाणेने एकाच कसोटीत सर्वाधिक झेल टिपण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • रहाणेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नमूना पेश करीत आठ झेल टिपले. त्यामुळे एकाच कसोटीत सर्वाधिक झेल टिपणारा खेळाडू म्हणून अजिंक्य रहाणेच्या नावाची नोंद झाली आहे.
  • याआधी युजविंद्रसिंग (भारत), ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) व मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) यांनी एका कसोटी सात झेल टिपण्याचा पराक्रम केला होता.
  • अजिंक्यने टिपलेल्या आठ झेलांपैकी काही झेल टिपणे कठीण होते. हे झेल टिपून रहाणेने आपल्या  क्षेत्ररक्षणातील कसब सिद्ध करून दाखवले आहे.

स्पेनविरुद्धच्या हॉकी कसोटी मालिकेत भारत विजयी

  • भारताने युरोपीयन दौऱ्यात स्पेनविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा दिमाखदार विजयाची नोंद केली. अखेरच्या लढतीत सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने स्पेनला ४-२ असे हरवले.
  • आघाडीपटू रमणदीप सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने मिनिटाच्या अंतराने (५०व्या आणि ५१व्या मिनिटाला) दोन गोल झळकावण्याची किमया साधली. ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंग (२४वे मि.) आणि आकाशदीप सिंग (४५वे मि.) यांनी प्रत्येकी एकेक गोल साकारला.
  • स्पेनकडून रिकाडरे संताना (२५वे मि.) आणि झेव्हियर लीओनार्ट (४९वे मि.) यांनी गोल केले.

अ‍ॅक्सिस बँकेकडूनही संपर्करहित 'फॉरेक्स कार्ड'!

    Axis Bank
  • खासगी क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने तिच्या ग्राहकांसाठी विविध १५ विदेशी चलनात विनिमय शक्य असलेले संपर्करहित फॉरेक्स कार्ड प्रस्तुत केले असून, अशी सुविधा देणारी ती भारतातील पहिलीच बँक असल्याचा तिचा दावा आहे.
  • ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूरसह जगात अनेक देशांमध्ये संपर्करहित तंत्रज्ञानावर आधारित कार्डद्वारे भरणा प्रणाली उपलब्ध झाली असून, विदेशात जाणाऱ्या भारतीयांना बँकेचे हे फॉरेक्स कार्ड उपयुक्त ठरेल.
  • दुकानदाराकडे असलेल्या बिनतारी पीओएस टर्मिनल्सवर कार्ड स्वाइप न करता अथवा खाचेत न घालता, संपर्करहित कार्डद्वारे त्या टर्मिनलवर केवळ थाप देऊन, विनिमय व्यवहार पूर्ण होतो. यातून एकूण विनिमयासाठी लागणारा वेळ लक्षणीयरूपात कमी होईल.
  • मे २०१५ मध्ये आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक या खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील दोन बड्या बँकांनी नवीन संपर्करहित तंत्रज्ञानावर आधारित क्रेडिट व डेबीट कार्ड प्रस्तुत केले होते.

युआनचे अवमूल्यन

  • पीपल्स बँक ऑफ चायना या चीनच्या मध्यवर्ती बँकेने युआनचे ११ ऑगस्ट रोजी २ टक्क्यांनी तर १२ ऑगस्ट रोजी १.६२ टक्क्यांनी अवमूल्यन केले.
  • त्यामुळे युआन प्रति डॉलर ६.३३०६ या दोन दशकांपूर्वीच्या नीचांक स्तरावर आले. रेनमिंबी म्हणूनही ओळखले जाणारे युआन हे चलन आता १९९४ नंतरच्या किमान स्तरावर आहे.
  • गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी विकास दर नोंदविणाऱ्या चीनने निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी चलन अवमूल्यनाचे पाऊल उचलले आहे.
  • चीनने यापूर्वी २००५ मध्येही स्वत:च्या चलनाचे अवमूल्यन करून घेतले आहे.
  • डॉलरच्या तुलनेत युआनच्या अवमूल्यनाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) स्वागत केले असून यामुळे मंदीच्या गर्तेत सापडलेल्या चीनला काहीसा दिलासा मिळेल, असे म्हटले आहे.
  • निर्यातीसाठी चीन ही भारताच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ नसल्याने घसरत्या युआनचा भारतीय निर्यातीवर लक्षणीय विपरीत परिणाम होणार नाही, असा अंदाज विविध दलाल पेढय़ांनी व्यक्त केला आहे.

‘हीरो सायकल्स’चे अध्यक्ष ओम प्रकाश मुंजाल यांचे निधन

    Om Prakash Munjal
  • ज्येष्ठ उद्योगपती, हीरो सायकल्सचे अध्यक्ष आणि हीरो उद्योग समूहाचे संस्थापक ओम प्रकाश मुंजाल यांचे १३ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंजाल यांनी ६० वर्षे हीरो सायकलचे नेतृत्व केले.
  • गेल्या काही महिन्यांपासून मुंजाल यांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी व्यवसायातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुलगा पंकज मुंजालने ही प्रगती कायम राखताना हीरो मोटर्स ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
  • ओमप्रकाश मुंजाल यांनी ब्रिजमोहन लाल, दयानंद आणि सत्यानंद या तीन बंधूंसह अमृतसरमध्ये १९४४ मध्ये सायकल व्यवसायाला सुरुवात केली होती.
  • त्यानंतर त्यांनी १९५६ मध्ये लुधियानात स्थापित होऊन त्यांच्या सायकलला 'हीरो' ही नाममुद्रा बहाल केली. देशी बनावटीची सायकलची ही भारतातील पहिली नाममुद्रा ठरली.
  • ८०च्या दशकात जगात सर्वाधिक प्रमाणात सायकली तयार करण्याचे कार्य हिरो सायकल कंपनीने केले.

स्नॅपडील आणि शॉपर्स स्टॉप यांची भागीदारी

  • आघाडीची ई-व्यापार पेठ स्नॅपडील आणि फॅशन परिधानांची विक्री शृंखला असलेल्या शॉपर्स स्टॉप यांनी एकत्र येत भागीदारीची घोषणा केली.
  • या सामंजस्यातून देशस्तरावर स्मार्टफोनधारकांपर्यंत मोबाइल अॅपद्वारे पोहोचलेल्या स्नॅपडीलवरच आता शॉपर्स स्टॉपमध्ये उपलब्ध विविध परिधाने, पादत्राणे व फॅशन अॅक्सेसरीजशी सान्निध्य ग्राहकांना मिळविता येईल. जे ग्राहक अशा तऱ्हेने कोणत्याही उत्पादनाची खरेदी करतील ते नजीकच्या शॉपर्स स्टॉप स्टोअरमधून त्यांना घरपोच पोहोचते केले जाणार आहे.
  • हे सामंजस्य प्रारंभी उत्तर भारतापुरतेच मर्यादित असेल व वर्षभरात ते देशस्तरावर राबविले जाईल. शॉपर्स स्टॉपची सध्या देशातील ३५ शहरांमध्ये ७४ विक्री दालने कार्यरत आहेत.

चीनमध्ये गोदामातील स्फोटात ५० ठार

  • उत्तर चीनमधील मोठे बंदर असलेल्या तियानजिन शहरात घातक रसायने साठवलेल्या एका गोदामात प्रचंड स्फोट होऊन किमान ५० लोक ठार, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले. 
  • या स्फोटांसोबत उडालेल्या आगीच्या गोळ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर मलबा (डेब्रिज) चौफेर पसरला. या अपघातामुळे १० हजारांहून अधिक लोकांना या परिसरातून इतरत्र हलवण्यात आले आहे. 
  • चीनच्या इतिहासातील अतिशय वाईट अशा औद्योगिक अपघातांपैकी असलेल्या या घटनेत रुइहाई गोदामात दोन मोठे स्फोट होण्याच्या अर्धा तास आधी तेथे आग लागली होती. या आगीचे गोळे इतरत्र उडून आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये आणखी स्फोट झाले.
  • गोदामात रासायनिक पदार्थ असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पाण्याचा वापर करता आला नाही आणि आग विझवण्यासाठी त्यांना वाळू व इतर साहित्य वापरावे लागले.

जुनी वाहने मोडीत काढल्यास प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा सरकारचा विचार

  • प्रदूषणाला आळा बसावा आणि रस्ते सुरक्षाविषयक मुद्दय़ांवर उपाय योजण्यासाठी दहा वर्षांहून जुनी वाहने मोडीत काढणाऱ्या वाहनधारकांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याबाबत सरकार विचार करत आहे.
  • राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात डिझेलवर चालणाऱ्या दहा वर्षांहून जुन्या वाहनांवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावावर काम सुरू असून, ते लवकरच अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल.
  • या प्रस्तावानुसार, मोटारीसारखी लहान वाहने नष्ट करण्यासाठी वाहनधारकांना ३० हजार रुपयांपर्यंत, तर ट्रकसारख्या मोठय़ा वाहनांच्या बाबतीत करसवलत लक्षात घेता ही रक्कम दीड लाख रुपयांपर्यंत असू शकेल.
  • रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री : नितीन गडकरी
 योजना काय? 
  • जुने वाहन विकताच मालकाला प्रमाणपत्र मिळेल.
  • नवे वाहन घेताना ते दाखवले की खरेदीत सवलत मिळेल.
  • मोटारीसारख्या लहान वाहनांसाठी ३० हजार रुपयांपर्यंत सूट असेल.
  • मोठय़ा वाहनांसाठी ही सवलत १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल.

जमात-ऊद-दावा संशयित संघटनांच्या यादीत

  • पाकिस्तानने काही संशयित संघटनांच्या नावांची यादी तयार केली असून त्यामध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या नेतृत्वाखालील जमात-ऊद-दावा या संघटनेचा समावेश आहे.
  • सदर संघटना धर्मादायाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामात सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
  • जमात-ऊद-दावा या संघटनेवर २००८ मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१० मध्ये या संघटनेला केवळ धर्मादाय कामकाज करण्याची अनुमती देण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा