चालू घडामोडी - १३ ऑगस्ट २०१५


लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

    Sansad Bhawan
  • संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ललित मोदी प्रकरणावरून कॉंग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज होऊ न शकल्याने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.
  • अगदी कामकाजाच्या शेवटच्या दिवशीही ललित मोदी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही भाष्य न केल्याने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संसदभवन परिसरात कॉंग्रेसच्या खासदारांनी निदर्शनेही केली. यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे खासदारही निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
  • आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजला. अधिवेशनाच्या सुरुवातीला 'आधी राजीनामा, मग चर्चा' अशी भूमिका कॉंग्रेसकडून घेण्यात आली.
  • लोकसभेमध्ये कॉंग्रेस सदस्य व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी करीत असल्यामुळे आणि निषेधाचे फलक दाखवत असल्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पक्षाच्या २५ खासदारांचे पाच दिवसांसाठी निलंबनही केले होते. या कारवाईविरोधात इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
  • राज्यसभेमध्ये कॉंग्रेसकडे बहुमत असल्यामुळे तिथे विरोधाची धार आणखी तीव्र होती. राज्यसभेमध्ये एकही दिवस कामकाज होऊ शकले नाही. तिथेही कॉंग्रेसचे सदस्य व्हेलमध्ये जमून सुषमा स्वराज यांच्या कृतीविरोधात घोषणा देत होते. त्याचवेळी पंतप्रधानांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्याची मागणीही करण्यात येत होती.
  • त्यानंतर कॉंग्रेसने लोकसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. सरकारनेही कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यानंतर या विषयावर चर्चा झाली. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. सुषमा स्वराज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली.
  • या सर्व घटनांच्या आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेचे आणि शून्यकाळानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

पॉस्को कंपनीची महाराष्ट्रात १० हजार कोटींची गुंतवणूक

  • स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियन कंपनी पॉस्को ही महाराष्ट्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातरडा येथे स्टील प्रकल्प उभारण्यासाठी पॉस्कोने उत्तम ग्वाला समूहाशी सामंजस्य करार केला आहे.
  • या प्रकल्पात ऑटोमोबाइल उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेल्या स्टील कॉईल्सचे उत्पादन केले जाईल. निम्न दर्जाचे लोखंड हे स्टीलमध्ये परावर्तित करण्याचे कामही या ठिकाणी होणार आहे.
  • जनरल मोटर्स (६४०० कोटींची गुंतवणूक) आणि फॉक्सकॉन (३५००० कोटींची गुंतवणूक) या नामवंत कंपन्यांनंतर पॉस्कोच्या माध्यमातून तिसरी मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे.
  • पॉस्को कंपनीने या आधी कर्नाटक आणि ओडिशामध्ये गुंतवणुकीचा केलेला प्रयत्न फलद्रूप झालेला नव्हता. ओडिशामध्ये १९९०च्या सुमारास झालेला प्रयत्न, भूसंपादनाला झालेला विरोध आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे फसला होता.

एच१बी व्हिसा मिळणाऱ्यांमध्ये ८६ टक्के भारतीय

    US H1B Visa
  • अमेरिकेकडून ज्यांना एच१बी व्हिसा दिला जातो त्यांमध्ये ८६ टक्के कम्प्युटर क्षेत्रात काम करणारे भारतीय आहेत, असे अमेरिकन सरकारने प्रसिद्ध केलेल्या यूएस सिटिझन्स अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
  • यातील बहुसंख्य कर्मचारी हे इन्फोसिस किंवा टाटा कन्स्ल्टन्सीसारख्या आऊटसोर्सिंग कंपन्यांसाठी काम करतात.
  • या यादीत चीन हा भारताच्या बराच मागे असून चिनी नागरिकांना ५ टक्के एच१बी व्हिसा प्रदान केले जातात. जगातील अन्य कुठल्याही देशांतील एक टक्क्यांहून अधिक नागरिकांना हा व्हिसा दिला जात नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
  • २०१४ मध्ये तब्बल ८६ हजार एचवनबी व्हिसा अमेरिकेकडून देण्यात आले.
  • कमी कालावधीसाठी अशा प्रकारचे प्रोग्रामर्सना निमंत्रित करणे हे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्यांना अधिक सोपे जाते कारण अमेरिकन नागरिकांना त्या जागेसाठी अपेक्षित असणाऱ्या वेतनापेक्षा कितीतरी कमी वेतन भारतीयांना दिले जाते.
  • हे प्रोग्रामर भारतात परतल्यानंतर कंपनीच्या क्लाएंट्सना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. कम्प्युटरशिवाय अन्य क्षेत्रांतही भारतीयांना व्हिसा मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.
  एच१बी व्हिसा काय आहे? 
  • परदेशी नागरिकांना अमेरिकेत तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यास परवानगी देणारा हा व्हिसा असून काही विशिष्ट व्यवसायांसाठी तो दिला जातो. या व्हिसाखाली संबंधित व्यक्ती जास्तीत जास्त सहा वर्षांसाठी काम करू शकते. विशेष कारणांसाठी तो आणखी तीन वर्षे वाढवता येतो.

पाकिस्तानी लष्कराच्या शुभेच्छा आणि मिठाई न स्वीकारण्याचा निर्णय

  • सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छा आणि मिठाई न स्वीकारण्याचा निर्णय सीमा सुरक्षा दलाने घेतला आहे. 
  • परंपरेप्रमाणे पाकिस्तानच्या निर्मिती दिनी आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनी दोन्ही देशांच्या जवानांकडून एकमेकांना शुभेच्छा आणि मिठाई दिली जाते.
  • काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये आणि त्याआधी पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आणि पंजाब पोलीसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही यश आले होते. हा दहशतवादी पाकिस्तानातूनच घुसखोरी करून भारतात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

जैन धर्मीयांच्या संथारा व्रतावर राजस्थान हायकोर्टाची बंदी

  • अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.
  • यापुढे संथारा ही आत्महत्या मानली जावी आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणि त्यास साथ देणाऱ्यांवर कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला जावा, असाही आदेश न्यायालयाने दिला.
  • हा निकाल राजस्थान राज्यापुरताच मर्यादित असला तरी त्याने देशभरातील जैन समाजात खळबळ उडाली असून, याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी समाजाच्या अनेक संस्थांनी सुरू केली आहे.
 जैन समाजाचा प्रतिवाद 
  • ही आमची शेकडो वर्षे चालत आलेली धार्मिक प्रथा आहे व आम्हाला धर्माचरणाचा मूलभूत अधिकार असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.
  • संथारा म्हणजे आत्महत्या किंवा इच्छामरण नव्हे, तर आत्मशुद्धीची ती अंतिम साधना आहे.

 न्यायालयीन विचार 
  • भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास जगण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. या हक्काचे कसोशीने रक्षण करण्याचे काम न्यायसंस्था करीत आली असली तरी जगण्याच्या हक्कात मृत्यूला कवटाळण्याचा हक्कही अंतर्भूत होतो, हे न्यायालयांनी मान्य केलेले नाही.
  • यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १९९६मध्ये ग्यान कौर वि. पंजाब सरकार या प्रकरणात दिलेला निकाल मूलभूत मानला जातो. त्यात न्यायालयाने म्हटले की, जगण्याचा हक्क हा माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे व आत्महत्येचे कृत्य अनैसर्गिक आहे. तर्कशक्ती कितीही ताणली तरी ‘जीवन संपविणे’ हे ‘जीवन जगण्यात’ कधीच अभिप्रेत असू शकत नाही.

 संथारा व्रत 
  • जैन समाजात संथारा व्रत ‘सल्लेखाना वृत्त’ म्हणूनही ओळखले जाते.
  • आपला मृत्यू आता जवळ आला आहे, अशी खात्री झालेली व्यक्ती हे व्रत करते.
  • यात मोह-मायेपासून मन काढून घेण्यासोबतच अन्न-पाण्याचे सेवन पूर्णपणे बंद करून देहत्यागाने शारीरिक क्लेषांपासूनही मुक्ती मिळविली जाते.
  • देशातील जैन धर्मीयांची लोकसंख्या ४३ लाखांच्या घरात आहे. अधिकृत नोंद नसली तरी भारतात दरवर्षी सरासरी २४० व्यक्ती संथारा व्रत ठेवून देहत्याग करतात.

केसरी टूर्सला पुरस्कार

  • टुडेज ट्रॅव्हलर या नियतकालिकातर्फे दिला जाणारा ‘बेस्ट डोमेस्टिक टूर ऑपरेटर’ हा पुरस्कार यावर्षी केसरी टूर्सला मिळाला आहे
  • नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या विसेष कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते केसरी यूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांना प्रदान केला गेला.
  • टुडेज ट्रॅव्हलर हे प्रिमियर बिजनेस व ट्रॅव्हल नियतकालिक असून गेली ९ वर्षे या नियतकालिकातर्फे कॉर्पोरेट, आतिथ्य, पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या संस्था तसेच कंपन्या यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पंकज अडवाणी पुन्हा विश्वविजेता

  • भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचा मान पटकावला आहे. कराचीत झालेल्या जागतिक ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत त्याने जेतेपद कायम राखताना १३वे जागतिक जेतेपद नावावर केले. 
  • गतविजेत्या पंकजने बेस्ट ऑफ ११ फेरींच्या अंतिम लढतीत चीनच्या यान बिंगटाओचा ६-२ असा सहज पराभव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा