पुढील तीन महिन्यांत देशात सुमारे ३५ ठिकाणी लष्कर भरती मोहीम राबविली जाणार असून, त्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात भरती मोहीम नसली, तरी नवीन वर्षात नागपूर आणि कोल्हापूर येथे भरती होणार आहे. त्यामुळे लष्कर भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्यांना आत्तापासून तयारी करण्यास वाव आहे.
जानेवारीमध्ये नागपूरला ६ ते २५ तारखेला भरती आहे. नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, बडनेरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील युवकांसाठी भरती आहे.
३ फेब्रुवारीला कोल्हापूरला भरती आहे. त्यात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्र, गोव्यातील युवकांना प्राधान्य असेल.
युरोपिअन युनियन व तुर्कस्तानदरम्यान करार
पश्चिम आशियामधून मोठ्या संख्येने युरोपकडे येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंदर्भात युरोपिअन युनियन (इयु) व तुर्कस्तानमध्ये करार झाला आहे.
२८ सदस्यीय इयुच्या प्रतिनिधींनी तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमद दावुतोग्लु यांची भेट घेऊन या करारावर शिकामोर्तब केले.
या करारान्वये इयुने तुर्कस्तानला ३.२ अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले असून त्याबदल्यात या निर्वासितांची सोय तुर्कस्तान करणार आहे.
तुर्कस्तानमध्ये सध्या सुमारे २० लाखांपेक्षा जास्त निर्वासित राहून जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
'बीएसएफ'मध्येही महिला अधिकारी
हवाई दलात फायटर पायलट म्हणून महिलांना सामावून घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयापाठोपाठ आता जगातील सर्वात मोठी सीमा सुरक्षा दल म्हणून ओळख असलेल्या ‘बीएसएफ’मध्येही प्रथमच महिलांना अधिकारी म्हणून सहभागी करून घेतले जाणार आहे.
पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील टेकनपूरच्या ‘बीएसएफ’ अॅकॅडमीत महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होणार आहे.
‘बीएसएफ’च्या स्थापनेला १ डिसेंबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असून, सुवर्णमहोत्सवी वर्षात महिलांना दलात सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पारंपरिक वैद्यकीय आणि कारकुनीसारखी केवळ नोकरी न करता महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्यासाठी संधी दिली जाणार आहे.
२००८ मध्ये बीएसएफमध्ये ७४५ महिलांना हवालदार (कॉन्स्टेबल) म्हणून भरती करण्यात आले होते. आता मात्र अधिकारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे.
जपानकडून मेट्रोला साडेपाच हजार कोटी
जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी ५४७९ कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.
दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला १०६९ कोटी तर अहमदाबाद मेट्रोला ४४१० कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे.
काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे.
भारत पायाभूत प्रकल्पांना जास्त महत्त्व देत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा प्रमुख भाग असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व हरितगृह वायूंचे प्रमाणही कमी होईल. भारत आर्थिक साधनांसाठी द्विपक्षीय व बहुराष्ट्रीय मदतही घेत आहे.
फ्युरीला विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद
वाल्दीमिर क्लित्सच्कोचा अकरा वर्षांचा अपराजित राहण्याचा विक्रम मोडीत काढताना ब्रिटनच्या २७ वर्षीय टायसन फ्युरीने विश्व हेवीवेट गटाचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले. २७ वर्षीय फ्युरीने डसेल्डरेफ येथे झालेल्या सामन्यात ११५-११२, ११५-११२ व ११६-१११ अशी बाजी मारली.
डब्लूबीए, आयबीएफ, आयबीओ आणि डब्लूबीओ अशी जेतेपदे नावावर असलेल्या युक्रेनच्या क्लित्सच्कोचा हा २००४ नंतरचा पहिला पराभव आहे.
भारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-१ या क्षेपणास्त्राची अब्दुल कलाम आयलंड, बालासोर (ओडिशा) येथे यशस्वी चाचणी घेतली. मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मधील ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने ते विकसित केले आहे. यासाठी संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इम्रातमधील संशोधन केंद्र व हैदराबादेतील भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संस्थांनीही मदत केली होती.
या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यामुळे या क्षेपणास्त्राला आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेणे शक्य होते.
स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी
फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली आहे.
दुकाने, रेस्टॉरंट, सार्वजनिक इमारती व ठिकाणे या ठिकाणी महिलांना बुरखा घालून फिरता येणार नाही. ही बंदी तोडल्यास सुमारे साडेसहा लाख रुपये दंड करण्यात येणार आहे.
स्वित्झर्लंडमध्ये सुमारे ४० हजार मुस्लिम महिला आहेत.
फ्रान्समध्ये यापूर्वीच बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.
‘बराक-८’ क्षेपणास्त्राची चाचणी
इस्राईलने भारतासमवेतच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केलेल्या बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने शत्रू म्हणून एका छोट्या ड्रोनवर हल्ला केला.
इस्राईलच्या नौसेनेच्या जहाजावरून सोडण्यात आलेले बराक-८ क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधले आणि शंभर टक्के यश मिळवले.
बराक-८ हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप मानले जाते. हे क्षेपणास्त्र विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ); तसेच इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय), इस्रायलचे शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकास व्यवस्थापन, एल्टा सिस्टिम्स आणि इतर कंपन्यांनी संयुक्तपणे बराक-८ हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
इस्रायलच्या समुद्रातील तेलसाठ्यांचे संरक्षण करण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
'बराक-८' क्षेपणास्त्र यंत्रणेमधील आधुनिक यंत्रणेमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा वेध घेता येणे शक्य होणार आहे. दिवस, रात्र, तसेच वेगवेगळ्या हवामान स्थितीमध्ये हे क्षेपणास्त्र काम करू शकेल.
ओ. पी. शर्मा निलंबित
दिल्ली विधानसभेतील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार अलका लांबा यांना उद्देशून अशोभनीय भाषेचा वापर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ओ. पी. शर्मा यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभा अध्यक्ष : राम निवास गोयल
'एचएसबीसी' भारतातील व्यवसाय बंद करणार
आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीची बँक असलेल्या हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन अर्थात एचएसबीसी बँकेने भारतातील खासगी (वैयक्तिक) बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही वर्षात एसएसबीसीने जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष २०१० पासून जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल दीड लाखांची घट केली आहे.
भारतातील व्यवसाय बंद करणारी एचएसबीसी दुसरी परदेशी बॅंक आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडनेसुद्धा (आरबीएस) भारतातील आपला बँकिंग व्यवसाय बंद केला होता.
२६ नोव्हेंबर १९२१ : श्वेतक्रांतींचे जनक व्हर्गीस कुरियन जन्मदिन
‘पृथ्वी २’ची यशस्वी चाचणी
अण्वस्त्रधारी ‘पृथ्वी २’ या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चंडीपूर येथे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या संस्थने ही चाचणी घेतली.
आर्ट गायडन्स पद्धतीनुसार या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राने नियोजित लक्ष्य अचूक वेळेत साधत आपली क्षमता सिद्ध केली.
या मोहिमेमध्ये उपयुक्य सर्व रडार यंत्रणा, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रेकिंग यंत्रणा, टेलीमेट्री स्टेशन्स आदी उपकरणाचा प्रक्षेपण मोहिमेदरम्यान वापर करण्यात आला. या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटर आहे, तर ते १००० किलो अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.
पॉंडिचरीत विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना
पॉंडिचरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी या योजनेवर ७.६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी मोफत सायकल मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेमुळे २६,२०७ विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळणार आहेत.
राज्यसभा सदस्य खेकीहो झिमोमी यांचे निधन
नागा पिपल्स फ्रंटचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य खेकीहो झिमोमी यांचे २६ नोव्हेंबर रोजी एआयआयएमएस रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
झिमोमी यांनी नागालॅंड स्टुडंट फेडरेशनमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. नागालॅंडमधील ते एक यशस्वी उद्योजक होते.
ते तीन वेळा नागालॅंड विधानसभेचे सदस्य होते. तसेच नागालॅंडमध्ये त्यांनी काही मंत्रिपदेही भूषविली होती.
म्यानमारसोबत शांतता करार करण्यासाठी त्यांनी अलिकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत म्यानमारला भेट दिली होती.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे कामकाज त्यांच्या निधनामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
२०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष
जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) अहवालानुसार, पृथ्वीवरील आतापर्यंतच्या इतिहासात २०१५ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून, एल निनोच्या प्रभावामुळे २०१६ या वर्षीही काहीशी अशीच परिस्थिती जाणवेल, असे अहवालात म्हटले आहे.
तापमानवाढीसंदर्भात कोणतेही पाऊल न उचलल्यास सध्याच्या तापमानात ६ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.
उद्योगक्रांतीच्या कालखंडानंतर जागतिक तापमानामध्ये २ अंशांनी वाढ झाली. हे तापमान २०१० पर्यंत सरासरीपर्यंत आणण्याचे लक्ष्य होते.
डब्ल्यूएमओच्या मते, २०१५ या वर्षातील भूपृष्ठावरील तापमानवाढ ही उद्योगपूर्व कालखंडानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. तापमानातील हे बदल हे एल निनोच्या प्रभावामुळे आणि मानवनिर्मित तापमानवाढीमुळे झालेले आहेत.
१९९८ पासून आतापर्यंत जगातील सर्वाधिक दहा उष्ण वर्षे झाली आहेत. त्यापैकी २००५नंतर आतापर्यंत आठ वर्षांचा समावेश पहिल्या दहामध्ये आहे.
दिल्ली सरकारने उद्देशिका चुकविली
दिल्ली सरकारने संविधान दिनाच्या निमित्ताने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये संविधानाची उद्देशिका छापली. मात्र त्यात गंभीर चूक करत 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' हे दोन्ही शब्द वगळून टाकले.
माहिती व प्रसारण विभागाच्या संचालकांना यांसदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून ४ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.
दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, भारताचा नीती आयोग आणि मलेशियाच्या परफॉरर्मन्स मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी युनिट (पेमांडू) यांच्यादरम्यान कार्यकुशल व्यवस्थापन क्षेत्रात योजना आणि अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
भारत आणि सिंगापूर देशांमध्ये दहा करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान भारत आणि सिंगापूर देशांमध्ये संरक्षणासह विविध क्षेत्रांशी संबंधित दहा करार करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
याच वेळी दोन देशांमधील भागीदारी धोरणात्मक पातळीवर नेल्याची घोषणाही करण्यात आली. दोन देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि राजकीय, संरक्षण, सुरक्षा सहकार्य, अर्थ आणि सांस्कृतिक अशा क्षेत्रांमध्ये नवे संबंध निर्माण करण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी केली असून, यामुळे दोन्ही देशांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
संरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच सायबर सुरक्षा, जहाज बांधणी आणि नागरी उड्डाण या क्षेत्रांमध्ये हे दहा करार करण्यात आले.
सुरक्षा सहकार्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत सायबर सुरक्षेबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, तंत्रज्ञानासाठी संयुक्त संशोधन, सायबर सुरक्षा धोरणाबाबतच्या माहितीचे आदानप्रदान याबाबतीत सहकार्य केले जाणार आहे.
सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस आणि नीती आयोगामध्ये झालेल्या योजना सहकार्य करारानुसार शहर नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन याबाबतच्या ज्ञान आणि माहितीची देवाण घेवाण होणार आहे. तसेच दोन्ही संस्थांमध्ये खासगी-सार्वजनिक भागीदारीही होणार आहे.
सिंगापूरचे पंतप्रधान : ली सेन लुंग
ट्युनिशियात दहशतवादी हल्ला
आफ्रिका खंडातील माली देशानंतर ट्युनिशिया देशात दहशतवाद्यांनी अध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यानंतर ट्युनिशियात महिनाभरासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, ट्युनिस शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ट्युनिशियाचे अध्यक्ष : बेजी केड इसेबसी
रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले
अनेकदा इशारा देऊनही हवाई हद्दीचा भंग करणारे रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्तानने पाडले. मात्र, तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे.
रशियाच्या ‘एसयू-२४’ प्रकारच्या लढाऊ विमानावर तुर्कस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. त्यानंतर हे विमान कोसळले, असा दावा रशियाने केला आहे. तर ‘एफ-१६ एस’ प्रकारच्या विमानातून रशियाच्या विमानावर हल्ला करण्यात आल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे.
लढाऊ विमान पाडण्यात आल्यानंतर या विमानातील दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीने बाहेर उड्या घेतल्या. विमान सीरियातील लटकिया भागात कोसळले. हा भाग सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दोन्ही वैमानिकांच्या शोधासाठी मोठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
एक लाख कोटींचा 'राईस मिल' घोटाळा?
कोळसा खाण, २-जी प्रमाणेच सुमारे एक लाख कोटींचा ‘राईस मिल’ घोटाळा ‘कोब्रापोस्ट’ने ‘कॅग’च्या हवाल्याने समोर आणला आहे.
देशभरातील शेतकऱ्यांकडून सरकार प्रत्येक हंगामात मोठ्या प्रमाणावर कच्चा तांदूळ खरेदी करते. किमान हमीभावाने ही खरेदी केली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी हे धान्य 'राईस मिल्स'कडे पाठवलं जातं.
मात्र मिलकडून केवळ पक्का तांदूळच सरकारला परत मिळतो. त्याची कणी वा कोंडा सरकारला परत मिळत नाहीत. राज्य सरकारं आणि केंद्राच्या या चुकीच्या धोरणामुळे मिल मालकांनी कणी आणि कोंडा विकून सरकारच्या तिजोरीचे आतापर्यंत करोडो रुपयांचे नुकसान केले आहे, असा दावा ‘कोब्रापोस्ट’ने केला आहे.
गेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आतापर्यंत सुमारे १ लाख कोटींचे सरकारचे नुकसान झाले आहे. 'कॅग'च्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे.
पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी करण्यास मनाई
रामायण किंवा कुराण या धर्मग्रथांच्या नावांवर कोणी एक व्यक्ती हक्क सांगू शकत नाही. एखादी वस्तू वा सेवेचा व्यवसाय करायचा असल्यास 'ट्रेडमार्क' म्हणून या नावांचा वापर केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला.
रामायण, कुराण, बायबल, गुरू ग्रंथ साहिब असे अनेक पवित्र तसेच धार्मिक महत्त्व असलेले ग्रंथ आहेत. त्यामुळेच या ग्रंथांच्या नावांचा वापर व्यवसायासाठी आपण करू शकत नाही असेल असे न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने सांगितले.
ईश्वर अथवा धर्मग्रंथांचं नाव 'ट्रेडमार्क' म्हणून वापरण्यास परवानगी दिल्यास लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही खंडपीठ म्हणाले.
कायद्याने लग्न संपुष्टात आले नसले, किंवा घटस्फोट झाला असला तरीही महिला त्यांचे 'स्त्रीधन' पती अथवा सासरच्या मंडळींकडून घेऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
विवाहापूर्वी, विवाहावेळी किंवा बाळाच्या जन्मावेळी महिलेला दिली जाणारी जंगम किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे 'स्त्रीधन' आहे. कायद्याने विभक्त झाली नसली तरी किंवा तिचा घटस्फोट झाला असला तरी कोणतीही महिला यासाठी खटला दाखल करू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ मधील महिला सरंक्षणाच्या कलम १२ नुसार तिला तो अधिकार आहे.
पती किंवा त्यांच्या कुटुंबियांना ही संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या 'स्त्रीधना'ची हानी झाल्यास त्या दिवसापासून त्यांच्यावर नियमित गुन्ह्याची नोंद होऊ शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये 'कार फ्री डे'
जगातील प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर असल्याने राजधानीतील प्रदूषण कमी करण्यासाठी २२ जानेवारी २०१६ हा दिवस 'कार फ्री डे' करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला आहे.
या दिवशी सरकारी कार्यालयात कोणीही कार आणणार नाही. तर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यादिवशी सायकलचा वापर करायचा आहे.
जोकोविच 'एटीपी वर्ल्ड टूर'चा चौथ्यांदा विजेता
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा ६-३, ६-४ असा पराभव केला.
एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे. यापूर्वी पीट सॅम्प्रस आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे. मात्र, यांनी सलग विजेतेपदे मिळविलेली नाहीत.
जोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे. त्याने या वर्षात खेळलेल्या ८८ सामन्यांपैकी ८२ सामन्यांत विजय मिळविलेला आहे.
विजय मल्या विलफुल डिफॉल्टर
भारतीय स्टेट बँकेने विजय मल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि तिची मूळ कंपनी असलेल्या युनायटेड ब्रिवरीज यांना ‘हेतुपुरस्सर कर्जबुडवे’ (विलफुल डिफॉल्टर) घोषित केले आहे.
विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने भारतीय स्टेट बँकेसहित अन्य १६ बँकांचे सुमारे ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून मूळ कर्ज २०१०मध्ये घेतले आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँकेचे थकित कर्ज १ हजार ६०० कोटी रुपये आहे.
किंगफिशर एअरलाइन्सकडून थकित असलेली कर्जे
भारतीय स्टेट बँक
१६०० कोटी रु.
पंजाब नॅशनल बँक
८०० कोटी रु.
आयडीबीआय बँक
८०० कोटी रु.
बँक ऑफ इंडिया
६५० कोटी रु.
बँक ऑफ बडोदा
५५० कोटी रु.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
४१० कोटी रु.
युको बँक
३२० कोटी रु.
कॉर्पोरेशन बँक
३१० कोटी रु.
स्टेट बँक ऑफ म्हैसूर
१५० कोटी रु.
इंडियन ओव्हरसीज बँक
१४० कोटी रु.
फेडरल बँक
९० कोटी रु.
पंजाब अँड सिंध बँक
६० कोटी रु.
अॅक्सिस बँक
५० कोटी रु.
बँक ऑफ बडोदामध्ये 'घोटाळा'
सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सहा हजारहून अधिक कोटींचा 'हवाला घोटाळा' झाल्याचे उघडकीस आले आहे.
काही उद्योजकांनी बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून फेरीवाले, रिक्षावाले व मजुरांच्या नावे बनावट खाती उघडून हा घोटाळा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत हाँगकाँग, दुबईसारख्या ठिकाणी ६ हजार कोटींहून अधिक पैसे बेकायदेशीररित्या पाठवण्यात आले आहेत.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा व सक्तवसुली संचलनालयातर्फे या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद हे पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ओलांद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची अधिकृत घोषणा भारत अथवा फ्रान्स यांच्याकडून करण्यात आलेली नाही.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ओलांद यांना निमंत्रण दिले होते. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेण्ट फॅबिअस हे २० नोव्हेबर रोजी दिल्लीत होते तेव्हा त्यांनी, ओलांद यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली.
‘आसियान’साठी ‘आर्थिक समुदाय’ स्थापन
संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर आसियान सदस्य राष्ट्रांच्या विकासासाठी आसियान इकॉनॉमिक कम्युनिटी (एईसी) नावाने विभागीय आर्थिक ब्लॉक स्थापन करण्याचा निर्णय आसियान सदस्य राष्ट्राच्या नेत्यांनी घेतला आहे.
क्वालालंपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांच्यासह दहा सदस्यराष्ट्रांच्या नेत्यांनी या करारावर सह्या केल्या.
'एईसी'च्या माध्यमातून आसियान राष्ट्रांमध्ये वस्तू, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे; तसेच दक्षिण आणि पूर्व आशियातील अर्थव्यवस्थांचे एकीकरण शक्य होणार आहे.
आसियान सदस्य राष्ट्राच्या नेत्यांकडून 'आसियान २०२५-एकत्र पुढे जाऊ या' या घोषणापत्राचाही अंगिकार करण्यात आला.
मालीमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला
पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बामको येथे रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून १७० जणांना ओलिस ठेवले. तब्बल नऊ तास हे ओलिसनाटय़ चालले.
दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २७ जण ठार झाले. तर उर्वरितांची सुटका करण्यात आली. त्यात २० भारतीयांचाही समावेश आहे.
हॉटेलातील ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या माली सुरक्षा जवानांच्या मदतीसाठी फ्रान्सने तातडीने ४० जवानांचे विशेष पथक रवाना केले होते.
मोदींच्या ट्विटर खात्यावर १.६१ कोटी फॉलोअर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अॅट नरेंद्र मोदी या ट्विटरवरील खात्याला आतापर्यंत १.६१ कोटी अनुसारक (फॉलोअर्स) मिळाले आहेत. केवळ दोन महिन्यांत मोदी यांच्या अनुसारकांमध्ये १० लाखांची भर पडून एकूण संख्या १.६१ कोटी इतकी झाली आहे.
२६ मे २०१४ रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ही संख्या १.१९ कोटीने वाढली. १७ सप्टेंबर २०१४ ते १७ सप्टेंबर २०१५ दरम्यान ही संख्या ८८ लाखांनी वाढली आहे.
अमिताभ बच्चन यांचे १.७८ कोटी तर शाहरुख खानचे १.६२ कोटी अनुसारक आहेत. राजकीय नेत्यांमध्ये २००९ पासून मोदी हे भारतीय राजकीय नेत्यात आघाडीवर असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ६.६१ कोटी अनुसारक असून त्यांचा ट्विटर पत्ता अॅट बराक ओबामा असा आहे.
राज्यसभा वाहिनी नव्या रुपात
राज्यसभा वाहिनी लवकरच व्यावसायिक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित मालिका आणि टीव्ही प्रकल्पांचे प्रसारण या वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील श्याम बेनेगल, टिगमांशू धुलिया आणि विनय शुक्ला या दिग्गजांना वाहिनीने यापूर्वीच सहभागी करून घेतले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित चित्रपट तसेच इतर कार्यक्रमांची निर्मिती केली जात आहे.
राज्यसभा वाहिनीवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. कार्यक्रमांची विक्री करून निधी उभारण्याची परवानगीही वाहिनीला मिळाली आहे.
चित्रपटांच्या निर्मितीसह मालिका आणि माहितीपट यांचीही निर्मिती करणार आहेत. त्यांची विक्री अन्य वाहिन्यांना करण्यात येणार आहे.
राज्यसभा वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी : गुरदीपसिंग सप्पल
पंकज अडवाणी विश्वविजेता
भारताचा सर्वात यशस्वी स्नूकरपटू पंकज अडवाणीने आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. चीनच्या झुआ शिनटाँगला नमवून पंकजने कारकीर्दीतील १५व्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
सनराइज क्रिस्टल बे रिसॉर्ट येथे झालेल्या अंतिम सामन्यात ३० वर्षीय पंकजने झुआला ८-६ अशा फरकाने नमवले.
सप्टेंबर महिन्यात आयबीएसएफचे बिलियर्डस जगज्जेतेपद पटकावणाऱ्या बंगळुरूच्या सुवर्णपुत्राने अवघ्या दोन महिन्यांत आणखी एक जागतिक जेतेपद आपल्या खात्यावर जमा केले.
सिरिया, इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना प्रतिबंध करणारे विधेयक अमेरिकेत मंजूर
रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी प्रतिनिधिगृहात सीरिया व इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना अमेरिकेत प्रवेश देणे तूर्त थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या शरणार्थीना पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर तपासणीशिवाय देशात प्रवेश देऊ नये अशी भूमिका यात घेण्यात आली आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हे विधेयक नाकारण्याचा इशारा देऊनही ते संमत झाले आहे.
इराक व सीरियातून येणाऱ्या शरणार्थीना तूर्त प्रवेश बंदी व त्यांच्यावर कडक तपासणी र्निबध लादणारे हे विधेयक २८९ विरूद्ध १३७ मतांनी मंजूर झाले आहे.
ओबामा प्रशासनाला त्यामुळे धक्का बसला असून अमेरिकी अध्यक्ष ओबामा यांचा अशा प्रकारच्या विधेयकास विरोध होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. आता हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होणे गरजेचे आहे.
सीरिया, इराकमधून शरणार्थीना येऊ देणे धोकादायक आहे. त्यांच्यात इसिसचे दहशतवादी आहेत की नाहीत हे ओळखणे अवघड आहे, असे कायदा अंमलबजावणी संस्थांनी म्हटले आहे.
मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत उत्तर कोरियाविरोधात ठराव मंजूर
उत्तर कोरियात मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याचा निषेध करणारा ठराव विक्रमी बहुमताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आला आहे. आता आमसभेच्या पूर्ण अधिवेशनात त्यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे.
बाकी जगापासून स्वत:ला वेगळे ठेवणाऱ्या उत्तर कोरियात मोठय़ा प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन होत आहे. त्याबाबतचा ठराव ११२ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी तो १११ मतांनी मंजूर झाला होता.
युरोपी व जपानी राजनीतिज्ञांनी या ठरावाचा मसुदा तयार केला होता, त्यात २००५ पासून उत्तर कोरियात मानवी हक्कांचे वाढतच चाललेले जे उल्लंघन आहे त्याचा निषेध केला आहे. यावर्षीच्या मसुद्यात मानवी हक्कांचे पद्धतशीर, व्यापक स्वरूपात जे उल्लंघन सुरू आहे त्याचा उल्लेख केला आहे.
लागोपाठ दुसऱ्या दिवशी या ठरावात उत्तर कोरियाला मानवतेविरोधातील गुन्ह्य़ांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात हजर करण्याची सूचना सुरक्षा मंडळाला करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा नागपुरमध्ये
नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५९वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नागपूर येथे ६ ते १० जानेवारीदरम्यान चिटणीस पार्कवर आयोजित करण्यात येणार आहे.
तीन दशकांनंतर प्रथमच ही स्पर्धा नागपूरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ८६ किलो, ९७ किलो तसेच महाराष्ट्र केसरी गटात ८६ ते १२५ किलो वजन गटात स्पर्धा होणार आहेत.
यात राज्यातील ४४ जिल्हा संघटना सहभागी होणार आहेत. दररोज सरासरी २५० कुस्त्या होणार असून त्यासाठी १५०० ते २००० मल्लांना निमंत्रित करण्यात आले आहे.
गादी आणि माती या विभागात या स्पर्धा होतील व त्यातून ‘महाराष्ट्र केसरी’ निवडला जाईल. विजेत्याला चांदीची गदा व एक लाख रुपये रोख व उपविजेत्याला ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
तसेच विविध वजन गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी राज्यातून १२५ पंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापक व इतर पदाधिकारी अशा एकूण १२०० प्रतिनिधींचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.
स्वाती दांडेकर आशियायी विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी
भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला स्वाती दांडेकर (वय ६४) यांची आशियायी विकास बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालकपदी अध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्ती केली आहे. दांडेकर यांना राजदूताचा दर्जा देण्यात आला आहे.
आयोवा प्रतिनिधिगृहात प्रथमच निवडून आलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला सदस्य असून २००३ मध्येही त्या निवडून आल्या होत्या.
दांडेकर या जन्माने भारतीय असून, अमेरिकेतील विधिमंडळात निवडून येणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आयोवा प्रतिनिधी मंडळात त्या २००३ ते २००९ दरम्यान सदस्य होत्या व नंतर आयोवा सिनेटमध्ये त्यांनी २००९ ते २०११ दरम्यान काम केले.
त्यानंतर आयोवा युटिलिटी बोर्डवर त्यांनी २०११ ते २०१३ दरम्यान काम केले. व्हिजन आयोवा मंडळावर त्या २००० ते २००३ दरम्यान संचालक होत्या.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
महाराष्ट्रातील १६ आदिवासी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही योजना १ डिसेंबर २०१५पासून सुरू होणार आहे.
अनुसूचित क्षेत्रातील आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये तर याचे प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे.
अपुरा आहार तसेच गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक जागरुकता दिसून येत नाही. शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचा विकास व वाढ होत असते. अशा कालावधीत गर्भवती स्त्रिया श्रमाची कामे करत असतात. या कालावधीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते.
या पार्श्वभूमीवर या स्त्रियांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत चौरस आहार देण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या क्षेत्रातील गरोदर तसेच स्तनदा मातांची यादी तयार करतील.
गावपातळीवर ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार. या समितीवर एक गरोदर महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात येणार आहे.
गहू तांदूळ, अंडी, सोयाबिन, हिरव्या पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी ही समिती करणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांची उपस्थिती, आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहील.
‘किस ऑफ लव्ह’ मोहिमेच्या आयोजकांना अटक
‘किस ऑफ लव्ह’ मोहिमेचे आयोजक राहुल पशुपलन आणि रश्मी नायर यांना एका सेक्स रॅकेट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांसह अन्य आठ जणांनाही पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याप्रकरणी अटक केली आहे.
केरळ पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणाचा तपास करून संपूर्ण प्रकरण उघड केले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये ‘किस ऑफ लव्ह’ नावाचा उपक्रम या सर्वांनी आयोजित केला होता.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल साडेतेवीस टक्के वाढ सुचवणारा अहवाल सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारला सादर केला आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्यास ४७ लाख केंद्रीय कर्मचारी व ५२ लाख निवृत्तिवेतनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच केंद्राच्या तिजोरीवर दरवर्षी एक लाख दोन हजार कोटी रुपये ताण पडणार आहे.
१ जानेवारी २०१६ पासून या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार आहे. न्यायमूर्ती ए. के. माथुर यांच्या अध्यक्षतेखालील वेतन आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे अहवाल सादर केला.
काय आहे वेतन आयोग?
सरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते.
वेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून शिफारस अहवाल केंद्राला सादर करते.
थोडय़ाफार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो व त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.
आजपर्यंतचे वेतन आयोग
वेतन आयोग
स्थापना
अध्यक्ष
पहिला
१९४६
श्रीनिवास वरदचारीयार
दुसरा
१९५७
जगन्नाथ दास
तिसरा
१९७०
रघुवीर दयाल
चौथा
१९८३
पी. एन. सिंघल
पाचवा
१९९४
न्या. रत्नवेल पाण्डेय
सहावा
२००६
न्या. बी. एन. श्रीकृष्ण
सातवा
२५ सप्टेंबर २०१३
न्या. अशोक कुमार माथुर
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
आयोगाने केंद्राच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १६ टक्के, भत्त्यांमध्ये ६३ टक्के तर निवृत्तिवेतनात २४ टक्के वाढ सुचवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा किमान १८ हजार रुपये तर कमाल सव्वादोन लाख रुपये वेतनाची शिफारस करण्यात आली आहे.
आयोगाने वेतनश्रेणी रद्द करण्याची सूचना केली असली तरी तीन टक्के वार्षिक वेतनवाढीची शिफारस केली आहे.
सीबीआयच्या संचालकांचे वेतन दरमहा ८० हजार रुपयांवरून ९० हजार रुपये करण्याची मागणी आयोगाने फेटाळली आहे. सध्या कॅबिनेट सचिव, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, लष्कर, नौदल आणि हवाईदल प्रमुखांचे वेतन दरमहा ९० हजार रुपये इतके आहे.
ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत वाढ करावी. सध्या ही मर्यादा दहा लाख रुपये आहे. आयोगाने ती २० लाखांपर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. महागाई भत्त्यांत ५० टक्के वाढ होईल तेव्हा ग्रॅच्युईटीत २५ टक्क्य़ांनी वाढ करावी.
कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आरोग्य विमा योजना.
दरमहा होणारी कपात दरमहा १२० रुपयांवरून पाच हजार रुपये इतकी करावी.
एक श्रेणी एक निवृत्तीवेतन असे न म्हणता आयोगाने सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतनाची फेररचना केली आहे. त्यात १ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त होणाऱ्या निमलष्करी आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. न्या. ठाकूर ३ डिसेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे २ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. न्या. ठाकूर यांची सरन्यायाधीशपदाची मुदत ४ जानेवारी २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.
नरेंद्र मोदी ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’साठी चर्चेत
जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’चे नामांकन मिळालेल्या ५० जणांच्या यादीमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिलायन्स इंड्रस्टीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ‘गुगल’चे नवे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश आहे.
टाइम पर्सन ऑफ द इयर २०१५ ची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानुसार मोदींना १.३ टक्के मते मिळाली आहेत. तितकीच मते सुंदर पिचई आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही मिळाली आहेत.
गेल्यावर्षीही नरेंद्र मोदी यांचे नाव ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ किताबासाठी चर्चेत होते. मात्र, त्यावर्षी ‘इबोला फायटर्स’ला ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले होते.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी २० नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पाचव्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश यांच्यासह २८ मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी जदयू व राजदच्या प्रत्येकी १२ व काँग्रेसच्या ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांचे सुपुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार हे गृहखाते आपल्याकडेच ठेवणार असून त्यासोबत सामान्य प्रशासन आणि माहिती-जनसंपर्क विभागाचा कार्यभारही त्यांच्याकडेच राहील.
तेजस्वी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले असून ते रस्तेबांधणी विभागाचे मंत्रिपद सांभाळतील. तर तेजप्रताप यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली आहे.
‘एमएसएमई’साठी नवीन तंत्रज्ञान निधी स्थापन
अतिलघु, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) नवे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान घेता यावे यासाठी केंद्र सरकारने 'टेक्नॉलॉजी अॅक्विझिशन अँड डेव्हलपमेंट फंड' (टीएडीएफ) हा नवा निधी स्थापन केला आहे. हा निधी राष्ट्रीय निर्मिती धोरणाचाच एक भाग आहे.
या निधीचा उपयोग एमएसएमई गटातील उद्योगांची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे एमएसएमई गटातील उद्योगांच्या कार्यक्षमतेवर बंधने येतात. त्याचवेळी हे तंत्रज्ञान खरेदी करणे सर्वच एमएसएमई उद्योगांना परवडणारे नसते. टीएडीएफ निधीमुळे असे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होईल.
या अंतर्गत एमएसएमई गटातील एखाद्या उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी येणाऱ्या तंत्रज्ञानासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के खर्च किंवा तंत्रज्ञान वापरण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कापैकी २० लाख रुपये सरकार देणार आहे. पेटंटच्या माध्यमातून तंत्रज्ञान घेण्यासाठीही या निधीअंतर्गत साह्य देण्यात येणार आहे.
यामुळे जगभरातील तंत्रज्ञान देशातील एमएसएमई उद्योगांना घेता येईल. तंत्रज्ञान किंवा पेटंट यांना परवाना देताना तो निवडक कंपन्यांनाच दिला जाणार आहे.
टीएडीएफ निधीअंतर्गत निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करणे, उपकरणांची खरेदी करणे, प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी साधने घेणे, वीज बचतीसाठी यंत्रणा उभारणे तसेच जलसंवर्धनासाठी उपाययोजना करणे इत्यादी कारमांसाठीही एमएसएमई गटातील उद्योगांना पैसा पुरवला जाणार आहे.
याशिवाय ग्रीन बिल्डिंगची उभारणी, कचऱ्यावरील प्रक्रिया आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प यांची उभारणी करण्यासाठी याच निधीअंतर्गत सवलती देण्यात येतील.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री : निर्मला सीतारामन
मोदींचा मलेशिया, सिंगापूर दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान मोदी पुढे सिंगापूरला रवाना होतील. मलेशियाचे पंतप्रधान महंमद नजीब बिन तुन हाजी अब्दुल रझाक हे या दोन्ही परिषदांच्या अध्यक्षस्थानी असतील. या वेळी आसिआन आणि पूर्व आशियाई परिषदांमधील सहभागी देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
स्टॅन्चार्ट बँकेच्या भारतातील प्रमुखपदी झरिन दारूवाला
मूळच्या ब्रिटनच्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झरिन दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी त्या आयसीआयसीआय बँकेतील घाऊक बँक विभागाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होत्या. तो आयसीआयसीआय समूहातीलच विशाखा मुळ्ये या मराठी महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी आयसीआयसीआय बँक समूहातील शिखा शर्मा या बाहेर पडत अॅक्सिस बँकेत रुजू झाल्या होत्या.
स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतात १०० हून अधिक शाखा असून ती देशातील सर्वात मोठी खासगी विदेशी बँक आहे. बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या बँकेच्या संघरचनेत फेरबदल सुरू आहेत. यानुसार झरिन यांच्या आधी भारतीय व्यवसायाची जबाबदारी पाहात असलेले सुनील कौशल यांना आफ्रिका विभागाचे मुख्य म्हणून बढती देण्यात आली आहे.
मिशेल जॉन्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर तो निवृत्त होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडीन, रायन हॅरीस, ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉट्सन यांनी नुकतीच ऍशेस मालिकेनंतर निवृत्ती घेतली होती. आता या वरिष्ठ खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत ३४ वर्षीय जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जॉन्सनचा चौथा क्रमांक लागतो. त्याने ३११ बळी घेतले असून, त्याच्यापेक्षा जास्त शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅकग्रा (५६३) व डेनिस लिली (३५५) यांनी जास्त मिळविलेले आहेत. जॉन्सनने ७३ कसोटीत ३११ बळी घेतला आहेत. तर, १५३ वनडेमध्ये २३९ विकेट घेतल्या आहेत.
‘इसिस’च्या तळांवर फ्रान्सचा हल्ला
पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सने सीरियामधील ‘इसिस’ विरोधातील आक्रमणाला धार आणली असून, त्यांच्या लढाऊ विमानांनी जोरदार चढाया केल्या. या कारवाईत ‘इसिस’च्या ताब्यात असलेल्या रक्का या शहरातील त्यांचे दोन प्रशिक्षण तळ आणि मोठा शस्त्रसाथे उद्ध्वस्त झाले आहेत.
फ्रान्सच्या वीस जेट विमानांनी रक्का शहरामध्ये तीसहून अधिक बाँब टाकले. ‘इसिस’च्या संकल्पनेत असलेल्या खिलाफतची राजधानी म्हणून रक्का शहराचा वापर होतो. त्यामुळेच हल्ल्यासाठी फ्रान्सने हेच शहर निवडले.
‘विहिंप’चे नेते अशोक सिंघल यांचे निधन
ऐंशीच्या दशकात अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी आंदोलनात आक्रमक कार्यशैलीमुळे प्रसिद्धीस आलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे १७ नोव्हेंबर रोजी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
धातुशास्त्रातील पदवी, पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे असे कला व ज्ञानाचे अस्तर लाभलेले अशोक सिंघल यांनी सर्व आयुष्य संघकार्य आणि विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारासाठी वाहून घेतले होते.
विहिंपला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकाश्रय मिळवून देण्यात आणि त्याद्वारे आर्थिक पाया भक्कम करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आग्रा शहरापासून जवळ असलेल्या अतरौली येथे २७ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. १९४२ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. सिंघल यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून धातुशास्त्र विषयात पदवी घेतली होती.
१९८० मध्ये ते विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव बनले. कारसेवक म्हणून त्यांनी डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीदविरोधी वादग्रस्त मोहिमेत आक्रमक भूमिका पार पाडली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराचे लोकार्पण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेत असताना वास्तव्य केलेल्या लंडन येथील घराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह आरपीआय नेते रामदास आठवले हेही यावेळी उपस्थित होते.
वायव्य लंडनमधील १० किंग हेन्री रोडवरील या घरात डॉ. आंबेडकरांनी १९२१-२२ या कालावधीत वास्तव्य केले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भारताने २०.५० चौ.फुटाचे हे तीन मजली घर ऑगस्टमध्ये विकत घेतले. यासाठी सुमारे चार दशलक्ष पौंड एवढी किंमत मोजावी लागली.
या घरात बाबासाहेबांची अत्यंत दुर्मिळ कागदपत्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रामुख्याने त्यांनी बोन विद्यापीठाला जर्मन भाषेत लिहिलेले पत्र यातील खास आकर्षण आहे.
पॅरिसनंतर तुर्कस्तानात अतिरेक्यांचा आत्मघाती हल्ला
तुर्कस्तानात जी-२० देशांची बैठक होत असताना ईशान्य तुर्कस्तानात सीरियाच्या सीमेजवळ आयसिसच्या एका संशयित अतिरेक्याने आत्मघाती स्फोट केला.
यात चार अधिकारी जखमी झाले असून त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी अंकारा येथे सात संशयितांना अटक केली असून त्याला पॅरिसच्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे.
पॅरिसमधील १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२९ जण ठार झाले. या हल्ल्यात २० जणांचा सहभाग असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘घातक प्रकल्पाला’ केंद्र सरकारची मान्यता
देशाच्या पहिल्यावहिल्या मानवरहीत लढाऊ विमानाचे स्वदेशी बनावटीचे इंजिन तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पासाठी ३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
'घातक' असे या इंजिनचे नाव असून, भविष्यात ते हेरगिरीक्षम ड्रोन, अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या लढाऊ विमानांना अथवा टेहाळणीक्षम विमानांनाही वापरता येणार आहे.
पारंपरिक विमानांना असणारी शेपटी या ड्रोनच्या डिझाइनमधून गायब करण्यात आली आहे. त्याऐवजी हवेतूनच संपूर्ण ड्रोनचे नियंत्रण करणारी 'फ्लाइट कंट्रोल सिस्टीम' त्यामध्ये बसविण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी 'मेक इन इंडिया' अंतर्गत खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असणाऱ्या 'कावेरी प्रकल्पां'तर्गत 'घातक'ची निर्मिती करण्यात येण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन
‘गांधी’, ‘दिल’, ‘अजूबा’ या चित्रपटांमध्ये भूमिका करणारे बॉलीवूड अभिनेते सईद जाफरी यांचे १६ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
जाफरी यांनी हिंदी चित्रपटांसह ब्रिटीश चित्रपटांमध्येही काम केले होते. गांधी (१९८२), हिना (१९९१) या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका या सर्वांच्याच लक्षात राहण्याजोग्या आहेत.
राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. जाफरी यांनी अभिनेत्री मेहरुनिमा (मधुर जाफरी) यांच्याशी विवाह केला होता. मात्र, १९६५ मध्ये हे दोघे वेगळे झाले.
गणेश थापा यांच्यावर दहा वर्षांची बंदी
नेपाळ फुटबॉल संघटनेचे प्रमुख गणेश थापा यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) दहा वर्षांची बंदी घातली आहे. तसेच लाओस महासंघाचे कार्याध्यक्ष विफेट सिहाचर्क यांच्यावरही दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी नेपाळच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू सामना फिक्स केल्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यात थापा यांच्यावरील बंदीमुळे नेपाळ फुटबॉलची प्रतिमा अधिक मलिन झाली आहे.
आपल्या १९ वर्षांच्या कार्यकाळात कोटय़वधी डॉलरचा अपहार केल्याचा आरोप थापा यांच्यावर आहे. बंदीव्यतिरिक्त थापा यांना १९, ८५० अमेरिकन डॉलरचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे.
‘फिफा’च्या शिस्तपालन समितीने थापांवर २००९ आणि २०११च्या फिफा कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीत लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
निको रोसबर्ग ब्राझिलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत विजेता
विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनवर ७.७ सेकंदाच्या फरकाने कुरघोडी करत मर्सिडिजच्या निको रोसबर्गने ब्राझिलियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले. रोसबर्गने १ तास ३१ मिनिटे ०९.०९ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
रोसबर्गचे यंदाच्या हंगामातील हे पाचवे, तर कारकीर्दीतील १३वे जेतेपद आहे. या विजयासोबत त्याने फॉम्र्युला वन विश्व अजिंक्यपद शर्यतपटूंचे उपविजेतेपदही निश्चित केले.
हॅमिल्टनने १ तास ३१ मिनिटे १६.१६ सेकंदात शर्यत पूर्ण करून दुसरे स्थान पटकावले, तर चार वेळा विश्वविजेतेपद जिंकणारा फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल (१ तास ३१ मिनिटे २३.२४ सेकंद) तिसऱ्या स्थानावर आला.
फेरारीचाच किमी रैकोनेन चौथा, तर विलियम्सचा वॉल्टेरी बोट्टास पाचवा आला. फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. संघाच्या गुणतालिकेत फोर्स इंडियाने पाचवे स्थान पटकावले आहे.
सय्यद अकबरुद्दीन भारताचे युनोमधील कायमस्वरूपी सदस्य
परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांची भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून अकबरुद्दीन यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली होती.
पुढील वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशोक पंडित यांच्याकडून अकबरुद्दीन सूत्रे स्वीकारतील.
संयुक्त राष्ट्रसंघाने आता ७०व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने सर्व १९३ देशांशी चर्चा करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल घडविणे आणि सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढविणे हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी स्थानासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये अकबरुद्दीन यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अकबरुद्दीन यांची कार्यक्षमता आणि पूर्वीची कामगिरी पाहता ही निवड करण्यात आली आहे.
स्टार्कचा कसोटीमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम नोंदविला आहे. न्यूझीलंडविरूद्ध गोलंदाजी करताना स्टार्कने आज ताशी १६०.४ एवढ्या वेगाने चेंडू टाकला.
रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. त्याने २००३ मध्ये इंग्लंडविरूद्ध वन-डेत ताशी १६१.३ कि.मी. वेगाने चेंडू टाकला होता.
१६० किमी प्रती ताशी वेगाने चेंडू टाकणाऱ्या पाच गोलंदाजांच्या पंक्तीत चार जण ऑस्ट्रेलियाचे आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करारावर इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबरोबरच उभय देशांत ९ बिलियन पौंडचा व्यापारी करारही झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये आगमन झाल्यानंतर ब्रिटिश लष्कराच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. कॅमेरून आणि मोदी यांच्यात १० डाउनस्ट्रीट येथे सुमारे ९० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली.
याशिवाय युनोच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या समावेशाला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचेही कॅमेरून यांनी सांगितले.
त्यानंतर जगातील लोकशाही व्यवस्थेचे मंदिर असलेल्या ऐतिहासिक बिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत भाषण दिले.
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १५३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत संचारबंदी लागू केली. तसेच अध्यक्ष फ्रांस्वा ओलॉंद यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली आहे.
फ्रान्समध्ये झालेल्या या साखळी बॉम्ब स्फोटात बॅटकला कन्सर्ट हॉलमध्ये सर्वाधिक हानी झाली असून, याठिकाणी १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्स-जर्मनीमध्ये फुटबॉल सामना सुरू असताना स्टेडियमजवळ दोन आत्मघाती हल्ले झाले. महत्वाची बाब म्हणजे हल्ल्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद ही स्टेडियममध्ये उपस्थित हाते. त्यांना तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले.
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
छगन भुजबळांकडील १६० कोटींची जमीन जप्त
‘महाराष्ट्र सदन’ बांधकामातील कथित गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नवी मुंबईतील खारघर येथील भूखंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली. या जमिनीची किंमत जवळपास १६० कोटी आहे.
खारघरमध्ये देवीशा इन्फ्रा कंपनीकडून गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यासाठी भुजबळ यांनी बनावट कंपन्या दाखवून ६५ एकर भूखंड खरेदी केला होता. या ठिकाणी ‘हेक्सवर्ल्ड’ या नियोजित प्रकल्पासाठी २३०० ग्राहकांकडून ४४ कोटी कंपनीने घेतले; मात्र तिथे कुठलाही प्रकल्प सुरू न झाल्याने ग्राहकांची फसवणूक झाली, असा आरोप आहे.
देवीशा इन्फ्राचे संचालक समीर आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात जूनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण असल्याने लाचलुचपतविरोधी विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे.
कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता गोळा करून विविध बनावट कंपन्यांत गुंतवल्याप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.
ऑफस्पिनर रमेश पोवार निवृत्त
तब्बल १५ वर्षे दर्जेदार क्रिकेट खेळल्यानंतर भारताचा ऑफस्पिनर म्हणून काही काळ योगदान देणारा मुंबईचा क्रिकेटपटू रमेश पोवार याने अखेर स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
३७ वर्षीय रमेश पोवारने २ कसोटी सामने व ३१ वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दोन कसोटी सामन्यात पोवारने सहा विकेटस घेतले. वनडेत त्याच्या खात्यात ३४ विकेटस जमा आहेत.
मुंबईसाठी मात्र त्याने दिलेले योगदान अधिक प्रभावी होते. तब्बल ४४२ विकेटस त्याच्या नावावर जमा आहेत. साईराज बहुतुलेसह त्याने मुंबईला अनेक रणजी विजेतीपदे जिंकून देण्यात मोलाची जबाबदारी बजावली.
पोवारने कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात राजस्थान व गुजरातचेही प्रतिनिधित्व केले.
एडीबीचे भारताला कर्ज
आशियाई विकास बँक भारताला २७३ दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात बँकेबरोबर केंद्र सरकारने एक करार केला आहे.
या कर्जातून आसाम, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओदिशा व पश्चिम बंगाल येथील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त केले जातील. हे कर्ज भारताला तीन टप्प्यांत दिले जाईल.
यातून ग्रामीण भागात कोणत्याही हवामानात टिकू शकतील, असे सुमारे ६ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जातील, ज्यामुळे ४ हजार २०० कुटुंबांना लाभ होईल.
निफ्टी निर्देशांकाचे नाव आता ‘निफ्टी ५०’
३ नोव्हेंबर १९९५ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टी निर्देशांक आता ‘निफ्टी ५०’ नावाने ओळखला जाईल.
एनएसईची समूह कंपनी असलेल्या ‘इंडिया इन्डेक्स सव्र्हिसेस अॅण्ड प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने सीएनएक्स निफ्टीसह विविध ५३ निर्देशांकांच्या नामाभिधानातही बदल केला आहे.
गत दोन दशकांत निफ्टी ५०चे बाजारमूल्य ५८.५ टक्क्यांनी वाढले आहे. तर १६ क्षेत्रामध्ये वित्तीय सेवा विभागाने ३१ टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत निफ्टी ५० या निर्देशांकाने ११ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी ५० ने २००९ मध्ये सर्वाधिक, ७५.८० टक्के परतावा दिला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी : चित्रा रामकृष्ण