चालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१५
‘स्त्रीधन’ अधिकार अबाधित
- कायद्याने लग्न संपुष्टात आले नसले, किंवा घटस्फोट झाला असला तरीही महिला त्यांचे 'स्त्रीधन' पती अथवा सासरच्या मंडळींकडून घेऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
- विवाहापूर्वी, विवाहावेळी किंवा बाळाच्या जन्मावेळी महिलेला दिली जाणारी जंगम किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे 'स्त्रीधन' आहे. कायद्याने विभक्त झाली नसली तरी किंवा तिचा घटस्फोट झाला असला तरी कोणतीही महिला यासाठी खटला दाखल करू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ मधील महिला सरंक्षणाच्या कलम १२ नुसार तिला तो अधिकार आहे.
- पती किंवा त्यांच्या कुटुंबियांना ही संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या 'स्त्रीधना'ची हानी झाल्यास त्या दिवसापासून त्यांच्यावर नियमित गुन्ह्याची नोंद होऊ शकते, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये 'कार फ्री डे'
- जगातील प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर असल्याने राजधानीतील प्रदूषण कमी करण्यासाठी २२ जानेवारी २०१६ हा दिवस 'कार फ्री डे' करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला आहे.
- या दिवशी सरकारी कार्यालयात कोणीही कार आणणार नाही. तर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यादिवशी सायकलचा वापर करायचा आहे.
जोकोविच 'एटीपी वर्ल्ड टूर'चा चौथ्यांदा विजेता
- जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा ६-३, ६-४ असा पराभव केला.
- एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या ४६ वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे. यापूर्वी पीट सॅम्प्रस आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे. मात्र, यांनी सलग विजेतेपदे मिळविलेली नाहीत.
- जोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे. त्याने या वर्षात खेळलेल्या ८८ सामन्यांपैकी ८२ सामन्यांत विजय मिळविलेला आहे.
विजय मल्या विलफुल डिफॉल्टर
- भारतीय स्टेट बँकेने विजय मल्या, किंगफिशर एअरलाइन्स आणि तिची मूळ कंपनी असलेल्या युनायटेड ब्रिवरीज यांना ‘हेतुपुरस्सर कर्जबुडवे’ (विलफुल डिफॉल्टर) घोषित केले आहे.
- विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने भारतीय स्टेट बँकेसहित अन्य १६ बँकांचे सुमारे ७ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून मूळ कर्ज २०१०मध्ये घेतले आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँकेचे थकित कर्ज १ हजार ६०० कोटी रुपये आहे.
किंगफिशर एअरलाइन्सकडून थकित असलेली कर्जे |
भारतीय स्टेट बँक | १६०० कोटी रु. |
पंजाब नॅशनल बँक | ८०० कोटी रु. |
आयडीबीआय बँक | ८०० कोटी रु. |
बँक ऑफ इंडिया | ६५० कोटी रु. |
बँक ऑफ बडोदा | ५५० कोटी रु. |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया | ४१० कोटी रु. |
युको बँक | ३२० कोटी रु. |
कॉर्पोरेशन बँक | ३१० कोटी रु. |
स्टेट बँक ऑफ म्हैसूर | १५० कोटी रु. |
इंडियन ओव्हरसीज बँक | १४० कोटी रु. |
फेडरल बँक | ९० कोटी रु. |
पंजाब अँड सिंध बँक | ६० कोटी रु. |
अॅक्सिस बँक | ५० कोटी रु. |
बँक ऑफ बडोदामध्ये 'घोटाळा'
- सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सहा हजारहून अधिक कोटींचा 'हवाला घोटाळा' झाल्याचे उघडकीस आले आहे.
- काही उद्योजकांनी बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून फेरीवाले, रिक्षावाले व मजुरांच्या नावे बनावट खाती उघडून हा घोटाळा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत हाँगकाँग, दुबईसारख्या ठिकाणी ६ हजार कोटींहून अधिक पैसे बेकायदेशीररित्या पाठवण्यात आले आहेत.
- केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा व सक्तवसुली संचलनालयातर्फे या घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा