चालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१५

रघुराम राजन ‘बीआयएस’चे उपाध्यक्ष

    Raghuram Rajan
  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची ‘बॅंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट’च्या मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘इंटरनॅशनल सेटलमेंट बँके’चे (बीआयएस) मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बेसल येथे आहे.
  • ‘बीआयएस’ जागतिक पातळीवर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये चलन धोरण आणि आर्थिक स्थिरता राखण्याचे काम करते. बीआयएस मंडळाची वर्षातून किमान सहा वेळा बैठक होते.
  • बीआयएसच्या मंडळात अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्ष जॅनेट येलेन, बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्नी, बँक ऑफ जपानचे गव्हर्नर हारुहिको कुरोदा यांचाही समावेश आहे.
  • डॉ रघुराम राजन यांना १० नोव्हेंबर २०१५ पासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी उपाध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. राजन यांची डिसेंबर २०१३ मध्ये बीआयएसच्या मंडळावर निवड झाली होती.
  • बीआयएस मंडळ अध्यक्ष : जेन्स वाइडमन

‘जीसॅट-१५’ या प्रगत दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

GSAT 15
  • भारताच्या ‘जीसॅट-१५’ या प्रगत दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयानामधील कौरोऊ येथून ११ नोव्हेंबर २०१५ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कर्नाटकातील हासन येथून या उपग्रहाचे नियंत्रण करण्यात येणार आहे.
  • भारताच्या या उपग्रहासोबत सौदी अरेबियाचा ‘अरबसॅट-६बी’ (बद्र-७)चेही प्रक्षेपण करण्यात आले.
  • ‘एरिन-५ व्हीए-२२७’ या प्रक्षेपकामार्फत या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
 कार्ये 
  • हा उपग्रह दूरसंपर्क क्षेत्रासाठी आहे.
  • त्यामध्ये केयू बँडची इशारादर्शक यंत्रणा आहे.
  • सध्याच्या उपग्रह प्रणालीची क्षमतावृद्धी आणि मुदत संपणाऱ्या उपग्रहाची ‘जीसॅट-१५’ जागा घेणार.
  • हवाई वाहतूक यंत्रणेसाठी दिशादर्शनाची कामे करणे.
  • जीपीएसच्या धर्तीवर स्थाननिश्चिती करणाऱ्या भारतीय यंत्रणेला माहिती पुरविणे.
  • सध्या भारतीय उपग्रह यंत्रणेत (इन्सॅट) ट्रान्सपाँडरची कमतरता असून, जीसॅट १५ मुळे ती भरून निघण्यास हातभार लागेल.
  • जीसॅट १५मुळे इस्रोला केयू बँडच्या भारतीय ग्राहकांना अखंड सेवा पुरवणे शक्य होईल. या उपग्रहावरील गगन यंत्रणेमुळे हवाई वाहतूक क्षेत्र आणि भारतीय विभागातील विविध स्थानाधारित सेवांना बळकटी मिळणार आहे.

‘जीसॅट-१५’बद्दल
वजन
३१६४ किलो
आयुष्यमान
१५ वर्षे
बनावट
स्वदेशी
कार्य श्रेणी
जीसॅट/इन्सॅट
उपग्रहावरील यंत्रणा
जीपीएसवर आधारित जीओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन (गगन)
इतर वैशिष्ट्ये
उपग्रहावर २४ ट्रान्सपॉँडर - एल १ आणि एल ५ बँडमध्ये कार्यरत राहणार

युनूस खानची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

  • पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज युनूस खान याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. युनूस कारकिर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
  • इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध चार एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
  • ३७ वर्षीय युनूस खानचा हा कारकिर्दीतील २६५वा एकदिवसीय सामना असेल. त्याने आतापर्यंत ७२४० धावा केल्या आहेत. त्यात ७ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. युनूसने १६ वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध कराची येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

उल्फा अतिरेकी संघटनेचा महासचिव अनूप चेतिया भारताच्या ताब्यात

  • आसाममधील सक्रीय असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रन्ट ऑफ आसाम (उल्फा) अतिरेकी संघटनेचा महासचिव अनूप चेतिया याला बांगलादेशने भारताच्या स्वाधीन केले.
  • बांगलादेशमधील कारागृहात गेल्या अठरा वर्षांपासून अनूप चेतिया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर बांगलादेशने त्याला भारताच्या स्वाधीन देण्याचा निर्णय घेतला.
  • बांगलादेशने अनूप चेतियासह लक्ष्मी प्रसाद गोस्वामी आणि बाबुल शर्मा यांनाही भारताच्या ताब्यात दिले आहे.
  • उल्फा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेचा चेतिया हा महासचिव आहे. त्याच्यावर आसाममध्ये पोलिसांची हत्या, अपहरण, बनावट नोटांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
  • त्याला १९९७मध्ये बांगलादेशमध्ये बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेवेळी त्याच्याकडे सोळा देशांतील चलने सापडली होती.

मोदींचा ब्रिटन आणि तुर्कस्तान दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत. नऊ वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान ब्रिटनला भेट देणार आहेत. या दौऱ्यात संरक्षणासह आर्थिक व व्यापारी सहकार्यविषयक करार होणे अपेक्षित आहे.
  • ब्रिटन भेटीत मोदी ब्रिटिश संसदेत भाषण करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी ब्रिटिश संसदेपुढे भाषण करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. 
  • आपल्या पहिल्या टप्प्यात मोदी १२ ते १४ नोव्हेंबर या काळात ब्रिटनला भेट देणार आहेत. भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर महाराष्ट्र सरकारने अलीकडेच विकत घेतले आणि तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्यास मोदी भेट देणार आहेत. याखेरीज बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरणही ते करणार आहेत. 
  • तुर्कस्तानात मोदी १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ‘जी-20’ समूहाच्या बैठकीसाठी जाणार आहेत. या बैठकीत टिकाऊ विकास उद्दिष्टांच्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

स्वित्झर्लंडबरोबरचा प्रशिक्षक विमानाबाबतचा करार अंमलात

  • स्वित्झर्लंडची संरक्षण साहित्य पुरविणारी कंपनी पिलॅटसने भारतीय हवाई दलाकडे ७५वे पीसी-७ एमके-२ हे प्रशिक्षण विमान सुपूर्त करत तीन वर्षांपूर्वी झालेला करार पूर्णपणे अंमलात आणला आहे.
  • सुमारे ५० कोटी डॉलरच्या या करारानुसार स्वित्झर्लंडने ७५ प्रशिक्षक विमाने आणि प्रशिक्षण यंत्रणा या कंपनीने भारताला दिली आहे.
  • फेब्रुवारी २०१३ मध्ये भारताला पहिले विमान मिळाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मिळत गेलेल्या या विमानांनी आतापर्यंत चाळीस हजार तास उड्डाण केले आहेत.

म्यानमारमध्ये लोकशाही

Aung San Suu Kyi
  • म्यानमारमध्ये आँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाने निवडणुकीत विजय मिळवला आहे. म्यानमारमधील काही दशकांची लष्करी सत्ता आता संपुष्टात येईल असे चित्र आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
  • १९९० मध्ये स्यू की यांच्या पक्षाने प्रथमच निवडणुकीत भाग घेतला होता. या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांनी लष्करी राजवटीच्या विरोधात कौल दिला असल्याचे संकेत होते.
  • किमान पन्नास वर्षे या देशात लष्कराने राज्य केले. त्यात मतभेदाचे सूर काढणाऱ्यांना ठार करण्यात आले, काहींना तुरुंगात टाकण्यात आले. प्रचंड भ्रष्टाचार व चुकीची आर्थिक धोरणे यामुळे देश डबघाईस आला होता. २०११ नंतर तेथे निमलष्करी राजवट होती.
  • सत्ताधारी युनियन सॉलडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पक्षाला (यूएसडीपी) ४४० सदस्यांच्या सभागृहात केवळ पाच जागा मिळाल्या आहेत.
  • म्यानमारमध्ये २५ टक्के संसदीय जागा लष्करासाठी असतात. अजूनही एनएलडी पक्षाला निवडणूक आयोगाकडून लाचखोरी होण्याची भीती वाटते आहे. एनएलडीला बहुमतासाठी ६७ टक्के जागांची आवश्यक आहे.
  • परदेशात जन्मलेली मुले असलेल्या व्यक्तीला अध्यक्ष होता येणार नाही असे कलम तेथील राज्यघटनेत आहे. ते बदलता आले तरच स्यू की अध्यक्ष होऊ शकणार आहे.

फॉर्च्यून इंडियाच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य प्रथम

  • फॉर्च्यून इंडियाच्या यादीत भारतीय उद्योग क्षेत्रातील आधादिच्या महिलांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.
  • आयसीआयसीआयच्या चंदा कोचर व अ‍ॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांना दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला आहे.
  • एचपीसीएलच्या अध्यक्षा निशी वासुदेव यांना चौथे, तर एझेडबी व पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक झिया मोदी व केपगेमिनी इंडियाच्या कार्यकारी प्रमुख अरूणा जयंती यांना पाचवे स्थान मिळाले आहे. पहिल्या पाचही महिलांनी गेल्यावेळचे स्थान कायम राखले आहे. जयंती या गेल्या वर्षी सातव्या क्रमांकावर होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा